थोडक्यात माझ्या आसपास जे कम्युनिस्ट, समाजवादी वातावरण होते, त्यांच्यापेक्षा शिवसेनेची ओळख पहिल्यांदा झाली आणि ती वार्यागत भिनली. कदाचित हेमूने जशी शिवसेना आणून हातात भगवा झेंडा दिला, तसा इतर कुणी दिला नाही. खटावकर नावाच्या गृहस्थानी संघाची शाखा चालवायचा क्षीण प्रयत्न केला, पण खेळ म्हणूनसुद्धा फार कुणाला ते रूचले नाही. सेवादल वगैरे नव्हतंच. केवळ आणि केवळ शिवसेना पोहचली.
परळच्या हाफकिन इन्स्टिट्यूटच्या स्टाफ क्वार्टर्समध्येच माझा जन्म झाला व इयत्ता नववी पास होईपर्यंत मी तिथेच रहात होतो. संमिश्र मध्यमवर्गीय वस्ती होती.
डॉ. शिरोडकर शाळेत अगदी मॉन्टेसरीपासून होतो. त्यामुळे जन्मापासून एक घर, एक शाळा असं नववीपर्यंत सरळसोट आयुष्य होतं. नंतर आम्ही उल्हासनगरला रहायला गेलो. पण जन्मापासून ते नवव्या इयत्तेपर्यंतच्या प्रवासातच मला साधारण पाचवीपासून ज्या तीन गोष्टींनी भारून टाकलं होतं त्या होत्या मार्मिक, शिवसेना व बाळ ठाकरे!
हे आज वाचून अनेकांच्या तोंडाचा आ वासला जाईल तरी यात काहीही अतिशयोक्ती नाही!
मार्मिकच्या आठवणी सांगायच्या असल्याने इतर तपशील वगळून मुद्यावर येतो. आमच्या चाळीत चौथ्या मजल्यावर राहणारे हा जरा वरचा क्लास समजला जाई. तर आमच्याकडे वडील लोकसत्ता नियमित. कधीतरी मराठा घेत. धर्मयुगही येत असे नियमित.
शेजारी महाराष्ट्र टाइम्स येत असे. तेंव्हा त्याचा मटा झाला नव्हता. तरीही तरूण व शालेय मुलांना महाराष्ट्र टाइम्सच आवडे, कारण त्याचे मागचे पूर्ण पान खेळासाठी राखीव असे.
कशी कोण जाणे पण मला शालेय वयातच राजकीय बातम्या वाचायची सवय झाली. आता यात मुलाचे पाय वगैरे छाप काही नव्हतं, कारण राजकारणाप्रमाणेच, सिनेस्टार्स, बिनाका गीत माला, क्रिकेट ही तेवढ्याच तीव्रतेने आवडत असे. क्रिकेटपटूंच्या तर चिकटवह्याही केल्या होत्या. वर्तमानपत्रात अग्रलेख, लेख असं काही कळत नसे, मात्र रविवार पुरवणीत किशोर कुंज वाचत असे. तसेच त्या काळात नवशक्तीत प्रमोद नवलकर भटक्याची भ्रमंती म्हणून भटक्या या टोपणनावाने सदर चालवीत. ते सर्वच लोक उत्सुकतेने वाचत. अग्रलेख म्हणून जर मी त्या काळात वाचला असेन तर तो मार्मिकचा!
आमच्या चाळीत हेमू गुप्ते नामक देखण्या तरुणाने शिवसेना नावाचे वादळ आणले. तेंव्हा तो असेल जेमतेम विशीत किंवा जरा जास्त. आमच्याच एक घर पलीकडे रहाणारे गुर्जर नियमित मार्मिक घेत!
पण हेमूने शिवसेना आणली आणि वातावरण भगवं करून टाकलं. दिवाळीच्या चांदण्या सर्व भगव्या! एका मजल्यावर बारा चांदण्या! हेमूच्या नेतृत्वाखाली बांबू तासण्यापासून पार झिरमुळ्या लावणे, सोनेरी पट्ट्या लावणे असा सर्व आजच्या भाषेत स्वदेशी, ऑर्गनिक, पर्यावरणपूरक कारभार.
कारण शिवसेनेचे वामनराव महाडिक आठ पक्षांचा पराभव करून निवडून आले होते.
वामनरावांच्या प्रचारार्थ हेमूने एक भली मोठी प्रचार भित्तीपत्रिका माझा मोठा भाऊ मोहनकडून बोरूने लिहून घेतली होती. ती लोकांच्या आकर्षणाचा भाग झाली होती.
त्याआधी ६७ की ६८ ला महापालिकेच्या निवडणुका प्रजा समाजवादी पक्ष व शिवसेना यांनी एकत्रित लढवल्या. प्रसप म्हणजे काय हे काही कळत नव्हतं. पण निकालाच्या दिवशी सेना- प्रसपची घौडदौड असं रस्त्यावर खडूने लिहिताना अंगात प्रचंड उर्जा येत असे. मतदानाच्या दिवशी एरव्ही बाहेरूनच पाहिलेल्या उडप्याकडे वडासांबार मोफत खायला मिळाला हे ही एक अप्रुप होतंच. आमच्या भागातून विजय पर्वतकर नावाचे तानाजीसारख्या मिशा असणारे उंच गृहस्थ शिवसेनेचे नगरसेवक झाले. त्यांचा मुलगा शिरोडकरलाच होता!
थोडक्यात माझ्या आसपास जे कम्युनिस्ट, समाजवादी वातावरण होते, त्यांच्यापेक्षा शिवसेनेची ओळख पहिल्यांदा झाली आणि ती वार्यागत भिनली. कदाचित हेमूने जशी शिवसेना आणून हातात भगवा झेंडा दिला, तसा इतर कुणी दिला नाही. खटावकर नावाच्या गृहस्थानी संघाची शाखा चालवायचा क्षीण प्रयत्न केला, पण खेळ म्हणूनसुद्धा फार कुणाला ते रूचले नाही. सेवादल वगैरे नव्हतंच. केवळ आणि केवळ शिवसेना पोहचली.
शिवसेना स्थापन व्हायच्या आधीपासून मार्मिक होता. व्यंगचित्र साप्ताहिक, ते ही राजकीय; मला चांदोबा, फुलबाग वाचायच्या काळात आकर्षून घेऊ शकले. कदाचित लहानपणापासूनची चित्रकलेतली गती व आवड यामुळे ते झाले असावे.
मार्मिक हे लालबुंद शीर्षक त्याच्या विशिष्ट अक्षरांमुळे आकर्षून घेई. पुढे जे. जे.स्कूलमध्ये गेल्यावर त्याला लोगो म्हणतात व तो फॉन्ट नसून कॅलिग्राफी आहे हे कळलं. आणि ठाकरेंची ब्रशवरील हुकूमत कळली. मार्मिक घेतला की मुखपृष्ठावरच व्यंगचित्र पहायचं. मग थेट मलपृष्ठावर शुध्दनिषादने कुठल्या सिनेमावर लिहिलंय ते पाहून मग सरळ मधलं डबलस्प्रेड पान व त्यावरील रविवारची जत्रा पहायची. याशिवाय पान ३ वर अर्धेपान एक व्यंगचित्र असे. त्याखाली टपल्या व टिचक्या हे सदर कुणी टोच्या लिहित असे. हा टोच्या प्रमोद नवलकरच अशी वदंता होती. एखादी बातमी वा वक्तव्य देऊन त्याखाली टोच्याची टपली वा टिचकी असे. ती विनोदीच पण निर्विष असे. असेच अर्धे पान व्यंगचित्र रविवार जत्रेनंतर पान दोन पान सोडून असे. ही अर्धपानी व्यंगचित्रे बरेचदा श्रीकांत ठाकरेंची असायची. त्यांच्या व बाळासाहेबांच्या शैलीत तसूभरही फरक नव्हता. अगदी अक्षरही सारखेच. नंतर हाच छाप विवेक सबनीस व राज ठाकरेंच्या व्यंगचित्रात आपल्याला दिसतो.
मार्मिकचे मुखपृष्ठ म्हणजे लोगो. शेजारी संपादकीयाचे शीर्षक व खाली व्यंगचित्र! एक मुखपृष्ठ आजही मला आठवते. काँग्रेस नऊ राज्यात हरली होती. इंदिरा गांधीचे मोठे टोकदार नाक व त्यावर नऊ मुख्यमंत्री बसलेले माशी सारखे.
शीर्षक होते `नाकी नऊ आले!’
मार्मिकमधली व्यंगचित्रे कॉपी करायची हा माझा छंद! कॉपी करून करून मी इंदिरा गांधी, मोरारजी, जगजीवनराम, नेहरू बरे काढू लागलो. पण हे पेन वा पेन्सिलने! आमचे बाळ ठाकरे थेट ब्रश काळ्या शाईत बुडवून फटकारे मारत. आर्ट स्कूलला गेल्यावर कळलं थेट ब्रशने व्यंगचित्र येरागबाळ्याचे काम नाही. मला लक्ष्मणपेक्षाही चित्रं म्हणून बाळ ठाकरेंची व्यंगचित्र जोरकस व कॅरिकेचर हा शब्द माहीत होण्याआधी व्यंगचित्रातून जो काही लाईकनेस ठाकरे आणत त्याला तोड नसे! मी बाळ ठाकरे असं लिहिण्याचं कारण तेव्हा ते बाळासाहेब झाले नव्हते.त्यांची बाळ ठाकरे ही स्वाक्षरीही मी काही काळ कॉपी करून तसं संजय पवार लिहून पाहिलं!
त्याच सुमारास शिवसेना स्थापनेची हालचाल मार्मिकमधून समजत असे. सेनेचं बोधचिन्ह जबडा वासलेला वाघ असाच ब्रशच्या फटकार्यातून निर्माण केलेला. त्याचीही कॉपी मी करे. पुढे निवडणुकीत भिंती रंगवणारेही तो हुबेहूब रंगवत. आज पन्नास वर्षानंतर वाघ गायब होऊन धनुष्यबाण आले हा गंमतीशीरच बदल.
मार्मिकमधील व्यंगचित्रांनंतर संपादकीय हा मुख्य भाग. ती भाषा, ते तडाखे, सपकारे सर्वच आवडे. याशिवाय मराठी अन्यायावरची `वाचा व थंड बसा अशा मथळ्याची उचकवणारी सदरे वाचकांना आतून पेटवत. पुढे शाखा स्थापना, त्यांचे कार्यक्रम यांचे फोटोसहित वृत्तांत वाढले. पुढे कामगार सेना वगैरे स्थापन झाल्यावर मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिक(च) न राहता शिवसेनेचे मुखपत्र झाले.
शिवसेना वाढली, पुढे सत्ताधारीही झाली आणि मध्ये कधीतरी मार्मिक सप्तरंगीही झाला. तो मार्मिक पाहून मला वाटले, इसमे वो बात नहीं! मार्मिक रंगीत, ग्लॉसी पेपरवर नाही तर न्यूजप्रिंट नी दुरंगीच शोभतो. त्यात व्यंगचित्रांना काळ्या शाईचा जोरकसपणा न्यूजप्रिंटवर जणू दगडावरची काळी रेघ वाटे.
पुढच्या काळात शिवसेनेसोबत मीही बदलत गेलो. पण फ्लॅशबॅकमधले मार्मिक, शिवसेना व बाळ ठाकरे आजही स्मृतीत तसेच आहेत!