केरळमधील 21 वर्षांच्या आर्या राजेंद्रन या देशातील सर्वात तरुण महापौर बनण्याची शक्यता आहे. केरळची राजधानी तिरुवनंतपूरम शहराच्या त्या महापौर बनू शकतात. 21 वर्षांच्या आर्या बीएससीला गणीत हा विषय घेतला असून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरून त्या निवडून आल्या आहेत. तिरुवनंतपूरमच्या सीपीएमच्या जिल्हा समितीने महापौर पदासाठी आर्या यांच्या नावाची शिफारस केली आहे.
सीपीएमच्या जिल्हा समितीने केलेली ही शिफारस मान्य झाल्यास आर्या यांचा महापौर बनण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या शिफारसीला सीपीएमच्या राज्य समितीद्वारे मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. आर्या यांनी तिरुवनंतपूरमच्या महापालिका निवडणुकीत मुडावंमुगल वार्डमधून निवडणूक लढवली होती. त्यात त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. आर्या यांचे वडील इलेक्ट्रिशयन असून आई गृहिणी आहे.
आर्या या सर्वात तरुण नगरसेवक असून महापौरपदासाठी योग्य असल्याचे सीपीएमच्या जिल्हा समितीने म्हटले आहे. सीपीएमने महापालिका निवडणुकीत उभ्या केलेल्या उमेदवारांमध्ये आर्या या सर्वात तरुण उमेदवार आहेत. कमी वयातच त्यांनी या निवडणुकीत यश मिळवले आहे. तर एलडीएफच्या महापौरांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आर्या सीपीएममध्ये लोकप्रिय आहेत.
सौजन्य : दैनिक सामना