हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नच्या मैदानावर रंगला. या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली. टीम इंडियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला तो कर्णधार अजिंक्य रहाणे याने. रहाणेने पहिल्या डावात 112 धावांची शतकी खेळी करत संघाला समाधानकारक धावसंख्या रचून दिली.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावात 326 धावांपर्यंत मजल मारली आणि 131 धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात रहाणे फलंदाजीला आला तेव्हा टीम इंडियाच्या 2 बाद 61 धावा झाल्या होत्या. रहाणेसमोरच पुजारा, विहारी आणि पंत हे तीन खंदे फलंदाज माघारी परतले. मात्र रहाणेने अष्टपैलू रवींद्र जाडेजाला हाताशी घेत टीम इंडियाला तारुण नेले. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 121 धावांची मौल्यवान भागिदारी केली.
बाद होण्यापूर्वी अजिंक्य रहाणे याने 223 चेंडूत 112 धावा केल्या. यात त्याने 12 वेळा चेंडू सीमापार पोहोचवला. अष्टपैलू रवींद्र जाडेजा याने देखील 57 धावांची खेळी करत संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
अजिंक्य रहाणे याने मेलबर्नमध्ये आपले कसोटी कारकिर्दीतील 12 वे शतक ठोकले. एक दिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 3 शतकांची नोंद आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रहाणेने जेव्हा शतक ठोकले आहे तेव्हा टीम इंडिया अजिंक्य राहिली आहे. रहाणेच्या एकाही शतकाच्या वेळी टीम इंडियाला पराभवाचे तोंड पहावे लागलेले नाही हा एक अनोखा विक्रम आहे.
रहाणेने एक दिवसीय क्रिकेटमध्ये 2014 ला इंग्लंडविरुद्ध 106, 2014 ला श्रीलंकेविरुद्ध 111 आणि 2017 ला वेस्ट इंडीजविरुद्ध 103 अशी शतकी खेळी केली आहे. या तिन्ही शतकांवेळी टीम इंडियाचा विजय झाला आहे. एक दिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 90 सामन्यात 2962 धावा चोपल्या आहेत. 111 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये रहाणेच्या नावावर 12 शतकांची नोंद आहे. 2014 ला ऑस्ट्रेलियाविरुद्धच त्याने आपले पहिली कसोटी शतक ठोकले होते. यात त्याने 118 धावा केल्या होत्या. हा सामना अनिर्णित राहिला होता. त्यानंतर 2014 ला इंग्लंडविरुद्ध 104 धावा (विजय), 2014 ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 147 धावा (अनिर्णित), 2015 ला श्रीलंकेविरुद्ध 126 धावा (विजय), 2015 ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 127 (विजय), 2015 ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 100 (विजय), 2016 ला वेस्ट इंडीजविरुद्ध नाबाद 108 (अनिर्णित), 2016 ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 188 धावा (विजय), 2017 ला श्रीलंकेविरुद्ध 132 (विजय), 2019 ला वेस्ट इंडीजविरुद्ध 102 (विजय), 2019 ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 115 धावा (विजय) आणि 2020 ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 112 धावा (विजय) अशी शतकी खेळी केली आहे.
रहाणेने आतापर्यंत 15 आंतरराष्ट्रीय शतक ठोकले असून यात टीम इंडियाला 12 वेळा विजय मिळाला आहे. तसेच त्याच्या 12 कसोटी शतकांच्या वेळी टीम इंडियाने 9 वेळा विजयी झेंडा फडकावला आहे, तर तीन वेळा सामना अनिर्णित राखला आहे. विशेष म्हणजे गेल्या पाचही शतकांवेळी टीम इंडिया विजयी झाली आहे.
सौजन्य : दैनिक सामना