रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील अष्टपैलू कलावंत लेखक दिग्दर्शक संगीतकार पुरुषोत्तम बेर्डे यांच्यावर लहानपणी ‘मार्मिक’चा सखोल संस्कार झाला. तारुण्यात त्यांना मार्मिकनेच त्यांचा आवाज मिळवून दिला आणि आणि लेखनाची एक शैलीही मिळवून दिली. ज्यांच्या कुंचल्याच्या जादूने ते भारावले त्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कार्यक्रमांच्या रूपाने मानवंदना देण्याची संधी त्यांना अनेक वेळा लाभली. त्यातील बाळासाहेबांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याची ही रोमांचक हकीकत.
‘नमस्कार पुरू, मी अजितेम जोशी बोलतोय, सामनाच्या ऑफिस मधून..़ येत्या २३ जानेवारी २००५ ला बाळासाहेबांचा ७५ वा वाढदिवस साजरा करायचा आहे. त्या संपूर्ण कार्यक्रमाच्या संकल्पनेची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी तुझ्यावर टाकायची ठरले आहे. उद्या सकाळी सामनाच्या
ऑफिसमध्ये मीटिंग आहे. उद्धवसाहेब, राजसाहेब आणि सुभाष देसाई साहेब मीटिंगला असणार आहेत, तुला यायला जमेल का?
नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता…
मी हो म्हटले आणि मिटींगला येतो असे कळवले…
दुसर्या दिवशी आधी राजसाहेबांबरोबर प्रदीर्घ मीटिंग झाली. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रकलेचा या कार्यक्रमात यथोचित गौरव व्हावा असं त्या बैठकीत ठरलं. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रातून उभा राहिलेला, मराठी माणसांची मनं ढवळून काढणारा, आणि त्यातून घडत गेलेला शिवसेनेसारखा पक्ष आणि त्याचा सगळा इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात त्यांच्या या ‘रेषा आणि हंशा’चा गौरव व्हायला हवा असे मला वाटून गेले. आणि त्यातून मला कार्यक्रमाचे शीर्षक सुचले.
‘रेषा आणि हशा’
पुढच्याच मीटिंगमध्ये सुभाष देसाई आणि उद्धवसाहेबांना ते शीर्षक खूप आवडले. या सोहोळ्यांत महाराष्ट्रातील नामांकित व्यंगचित्रकारांचा समावेश असावा या हेतूने अनेक व्यंगचित्रकारांना या निमित्त प्रत्यक्ष रंगमंचावर कला सादर करण्यासाठी एक छान संधी दिली गेली व तसे स्कीट लिहिले गेले. विकास सबनीस, प्रशांत कुलकर्णी, विवेक मिस्त्री आदि व्यंगचित्रकार यासाठी बोलावले. संजय मोनेने ते स्कीट लिहिले. रामदास फुटाणे संचालित हास्यकविता सादर झाल्या. नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलावंतानी या सोहोळ्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली आणि प्रत्यक्ष ती मंडळी नृत्य आणि गायनकला सादर करायला आलीसुद्धा.
बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचे एका गीतातून सादरीकरण झाले, ते गीत लिहिले विवेक आपटेने, आणि गायले सुरेश वाडकर यांनी. सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री मिताली जगताप आणि इतर अनेक कलावंतानी एक आधुनिक लावणीनृत्य सादर केले. दीपाली विचारे यांनी नृत्य दिग्दर्शन केले. प्रभाकर पणशीकर, प्रशांत दामले, संजय नार्वेकर, पॅडी कांबळे यांच्या गाजलेल्या विनोदी भूमिकांचे प्रवेश सादर झाले.
या सर्वांवर कळस म्हणजे एक अत्यंत शौर्यपूर्ण आणि भावपूर्ण असे नृत्यगीत सादर करायचे ठरले. ज्यात बाळासाहेबांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनाचे काव्यपूर्ण वर्णन असेल. जवळजवळ १० ते १२ मिनिटांचे ते गाणे विवेक आपटेनीच लिहिले, मी त्याचे संगीत केले, आणि सुरेश वाडकर यांनीच ते गायले. त्या गाण्याच्या शेवटच्या भागात बरोबर साहेबांचा प्रवेश कल्पिला होता. षण्मुखानंद हॉलच्या उजवीकडील दरवाजातून साहेब येतात… त्यांचा जयजयकार होतो, त्यानंतर ७५ सुवासिनी त्यांना ओवाळतात, सनई चौघड्यांच्या सुरात वरून पुष्पवृष्टी होते… त्यानंतर धीम्या गतीने साहेब रंगमंचाच्या डावीकडून रंगमंचावर येतात, तिथे महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार घालतात आणि मग रंगमंचाच्या मध्यभागी उभे राहून तमाम उपस्थित शिवसैनिकांची मानवंदना स्वीकारतात तेव्हा त्यांच्यावर वरून पुष्पवृष्टी होते, हे सर्व गाण्यातल्या म्युझिकमध्ये मिनिट टू मिनिट वर्कआउट केले होते. त्यानंतर सोनिया परचुरे हिच्या नृत्यदिग्दर्शनात आधीचे गीत बसवले व साहेबांच्या आगमनापासूनचा भाग मी दिग्दर्शित केला. त्यासाठी खूप डमी रिहर्सल झाल्या. त्याआधी या सर्व प्रकाराला उद्धवजींकडून संमती घेतली. आणि त्यांना विनंती केली की हे सर्व साहेबांकडून संमत करून घ्या. त्यांनी ते करून घेतले. तशा पद्धतीचा एक नकाशा तयार करून तो साहेबांना दाखवण्याचा घाट घातला. ह्यात कोणतीच चूक होऊ नये यासाठी उद्धवजींना एक रिहर्सल दाखवण्याचे ठरले. त्यासाठी खास सेनाभवनचा दुसर्या मजल्यावरचा हॉल आम्हाला दिला गेला. ठरल्या वेळी उद्धवजी आले. त्याना संपूर्ण रिहर्सल दाखवली. सर्व काही त्यांना आवडले. पण एक शंका व्यक्त झाली, साहेबांबरोबर मोठी सिक्युरिटी असते, स्वागतासाठी काही नेतेही दरवाजापर्यंत जातात. शिवसैनिक स्वत:हून पुढे येऊन साष्टांग नमस्कार करतात, आणि हे सर्व उत्स्फूर्तपणे होत असते. त्यांना कोणी रोखू शकत नाही. तशात त्या दिवशी साहेबांचा ७५ वा वाढदिवस, म्हणजे अलोट गर्दी असणार. या सर्वात हा असा सुविहित आणि काटेकोर प्रकार कसा होईल? उद्धवजींना हे सर्व आवडले होते, त्यामुळे थोडा विचार करून त्यांनी आश्वासन दिले की सिक्युरिटीची मदत घेऊन सर्वांना आधीच सांगून ठेवण्यात येईल की हा खास सोहोळा आहे, प्रथमच असे काही नवे घडत आहे. हे आश्वासन मिळताच बरे वाटले.
पुढच्या रिहर्सल्स तर अगदी साहेब गाडीतून उतरून शिवसैनिकांच्या नमस्कारांच्या प्रॅक्टिससह बाहेरपासून झाल्या, त्यामुळे आता फक्त प्रत्यक्षात साहेबांनी ठरलेल्या मॅपप्रमाणे येणे व सर्व पार पडणे एवढंच शिल्लक होतं.
खरे तर एवढ्या मोठ्या व्यक्तीला अशा काही बंधनात अडकवणे योग्य नव्हते पण वेगळेपणाच्या अट्टहासापोटी माझी संपूर्ण टीम त्यात झटत होती.
२३ जानेवारीचा दिवस उजाडला, आज बाळासाहेब ठाकरे यांचा ७५वा वाढदिवस. आमच्या कार्यक्रमाच्या जाहिरातीही वर्तमानपत्रात येणार होत्या. त्यात खास उल्लेख होणार होता साहेबांच्या खास स्वागताचा. मात्र वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावरच्या बातमीने माझी शुद्ध हरपली. मथळा होता, ‘बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी यांना लष्करे तोयबाची धमकी. त्यांच्या जिवाला धोका.’
बाप रे, आज सकाळी सेनाभवनमध्ये ग्रँड रिहर्सल आणि संध्याकाळी कार्यक्रम. मी १० वाजता सेनाभवनात पोहोचलो. तिथे चिंतेचे वातावरण दिसत होते. कडक पहारा वाढवला होता. तीच परिस्थिती मातोश्रीवर आणि षण्मुखानंद हॉलवर. सर्व कलाकार जमले होते. मी कार्यालयात चौकशी केली. तिथे कार्यक्रम रद्द होणार नसल्याचे कळले. उलट ‘अहो, काळजी करू नका हो. साहेबांच्या केसालाही धक्का बसला तर भयंकर परिणाम भोगावे लागतील त्यांना, तुम्ही चिंता करू नका. रिहर्सल चालू द्या तुमची.’
माझ्या जिवात जीव आला. पण तेवढ्यात, अकरा साडे अकराच्या दरम्याने माझ्या मोबाईलवर उद्धव साहेबांचा फोन आला. ‘नमस्कार, उद्धव बोलतोय. आजच्या कार्यक्रमाबद्धल मोठे साहेब तुमच्याशी बोलू इच्छितात, मी त्यांना फोन देतो ….’
बापरे … प्रत्यक्ष साहेब बोलणार. मी बसल्या जागी उभा राहिलो!
‘जय महाराष्ट्र, मी बाळ ठाकरे बोलतोय .. पहिली गोष्ट म्हणजे या कार्यक्रमासाठी तू जी मेहेनत घेतली आहेस त्याबद्धल उद्धवने मला सर्व सविस्तर सांगितलं. पण आज सकाळच्या बातम्या तू वाचल्या असशीलच. त्यामुळे आजच्या कार्यक्रमास मी येऊ शकत नाही, वाईट वाटून घेऊ नका तुम्ही सगळे. खरं तर मी कोणाला घाबरत नाही, लष्करे तोयबा असो नाहीतर कोयबा असो-पण माझ्या येण्यावर स्वत: पोलीस कमिशनर साहेबांनी बंधन आणलंय. त्यांचं मला ऐकलं पाहिजे, संपूर्ण यंत्रणेवर ताण आलाय. तशात मी तिथे येण्याचा हट्ट करणे बरोबर नाही. माझा शिवसैनिक नाराज होईल, तुम्ही सगळेच कलावंत नाराज व्हाल. पण मला तूच सांग, या अशा परिस्थितीत मी येणं बरोबर आहे का?… पुन्हा सांगतो, मी तय्याबाला घाबरत नाही. पण माझ्यासाठी डोळ्यात तेल घालून जागे राहणार्या पोलीस यंत्रणेचा मला विचार करायला हवा नाही का?’ …
एका अर्थी माझं अवसान गळालं होतं.. पण ते उसने आणून मी साहेबांना म्हटले..
‘अगदी योग्य निर्णय आहे साहेब, तुम्ही आमच्यासाठी खूप महत्वाचे आहात … आम्ही संपूर्ण कार्यक्रम तेवढ्याच ताकदीने करू…’
‘हो, कार्यक्रम होणार , तुम्ही तो करा, तो थांबवण्याची कोणाची हिम्मत नाही … तुम्हाला शुभेच्छा … जय हिंद , जय महाराष्ट्र…’
त्या गडबडीत साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही द्यायला विसरलो.
पण प्रत्यक्ष साहेब फोनवर बोलून दिलासा देत होते, यातून कलावंतांची ते किती कदर करतात याची प्रचीती आली . संध्याकाळी कार्यक्रमाच्या आधी उद्धवजींनी मला बोलवून घेतले, आणि हळूच सांगितले, ‘साहेब येतील, पण किती वाजता ते घोषित करता येणार नाही. अचानक येतील आणि पंधरा मिनिटात निघून जातील. मात्र तुम्ही रिहर्सल केलेला तो पुष्पवृष्टीचा सोहळा सादर करा… तुम्ही जशी रिहर्सलला मागून कॉमेंटरी करीत होतात तशी करा. चालेल पण ते सर्व करा.’
साहेब येणार की नाही याची शिवसैनिकांत चुळबुळ होती आणि अचानक तासाभराचा कार्यक्रम झाला असताना मला आत बोलावले. तिथे साहेब येऊन बसले होते आणि स्वत: मुंबईचे तत्कालीन कमिशनर एन. एम. सिंग त्यांची सिक्युरिटी म्हणून आले होते. कुणालाही कळू न देता साहेबांचे आगमन झाले होते. सुरू असलेले नृत्य संपताच साहेबांनी स्टेजवर जावे असे ठरले.
साहेबांचा अचानक प्रवेश होताच प्रचंड घोषणा झाल्या. साहेबांनी रीतसर महाराजांना पुष्पहार अर्पण केला, वंदन केले आणि रंगमंचाच्या मध्यभागी येताच पुष्पवृष्टी झाली… साहेबांनी बोलायला सुरुवात केली..
‘माझ्या तमाम मराठी बांधवानो, भगिनीनो आणि मातांनो….’
टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात साहेबांचे भाषण सुरू झाले, रंगले, आणि प्रचंड घोषणेत संपले… आणि साहेब पोलीस कमिशनर आणि सिक्युरिटीच्या संरक्षणांत निघून गेले.
त्या धमकीला भीक न घालता शिवसैनिकांच्या प्रेमापोटी साहेब आले आणि गेले… नंतरचा कार्यक्रम सुद्धा तेवढ्याच तन्मयतेने सर्वांनी पहिला, कारण उद्धव, राज यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब तिथे हजर होते. आणि साहेबांचा एक झंजावती वावर त्या संपूर्ण सभागृहात दरवळत होता.