यंदाची दिवाळी केंद्रातील सत्तेत रेजिम चेंजची आतषबाजी घेऊन येणार असं वातावरण गेल्या काही महिन्यांत देशात तयार झालं होतं… कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून देशातल्या जेन झी पिढीमध्ये एक चैतन्य निर्माण झाल्याचं दिसलं, केंद्रातल्या नृशंस शासकांच्या, खासकरून डरपोक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अंमलाखाली काम करणार्या सुरक्षा यंत्रणांच्या दमनशाहीला न जुमानता ही तरुणाई रस्तोरस्ती उतरली आणि तिने रोज भरजरी वस्त्रे बदलणारा ‘राजा नागडा आहे’ हे त्याच्याइतक्याच नागड्या भाषेत सांगण्याचं धारिष्ट्य केलं तेव्हा स्वत:ला दैवी अवतार मानू लागलेल्या स्वघोषित विश्वगुरूंचं आसनही डळमळीत झालं. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली इंडिया आघाडीने नवी दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या मोर्चालाही जबरदस्त प्रतिसाद लाभला आणि २०२४ची निवडणूक चोरून बळजबरीने सत्तेत बसलेल्या मोदी-शाह कंपनीची घटिका भरली आहे, असं वातावरण तयार झालं. पाठोपाठ दिवाळीत या आधुनिक ईस्ट इंडिया कंपनीच्या पोटात गोळा आणणारे फटाके चक्क देशाबाहेर फुटले. मोदींच्या परिवाराची पितृभूमी असलेल्या इस्रायलमध्ये मोदींचे लाडके मित्र नेतान्याहू यांना जनतेने घरी पाठवलं आणि दुसरीकडे सगळे राजनैतिक संकेत मोडून मोदींनी ज्यांचा प्रचार करून देशाचं दीर्घकालीन आणि अपरिमित नुकसान करून ठेवलं त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला प्रतिनिधीगृहात बहुमत गमावावं लागलं.
हे दोघे म्हणजे सगळ्या जगासाठी ईडा आणि पिडा बनले होते. ट्रम्प अजूनही आहेतच, पण आता त्यांच्या निरंकुश आणि बेबंद कारभाराला चाप लावण्याची ताकद विरोधी डेमोक्रॅटिक पक्षात आलेली आहे. या दोघांनी मिळून जग वेठीला धरलं होतं. नेतान्याहूंनी अटकेच्या भीतीने देशात पॅलेस्टिीनींच्या विरोधात द्वेषाला खतपाणी घालून गाझा पट्टीत हिटलरी वंशविच्छेदच आरंभला होता आणि ज्यू लॉबीच्या हातातलं खेळणं बनलेल्या ट्रम्प यांनी नेतान्याहू यांच्या कच्छपि लागून इराणवर हल्ला चढवण्याचं, त्यांच्या सर्वोच्च नेत्याची हत्या घडवून आणण्याचं दु:साहस केलं होतं. ते ट्रम्प यांच्या अंगाशी आलं आणि हे युद्ध जिंकण्यासाठी इराणवर अणुबाँब टाकून तो बेचिराख करण्याचा मार्गही ट्रम्प पत्करतील, अशी भयावह चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. पण या दोन्ही देशांतल्या जनतेने सुज्ञपणा दाखवून या युद्धपिपासू नराधमांच्या मागे वाहावत जाणं नाकारलं आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. त्यांच्या युद्धखोरीची सगळी हवा काढून टाकली.
याच काळात, जगाचा कल उजवीकडे ढळला असल्याच्या वातावरणावर मात करून इतरही काही देशांमध्ये उदारमतवादी विचारांचे नेते आश्चर्यकारकरित्या निवडून आले आणि त्यामुळेच दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या देशाला ग्रासणारी ईडा पिडा टळेल आणि बळीचं राज्य प्रस्थापित होईल, अशी आशा बळावली आहे. मात्र, पहाट होण्याच्या आधीची रात्र सर्वात काळी असते, असं म्हणतात; ती परिस्थिती देशात निर्माण झालेली दिसते आहे. यंदाची दिवाळी खरंतर दुष्काळी दिवाळी. पण, संवेदना हरवलेल्या समाजाने दुष्काळाने काळवंडलेल्या चेहर्यांवर आनंदाचा प्रकाश उजळवण्याचा मार्ग अवलंबण्याच्या ऐवजी न्यायालयाची बंदी झुगारून आणि प्रदूषणाचे इशारे धुडकावून उत्तररात्रीपर्यंत फटाक्यांचा धूर काढण्याचा मार्ग अवलंबला. मुंबई, नवी दिल्ली, पुणे यांच्यासारख्या महानगरांच्या हवेने धोक्याच्या पातळ्या ओलांडल्या, पण त्याने उन्मादी आनंदाला जराही लगाम लागला नाही. हाच उन्माद सातासमुद्रापारही दिसू लागला आहे अलीकडे. शांतताप्रिय आणि कायदे काटेकोरपणे पाळणार्या देशांमध्ये हा उच्छाद मांडल्याबद्दल काही ‘क्रांतिकारकां’ना तुरुंगवासही भोगावा लागला.
दिवाळीच्या काळात जनआंदोलनं काही काळ स्थगित झाल्याबरोबर केंद्रात आणि राज्यात पुन्हा एकदा बेबंदशाहीचे प्रयोग सुरू झाले. इकडचे बड्या शेठजींचे पगारी लाकूडतोडे एकीकडे भीमाशंकरच्या जंगलावर कुर्हाड चालवू लागले आणि दुसरीकडे छठपूजेच्या गाण्यांवर नाचत उत्तर भारतीयांचे लांगूलचालन करू लागले. महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त बळीराजाच्या तोंडाला मात्र पाच हजार रुपयांच्या उचलेची तोकडी पाने पुसून मोकळे. आपण कोणत्या राज्याचे नेते आहोत, याचंही भान हरवलेली ही कणाहीन बाहुली दिल्लीसमोर कधीही मोडून पडतील अशी वाकताना पाहून मराठी माणसाला शरम वाटत असेल. दुसरीकडे केंद्रसत्तेने पुन्हा एकदा महिला विधेयकाच्या नावाखाली डिलिमिटेशन विधेयक रेटण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची लक्तरे उघडकीला आल्यानंतर ज्यांनी देश चालवण्याचा नैतिक अधिकार कधीच गमावला आहे, तो परिवार आता सत्तेला जळूसारखे चिकटून राहण्यासाठीची व्यवस्था करायला सज्ज झाला आहे.
दिवाळी आली आणि गेली. लागायचे ते दिवे लागले, वाजायचे ते फटाके वाजले, काजळी पसरवून गेले. आता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी लागेल देशावरची काजळी हटवणारे फटाके सत्तेच्या खुर्चीखाली वाजवण्यासाठी! ईडा पिडा कायमची घालवण्यासाठी!
