‘रस्त्यावरचा लढाऊ शिवसैनिक म्हणून परिचित असलेले मोहन रावले यांचे आज पहाटे गोवा येथे आकस्मिक निधन झाले. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून गेलेल्या मोहन रावले यांच्या निधनाने शिवसेनेसह राजकीय वर्तुळात शोककळा पसरली.
परळ-लालबागचा लढवय्या शिवसैनिक अशीच त्यांची ओळख होती. भारतीय विद्यार्थी सेनेचे ते प्रदीर्घ काळ अध्यक्ष होते. शिवसेनेच्या स्थापनेपासून ते आंदोलने, लढे यात सहभागी होते. शिवसेनेच्या वाढीसाठी त्यांनी अनेकदा तुरुंगवासही भोगला.
मोहन रावले हे वैयक्तिक कामासाठी गोव्यास गेले होते. तेथेच त्यांचे पहाटे 4 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी इंदिरा, कन्या कांचन आणि मुलगा अभिराज असा परिवार आहे.
मोहन रावले यांचे पार्थिव गोव्यातून शनिवारी सायंकाळी मुंबईस आणले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिवसैनिक शोकापुल झाले. परळ येथील शिवसेना शाखेत माजी खासदार मोहन रावले यांना राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मानाची भगवी शाल आणि पुष्पहार अर्पण करून अंतिम दर्शन घेतले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, गजानन कीर्तिकर, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, महापौर किशोरी पेडणेकर, माजी आमदार दगडू सकपाळ आदी उपस्थित होते.
रात्री 9 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले तेव्हा हजारोंच्या जनसमुदायाने त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून मोहन रावले यांच्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ झाला. ते भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते. शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढवण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. ते पाच वेळा दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघाचे खासदार होते.
गिरणी कामगारांचा बालेकिल्ला असलेल्या लालबाग, परळमध्ये रुजलेल्या शिवसेनेच्या ताकदीचा मोहन रावले यांना इतका फायदा झाला की, ते तब्बल पाच वेळा लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले. शिवसेनेने 1991 मध्ये त्यांना प्रथम दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1996, 1998, 1999 आणि 2004 असे मिळून सलग पाच वेळा ते लोकसभेवर निवडून गेले.
दक्षिण-मध्य मुंबईसारख्या मतदारसंघातून सातत्याने पाच वेळा खासदार म्हणून निवडून येणे नक्की सोपे नव्हते, पण ही किमया रावले यांनी केली. या भागात शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना त्यांनी मराठी आणि त्यात मोठय़ा संख्येने असलेल्या कोकणातील माणसांना जोडून ठेवण्याचे मोठे काम प्रामुख्याने केले.
मोहन रावले यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिकांनी परळच्या कामगार मैदान परिसरात मोठी गर्दी केली होती. अमर रहे, अमर रहे, मोहन रावले अमर रहे च्या घोषणांनी परळचा कामगार मैदान परिसर दणाणून गेला होता. यावेळी आमदार कपिल पाटील, अॅड. आशीष शेलार, कालिदास कोळंबकर, माजी आमदार बाळा नंदगावकर यांनीही रावले यांचे अंतिम दर्शन घेत आदरांजली वाहिली.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोहन रावले यांचे निधन दुःखदायक आहे. दक्षिण-मध्य मुंबईचे प्रतिनिधित्व करत ते संसदेत दीर्घकाळ सहकारी होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळच्या निष्ठावान सहकाऱयांमध्ये त्यांची गणना व्हायची. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! –शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
सर्वसामान्यांना आपलेसे केले!
शिवसेनेच्या माध्यमातून प्रदीर्घ काळ मुंबईकरांचे संसदेत प्रतिनिधित्व करणारे माजी खासदार मोहन रावले यांच्या निधनाने धक्का बसला. शिवसेनेच्या अनेक आंदोलनांत आघाडीवर असलेल्या मोहन रावले यांनी त्यांचा स्वभाव आणि कार्यशैली यामुळे सर्वसामान्यांना आपलेसे केले होते. संपूर्ण शिवसेना परिवार त्यांच्या पुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो! माजी खासदार मोहन रावले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
रावले मास्तरांचा मुलगा!
कुठल्याशा कार्यक्रमासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री रामविलास पासवान मुंबईत आले होते. गिरणी कामगारांच्या आंदोलनाचा पेटता काळ होता. शिवसेनेचे खासदार म्हणून मोहन रावले कामगारांची बाजू रस्त्यावर उतरून लढवत होते. पासवान यांना घेरण्याचा मोठा प्लॅन त्यावेळी रावले यांनी आखला. परळमध्ये पासवान येणार होते त्या ठिकाणी कामगारांसह रावले थडकले. काही क्षणातच पासवान आले. गर्दी आणि रावले यांना पाहताच त्यांनी प्रसंग बाका आहे हे ओळखले आणि गाडीतून उतरताच रावले यांना मिठी मारून ते म्हणाले, ‘अरे मोहन तू तो अपना है…’ त्यानंतर कामगारांच्या घोषणा विरल्या, रावलेंनी पुढे केलेला मागण्यांचा कागद हातात घेत पासवान म्हणाले, ‘मोहन, मुझे सब मंजूर है.’
ही किमया होती मोहन रावले नावाच्या गिरणी कामगाराच्या मुलाची. परळपासून दिल्लीपर्यंत सर्वांना ‘अपना आदमी’ वाटायला लावेल असा विश्वास त्यांनी निर्माण केला होता. विद्यार्थी आंदोलनाच्या मुशीतून तयार झालेलं हे नेतृत्व होतं. त्याला परळसारख्या कामगार चळवळीची पार्श्वभूमी लाभलेल्या धुमसणाऱया भागात वास्तव्याची जोड मिळाली. ध्यानीमनी नसताना मिळालेली लोकसभेची उमेदवारी आणि पाठोपाठ पाच निवडणुकांतील विजयांनंतरही पाय जमिनीवर असणारा हा नेता होता. सर्वांना आपला वाटणारा आणि आपला खासदार असूनही आपण एखाद्या प्रसंगी त्याला जाब विचारू शकतो एवढा अधिकार आबालवृद्धाना बहाल करणारा.
रूढार्थाने त्यांचं कुठे कार्यालय नव्हतं. परळला ते राहत त्या इमारतीखाली सकाळपासून हळूहळू गर्दी जमायला लागायची. 11 वाजल्यानंतर रावले खाली येऊन त्या गर्दीला सामोरे जात. प्रत्येकाला भेटत. प्रत्येकाची अडचण समजून घेत, काय काम आहे विचारत. ते प्रत्येकाला पत्र देत. त्यांच्या पत्रावर अनेकांची कामं होतं. ज्यांची कामं झाली नाहीत अशी माणसं पुन्हा येत. मग त्या व्यक्तीचं काम ज्या कार्यालयात असेल तिथे रावले स्वतः सोबत जाऊन कधी समोरच्या अधिकाऱयाला समजावून तर कधी खास त्यांचा ‘आवाज’ लावून समज देऊन काम करून घेत. ही गर्दी हीच त्यांची ऊर्जा होती. त्यांनी किती तरुणांना नोकऱया लावल्या याची गणतीच नव्हती. शाळा आणि कॉलेजच्या अॅडमिशनच्या काळात तर त्यांच्या इमारतीखाली ‘शाळा’ भरलेली असे. हजारो अॅडमिशन या माणसाने लीलया करून दिली. हाच त्यांचा जनसंपर्क निवडणुकीच्या काळात त्यांच्या प्रचाराची फौज बनून त्यांच्यासाठी उतरत असे. परळ-लालबागकरांच्या पुटुंबाचा भाग बनून जगले. अलीकडे ते काहीसे कोशात गेले. सक्रिय राजकारणापासून थोडे लांब गेले होते. पण लोकांची गर्दी मात्र कायम होती. ते राजकीय व्यासपीठावर अधूनमधून दिसायचे. नंतरच्या काळात ते लोकांना रुग्णालयात मदत कर, अॅडमिशनसाठी फोन कर, कुणाला आर्थिक मदत कर असं काम वैयक्तिक पातळीवर करतच होते. दिवसाला 50 ते 60 सत्यनारायणाच्या पूजांना हजेरी लावणारा हा नेता दुःखाच्या प्रसंगीही कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहायचा. कुणाला मित्र, कुणाला भाऊ, कुणाला काका, कुणाला मामा तर कुणाला भक्कम आधार वाटणारा हा पाचवेळचा खासदार प्रत्यक्षात आतून खूप हळवा होता. कुणाच्याही दुःखाने त्यांचं काळीज हलायचं, डोळय़ांत अश्रू तरळायचे तसेच कुणावरही अन्याय होताना दिसला तर ते उसळून यायचे. मोहन रावले हे अद्भुत रसायन होतं. मला साहेब म्हणू नका. मी तुम्हा सर्वांचा लाडका मोहन आहे. मला तसेच राहू द्या, असे सांगणारा हा माणूस शेवटपर्यंत गिरणीतल्या रावले मास्तरांचा मुलगा म्हणूनच जगला.
क्रीडाप्रेम
त्यांचं खेळावर प्रचंड प्रेम होतं. मुळात ते स्वतः बॉक्सर होते. शिवाय क्रिकेट हा त्याचा हळवा कोपरा होता. कित्येकदा मैदानात अचानक घुसून कोणत्याही पिचवर जाऊन ते चालू ‘सामना’ थांबवून एखादी ओव्हर बॅटिंग करून आपली क्रिकेटची हौस भागवून घ्यायचे. तिथे टेनिस बॉलवर क्रिकेट खेळणाऱया मुलांनाही खासदार आपल्यासोबत खेळतोय याचं अप्रूप वाटायचं. क्रीडापटूंच्या कोटय़ातून त्यांनी अनेकांना नोकऱया लावल्या. खो-खो पटूंसाठी रेल्वेत नोकरीची दारं त्यांनी उघडली.
तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या मागे लागून त्यांनी पश्चिम रेल्वेत 13 खो-खोपटूंना नोकरी मिळवून दिली. रस्त्यावर आणि मैदानावर सारख्याच उत्साहाने ते रमले.
पिवळय़ा रंगाचा शर्ट
रंगाविषयी त्यांची आवड अगदी ठाम होती. क्रीम कलरची पॅण्ट आणि पिवळय़ा रंगाचा शर्ट ही त्यांची खास आवड.
चिपळूणची खानावळ
रावले कोकणात जाताना चिपळूणला रघू मोरे यांच्या प्रसिद्ध खानावळीत हमखास जात. तिथे मासे आणि कोंबडीचा रस्सा हे त्यांचे खास आवडीचे पदार्थ होते. खासदारकीची झूल उतरवून ते या खानावळीतल्या बाकडय़ावर साधेपणाने जेवायला बसत.
मैत्र
मोहन रावले हे सच्चा मित्र होते. त्यांचा मित्रांचा गोतावळा परळपासून देशविदेशात विस्तारलेला होता. रावलेंच्या एका शब्दाखातर काहीही करायला तयार असणाऱया मित्रांची संख्या मोठी होती आणि त्यांच्या मित्रांच्या गोतावळय़ात असे करू शकणाऱया मित्रांच्या यादीत रावले यांचे नाव ‘कॉमन’ होते. मोहन माझा जवळचा मित्र आहे, असे सांगणारे शेकडो लोक परळ-लालबागला भेटतील.
गॅस आणि टेलिफोन
पूर्वी स्वयंपाकाचा गॅस आणि टेलिफोनसाठी वर्षानुवर्षे वाट पहावी लागे. पण रावले यांच्या खासदार कोटय़ापासून गरजवंतांना तत्काळ गॅस आणि टेलिफोन मिळवून द्यायचे. त्यांच्याकडची गॅस आणि टेलिफोनची कूपन्स संपल्यानंतर ते अन्य राज्यातल्या राज्यसभा खासदारांची कूपन्स आणून ती मतदारसंघातील लोकांना देत. त्या काळात लोकांना ही कूपन्स लॉटरीसारखीच वाटत.
दिलदार दोस्त
कडवट शिवसैनिक, दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्हते. ‘परळ ब्रॅण्ड’ शिवसैनिक हीच त्यांची ओळख होती. मोहन रावले पाच वेळा खासदार झाले, पण अखेरपर्यंत ते सगळय़ांसाठी मोहनच राहिले. विनम्र श्रद्धांजली! खासदार संजय राऊत, शिवसेना नेते
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून मोहन रावले यांना आदरांजली वाहिली. यावेळी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, गजानन कीर्तिकर, आमदार अजय चौधरी आदी उपस्थित होते.
सौजन्य- सामना