राजकीय स्वार्थ साधण्यासाठी किंवा एका ठरावीक पक्ष-नेत्याला बदनाम करण्यासाठी षड्यंत्र रचून सोशल मीडियाचा गैरवापर करण्यात आल्याचे आता पुराव्यानिशी स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र पोलिसांचा सायबर सेल विभाग अशा समाजविघातक घटकांवर कडक नजर ठेवून आहे. निवडणूक लढा, नक्कीच लढा, पण अशा पद्धतीचे घाणेरडे राजकारण करू नका. यापुढील काळात सोशल मीडियाचा गैरवापर केला तर तो घटक-व्यक्तींची गय केली जाणार नाही…सुशांतसिंह केसपासून राजकीय पक्ष-व्यक्तींना टार्गेट करण्याच्या झालेल्या प्रकारांचे दाखले देत सोशल मीडियाच्या दाहक वास्तवावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खास मार्मिकसाठी टाकलेला हा करडा दृष्टिक्षेप…
गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजविघातक कृत्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. मात्र महाराष्ट्र पोलिस सायबर सेल विभागाच्या माध्यमातून आम्ही अशा घटकांची पाळेमुळे खणून काढत त्यांच्यावर जरब बसविण्यासाठी कडक पावले उचलत आहोत.
भारतीय जनता पक्षाने सोशल मीडियाचा गैरवापर करून अतिशय घाणेरडे राजकारण केले आहे. पेड युजर्स, फेक प्रोफाईल, एका ट्विटसाठी तब्बत सात रुपये देऊन विकत घेतलेल्या पोस्ट (बॉट) आदींच्या माध्यमातून भाजप आयटी सेलने सोशल मीडियाचा गैरवापर केला. फेक न्यूज प्रसारित करून वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी खोटी वातावरणनिर्मिती केली. पालघर केसमध्ये काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात ट्रेंड चालविण्यात आला. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळेल, व्यक्तिगत नेतेमंडळी, पक्षांची कशी बदनामी केली जाईल, समाजात तेढ कशी पसरवली जाईल अशा कुहेतूंनी प्रेरित असा सोशल मीडियाचा गैरवापर करण्यात येत आहे. आम्ही ते पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख अमित मालवीय याच्यासह सुनयना होले, सुरेश नखू, प्रतीक करपे, जितिन गजेरिया, आशीष नेरखड, सुमित ठाकूर, विभोर आनंद आदींवर कारवाई केली आहे. त्यापैकी ठाकूर आणि आनंद यांना अटकदेखील करण्यात आली आहे.
सुशांतसिंह प्रकरणाच्या माध्यमातून मुंबई-महाराष्ट्राला बदनाम करण्यात आले. मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर शंका उपस्थित करण्यात आल्या. अखेर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारची भूमिका योग्य असल्याचा निर्वाळा दिला, परंतु या सर्व सुशांतसिंह प्रकरणात भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या आयटी घटकांकडून सोशल मीडियाचा फार मोठ्या प्रमाणावर गैरवापर करण्यात आला. जाणीवपूर्वक अपप्रचार केला गेला. वस्तुस्थितीचा विपर्यास करून समाजमाध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरविण्यात आली. त्यामधून बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायदा लाटण्यात आला. तसेच महाराष्ट्र-मुंबईला बदनाम करण्याचे सुनियोजित षड्यंत्र रचण्यात आले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बदनामीचा तपशीलवार उलगडा महाराष्ट्र पोलिसांच्या तपासात करण्यात आला आहे.
आता हेच पाहा ना – बायपोलर सिंड्रोम वगैरेच्या माध्यमातून प्रारंभी सुशांत हा मानसिक रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. तो बिहारमधील अत्यंत हुशार-होतकरू मुलगा होता. करीअर करण्यासाठी तो मुंबईत आला. मग हाच मुद्दा उचलून बिहारविरुद्ध मुंबई, श्रीमंतविरुद्ध गरीब असे वातावरण करण्यात आले. मुंबईत त्याच्यावर श्रीमंतांच्या प्रस्थापित लॉबीने अन्याय केला. मुंबईची कोटरी त्याला बाजूला ठेवते आहे, अशी आवई उठविण्यात आली. नंतर आणला नेपोटिझमचा मुद्दा.
मग मुख्यमंत्री उद्धवजी, मग दिशा सालियन प्रकरण पुढे करीत आदित्य वगैरेंना टार्गेट करून बदनाम करण्याचे फार मोठे षड्यंत्र रचण्यात आले. त्यामध्ये सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात आला. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलला आम्ही त्वरित अॅलर्ट केलं. २४ तासांत ट्रोलिंगचं प्रमाण ४२ टक्क्यांनी कमी झाले.
तत्पूर्वी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्या विरोधात वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा चुकीचा प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आला. त्यावेळीदेखील सोशल मीडियाचा मोठा गैरवापर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा घटकांवर आपण तातडीने कारवाई केली आहे आणि यापुढेही करणार आहोत.
सोशल मीडियाच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा सायबर सेल आता डोळ्यात तेल घालून काम करीत आहे. अशा समाजविघातक कृतींवर वॉच ठेवण्यात येत आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. निवडणुकीच्या माध्यमातून राजकारण अवश्य करा, राजकीय लढतीला आमची हरकत नाहीच, पण अशा पद्धतीने सोशल मीडियाचा गैरवापर करून घाणेरडे राजकारण करू नका, असे जाहीर आवाहन मी भारतीय जनता पार्टी आणि संबंधित आयटी घटकांना करीत आहे.