जगात लोकांना हे वर्ष खराब गेलं असलं तरी गायन क्षेत्रातून अभिनयाकडे वळलेल्या अभिनेत्री अमिका शैल हिला मात्र हे वर्ष चांगले ठरले आहे. याच वर्षात ती अभिनेता अक्षयकुमार याच्यासोबत ‘लक्ष्मी’ या सिनेमात चमकली, तर वर्षाच्या अखेरीस तिला आणखी एक वेबसिरीज मिळाली आहे. ‘गंदी बात-5’ आणि ‘मिर्झापूर-2’ या वेबसिरीजनंतर आता ती डिस्ने हॉटस्टार या ओटीटी चॅनलवरील ‘मास्क मॅन’ या नव्या वेब मालिकेतही दिसणार आहे. याच नाताळात तिची ही वेबसिरीज स्ट्रीम होणार आहे.
आपल्या या नव्या प्रोजेक्टबद्दल बोलताना ती म्हणते, ख्रिसमस म्हणजे आनंद… हा सण आलेला असतानाच माझी ही नवी वेब मालिका सुरू होतेय याहून जास्त आनंद कोणता असू शकेल? हे वर्ष संपताना मला खूप चांगले गिफ्ट देऊन जाणार आहे. या वर्षात मला वेगवेगळे रोल करायला मिळाले हे माझे भाग्यच… या वेबसिरीजनंतरही मला आणखी चांगल्या भूमिका मिळू शकतात, ज्याद्वारे एक उत्तम अभिनेत्री अशी माझी ओळख निर्माण होईल, असेही तिने स्पष्ट केले. अमिका शैलने यापूर्वी ‘उडान’, ‘दिव्य शक्ती’ आणि ‘वायू परी’ या मालिकांमध्येही काम केले आहे. तिची भूमिका असलेली ‘मास्क मॅन’ ही वेबसिरीज रोमान्टीक थ्रिलर आहे. आपल्या आधीच्या प्रोजेक्ट्सना प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसाच तो नव्या वेबसिरीजलाही मिळेल अशी तिला आशा आहे.