नवरात्र सुरू झाल्यापासून माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या गर्बा खेळायला जातो, तरुण पोरी-पोरांमध्ये रमतो. खूप दमतो आणि रात्री घरी येतो. आता नवरात्रीचे नऊ दिवस पोक्याचे पाऊल रात्री घरात पडत नाही. गर्बा मूळ गुजरातचा असला तरी महाराष्ट्रात जिथे जिथे नवरात्रात देवीची प्रतिष्ठापना केला जाते तिथे तिथे रात्र गर्ब्याने जागवतात. दुसर्याचे चांगले गुण घ्यावे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. गुजरातची जनता मात्र एवढ्या विशाल मनाची का नाही असा प्रश्न पोक्याला नेहमी पडतो. आपण त्यांचा गर्बा आपला असल्यासारखा खेळतो तर गुजरात आपल्या फुगड्या, बसफुगड्या, फेर यासारखी आकर्षक नृत्यशैली का अंगिकारत नाही? पोक्या चारचौघात ते बोलूनही दाखवतो. यावर मी त्याला म्हणालो, अरे, ते मुंबईतले, महाराष्ट्रातले उद्योग स्वत:चीच मालकी असल्यासारखे पळवतात, इथला व्यापार गुजरातला नेण्याचे आटोकाट प्रयत्न करतात ते त्यांना महाराष्ट्राबद्दल प्रेम आहे म्हणूनच ना! गुजरात आपला भाऊच आहे ना! भावाचे भले झालेले पाहण्याची ताकद आपल्याला यायला हवी… मी एवढे बोललो तरी पोक्याची ट्यूब पेटत नव्हती. रात्री गर्ब्याच्या जागरणामुळे तो स्विच ऑफ झाल्यासारखा वाटत होता. शेवटी मी त्याला म्हटले, ते जाऊ दे खड्ड्यात, पण रास गर्ब्याचा मनसोक्त आनंद घ्यायला गुजरातलाच जायला हवे. तिथले म्हातारे, म्हातार्याही अगदी तरुण असल्यासारखा गर्बा खेळतात. मानायला हवे त्यांना… माझ्या या बोलण्याने पोक्याची ट्यूब हळूहळू पेटायला लागली, तो म्हणाला, या गुजराती लोकांनी पोलिटिकल गर्बा खेळायला हवा, तर खरी मजा येईल. त्याने उदाहरणार्थ मोदीजी गर्ब्यात म्हणतील असा गाण्याचा मुखडा आणि दोन-चार ओळी म्हणून दाखवल्या.
मै तो भूल गया मेराही देश
विदेश मुझे प्यारा लगे
सारे दुनिया को दे दो संदेश
मेलोडी मुझे प्यारा लगे ।।धृ।।
डोनाल्ड भी चालू और
जिनपिंग भी चालू
नेत्यानाहू भी चालू और
पुतीन भी चालू
उनका बर्ताव भी
जैस रेडा-म्हैस
विदेश मुझे प्यारा लगे ।।१।।
हे गाणे ऐकून मी खूष झालो. ताबडतोब पोक्याने पुढच्या गाण्याचा सूर लावला…
मै तो आरती उतारु रे
मोदी और शहा की ।
जय जय मोदीजी शहा
जय श्रीराम ।।धृ।।
सदा होती है जयजयकार
श्रीराम के मंदिर मे
श्रीराम के मंदिर मे
नित चोरोंकी होती धमाल
श्रीराम के मंदिर मे
सदा पुजारी करते पुकार
श्रीराम के मंदिरमे
दिखे हर घडी नया व्यवहार
श्रीराम के मंदिर मे
चोर देखो डाका डाले
दानपेटी पर उतरे
वैâसे अघोरी रे
ओ चोरी चोरी करके दिखाई रे ।।२।।
पोक्याचे गाणे ऐकून मी खूष झालो. आणि म्हणालो, पोक्या हे आता पुरे. गर्ब्याशी संबंधित इतरही गोष्टी आहेत. यंदाच्या गर्ब्यात तर हिंदू-मुस्लीम वाद पेटवायचा प्रयत्न करण्यात येत आहे. हिंदुंच्या गर्ब्यात मुस्लिमांनी सामील होऊ नये. सामील व्हायचे असल्यास सोबत बहिणींना आणि पत्नीला घेऊन यावे, असे वक्तव्य केले गेले होते. याचा अर्थ मुस्लीम तरुण गर्ब्यात इतर धर्माच्या तरुण-तरुणींशी गैरप्रकार करतील अशी त्यांना भीती वाटते. गर्ब्यात काही गैरप्रकार यापूर्वीही झालेले आहेत. काही प्रियकर प्रेयसी नाचण्याचे निमित्त साधून गर्ब्यात सामील होतात, तर काही घरात गर्ब्यात नाचायला जातो सांगून इतर ठिकाणी चाळे करायला जातात. इमारतीच्या गच्चीवर हे प्रकार रेडहँड पकडलेले आहेत. त्यातून हाणामारी, बलात्कार, खूनही घडले आहेत. ते करणारे मुस्लिम नव्हते तर इतर समाजातील होते. गर्ब्यात मुलींची छेड काढणे, लाइन मारणे या हेतूने काही तरुण येत असतील तर ते कुठल्याही धर्माचे आणि जात्ी-पंथाचे असले तरी त्यांचा योग्य तो बंदोबस्त करायला हवा, पण, कुणाला धर्माच्या नावाखाली अटकाव करणे चुकीचे वाटते. शेवटी महाराष्ट्राच्या, मुंबईच्या, देशाच्या जीवनात सांस्कृतिक उत्सवांना प्रेरणा देणे हे समाजाचे कामच असते. कितीतरी चांगले मुस्लिम गायक गायिका या देशात होऊन गेल्या आहेत. बेगम अख्तर, नूरजहाँ, शमशाद बेगम, मोहम्मद रफी, तलत मेहमूद यांचे गाणे ऐकताना त्यांचा धर्म आड येत नाही. कारण कलेला कोणताही धर्मच नसतो. म्हणूनच मुस्लीम सिनेकलावंत आवडतात. त्यांचा अभिनय आवडतो. म्हणूनच गर्ब्यात इतर धर्मीयांना नाचायला येऊ न देणे हा कलेचा अपमान वाटतो. नवरात्र उत्सव खेळीमेळीच्या वातावरणात केले जातात. तिथे गर्बा, दांडिया हे मनोरंजनाचे प्रकार तिथले उत्सवी वातावरण अधिक रंगतदार करण्यासाठी असतात. तिथे कुणाला जबरदस्तीने अटकाव करणे या नव्या युगात तरी शोभादायक वाटत नाही…
माझ्या या बोलण्याने पोक्या खडबडून भानावर आला आणि मला म्हणाला, तू बोलतोस ते योग्य आहे, पण भाजपच्या विचारांचे लोक समाजात द्वेष-भावना वाढावी आणि मुस्लीमविरोधी प्रचार करून हिंदूंची एक गठ्ठा मते मिळावीत म्हणून प्रयत्नशील असतात, हे या गर्बा प्रकरणावरून माझ्या लक्षात आले. सर्वधर्मीय सांस्कृतिक जीवनात एकत्र यायलाच हवेत. सांस्कृतिक मंत्री शेलारमामांना भेटून त्यांना मुद्दा पटवून सांगतो. मग तर झाले! चला आज रात्री आपण गर्बा खेळायला जाऊया. दे धमाल करुया!

