• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

खलिल जिब्रान – एक लेखक जो युगनायक होता!

समीर गायकवाड (बिट्विन द लाइन्स)

Marmik Team by Marmik Team
September 16, 2026
in इतर
0
खलिल जिब्रान – एक लेखक जो युगनायक होता!

ही एका अशा माणसाची गोष्ट आहे, ज्याच्या शवपेटीवर दोन देशाचे राष्ट्रध्वज गुंडाळले होते! त्यातला एक होता चक्क अमेरिकेचा आणि दुसरा होता लेबेनॉनचा! एक असा माणूस की ज्याच्या अंत्ययात्रेला विविध धर्माचे लोक एकत्र आले होते, जेव्हा जगभरात सौहार्दाचे वातावरण नव्हते! एक अवलिया जो प्रतिभावंत कवी होता, शिल्पकार होता, चित्रकार होता आणि परखड भाष्यकार होता. सर्वात महत्वाचे म्हणजे तो एक ज्ञानी, विवेकी दार्शनिक होता. एक सहृदयी पुरुष, जो आपल्या प्रेमासाठी अविवाहित राहिला. एक असा माणूस ज्याने वयाच्या पंधराव्या वर्षी धर्माची खरमरीत समीक्षा करणारं पुस्तक लिहिलं. ज्याला तत्कालीन चर्चने हद्दपारीची सजा सुनावून देशाबाहेर काढलं होतं, त्याच देशात पुढे त्याच्या नावाचा डंका पिटला गेला, मृत्यूनंतर त्याचे पार्थिव जनदर्शनासाठी तब्बल दोन दिवस ठेवावे लागले, इतकी अलोट गर्दी त्याच्या अंतिम दर्शनासाठी एकवटली होती. ज्या मॅरोनाईट चर्चच्या आदेशाने त्याला पिटाळून लावले होते, त्याच चर्चच्या आदेशानुसार त्याच्या स्वतःच्या गावातल्या दफनभूमीत त्याचे शव विधिवत् व सन्मानाने दफन केले गेले. आजही त्या असामीची कबर तिथे आहे अन् आजही त्या कबरीवर फूल चढवण्यासाठी मॅरोनाईट कॅथॉलिक, प्रोटेस्टंट, शिया, सुन्नी, यहुदी, बौद्ध यांच्यासह अनेक संप्रदायाचे, धर्माचे लोक तिथे येतात!

या असामान्य माणसाचं नाव खलिल जिब्रान! त्याच्या नावाचा अर्थ अत्यंत अप्रतिम आहे. ‘खलिल’ म्हणजे निवडलेला प्रिय मित्र आणि ‘जिब्रान’चा अर्थ आहे ‘आत्म्यांना संतोष देणारा! खलिलची वाक्ये सुभाषितांगत प्रसिद्ध आहेत. तो एक सर्वकालीन श्रेष्ठ रचनाकार म्हणून गणला जातो. अनेक कष्ट सहन करून त्याने आपले नाव सार्थ ठरेल असे संदेश दिले. ज्यायोगे संपूर्ण मानवजात सुख, शांती, समाधान आणि तृप्तीचे जीवन जगू शकेल.

गेल्या दोन दशकांपासून जो अंतर्गत यादवी आणि दहशतवाद्यांच्या कारवायांनी जराजर्जर झाला आहे, त्या सिरीया देशाचा कधी काळी भाग असणार्‍या तत्कालीन ऑटोमन माऊंटमधील बशरी (पुढे हा भूभाग लेबनॉनच्या ताब्यात आला) ह्या शहरात खलिलचा जन्म ६ जानेवारी १८८३ रोजी झाला. त्याचे कुटुंब मॅरोनाईट कॅथॉलिक होते. वयाच्या अकराव्या वर्षापर्यंत त्याने घरीच शिक्षण घेतले. तिथल्या सततच्या यादवीमुळे त्याच्या कुटुंबाला परागंदा होण्याशिवाय पर्याय उरला नाही. १८९५ ते १८९७ या दोन वर्षात सुरक्षित निवार्‍याच्या शोधात त्यांचं कुटुंब बेल्जियम, फ्रान्स, अमेरिका या देशातून फिरलं. या काळात त्याला अरेबिक, फ्रेंच आणि इंग्लिश भाषा अवगत झाल्या. अखेर त्यांचं कुटुंब अमेरिकेत स्थायिक झालं, पण छोट्या खलिलला मायभूमीची आस लागली होती. तो लेबनॉनला बैरुतच्या ‘मदरसत उल हिकमाह’मध्ये परतला. तिथे त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्याने वैद्यकीय शिक्षणासह इतिहास, संगीत, साहित्य आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अभ्यास केला.

त्याने वयाच्या पंधराव्या वर्षी लिहिलेल्या ‘द प्रॉफेट’ला आजही सर्वश्रेष्ठ आणि अभिजात साहित्यकृतीत गणलं जातं. या पुस्तकात २६ काव्यात्मक निबंध आहेत. या पुस्तकाबद्दल त्याला विलक्षण आत्मीयता होती. तब्बल चार वर्षे याचं हस्तलिखित तो जवळ बाळगून होता. तो सातत्याने पुनर्वाचन करायचा आणि त्यात सुधारणा करायचा, त्याला सजवायचा. हे पुस्तक प्रकाशित होताच जगाच्या साहित्यक्षितिजावर त्याचं नाव आपसूक उदयमान झालं. पिचलेल्या व अन्यायग्रस्त मानवाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव त्यात करून देण्यात आली होती. तरीही हे पुस्तक क्लिष्ट नव्हतं. वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने ‘अल हकीकत’ ही पत्रिका काढली होती. यात साहित्य आणि धर्मदर्शन यावर लेख असत. सतराव्या वर्षी वर्तमानपत्रातून गद्यलेखन सुरू करतानाच त्याने अरबी कवींची काल्पनिक चित्रे रेखाटली. इस्लामच्या उदयाच्या आधी या कवींची चित्रे उपलब्ध नव्हती, पण खलिलने ती साकारली. तो एकोणीस वर्षांचा असताना त्याच्या लाडक्या बहिणीचं निधन झालं, जिला तो संत म्हणत असे. तर त्याच्या वयाच्या विसाव्या वर्षी भावाचे नि त्या पाठोपाठ तीन महिन्यांनी त्याच्या आईचे निधन झाले. या घटनांनी खलिल व्यथित झाला आणि त्याने जीवनाकडे समीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिले. कदाचित त्यामुळेच खलिलच्या लेखनात कुठेही भोगवाद वा चंगळवाद आढळत नाही!

खलिल २१ वर्षांचा असताना
लेबनॉनमध्ये यादवी सुरू झाली. अराजक माजले. खलिलने एकाच वेळी चर्चच्या धार्मिक सत्तेला आणि शासकांच्या निरंकुश सत्तेला आव्हान दिले. त्याला खरे तर ख्रिश्चन धर्माप्रती जिव्हाळा होता, पण त्यातील दांभिकता त्याला पसंत नव्हती. त्याच वेळी इस्लामच्या विविध अर्थ लावण्याच्या पद्धतीवर तो नाराजी व्यक्त करत असे. त्यातील हिंस्त्रतेवर त्याचे खासे कटाक्ष होते, मात्र मानवतावादी सुफी गूढ छटांची त्याला ओढ होती. त्या काळात तुर्की शासकांनी अत्याचार माजवला होता. चर्चला संरक्षण होते, पण लोकांना नव्हते. पादरी लोक चर्चच्या नावाखाली भोळ्या गरीब जनतेचे शोषण करीत होते. बायबल आणि ख्रिस्ताच्या शिकवणी मन मानेल तशा पद्धतीने लोकांवर लादून आपले घर भरत होते. शासक त्यांना उत्तेजन देऊन त्यात वाटा घेत होते. दोन्हीकडून कात्रीत अडकलेली जनता आक्रोश करत असली, तरी तिचा आवाज कुणाच्य्ाा कानी पोहोचत नव्हता. खलिल मात्र यावर अंतर्मुख होऊन विचार करत होता आणि एके दिवशी लोकांच्या उद्रेकाला ठिणगी लावण्याचे काम खलिलनेच केले. त्यासाठी त्याला कुठल्या शस्त्राची गरज पडली नाही. हे काम त्याच्या पुस्तकाने केले. ‘अल अरवाह अल मूत्ममरिदा’ (स्पिरिट्स रिबेलियस) हा खरं तर कथासंग्रह होता, पण त्यात आगीच्या लसलसत्या जिव्हाच होत्या. त्या पुढची पायरी ‘अल अज्नीहा अल मूतकास्सिरा’ (द ब्रोकन विंग) या पुस्तकाने गाठली! या पुस्तकाने चर्चच्या धर्मसत्तेला जणू आव्हान दिले. त्यात त्यानं म्हटलंय की, ‘गरीब लोक आपलं रक्त घाम गाळून मेहनतीची भाकरी कमावतात आणि चर्चचे लोक त्यांच्या तोंडाचा घास हिसकावून घेतात. त्यांच्या शेतात पिकलेल्या धान्याने आपलं भांडार भरतात. तुम्ही धर्माच्या नावावर त्यांना हरतर्‍हेने लुटत आहात. त्यांच्याकडून हिसकावलेलं सर्व त्यांना परत करून त्यांना सुखाने जगू द्यायला हवं.’ खलिलने आपल्या कथांत हा आवाज इतका बुलंद केला की एका बलाढ्य सत्तेने त्याच्याविरुद्ध मोर्चेबांधणी केली.
तळपायाची आग मस्तकी गेलेल्या सत्ताधीशांनी खलिलच्या पुस्तकांच्या प्रती जप्त केल्या. त्याचं पुस्तक जाळून टाकण्याचे आदेश निघाले. चर्चला हाताशी धरून धर्मद्रोहाचे आरोप लावून त्याला देशातून निष्कासित केले गेले. विशेष म्हणजे हे आदेश निघाले तेव्हा खलिल रोदँ या चित्रकार मित्रास भेटण्यासाठी पॅरिसला गेला होता. त्याच्या अनुपस्थितीत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती, यावरून त्याच्याबद्दल असणार्‍या भीतीची कल्पना यावी. आपल्याला हद्दपार केले याहून अधिक दुःख त्याला पुस्तक जाळून टाकल्याचे झाले. त्याने त्या विद्रोही पुस्तकाचे इंग्रजीत पुनर्लेखन केले. हे पुस्तक ‘स्पिरिटस रिबेलियस’ या नावाने जगात प्रसिद्ध आहे.
यानंतर बराच काळ तो रोदँसोबत पॅरिसमध्येच राहिला. तिथं त्याने लेखनासोबत चित्रकलेवर ध्यान केंद्रित केलं. काही काळ तिथे राहून तो अमेरिकेस निघून गेला.

न्यूयॉर्कमध्ये त्याने छोटासा स्टुडिओ थाटला. त्याच्या पेंटिंग्जची प्रदर्शने अमेरिका,  फ्रान्स आणि इंग्लंडमध्ये भरत गेली. मोठमोठ्या समीक्षकांनी त्याच्या कलेची प्रशंसा केली. खलिलने जवळपास पंचवीस पुस्तके लिहिली. ‘द सिक्रेट्स ऑफ हार्ट’, ‘टियर्स अँड लाफ्टर’ ही त्याची सुरुवातीची पुस्तके होती. तारुण्यात लिहिलेल्या या पुस्तकांत मानवता, प्रेम, सौंदर्य आणि निसर्गकेंद्रित चिंतन आहे. ‘द ब्रोकन विंग्ज’मध्ये त्याच्या जीवनानुभवाची झलक आहे. तारुण्यात त्याचे सलमा करीमी या तरुणीवर प्रेम होते. पण चर्चच्या एका बिशपने तिचे लग्न आपल्या भाच्याशी लावून दिलं. खलिलचा हृदयभंग झाला. तो तिच्या प्रेमाच्या साक्षीने अविवाहित राहिला, त्याने पुन्हा कुठल्या स्त्रीवर प्रेमदेखील केलं नाही! त्याच्या हृदयभंगाच्या व्यथेच्या शेड्स ‘द मॅडम’, ‘द फोर रनर’, ‘द गार्डन ऑफ द प्रॉफेट’ या साहित्यकृतींत आहेत. कदाचित त्यामुळेच खलिलने ख्रिस्ताला मानवी गुणांनी संपन्न व कल्याणकाराच्या रूपातील करुणेचा अवतार या प्रतिमेत दर्शवलेय.
इ.स. १९०४मध्ये बोस्टन इथे भरलेल्या प्रदर्शनात मेरी एलिझाबेथ हेस्केलशी खलिलची भेट झाली. मेरी कलाशाळेत मुख्याध्यापिका होती, खलिलपेक्षा दहा वर्षाने मोठी होती. या दोघांची मैत्री खलिलच्या मृत्यूपर्यंत टिकून होती. काही चरित्रकारांच्या मते त्यांच्यात प्लेटॉनिक प्रेमाचं नातं होतं. मेरीच्या सहवासात आलेल्या खलिलने रोमँटिसिझमवर लेखन केले. मेरीने जेकॉब फ्लोरेन्सशी लग्न केलं. तत्पश्चातही ती खलिलला विविध स्वरूपांत मदत करत राहिली. दोन विजातीयलिंगी व्यक्तींमधील निखळ पारदर्शी आणि सच्च्या मैत्रीचे उदात्त प्रतीक म्हणून या दोघांच्या नात्याकडे पहिले जाते. वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी १० एप्रिल १९३१ रोजी खलिलच्या आयुष्याचं अखेरचं पान लिहिलं गेलं! तोवर त्याला अमेरिका आणि लेबनॉन या दोन्ही देशांनी नागरिकत्व बहाल केले होते.खलिलचा मृत्यू न्यूयॉर्कमध्ये झाला. त्याची इच्छा होती की मायभूमीत दफन व्हावे, पण त्यासाठी त्याच्या पार्थिवाला बरीच प्रतीक्षा करावी लागली. १९३२मध्ये त्याचे पार्थिव मायदेशात आणले गेले.

प्रॉव्हिडन्स नावाच्या जहाजातून त्याचे पार्थिव अमेरिकेतून लेबनॉनमध्ये आणले गेले, तेव्हा लेबनॉनमधले वातावरण बदलले होते. त्याच्या नावाला सर्वत्र मानसन्मान मिळत गेला आणि त्याची लोकप्रियता वाढत गेली. आजच्या घडीला खलिलच्या बशरीमधील कबरीचे रूपांतर एका भव्य देखण्या स्मारकात झाले आहे. बोस्टनमध्येही त्याचे शानदार स्मारक आहे. वॉशिंग्टन डीसीत त्याचे शिल्पस्मारक आहे. जगभरात अनेक देशात त्याचे पुतळे उभारले गेलेत. एका साहित्यिकाला मिळालेला हा सर्वोच्च बहुमान असावा.

अरब जगतात जिब्रानला साहित्यिक व राजकीय बंडखोर मानले जाते. परंपरागत संप्रदायापासून फारकत घेणारी त्याची रोमांचक लेखनशैली, विशेषतः त्याच्या गद्यात्मक कविता आधुनिक अरब साहित्यातील प्रबोधनाच्या केंद्रस्थानी होत्या. लेबनॉनमध्ये आजही त्याला साहित्यिक युगनायक मानले जाते. शेक्सपिअर आणि लाओ-त्झूनंतर खलिल जिब्रान हा सार्वकालिक सर्वाधिक खप असणारा तिसरा कवी आहे. कथा लिहिणारा खलिल कथानायकही झाला आणि युगनायकही झाला, ही गोष्टच खलिलविषयी सारं काही सांगून जाते.
चाटूगिरी करणारा सौदी अरेबिया आणि मध्यस्थाचे कातडे पांघरलेला कतार वगळता अमेरिकेशी सार्‍या अरब देशांचे वाकडे आहे. त्यामुळे जो अरब देशांशी वाकडे घेईल तोच त्यांना प्यारा आहे हे उघड आहे. आताच्या घडीला ख्रिश्चनिटीविरोधात आणि ख्रिश्चन इस्लाम संघर्षाविरोधात थेट भूमिका घेणारा लेखक अमेरिकेसही पचनी पडणार नाही. असं त्रांगडं शतकापूर्वी नव्हतं. मात्र तेव्हा धर्मसत्ता प्रबळ होत्या, त्याचबरोबर युरोपमध्ये उदारमतवादही होता, ज्याची जिब्रानला मदत झाली. आता जगभरात काही मोजके देश
(नॉर्वे, स्वीडन) वगळता उदारमतवाद औषधालाही उरला नाही. मग अशा वेळी जिब्रानसारख्या लेखकाचे मोठेपण अधिक ठळक होते.
मॅरोनाईट ख्रिश्चन्स हे भूमध्य समुद्रालगतच्या अरब देशांतले ख्रिश्चन्स. इस्रायल, पॅलेस्टाईन, लेबेनॉन, सीरिया, जॉर्डन, तुर्की आणि सायप्रस हे देश प्रामुख्याने यात येतात. मॅरोनाईट चर्चशी यांची बांधिलकी असते. त्यातही रोमन कॅथोलिक्सबरोबर धार्मिक सोहळ्यात सामुदायिक प्रेझेन्सला सहमती देतात. संपूर्ण भूमध्यसमुद्रालगतच्या देशांत मॅरोनाईट ख्रिश्चन्स आणि मुस्लिम यांच्यात क्वचित वाद होताना दिसतात. याचे श्रेय ते खलिल जिब्रानच्या परखड स्पष्टतेला देतात. इथे ज्यू आणि इस्लाम असा संघर्ष दिसतो, मात्र इस्लाम ख्रिश्चन असा संघर्ष तुलनेने अगदी कमी दिसतो. एक लेखक याहून अधिक कोणती क्रांती करू शकतो.

जिब्रानचं मोठेपण त्याने केलेल्या विद्रोहापुरते नसून त्याने साक्षेपी प्रबोधनही केले. त्याच्या बालपणी त्याचे कुटुंब भटक्यासारखं फिरलं, त्याचा फायदा (!) घेत त्यानं स्वतःला बहुभाषिक बनवलं. त्याचं लेखन त्यामुळेच खूप लवकर युरोपभर पसरलं. आपदा में अवसरचे अनेक हिणकस प्रयोग आपण पाहत आहोत. मात्र जिब्रानने खरेच आपत्तीचे रूपांतर इष्टापत्तीत केलं. इतकं करून तो थांबला नाही तर ताठ कण्याने मायदेशी परतला. तो विदेशात गेलेला असताना त्याच्या विरोधात कारवाई केली गेली, यावरून त्याचा दबदबा ओळखू येईल. एक लेखक इतकी क्रांती घडवू शकतो यावर आताचे जग विश्वास ठेवणार नाही. सात शतकांपूर्वी सात शुभ्रधवल विशाल बगळे पठारांवरून हिमाच्छादित शिखरांकडे आपले पंख फडफडवत झेपावले.

त्यांना पाहून पर्वताच्या पायथ्यातील गावामधील एक खेडूत म्हणाला, ‘त्या सात बगळ्यापैकी एका बगळ्याच्या पंखावर मी काळा दिव्य ठिपका पाहिला, जो मला जमिनीवरून स्पष्ट दिसला….’ आता त्या पर्वतराजीतील सर्व गावातले लोक सात विशाल काळ्या बगळ्यांची कथा सांगत असतात… खलिल जिब्रान यांच्या कथेमधील ह्या पंक्ती आहेत. मानवी स्वभाव निष्कलंक माणसाला देखील कसा कलंकित ठरवतो आणि त्यात स्वतःच्या मनाची भर घालत राहतो याचे हे बोलके उदाहरण.

माहितीसाठी : खलिल जिब्रानचे मराठीत उपलब्ध असणारे अनुवादित व चरित्र साहित्य – ‘दि मॅड मॅन’ ,’वाँडरर’, ‘सॅन्ड अ‍ॅन्ड फोम’ या तिन्हीचे मराठीतील अनुवाद काका कालेलकर यांनी केले आहेत. तर ‘रुपेरी वाळू’ या नावाने ’सॅन्ड अ‍ॅन्ड फोम’चे अनंत काणेकर यांनी मराठीत रूपांतर केले आहे. ‘खलिल जिब्रान जीवन-दर्शन’ हा ’दि प्रॉफेट’ या खलिल जिब्रानच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद रघुनाथ गणेश जोशी यांनी केला आहे. याचे संपादन आचार्य शं.द. जावडेकर आणि आचार्य स.ज. भागवत यांनी केले आहे. खलिल जिब्रानचे मराठीतील चरित्र श्रीपाद जोशी यांनी लिहिले आहे. रघुनाथ गणेश जोशी यांच्या ’जीवन-दर्शन’ या पुस्तकातही जिब्रानचे अल्पचरित्र देण्यात आले आहे.

Previous Post

कॅनडाचा मैत्रीचा हात भारत स्वीकारणार का?

Next Post

मोदींची गच्छंती निश्चित?

Next Post
मोदींची गच्छंती निश्चित?

मोदींची गच्छंती निश्चित?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.