मुळात स्वप्नं पाहण्याचं स्वातंत्र्य, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडण्याचं स्वातंत्र्य, आपल्या मनातली कल्पना कथा-पटकथेच्या रूपात मांडण्याचं स्वातंत्र्य, व्हिजनचं स्वातंत्र्य आणि सादरीकरणाचं स्वातंत्र्य. व्यक्तिस्वातंत्र्यापासून ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यापर्यंत अनेक प्रकारचं स्वातंत्र्य जिथे असतं, तिथेच मुक्तपणे कलानिर्मिती होऊ शकते. हे स्वातंत्र्य ही मुंबईची ओळख आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबईतली हिंदी सिनेमासृष्टी उत्तर प्रदेशात नेली जाणार, अशी चर्चा आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नुकतेच मुंबईत येऊन गेले तेव्हा, आजवर उत्तर प्रदेशातील कष्टकरी लोक मुंबईत काम शोधायला येत होते, आता मुख्यमंत्रीही येऊ लागले, अशी कोपरखळी मारली गेली. त्यांनी चित्रपटसृष्टी नेण्यासाठी नाही, तर उत्तर प्रदेशात फिल्मसिटी तयार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलंं. हिंदी सिनेमा आणि मुंबई यांची ताटातूट करता येणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलेलं असावं. अजूनही लक्षात आलं नसेल, तर त्यांनी हिंदी सिनेमाच्या इतिहासाचा थोडा अभ्यास करावा, सिनेमाकला काय आहे, तिला काय लागतं, ते तपासून पाहावं.
आज चित्रमहर्षी म्हणून गौरवल्या जाणार्या दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतला पहिला चित्रपट बनवला, तेव्हा ते सिनेमाचे एक वेड लागलेले, झपाटलेले गृहस्थ होते. परदेशांतली एक कला भारतीय रंगात आणि भारतीय ढंगात भारतीय प्रेक्षकांसाठी आणण्याचं वेड. या वेडाला कोणत्या भूमीत पोषण मिळेल, कुठे ते सत्यात अवतरू शकेल, हे त्यांना माहिती होतं. म्हणून त्यांनी मुंबईतच चित्रपटनिर्मिती केली.
भारतीय सिनेमासृष्टीचा हा मूळपुरुष मराठी होता, ही मराठीजनांसाठी अभिमानाची बाब आहे. ‘राजा हरिश्चंद्र’ची निर्मिती करणार्या या ‘हरिश्चंद्राच्या फॅक्टरी’तच हिंदी सिनेमाचाही जन्म झाला आहे, हे लक्षात घ्यायला हवं.
हिंदी सिनेमावरचा मराठी मातीचा कलात्मक आणि सामाजिक प्रभाव गडद करणारी दुसरी व्यक्ती म्हणजे व्ही. शांताराम. त्यांच्या ‘प्रभात’ने तयार केलेले कलात्मक सिनेमे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेले. शांतारामबापूंनीही ‘राजकमल’च्या रूपाने हिंदीत झेप घेण्यासाठी पुन्हा मुंबईचीच निवड केली. हिंदीत सामाजिक संदेश गुंफलेले आणि नजरेचं पारणं फेडणारे भव्यदिव्य सिनेमे तयार करणारे शांतारामबापू हे त्यांच्या काळातले बिगेस्ट शोमॅन होते. त्यांच्या सिनेमांचा प्रभाव मला राज कपूर यांच्या सिनेमांमध्येही दिसतो. नंतरच्याही अनेक चित्रपट दिग्दर्शकांनी शांतारामबापूंपासून प्रेरणा घेतलेली दिसते.
दादासाहेब फाळके असोत की व्ही. शांताराम असोत, ते जेव्हा मुंबईत हिंदी सिनेमे तयार करत होते, तेव्हा पृथ्वीराज कपूर, देव आनंद, दिलीप कुमार यांच्यासारखे सिनेमावेडाने झपाटलेले लोक देशाच्या कानाकोपर्यातून मुंबईला येत होते. इथे संघर्ष करून नाव कमावत होते.
नंतरच्या पिढीतही गिरगावातच लहानाचे मोठे झालेले जितेंद्र किंवा शाळकरी वयात मुंबईत आलेले राजेश खन्ना यांच्यासारखे ‘मुंबईकर’ स्टार कमी होते. धर्मेंद्र, मनोज कुमार यांच्यापासून अमिताभ बच्चन आणि अगदी अलीकडच्या शाहरूख खानपर्यंत सिनेमासृष्टीत नाव काढू पाहणारे गुणवान कलाकार मुंबईबाहेरूनच इथे आले, इथेच त्यांनी नाव कमावलं, मानसन्मान, यशकीर्ती, पैसा कमावला आणि मुंबईमध्ये विरघळून गेले.
असं काय चुंबकीय आकर्षण आहे मुंबईत? हिंदी सिनेमे सुरुवातीपासून आजपर्यंत मुंबईतच बनतात?
सिनेमांची दुनिया ही स्वप्नांची दुनिया आहे, या स्वप्नांच्या दुनियेला झालर लावण्यासाठी, कलात्मकतेने ती विणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळणं आवश्यक असतंष्ठ मुळात स्वप्नं पाहण्याचं स्वातंत्र्य, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडण्याचं स्वातंत्र्य, आपल्या मनातली कल्पना कथा-पटकथेच्या रूपात मांडण्याचं स्वातंत्र्य, व्हिजनचं स्वातंत्र्य आणि सादरीकरणाचं स्वातंत्र्य. व्यक्तिस्वातंत्र्यापासून ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यापर्यंत अनेक प्रकारचं स्वातंत्र्य जिथे असतं, तिथेच मुक्तपणे कलानिर्मिती होऊ शकते. हे स्वातंत्र्य ही मुंबईची ओळख आहे.
जगाच्या पाठीवर आणि भारत देशात शहरं खूप आहेत, महानगरंही खूप आहेत; पण, मुंबई हे फक्त एक शहर नाही, महानगर नाही- मुंबई ही एक वृत्ती आहे, प्रवृत्ती आहे. `स्पिरिट ऑफ मुंबई’ या नावाने ती ओळखली जाते. माझी मुंबई येणार्याला धर्म विचारत नाही, जात विचारत नाही, पंथ विचारत नाही, भाषा विचारत नाही- एखाद्या आईने सगळ्या मुलांना वात्सल्य द्यावं तशी वात्सल्य देते, पोटाला अन्न आणि हातांना काम देते, माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा हक्क देते. म्हणून देशाच्या वेगवेगळ्या भागांतून आलेले लोक इथे मुंबईकर बनून जातात. येणार्याची जात पात धर्म न विचारता कल्पक, बुद्धिमान आणि कार्यरत असणं याचा सन्मान केला जाणं, हे फक्त आणि फक्त मुंबईतच शक्य आहे, असं मी म्हणाले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
त्यामुळेच इथून, फिल्म इंडस्ट्री कुठेतरी उचलून नेण्याची कल्पना करणं ही हास्यास्पद गोष्ट आहे. इथे `फिल्म इंडस्ट्री’ आणि `फिल्मसिटी’ यांच्यातला फरक समजून घेतला पाहिजे.
जिथे सिनेमाच्या सर्जनाची सगळी कामं होतात, ती असते फिल्म इंडस्ट्री. जिथे फक्त शूटिंग होतं, ती असते फिल्मसिटी.
हिंदी सिनेमांचं शूटिंग देशविदेशात अनेक ठिकाणी होतं, पंजाबात होतं, स्वित्झर्लंडमध्ये होतं, उत्तर प्रदेशात होतं, मध्य प्रदेशात होतं (तिथे अभिनेत्री मंत्र्याच्या बंगल्यावर रात्रीच्या जेवणाला गेली नाही की शूटिंग बंदही पाडलं जातं), युरोप, अमेरिका सगळीकडे हिंदी सिनेमांचं चित्रिकरण होतं. पण म्हणून कोणी ‘फिल्म इंडस्ट्री’ तिथे गेली असं म्हणत नाही. ती फक्त चित्रिकरण स्थळं आहेत. तशी अनेक चित्रिकरण स्थळं उत्तर प्रदेशातच नाहीत, टिंबक्टूमध्येही तयार होऊ शकतील. पण तिथे मुंबई नाही तयार करता येणार आणि फिल्म इंडस्ट्री नाही उचलून नेता येणार. डोळ्यांत स्वप्न, डोक्यात बुद्धी आणि गुणवत्ता घेऊन कुठूनही या आणि स्वप्नं मेहनतीने साकार करा, असं सांगणारी दुसरी मुंबई बनवणं इतकं सोपं नाही. त्यासाठी महाराष्ट्राची प्रागतिकता आधी आत्मसात करायला हवी.
मला एक प्रश्न पडतो, आज ज्यांना चित्रपटसृष्टीच आपल्या राज्यात वसवण्याची स्वप्नं पडतायत, त्यांना आताच कशी जाग आली आहे? या चित्रपटसृष्टीची, इथल्याच काही कृतघ्नांकडून आणि सत्ताधार्यांकडे बुद्धी गहाण टाकलेल्यांकडून विटंबना होत होती, सत्ताधार्यांचे अनौरस माऊथपीस जेव्हा ‘नशेडी’ वगैरे गलिच्छ शब्द वापरून अख्ख्या फिल्म इंडस्ट्रीला बदनाम करत होते, तेव्हा योगीजी सिनेमासृष्टीच्या बाजूने दोन शब्द बोलले असते, तर फार बरं झालं असतं आणि ही चित्रपटसृष्टी आपल्या राज्यात आमंत्रित करण्याचा त्यांना अधिकारही राहिला असता. अधिकार गाजवणार्याने आधी कर्तव्यंही बजावली पाहिजेत ना? व्यक्तिगत वैरापोटी, सुडापोटी आमच्या फिल्म इंडस्ट्रीवर तोंडसुख घेतलं जात होतं, तेव्हा तोंडात मिठाची गुळणी धरून बसलेल्यांना आता कशाला आमचा पुळका आलेला आहे?
माझं योगी आदित्यनाथांना इतकंच सांगणं आहे की आधी सिनेमासृष्टीचा इतिहास जाणून घ्या, कला कुठे आणि कशी फुलते ते जाणून घ्या, तसं वातावरण निर्माण करायला आपण सक्षम आहोत का, हे जाणून घ्या. तुमच्या राज्यातल्या मेहनती कष्टकर्यांपासून ते गुणवान कलावंतांपर्यंत सगळ्यांना आपल्याकडे खेचून आणणार्या मुंबईचं नेमकं स्पिरिट काय आहे, ते समजून घ्या. मग कदाचित तुम्ही फिल्मसिटीपुरतंच बोलू लागाल, फिल्मसिटी उखडून नेण्याच्या कल्पना तुमच्या डोक्यात येणार नाही आणि तुमच्याकडून, बहुदा अजाणतेपणाने, मुंबईचा असा अपमान होणार नाही.