वडिलांना शेतीच्या कामात मदत करण्यासाठी मुलाने रिमोट कंट्रोलवर चालणारा ट्रॅक्टर बनवला आहे. राजस्थानमधील बारन जिह्यात राहणाऱया एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या योगेश नागर या तरुणाने ही कमाल केली आहे. योगेश 12वी पास आहे. त्याने तयार केलेला ट्रक्टर केवळ हातातील रिमोटच्या मदतीने शेत नांगरण्यापासून अनेक काम करतो. विशेष म्हणजे हा रिमोट अगदी एक किमी अंतरावरून या ट्रक्टरवर नियंत्रण ठेवू शकतो.
योगेशने हा ट्रक्टर बनवून तीन वर्षे झाली आहेत. मात्र आता त्याचा व्हिडीओ पुन्हा चर्चेत आलाय. 2017 साली बीएससीच्या पहिल्या वर्षी असताना योगेशने हा रिमोट कंट्रोल ट्रॅक्टर तयार केला. ट्रॅक्टर चालवल्यामुळे रामबाबू नगर यांच्या पोटात दुखायचे. डॉक्टरांनी त्यांना ट्रॅक्टर चालवू नका असा सल्ला दिला.
वडिलांना होणारा त्रास पाहून योगेशने शेतात दोन महिने ट्रक्टर चालवला. मात्र चालक नसणारा ट्रॅक्टरही शेतात काम करू शकतो अशी कल्पना दोन महिने ट्रॅक्टर चालवल्यानंतर योगेशला सुचली आणि त्याने ती प्रत्यक्षात उतरवली. त्याने रिमोट कंट्रोल ट्रॅक्टरमधील ट्रान्समिटरशी जोडला. आतापर्यंत 60 पेक्षा अधिक जणांनी योगेशकडे संपर्क करून अशाप्रकारे ट्रॅक्टर चालवणारे रिमोट कंट्रोल बनवून देण्याची मागणी केली आहे.
सौजन्य- सामना