विल्यम शेक्सपिअर यांचे अजरामर झालेले ‘हॅम्लेट’ हे नाटक मध्यंतरी पुन्हा रंगभूमीवर आणले गेले होते. नाना जोग यांनी मराठी रुपांतर केलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले होते. या नाटकाचा अखेरचा प्रयोग झाला त्या दिवसाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. या नाटकात सुमीत राघवन, तुषार दळवी, भूषण प्रधान, सुनील तावडे, आशिष कुलकर्णी, ओंकार कुलकर्णी, मनवा नाईक, रणजीत जोग, मुग्धा गोडबोले या कलाकारांच्या भूमिका होत्या. अखेरच्या प्रयोगाला वर्ष पूर्ण झाल्याची माहिती मनवा नाईक हिने इन्स्टाग्रामवरील आपल्या पेजवर टाकली आहे. यावेळी तिने नाटकातील काही फोटोही शेयर केले आहेत.
मनवाने या नाटकात ओफेलियाची भूमिका साकारली होती. या नाटकाच्या प्रवासात मनवाने दीड वर्षे या भूमिकेसोबत घालवली होती. आता हीच आठवण तिने चाहत्यांसाठी शेयर केली आहे. आपल्या पोस्टमधील कॅप्शनमध्ये मनवा लिहीते की, एक वर्ष झालं… 13 डिसेंबर 2019 रोजी मी ओफेलियाला शेवटची भेटले होते… या पोस्टमध्ये मनवाने तिच्या भूमिकेतील काही फोटो शेयर केले आहेत. या नाटकाच्या शेवटच्या प्रयोगानंतरही मनवाने भावुक पोस्ट केली होती.