• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

अफाट आयुष्य जगलेला माणूस : अर्नेस्ट हेमिंग्वे!

समीर गायकवाड बिट्वीन द लाइन्स

Marmik Team by Marmik Team
October 1, 2026
in बिट्वीन द लाइन्स
0
अफाट आयुष्य जगलेला माणूस : अर्नेस्ट हेमिंग्वे!

काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर ‘सिक्स वर्ड स्टोरी’चा ट्रेंड भलताच व्हायरल होता. सहा शब्दांमध्ये जमेल ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न अनेकजण करत होते. या ट्रेंडचा नेमका अर्थ खूप कमी लोकांना ज्ञात होता! या ट्रेंडला एक मोठा इतिहास आहे, विख्यात अमेरिकन लेखक, साहित्यातील नोबल पुरस्कार विजेता अर्नेस्ट हेमिंग्वेला याचं श्रेय जातं.

१९३२ ते १९४५ या काळात हेमिंग्वेचं लेखन इतके गाजलं होतं की त्यावर तिकीटबारीची मोडतोड करणारे सिनेमे तयार झाले! हेमिंग्वेचे सुरुवातीचे दिवस आणि नंतरचे दिवस यात जमीन-अस्मानाचा फरक असल्यानं त्याला लेखक म्हणून जी आयडेंटिटी हवी होती ती मिळाली नव्हती. एकदा तो लेखक मित्रांसोबत चर्चा करत होता. त्यात त्याने आपल्या सिद्धहस्त लेखणीची ताकद सांगितली. यावर मित्रांनी आव्हान दिलं की ‘तो इतकाच भन्नाट लेखक असेल तर केवळ सहा शब्दांत गोष्ट लिहून दाखवावी!’ त्यांचं हे आव्हान जिव्हारी लागलेला हेमिंग्वे हळवा झाला. त्यानं तात्काळ ती गोष्ट लिहिली! हेमिंग्वेनं एका जाहिरातीच्या स्वरूपात लिहिलं होतं- ‘विक्रीसाठी उपलब्ध : तान्हुल्याचे बूट, एकदाही न वापरलेले…'(For Sale : Baby shoes, Never worn…) हेमिंग्वेची ही अल्पाक्षरी कथा खूपच लोकप्रिय झाली, कारण तिच्यात अवघ्या सहा शब्दांत अनेक गूढ, करुण आणि मृदू रंग भरले होते. हेमिंग्वेने मित्रांचे आव्हान स्वीकारून पैज जिंकली खरी, मात्र इथून त्याची जगभरात ख्याती वाढली…

१९९०च्या दशकात युरोपात या गोष्टीचे पुन्हा पेव फुटले. सोशल मिडियावर दरवर्षी जून-जुलैमध्ये Six Word Stories हा ट्रेंड आघाडीवर राहू लागला! हा ट्रेंड याच काळात झळकतो, कारण दरवर्षी २ जुलैला अर्नेस्ट हेमिंग्वेचा स्मरणदिन साजरा होतो. विसाव्या शतकातील अमेरिकेचा सर्वश्रेष्ठ लेखक अन् Six Word Stories चा जनक असणारा अर्नेस्ट हेमिंग्वे एक अफलातून आयुष्य जगला अन एक दुर्दैवी शेवटाने गेला!

जगभरात चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरलेल्या हेमिंग्वेला नोबेल व पुलित्झर हे साहित्य क्षेत्रातील दोन्ही प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले. पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात अमेरिकन लेखकांच्या ज्या पिढीला ‘दि लॉस्ट जनरेशन’ संबोधण्यात आले, तिचे नेतृत्व अर्नेस्ट हेमिंग्वेनं केलं. उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी लेखकाने आयुष्यच पणाला लावले पाहिजे, असं त्याचं मत होतं. म्हणूनच की काय त्याचं जीवन भन्नाट साहसांनी भरलंय!

हेमिंग्वेचे बालपण ओक पार्क येथे व्यतीत झालं. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर कॉलेजला न जाता त्याने ‘कान्सास सिटी स्टार’ या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून कारकीर्द सुरू केली. त्याच वेळेस जगात एक मोठी घटना घडत होती, पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं! युद्धात आपणही सहभागी व्हावे, असे त्याला तीव्रतेने वाटू लागलं. परंतु डाव्या डोळ्याची दृष्टी अधू असल्याने सैन्यात प्रवेश मिळाला नाही. मग रेडक्रॉस सोसायटीच्या अ‍ॅम्ब्युलन्सचा ड्रायव्हर बनून युद्धभूमीवर जाण्याचं त्यानं ठरविलं. त्यासाठी शिकागोला जाऊन आवश्यक ती शारीरिक परीक्षा दिली आणि युरोपला जाण्यासाठी जहाजात बसला. बार्डो येथून पॅरिसची गाडी पकडून फ्रान्सची सरहद्द ओलांडून तो इटलीमधील युद्धभूमीवर पोचला. प्रथम इटलीतील मिलान या गावी जखमी सैनिकांना रणभूमीवरून हॉस्पिटलमध्ये हलवण्याचे काम पार पाडलं. त्यानंतर आल्प्स पर्वताजवळील शिओ गावी पेआवे नदीच्या काठावर खंदकातील सैनिकांना आवश्यक वस्तू देत असताना शत्रूनं फेकलेल्या बॉम्बमुळे हेमिंग्वे जबर जखमी झाला. त्याच्या जवळचा एक सैनिक ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. आसपास मृत्यूचे थैमान सुरू असताना हेमिंग्वेने स्वतःची गंभीर दुखापत विसरून जखमी सहकार्‍याला वाचविलं. त्याला मिलान येथील रेडक्रॉस हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. त्याच्या पायातून धातूचा तुकडा आणि मशिनगनच्या दोन गोळ्या डॉक्टरांनी ऑपरेशन करून बाहेर काढल्या. तेथे त्याला अनेक आठवडे उपचार घ्यावा लागला. त्याच्या असाधारण शौर्याकरिता इटली व अमेरिका या दोन देशांकडून शौर्यपदके मिळणार होती. वर्तमानपत्रांनी त्याचे कौतुक तर केलेच; पण शिकागोमध्येही तो ‘हिरो’ झाला होता.

मिलानच्या हॉस्पिटलमध्ये अनेक परिचारिका होत्या. त्या हेमिंग्वेची काळजी घेत होत्या. त्यातल्याच अ‍ॅग्नेस व्हॉन कुरीव्हस्की या अमेरिकन नर्सच्या तो प्रेमात पडला, तेव्हा त्याचं वय होतं केवळ १९ वर्षे! तिचेही हेमिंग्वेवर अतोनात प्रेम होतं. त्यानं लग्नाची मागणी घातल्यावर तिनं लगोलग होकार दिला नाही. त्यानं युद्धाची भयानकता पाहिली होती. मृत्यूसुद्धा जवळून पाहिला होता. त्याला हवी असलेली ‘अ‍ॅक्शन’ शिओच्या रणांगणावर अनुभवली होती. अ‍ॅग्नेस भेटल्यानंतर जगात आता आपल्याला कुठलीही गोष्ट अशक्य नाही, असं त्याला वाटू लागलं. काही दिवसांनंतर अ‍ॅग्नेसची नियुक्ती फ्लॉरेन्स येथे झाली. त्यांच्या प्रेमाची देवाणघेवाण पत्रांतून सुरू राहिली. कालांतरानं कुबड्या वापरणं बंद करून तो काठीच्या आधारे चालू लागला. पाय बरा झाल्यानंतर ते दोघं घोड्यांच्या शर्यतीला गेले. दोघांनी काही काळ एकत्र व्यतीत केला. सभोवतालच्या रणधुमाळीतही त्यांचं प्रेम फुलत गेलं. तिला जिथे जिथे पाठविले जाई, तिथे हेमिंग्वे तिला भेटायला जायचा.
अखेर युद्ध संपले आणि हेमिंग्वे अमेरिकेत ओक पार्कला स्वगृही परतला. पण त्याचं चित्त मात्र इटलीकडे लागलं होतं. घरात बसून
अ‍ॅग्नेसची पत्रं वाचणं त्याला नको वाटायचं. अंथरुणावर पडूनच इटली, आल्प्स पर्वत आणि अ‍ॅग्नेसच्या आठवणीत रमून जायचा. पायातून काढलेल्या बॉम्बच्या पत्र्याचा तुकडा त्यानं अंगठीमध्ये हिर्‍यासारखा जडवला होता, ती अ‍ॅग्नेसची आठवण होती! १९१९च्या मार्च महिन्यात अ‍ॅग्नेसचे एक पत्र आलं आणि हेमिंग्वेला जबर धक्का बसला! तो आजारी पडला. त्यानं स्वतःला कोंडून घेतलं. बहिणीशी- मार्सेलिनशी त्याचं विशेष पटायचं. तिनेसुद्धा त्याला बोलते करायचा प्रयत्न केला. वारंवार विचारल्यानंतर हेमिंग्वेने अ‍ॅग्नेसच्या पत्राविषयी सांगितले. ती एका इटालियन आर्मी ऑफिसरच्या प्रेमात पडली होती, तिनं त्याच्याशी विवाह केला होता. हेमिंग्वे संतापला होता.

नंतरच्या वर्षभरात हेमिंग्वेने युद्धाच्या कथा लिहिल्या. दरम्यान आईसोबत त्याचं पटत नव्हतं. तिनं त्याला घर सोडायला सांगितलं. वाढदिवसाच्या दिवशीच त्यानं घर सोडलं आणि मित्राकडे राहायला गेला. तिथेच त्याची ओळख हॅडली रिचर्डसन हिच्याशी झाली. ती त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती; पण दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि विवाहबद्ध झाले. हेमिंग्वेचं लिखाण, त्याचं मासे पकडणं, भटकणं, हसणं, बोलणं सर्वच हॅडलीला आवडले. हेमिंग्वेला पुन्हा ‘टोरान्टो स्टार’ या वृत्तपत्रात युरोपियन प्रतिनिधी म्हणून नोकरी मिळाली. त्यानं पॅरिसमध्ये राहायचे असे ठरवलं. ते त्याचे अत्यंत आवडते ठिकाण होतं. लेखक होण्याची हेमिंग्वेची महत्त्वाकांक्षा होती; पण त्याला सुरुवातीच्या काळात फार संघर्ष करावा लागला. त्याची ‘द सन ऑल्सो रायझेस’ ही कादंबरी आणि अन्य कथा संपादकांकडून नाकारल्या जात होत्या. हेमिंग्वे त्या वेळेस गर्ट्रूड स्टेन, एझरा पौंड, जेम्स जॉईस या दिग्गज लेखकांच्या सहवासात पॅरिसमध्ये राहत होता. एके दिवशी
पॅरिसच्या लेफ्ट बँक येथील एका रेस्टॉरंटमध्ये हेमिंग्वे मित्रासमवेत स्वतःच्या लेखनाच्या अपयशाची चर्चा करीत होता. त्याचा मित्र सहजपणे त्याला म्हणाला की, ‘तू आयुष्यात फार काही दुःख पाहिले नाहीस, सहन केले नाहीस!’ क्षणातच हेमिंग्वेचा पारा चढला आणि त्याने महायुद्धाच्या काळात घडलेली आपली प्रेमकहाणी त्याला ऐकवली. मित्रानं त्याला सल्ला दिला की हीच प्रेमकथा आता तू लिहून संपादकांकडे व प्रकाशकांकडे पाठव. हेमिंग्वेनं त्याचं ऐकलं. अ‍ॅग्नेसबरोबरच्या प्रेमकथेवर आधारित ‘ए फेअरवेल टू आर्म्स’ या कादंबरीनं इतिहास घडविला आणि एका महान कादंबरीकाराचा उदय झाला!

या कादंबरीत हेमिंग्वेने स्वतःच्या ठिकाणी प्रâेडरिक हेन्री या पात्राची निर्मिती केली, जो पहिल्या महायुद्धात इटलीतील युद्धात
रेडक्रॉस अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हर असतो. बॉम्बस्फोटात जखमी झाल्यावर मिलानच्या हॉस्पिटलमध्ये कॅथरिन बर्कले या ब्रिटिश नर्सच्या प्रेमात पडतो. युद्ध, प्रेम या दोन्हीही गोष्टी कादंबरीत समांतर घडतात. युद्धापासून दोघेही दूर जाण्याचा प्रयत्न करतात. हेन्री लष्करी गणवेश फेकून तिच्यासमवेत मोठ्या प्रयासाने स्वित्झर्लंडला जातो. कॅथरीन गरोदर असते. तेथे ते दोघेही काही दिवस आनंदात राहतात; पण बाळंतपणात तिचा मृत्यू होतो. हेन्री पुन्हा एकाकी पडतो. या निष्पाप प्रेमकथेत युद्ध हाच प्रेमाचा शत्रू आहे.

पहिल्या महायुद्धाची भीषणता दाखवणारी ही कादंबरी फार लोकप्रिय झाली. हेमिंग्वेने कॅपोरेटो येथील सैन्य माघारीचं हुबेहूब वर्णन केलं. अनेक दुःखदायक प्रसंगांचं वर्णन केलं. या कादंबरीवरून १९३२ आणि १९५८मध्ये दोन चित्रपट तयार झाले. ‘द सन ऑल्सो रायझेस’ या कादंबरीतही हेमिंग्वेने युद्धातील अपघाताने झालेले परिणाम दाखविले. या दोन कादंबर्‍यां पाठोपाठ हेमिंग्वेच्या इतर कादंबर्‍या प्रकाशित झाल्या, खूप गाजल्या. जर्मन, फ्रेंच व इतर भाषांमध्ये त्या अनुवादित झाल्या. श्रीमंत झालेला अर्नेस्ट आता अमेरिकेत ‘पापा’ या नावाने ओळखला जाऊ लागला. त्याच्या रुबाबदार व देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे स्त्रिया आकर्षित व्हायच्या. एका पार्टीत त्याला
पॉलीन पीफर भेटली. ती त्याच्या प्रेमात पडली होती. तिने आधी हॅडलीशी मैत्री केली, मग हेमिंग्वेशी. दोघे खूप जवळ आले होते. हेमिंग्वेने तिच्याशी विवाह केला. स्पेनमधील यादवी युद्धाच्या काळात मार्था गेलहॉर्न या तरुणीशी त्याची गाठ पडली. ती वार्ताहर आणि लेखिका होती. क्यूबामध्ये राहायला गेल्यानंतर त्यानं तिच्याशी लग्न केलं, पण दोघांचं फार काळ पटलं नाही. मेरी वेल्श ही हेमिंग्वेची चौथी आणि शेवटची पत्नी. ती अमेरिकेची परराष्ट्र प्रतिनिधी होती. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात इंग्लंडला त्याची तिच्याशी भेट झाली. ते दोघं एकत्र आले, नंतर विवाह केला. त्याचं छोटेखानी विमान जेव्हा आप्रिâकेच्या जंगलात कोसळलं तेव्हा मेरी त्याच्याबरोबर होती. दोघे जखमी झाले; परंतु वाचले!

हेमिंग्वेचं युद्धाचं आकर्षण कधीही कमी झालं नाही. त्यासाठी त्यानं अनेकदा जीव धोक्यात घातलेला. युद्धकाळात प्रेमात पडण्याचा योग त्याच्या बाबतीत वारंवार आला! अ‍ॅग्नेस, मार्था, मेरी वेल्श त्याला युद्धादरम्यानच भेटल्या. शिकार, मासेमारी, स्पेनमधील बैलांच्या झुंजी पाहणे हे त्याचे छंद त्याच्या साहसी स्वभावाशी मिळतेजुळते होते. त्याच्या लाडक्या ‘पिलार’ या बोटीतनं त्यानं सागरी प्रवास केला, शिकारीच्या छंदापायी अनेकदा तो आफ्रिकेला गेला, मनमुराद शिकार आणि भटकंती केली. बैलांच्या झुंजीचा थरार अनुभवण्यासाठी स्पेनला गेला. तेथे जेव्हा युद्ध सुरू झाले, तेव्हा प्रथम वार्ताहर म्हणून, नंतर सैनिक म्हणून युद्धात सामील झाला. ‘टोरांटो स्टार’ची नोकरी करीत असताना त्याने टर्की आणि ग्रीस या देशांतील युद्धाचे वार्तांकन केलं. जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झालं, तेव्हा तो क्यूबामध्ये होता. त्यानं आपल्या खासगी बोटीला मशिनगन लावून युद्धनौकेप्रमाणे सजवून अ‍ॅटलांटिक किनार्‍यावर गस्त घालण्यास सुरुवात केली. पुन्हा वार्ताहर बनून रणभूमीवर पोचला. त्यानंतर जर्मन रॉकेटविरोधी पथकात वायुसेनेत तज्ज्ञ म्हणून काम केले. नॉर्मंडी बीचवर १९४४मध्ये झालेल्या बॉम्बवर्षावात हेमिंग्वेचा सहभाग होता. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर तो पुन्हा क्युबामध्ये राहायला गेला. लेखन, मासेमारीत स्वतःला गुंतवून घेतले. माशाच्या शिकारीच्या अनुभवावर आधारित ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ ही कादंबरी लिहिली. त्यासाठी १९५२मध्ये त्याला नोबेल पुरस्कार मिळाला. अखेरीस हेमिंग्वेकडे संपत्ती, कीर्ती व प्रतिष्ठा इ. सारं काही होतं; परंतु साहसी जीवनाची सवय असलेल्या हेमिंग्वेला विकलांग होऊन मिळमिळीत आयुष्य जगायचे नव्हते. १९६१मध्ये एकदा तो स्वतःच्या घरातच पाय घसरून पडला. तत्काळ त्यानं स्वतःची आवडती बंदूक डोक्यातला लावली आणि गोळी झाडली! हेमिंग्वेनं आपला रोमांचक, वादळी जीवनप्रवास स्वखुशीनं थांबवला. अगदी अशाच प्रकारे त्यांच्या वडिलांनीही आत्महत्या केली होती. आयुष्यात चार वेळा प्रेमविवाह करणारा अन सहा शब्दांची अभूतपूर्व गोष्ट लिहिणारा हेमिंग्वे जिवंत असतानाच दंतकथा बनला होता!

Previous Post

पंचामृताची धपाटी

Next Post

दरवळ दाटे चोहीकडे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.