महाराष्ट्र सरकारने महिनाभरापूर्वी सिनेमा, नाट्यगृहे सुरू करायची परवानगी दिली तरी रंगभूमी अजूनही नेहमीसारखी फुलली नाहीये. असं का झालं असावं? गाडं अडलंय कुठं? निर्मात्यांना कसली भीती सतावत असावी? प्रेक्षकसंख्या कमी होईल ही भीती की, सरकारी नियमांनुसार अर्ध्या प्रेक्षकांतच नाटक चालवावे लागणार ही धास्ती?
लॉकडाऊन हळूहळू उठवत महाराष्ट्र सरकारने अनलॉक प्रक्रिया सुरू केली. त्यात आता तर महिनाभरापूर्वी म्हणजे पाच नोव्हेंबरला मर्यादित प्रेक्षकसंख्येने का होईना सिनेमा आणि नाट्यगृहे उघडण्यास सरकारने परवानगी दिली. नाट्यगृहे खुली झाली, पण नाटकांचे पडदे काही उघडलेले नाहीत. काही अगदी हाताच्या बोटावर मोजता यावीत अशी एक-दोन नाटके रंगमंचावर आलीही, पण रंगभूमी नेहमीसारखी फुललीच नाही. असं का झालं असावं? तिसरी घंटा झाली, पण गाडं अडलंय कुठं? निर्मात्यांना नेमकी कसली भीती सतावतेय? प्रेक्षक कमी येतील ही भीती की, ते भरपूर आले तरी सरकारी नियमांनुसार अर्ध्या प्रेक्षकांतच नाटक चालवावे लागणार ही धास्ती?
कोरोना संकटातून आपण बर्यापैकी बाहेर पडायला लागलो आहोत. रुग्णसंख्याही आता आटोक्यात येऊ लागली आहे. लोकही ‘कोरोना गेला चुलीत’ असे म्हणत हळूहळू सुटकेचा नि:श्वास टाकत आहेत.
लॉकडाऊन असतानाही लोक मोकळेपणाने बाजारपेठांमध्ये फिरत होते. आता अनलॉक प्रक्रियेमुळे लोक स्वत:ची काळजी घेत मॉल्समध्ये जाऊ लागलेच आहेत ना… मग तसे ते नाटके पाहायलाही नक्कीच येतील, असा ठाम विश्वास स्वत: निर्माता असलेले अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केलाय. त्यांचं ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे लॉकडाऊनपूर्वी ३८५ प्रयोग झालेलं नाटक कोविड संकटानंतर प्रथमच येऊ घातलंय. ते म्हणतात, गेले आठ-नऊ महिने लोकांना मनोरंजनाचं काही साधन नव्हतं. ऑनलाइन किंवा ओटीटीच्या माध्यमाच्या मनोरंजनावर त्यांना समाधान मानावं लागत होतं. असे प्रेक्षक नाटके पाहायला नक्की येणार ही मला खात्री आहे.
ते म्हणाले, नाट्यगृहे उघडली तेव्हापासून रंगीत तालमी वगैरे प्रॉपर सगळं करूनच आम्ही रंगभूमीवर येतोय. त्यासाठीच मधले काही दिवस गेले. आता प्रयोग सादर करताना आम्ही आमच्याकडून सर्व ती काळजी घेत आहोतच. प्रेक्षकांनीही आपापली काळजी घ्यायची आहे. सरकारने ५० टक्के आसनक्षमतेने नाट्यगृहे उघडायला परवानगी दिली आहे. त्यामुळे त्या दृष्टीने खर्चाचे गणित जुळले पाहिजे. सर्वांनी मिळून, एकमेकांना मदत करून जे जमेल ते पाहावे लागणार आहे, असेही ते म्हणाले.
लॉकडाऊननंतरच्या रंगभूमीबाबत बोलताना आणि त्याच दृष्टीने योजना सांगताना प्रशांत दामले म्हणतात, माझ्या ‘तू म्हणशील तसं’ या दुसर्या नाटकाचा लॉकडाऊननंतरचा पहिलाच प्रयोग १२ डिसेंबरला दुपारी कल्याणला आणि १३ डिसेंबरला दुपारी ठाण्याच्या गडकरी रंगायतनला ठेवला आहे.
पण ज्या नाटकात मी काम करतोय, त्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग आम्ही १२ डिसेंबरला पुण्यात ठेवला आहे आणि १३ डिसेंबरला पुण्यातच गंधर्व आणि चिंचवड येथे प्रयोग होणार आहे. म्हणजे आधी येथे मग तेथे असला प्रकार नाही. मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी माझ्या दोन नाटकांचे प्रयोग रंगणार आहेत, असे ते स्पष्ट करतात.
नाट्यगृहे अर्ध्या क्षमतेने चालवायची म्हणजे निर्मात्याला खरं तर नुकसानच… याचे गणित कसे जुळवणार? असा प्रश्न उरतोच. यावर प्रशांत दामले म्हणतात, निर्मात्याला नुकसान तर होणारच आहे. किती होणार ते माहीत नाही, पण होणार हे नक्की. बर्याचशा गोष्टी अजूनही कळायच्या बाकी आहेत. म्हणजे प्रेक्षक किती येणार आहेत कल्पना नाही. तिकिटांचे दरही आम्ही तेच ठेवलेले आहेत, पण मला वाटतं गेले आठ-नऊ महिने लोकांना मनोरंजनाचं काही साधन नव्हतं. ते नाटक पाहायला नक्की येणार अशी मला खात्री आहे.
नाटक पाहायला प्रेक्षक येणारच असं मत अभिनेता अंशुमन विचारे यानेही व्यक्त केलंय. तो म्हणतो, जे खरे नाट्यप्रेमी आहेत ते येतीलच… कोरोनानंतरची रंगभूमीही अधिक जोमाने पुन्हा सुरू होईल. लवकरच सगळं सावट दूर होऊन नाट्यगृहे पुन्हा पूर्वीसारखीच भरगच्च भरलेली दिसतील. लॉकडाऊननंतरची रंगभूमी कशी असेल ते सांगताना अंशुमन म्हणतो, रंगभूमी तीच होती, तीच राहील. सुरक्षिततेच्या दृष्टीने आता काही अटी पाळाव्या लागतील इतकंच… पण कलेबाबत कुठलीही तडजोड झालेली नसेल. फक्त एवढंच की, सेल्फ डिस्टन्स वगैरे प्रिकॉशन्स ज्या आजच्या काळात घ्यायलाच लागणार आहेत त्या घेऊनच आपल्याला पुढे जावे लागणार आहे. त्यासाठी सगळी नाट्यगृहे, निर्माता संघ म्हणा किंवा कलाकारसुद्धा म्हणा, सगळे एकमेकांना बांधील असतील एवढाच काय तो फरक असेल… पण तांत्रिकदृष्ट्या म्हणा किंवा कलेच्या बाबतीत कुठलीही तडजोड होणार नाही.
खूप मोठ्या गॅपनंतर नाट्यसृष्टी पुन्हा सुरू होतेय ही बाब आनंदाचीच आहे. कलाकार बॅक स्टेज आर्टिस्ट निर्माते आणि खास करून रसिकांसाठीही… कारण तेच खरे नाट्यप्रेमी आहेत. त्यांच्यामुळेच आता लॉकडाऊननंतरची रंगभूमीसुद्धा अधिक जोमाने पुन्हा सुरू होईल असं मला वाटतं. लवकरच सगळं सावट दूर होऊन नाट्यगृहे पुन्हा पूर्वीसारखीच भरगच्च भरलेली दिसतील बघा असं तो म्हणतो.
गर्दी टाळण्यासाठी नाट्यगृहे अर्ध्या क्षमतेने भरावीत अशी अट सरकारने घातली आहे. त्यामुळे निर्मात्याचं तसं पाहिलं तर नुकसानच होणार ना त्याबद्दल काय, असे विचारता अंशुमन म्हणतो, त्यावरही उपाययोजना करण्याचा प्रयत्न सर्वच स्तरावर सुरू आहे. बर्याच नाट्यगृहांनी भाडी २५ टक्क्यांवर आणली आहेत. लाईट वगैरे इतर खर्चांमध्येही कपात करण्यात आली आहे. यामुळे प्रॉडक्शन कॉस्टही कमी होणार ना त्यांची! त्यामुळे निर्मात्यांच्या डोक्यावर फार मोठा खर्च नसेल असं मला वाटतं. त्या दृष्टीनेही विचार केला तरी ५० टक्के आसनक्षमतेने नाट्यगृहे सुरू करणेही निर्मात्यांना परवडण्यासारखे आहे, असं मानायला हरकत नसावी.
अंशुमनने हा एक वेगळाच विचार व्यक्त केला. लॉकडाऊनपूर्वी नाट्यगृहांची भरमसाठ भाडी, लाईट व्यवस्थेसाठी लागणारा मोठा खर्च यामुळे निर्मात्याचे कंबरडे मोडले होते. त्यात आता नाट्यगृहे काही महिने बंद होती, पण आताच्या संकटाचा काळ पाहून नाट्यगृहांनीही थोडा विचार केलेला दिसतो. तो नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी शिवाजी मंदिर नाट्यगृहाच्या हरी पाटणकर यांच्याशी चर्चा केली, तेव्हा त्यांनी नाट्यगृहांच्या योजना सांगितल्या. ते म्हणाले, कोरोनामुळे सगळेच लोक त्रासले आहेत. सरकारच्या नव्या नियमांमुळे निर्मातेही धास्तावले आहेत. म्हणून काही नाट्यगृहांनी आपापली भाडी कमी करायला सुरुवात केली आहे. कल्याणचे नाट्यगृह, ठाण्याचे नाट्यगृह, वाशीचे नाट्यगृह येथे भाड्यांमध्ये सूट दिल्यामुळे प्रयोग लागताहेत. मुंबईत म्हणायचं तर दीनानाथ नाट्यगृहाची दुरुस्ती होतेय. महिनाभरात ती पूर्ण झाल्यावर नाट्यगृह सुरू होईल. शिवाजी मंदिरही जानेवारीत चालू होईल अशी अपेक्षा आहे. दामोदर हॉल, साहित्य संघ, रवींद्र नाट्यमंदिर ही नाट्यगृहेही लवकरच म्हणजे डिसेंबरअखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या सुरुवातीला चालू होतील. नाट्यगृहेही चालू होणारच. कारण लोकही कंटाळली आहेत. त्यामुळे काहीतरी उपाय करून नाट्यगृहे चालू करावीच लागणार आहेत. त्यातही मला वाटतं लोकल ट्रेन सर्वांसाठी खुल्या झाल्या की लोक नाटके पाहायला नक्की येतील, असेही हरी पाटणकर म्हणाले. म्हणजे गाडं अडलंय कुठं? याचा उलगडा एव्हाना झाला हे बरं झालं.
ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनीही कोरोनाच्या आधीची रंगभूमी आणि कोरोनानंतरची रंगभूमी यावर मत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या, कोरोनाच्या आधी रंगभूमी मोकळी-ढाकळी होती. आता ती थोडी बंदिस्त होईल इतकंच. कारण लोक येथे नाटके पाहायला येणार ते चेहर्यावर मुखवटे चढवून… एरव्ही आम्ही मुखवटे चढवून स्टेजवर चढतो. आमचा मुखवटा असेल, त्यांचे मास्क असतील… लोकांच्या मनात सध्याच्या काळात थोडी भीती असेलही, पण आम्ही सगळी काळजी घेऊन नाट्यगृहे सुरू करतोय ते लोकांनीही लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांचा जीव जसा धोक्यात असतो तसा आमचाही असतो. लोक आपापल्या कुटुंबाची काळजी घेत असतात, तसंच रंगभूमी, प्रेक्षक हेदेखील आमचं कुटुंबच असतं. त्यामुळे त्यांची पूर्ण काळजी घेऊनच आम्ही पुढे पाऊल टाकतोय.
सरकारने ५० टक्के आसनक्षमतेने नाट्यगृहे सुरू करायची परवानगी दिली आहे. ही राज्य सरकारची खूप चांगली योजना आहे. एकेक आसन सोडून एकेका प्रेक्षकाला बसायला दिले जाणार आहे. काळ तोच आहे. मध्यंतरी काही महिन्यांत लोकांना ऑनलाइन बघण्याची सवय झाली आहे, पण खरे मनोरंजन रंगभूमीच्या मंचावरच आहे. त्यामुळे सगळी काळजी घेऊन आम्ही काम सुरू करतोय. लोकांनीही काळजी घेऊनच नाट्यगृहांमध्ये नाटके पाहायला यावं असं मी सांगेन. लोकांना बर्याच महिन्यांनी जिवंत कलेचा आनंद घेण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. नाटकावर प्रेम असणारे भरपूर प्रेक्षक आहेत. त्यामुळे प्रेक्षक येतील की नाही ही भीती नाही. रंगभूमी धीम्या गतीने सुरू होईल आणि लवकरच पहिल्यासारखी गर्दी नक्की होईल याची मला खात्री आहे, असेही त्या म्हणाल्या.
नाट्यसृष्टी पुन्हा उजळून दे रे महाराजा!
नाटक! मराठी माणसांचं मनोरंजन करणारं नाटक. दीडशेहून अधिक वर्षं परंपरा असलेलं नाटक. कित्येक वर्षे तो वारसा जपणारे आमचे रंगकर्मी. नव्या वळणाचा मागोवा घेणारा नाट्य कलावंत आजही धडपडताना दिसला, दिसतो आणि दिसणार आहे. आमची नाट्यसृष्टी अनेक आव्हानांना तोंड देत विनातक्रार उभी आहे. आलेल्या संकटांवर मात करीत पुन्हा उभी राहिलेली आहे. कोरोना नऊ महिन्यांपूर्वी महाराष्ट्रभर थैमान घालू लागला आणि नाट्यगृह बंद झाल्यामुळे नाटकांचे प्रयोग बंद झाले.
लॉकडाऊनच्या दिवसांत नाटकवाल्यांची आर्थिक परिस्थिती रोडावली. या परिस्थितीवर आत्महत्या हा उपाय नाही हे त्यांनी पुरेपूर ओळखलं आणि रंगकर्मी नवीन व्यवसाय करू लागले.
काहीजणांनी मासे विकण्याचा धंदा सुरू केला. ओल्या माशांबरोबर सुक्या माशांची विक्री करताना फेसबुकवर त्यांचे अपील प्रकर्षानं दिसले. कलाकारांनी त्यांना व्यवसायात चांगलेच प्रोत्साहन दिले. आता त्यांना तो जोडधंदा मिळाला. वैभव मांगले हा चित्रकार आहे हे लॉकडाऊनमुळेच कळलं. त्याने रत्नागिरीला आठ महिने राहून चित्रं काढून ती दर्दी व्यक्तींना विकली. आलेली रक्कम रंगमंच कामगारांना दिली. असे अनेक आर्टिस्ट असतील की ज्यांनी त्या वेळेत वâाहीr आपली कला जोपासली. त्या सर्वांना सॅल्युट.
दोन व्यावसायिक नाट्य निर्माता संघ आता झालेत. एक जुना निर्माता संघ आणि नव्यानं बारसं केलेला जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ. या दोघांनी शासनाशी पाठपुरावा करून आपल्या मागण्या पदरात पाडून घेतल्या तरीही काही मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. क्रेडिट मात्र दोन्ही संघ स्वतःकडे घेताना दिसत आहेत. अरे नाट्य व्यवसाय हा सर्वांचा असताना हे मी केलं ही भावना कदापि नसावी. सरकारने पाच नोव्हेंबरला नाट्यगृह सुरू केली खरी, पण आता महिना झाला तरी प्रयोग सादर होताना दिसत नाहीत. ५० टक्के प्रेक्षक संख्या निर्मात्यांना खर्चाच्या दृष्टिकोनातून मान्य नाही. कारण प्रयोगाचा खर्च जास्त आहे. त्यांनी नाट्यगृहाची भाडी कमी करावीत म्हणून महानगरपालिकेकडे गार्हाणं घातलं आणि त्यांनीसुद्धा ती कमी केली. भाड्यात ७५ टक्के कपात करून नाट्यगृह उपलब्ध करून दिले. एवढं असूनही निर्मात्यांची स्वतःची म्हणजेच नाट्य परिषदेची यशवंत नाट्य मंदिर वास्तू असताना त्याचे भाडं कमी करण्याबाबत कुणीही बोलताना दिसत नाही. उलटपक्षी सरकारने नाट्यगृह उघडायची परवानगी दिल्यावर नाट्य परिषदेच्या त्या वास्तूत नाटकांचे प्रयोग सुरू होणे गरजेचे होते. दुसर्याकडे मागण्या मागताना स्वतःच्या मातृसंस्थेकडे ते मागू शकले नाहीत हे कुणालाच पटणार नाही.
असो.
प्रशांत दामले, भरत जाधव आणि दिलीप जाधव त्यांच्या नाटकांचे प्रयोग डिसेंबरच्या दुसर्या आठवड्यात शनिवार-रविवार करणार आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इतर निर्माते त्याचा कित्ता गिरवतील अशी आशा आहे. शेवटी रंगदेवतेकडे एकच गार्हाणं की नाट्यसृष्टी पुन्हा उजळून निघून दे रे महाराजा…