जगभरात अजूनही कोरोनाचे थैमान सुरूच आहे. अमेरिका, ब्रिटन आणि रशियात कोरोनावरील लस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, तरीही काही देशात कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. त्यामुळे संशोधकांची चिंता वाढली आहे. त्यातच आता ब्रिटनमधून एका धक्कादायक बातमी आली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे स्वरुपाची संशोधकांनी माहिती दिली आहे. हा नव्या स्वरुपातील कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत असल्याने संशोधकांची चिंता वाढली आहे.
हा नव्या स्वरुपातील व्हायरस ब्रिटनच्या दक्षिणपूर्व भागात वेगाने पसरत आहे. ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅकाँक यांनी कोरोनाच्या या नव्या प्रकाराची माहिती दिली आहे. कोरोना आता नव्या स्वरुपात ब्रिटनमध्ये पसरत असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिटनच्या दक्षिणपूर्व भागात याचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. कोरोनाच्या या नव्या स्वरुपाचे 1000 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्याचे हॅकाँक यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सांगितले.
आधीच्या कोरोना व्हायरसपेक्षा हा नव्या स्वरुपातील व्हायरस वेगाने पसरत असल्याचे हॅकाँक यांनी सांगितले. देशात कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, कोरोनाच्या या स्वरुपावर लसीची किती परिणाम होईल, हे सांगता येणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. हा नवीन स्वरुपातील व्हायरस केंट प्रथम आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रिटनमध्ये आढळून आलेला हा नव्या स्वरुपातील व्हायरस मोठ्या प्रमाणात आणि झपाट्याने पसरण्याची भीती ब्रिटनचे मुख्य चिकित्सा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ब्रिटनने या कोरोनाच्या नव्या स्वरुपातील व्हायरसची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला (डब्लूएचओ) दिली आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या आता वेगाने वाढत आहे. या नव्या स्वरुपातील व्हायरसमुळे ही वाढ होत आहे का, याबाबत संशोधन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
ब्रिटनमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी लंडनसह इतर काही शहरात चौथ्या टप्प्यातील निर्बंध जारी केले आहेत. या टप्प्यात निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहे. या वर्षी साजरा करण्यात येणारा नाताळ साध्या स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात नाताळ साजरा करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता नव्या स्वरुपातील कोरोनामुळे ब्रिटनची चिंता वाढली आहे.
सौजन्य- सामना