राज्यातील विकासकामांची बोहनी संभाजीनगरातून झाली आहे. आता विकासाला गती मिळाली आहे आणि ती कदापि थांबणार नाही, असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. निवडणुका आल्या म्हणून विकासकामे करायला आलेलो नाही. केवळ भूमिपूजन करून कुदळ मारायला आलेलो नाही; तर काम पूर्ण करायला आलो आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
संभाजीनगरात उभारण्यात येणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक तसेच 1680 कोटींची नवी पाणीपुरवठा योजना, 152 कोटींचे प्रमुख 23 रस्ते आणि 174 कोटींचा सफारी पार्क या विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
गुंठेवारी, सिडकोतील घरांच्या मालकीहक्काचा प्रश्न हे अनेक वर्षे रखडलेले प्रश्न आहेत. मुंबईहून निघतानाच गुंठेवारीचा प्रश्न निकाली काढण्याची सूचना दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सिडकोतील घरांच्या मालकीहक्काचा प्रश्नही लवकर मार्गी लावण्यात येईल, असे ते म्हणाले. रस्त्यांचाही प्रश्न आहे. बऱयाच जणांनी खड्डे पाडलेत ते बुजवायचे आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. चिकलठाणा येथील विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजीराजे विमानतळ करण्यात यावे असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. तो मंजूर होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. संभाजीनगरात अनेक उद्योग येत आहेत. पदवीधरांचे आयुष्य प्रकाशमान करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, हरिभाऊ बागडे, प्रा. रमेश बोरनारे, उदयसिंह राजपूत, अंबादास दानवे, सतीश चव्हाण, अतुल सावे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय आदी उपस्थित होते.
मास्क खाली करू नका!
कोरोनाचे आकडे खाली आले आहेत म्हणून तोंडावरचा मास्क खाली करू नका असे बजावतानाच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही असा इशारा दिला.
घरी बसून केलेल्या कामांचा शुभारंभ होतोय
भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी, मुख्यमंत्री घरात बसून असतात अशा वावडय़ा उठवणाऱ्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात मी घरी होतो, पण मी नुसता बसून नव्हतो. तर अविरत कामे चालू होती. तीच कामे आता दृश्य स्वरूपात समोर येत आहेत. घरी बसून मी काय केले हे आता लोकांना दिसत आहे, असा टोला त्यांनी लगावला.
भूमिपूजन ‘रिमोट कंट्रोल’ने हा योगायोगच
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची रिमोट कंट्रोल अशी ओळख होती. आज त्यांच्या स्मारकाचे भूमिपूजन रिमोट कंट्रोलनेच झाले हा योगायोगच आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम वेगात सुरू आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर शिर्डीपर्यंत हा मार्ग खुला होईल. समृद्धी महामार्गामुळे संभाजीनगरचेही महत्त्व वाढणार आहे, असेही ते म्हणाले.
शिवसेनाप्रमुखांचे स्मारक प्रखर हिंदुत्वाचे संस्कार करणारे केंद्र असेल
शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्ववादी विचारांची मशाल पेटवली. याच हिंदुत्ववादी विचारांचा वारसा जपणारे त्यांचे स्मारक असेल. येथे केवळ पुतळा नसेल, तर हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे हा मूलमंत्र या स्मारकात येणाऱयांना प्रेरणा देत राहील. राष्ट्रीय विचार मनामनांत रुजवणारे ते प्रेरणा केंद्र असेल, असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी व्यासपीठावर राजेशाही खुर्ची ठेवण्यात आली होती. मात्र व्यासपीठावर आल्याबरोबर त्यांनी ही खुर्ची बदलून इतरांप्रमाणेच साधी खुर्ची मागवून घेतली. मुख्यमंत्र्यांचा हा साधेपणा उपस्थितांना भावला.
-
समृद्धी महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱयांच्या व्यथा समजून घेण्यासाठी आपण त्यांच्या शेतावर गेलो. त्यांना ताटकळत ठेवले नाही, असा टोला सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला लगावला.
सौजन्य- सामना