व्यंगचित्रकाराला निव्वळ त्याच्या वर्तमानावर भाष्य करण्याची क्षमता असून चालत नाही, तो भविष्यही ओळखतो, तेव्हा तो द्रष्टा आणि मोठा व्यंगचित्रकार ठरतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे असे द्रष्टे व्यंगचित्रकार होते, याचा हा खणखणीत पुरावा पाहा. खरंतर हा पुरावा पाहणं खुद्द बाळासाहेबांनाही आवडलं नसतं आणि मराठी माणसासाठीही हा पुरावा काही भूषणावह नाही. ३ मार्च १९८५ रोजी म्हणजे ४१ वर्षांपूर्वी या व्यंगचित्राच्या माध्यमातून बाळासाहेबांनी मराठी माणसाला इशारा दिला होता, वेळीच जागा हो, नाहीतर तुझ्यापुढे हे दुर्भाग्य वाढून ठेवलं गेलेलं आहे. मराठी माणसाचा पोषाख तेवढा बदलला आहे आता, बाकी त्याला जखडून ठेवणारे मुद्दे तेच आहेत. तेव्हा परप्रांतीयांचे लोंढे फक्त मुंबईवर आदळत होते, आता पुणे-नाशिकमार्गे पश्चिम महाराष्ट्रात आणि ठाणे-रायगडमार्गे कोकणातही पसरायला सुरुवात केली आहे. इथेही आता मराठी माणसं घराबाहेर पडल्यावर आपसूक हिंदी बोलू लागतील मुंबईकर मराठी माणसांप्रमाणेच. बाँबेचे मुंबई तेव्हा झाले नव्हते, आता झाले, इतकाच काय तो बदल- फक्त मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला. नोकरभरतीच उरली नाही त्याच्यावर अन्याय व्हायला आणि मराठी नेते गुजराती, मारवाडी, जैन शेठजींचे एजंट बनल्यानंतर मराठी माणसाला धंद्यात शिरकाव मिळणार कुठून? मराठी माणसाचा जिथे तिथे पाणउतारा करून आणि मराठी भाषेचा अपमान करून आईच्या उरावर मावशी आणून बसवणारे सत्ताधीश आपणच निवडून दिलेले आहेत- आता मराठी माणूस बोल तरी कोणाला लावणार? भोगा आपल्याच कर्माची फळे.

