लॉकडाऊनमुळे ओटीटी माध्यमांचे चांगलेच फावले. नवनवी ओटीटी माध्यमे उदयाला आलीच, पण जुन्या ओटीटींनाही सुगीचे दिवस आले. अल्ट बालाजी आणि झी फाईव्ह या ओटीटींनी नव्या वर्षातही छान छान वेब मालिका आणण्याचा सपाटा लावला आहे. यातलीच पहिल्या ‘क्रॅश’ नावाच्या वेबसिरीजचे पहिले पोस्टर अल्ट बालाजीने आज सोशल माध्यमांवर रिलीज केले. यात झैन इमाम (ऋषभ), रोहन मेहरा (रहीम), अदिती शर्मा (काजोल), अनुष्का सेन (आलिया) आणि कुंज आनंद (कबीर) यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत.
ही कहाणी चार बहीण भावांची कहाणी आहे. बऱ्याच वर्षांनी ही चारही भावंडे प्रथमच एकमेकांना भेटतात. तेव्हा त्यांच्या एकमेकांच्या जिव्हाळ्याचे, त्या प्रत्येकाच्या मनात असलेल्या आपापल्या जीवलगांचे, प्रेमाचे यात दर्शन होईल. अल्ट बालाजीची ही वेबसिरीज येत्या फेब्रुवारीत स्ट्रीम होणार आहे. ही वेबसिरीज प्रेक्षकांना नक्की आवडेल असा निर्मात्यांना विश्वास आहे.