इअर एंडची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची जत्थे अलिबागसह रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करा, अन्यथा नियम मोडणारे दुकानदार, हॉटेलचालक, रिसॉर्ट, फार्महाऊस मालक यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांच्या व्यवसायाला सात दिवस टाळे ठोकले जाईल असा इशारा रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिला आहे.
ब्रिटनमध्ये नवा घातकी कोरोना सापडला आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमुळे त्याचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे मुंबईपाठोपाठ रायगड जिल्ह्यातही रात्री 11 ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी तोबा गर्दी होऊ लागली आहे. पर्यटन वाढले असले तरी कोरोनाच्या संकटाची टांगती तलवार अजूनही कायम आहे. त्यामुळे नाईट कर्फ्यूचे नियम तोडले तर थेट सात दिवसांच्या व्यवसाय बंदीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
मुरुड जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद
मुरुडमध्ये पर्यटनासाठी डेरेदाखल झालेला पर्यटकांची मुरुड जंजिरा किल्ला पाहण्याची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे हा किल्ला रविवारी पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.
यंदा वसईचा नाताळ शिस्तीच्या चौकटीत
निसर्गरम्य आणि सुशेगाद वसईत यंदा नाताळ स्पेशल चौकटीतच साजरा होणार आहे. वसईकरांचे आकर्षण असलेल्या वसई कार्निवल तसेच कुपारी महोत्सव रद्द करण्यात आला आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ख्रिस्ती बांधव अत्यंत साधेपणाने नाताळ साजरा करणार आहेत. नाताळच्या पार्श्वभूमीवर वसईत विविध चर्चमधून प्रार्थनेचे सूर ऐकू येऊ लागले असून बाजारपेठा देखील रंगीबेरंगी आकाशकंदील, जिंगल बेल्स आणि ख्रिसमस ट्रीने फुलल्या आहेत. यंदा कार्निवल साजरा न करण्याचा निर्णय या कमिटीचे अध्यक्ष फ्रेडी डिमेलो यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केला आहे तर ख्रिस्ती कुपारी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जिम रॉड्रिक्स यांनी कुपारी महोत्सव रद्द करत असल्याचे कळवले आहे आहे.
ठाण्यात कडक कर्फ्यू
रात्रीची संचारबंदी लागू झाल्यानंतर संध्याकाळीच ठाणे पोलिस बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरले. त्याआधी त्यांनी कोरोना रुग्णांसाठी रक्तदानही केले. संचारबंदीची आधीच दवंडी दिल्याने ठाणेकर हे देखील आदेश पाळत असल्याने, रात्री अकरानंतर रस्त्यांवर शुकशुकाट पसरत आहे .
सौजन्य- सामना