वारकरी साहित्य परिषदेतर्फे घेण्यात येणारे 9 वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन मुंबईच्या हॉटेल नोव्हेटेल येथे पार पडणार आहे. दिनांक 21 आणि 22 डिसेंबर 2020 दरम्यान पार पडणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असून या सोहळ्याला उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, आणि माजी राज्यपाल मा. डी.वाय.पाटील हे उपस्थित असणार आहेत. 22 डिसेंबर रोजी सांगता सोहळा पार पडेल.
या सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. तर माजी मंत्री दिवाकर रावते हे स्वागताध्यक्ष असतील. 21 डिसेंबरला सकाळी 8 वाजता दिंडी सोहळ्याने संमेलनाची सुरूवात होईल. उदघाटन सोहळ्यानंतर मावळते संमेलनाध्यक्ष ह.भ.प. श्री अमृतमहाराज जोशी यांच्याकडून नवे संमेलनाध्यक्ष ह.भ.प चकोरमहाराज बावीसकर हे संमेलनाची सूत्र स्विकारतील. स्वागतानंतर पहिल्या सत्रात दु.2 ते 4 या कालावधीदरम्यान संप्रदायाच्या परंपरेची जोपासना या विषयावर चर्चासत्र पार पडेल. तर सायं. 4 ते 6 दरम्यान प्रदुषण या विषयावर चर्चासत्र पार पडेल. कार्यक्रमाच्या अखेरीस ह.भ.प. डॉ. रामकृष्ण लहावितकर हे आभार प्रदर्शन करतील.
सौजन्य- सामना