• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

गेले ते दिन गेले!

टोक्या टोचणकर (टोचन)

Marmik Team by Marmik Team
September 19, 2026
in टोचन
0
गेले ते दिन गेले!

गणपती बाप्पा आले, गौराई आली आणि चाललीसुद्धा. आता पाच दिवसाचे, सात दिवसाचे गणपतीसुद्धा निरोप घेतील. बाकीचे अनंत चतुर्दशीला नजरेआड होतील. मग पुढच्या वर्षीपर्यंत त्यांची वाट पाहायची. आनंद, उत्साहाचा हा सण म्हणजे मराठी भगिनी बांधवांच्या कलाकुसरीला, मोदकांसह चविष्ट मराठमोळ्या खाद्यपदार्थांना उत्तेजन देणारा उत्सव. सार्वजनिक गणपतींची भव्य दिव्य आरास डोळे दीपवणारी असली तरी खरी मजा असते ती चाळीचाळींमध्ये होणार्‍या घरगुती गणेशोत्सवाची. गणपतीची सरबराई करण्याची एकच चढाओढ असते. यावर्षी मखराची सजावट कशी करायची, मूर्ती कशी हवी याचे बेत महिनाभर आधीपासून केले जातात. माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या आणि माझं बालपणही शंभर खोल्यांच्या दोन मजली चाळीत गेलं. प्रत्येक मजल्यावर तेहतीस खोल्या आणि एक सार्वजनिक झिलग्यांची खोली. आजही ती जुनी चाळ डोळ्यासमोर उभी राहते. त्यावेळी प्रत्येक मजल्यावर किमान पाच खोल्यांमध्ये म्हणजे एकूण पंधरा खोल्यांमध्ये गणपती असायचे. पोराटोरांसह बहुतेक चाळकरी मंडळी प्रत्येक खोलीमध्ये आरतीला जायची. तालासुरात आणि ढोलकी, मृदुंगाच्या साथीने आरत्या रंगायच्या, शेवटी प्रसादासाठी एकच झुंबड उडायची. आता चाळी गेल्या आणि या खोलीची खबर त्या खोलीला लागणार नाही, अशी ब्लॉक सिस्टीम आली. मेंटेनन्स परवडणार नाही म्हणून ऐंशी टक्के चाळकरी साठ-सत्तर लाखाला खोल्या विकून ठाणे, डोंबिवली, पार बदलापूर, कर्जतपर्यंत राहायला गेले. नव्या सोसायटीत फक्त पाच जणांच्या घरी गणपती बाप्पा आणतात. आरतीलाही कोण कुणाकडे जात नाही. परवा पोक्याची डायरी वाचली तेव्हा पोक्याने जागवलेल्या चाळीतल्या जुन्या आठवणी वाचून डोळ्यातून आसवं ओघळायला लागली. त्याच डायरीतील या काही आठवणी –

आज गणपतीचा दुसरा दिवस चाळीतल्या आरत्या रात्री आठनंतर सुरू होतात आणि अकरा वाजेपर्यंत चालतात. आठच्या आधी परत येण्याचे ठरवून माझगावला एका नातेवाईकाच्या घरी गणपतीला गेलो. तिथे रात्री सातला आरत्यांना सुरुवात झाली. त्यातल्या तीन-चार आरत्या खूप वेगळ्या होत्या आणि त्यांच्या चालीही सुरेख होत्या. त्यातील एक संत तुकाराम यांनी सद्गुुरुंवर केलेली आरती होती. त्यात संत मुक्ताबाईचाही उल्लेख होता. काही ओळी अशा होत्या.
धन्य धन्य सद्गुरु राव
माझ्या देही दावला देव
माझ्या देहाचे देऊळ केले
आत्मलिंग प्रकटले
त्रिगुणाच्या वळल्या वाती
सत्तावीस लावल्या ज्योती
पंचप्राणाची आरती
मुक्ताबाई ओवळती
धन्य धन्य मुक्ताबाई
तुका म्हणे माझी आई

मी त्याच रात्री चाळीतल्या आरत्यांमध्ये तीr आरती सर्वांकडून तालासुरात गाऊन घेतली. बाल्याचा डान्स म्हणजेच ज्याला चवली नाच म्हणायचे तो सादर करण्यासाठी एक पथक यायचे. दुसर्‍या दिवशी चाळीतली पोरे-टोरे त्यांचे अनुकरण करत नाचायची. ’शालू झोका देगो मैना’ हे नाचाचे आवडते गाणे. त्या अकरा दिवसांत गणपतीबाप्पा असलेल्या प्रत्येक घराबाहेर गॅलरीत नाच-गाणी म्हणत जागरणाचा कार्यक्रम असायचा. दोन-तीन वेळा चहापाणी, नाश्ता असा खास बेत व्हायचा. कधी महिलांचे भजन बाहेरून बिदागी देऊन आणले जायचे, कधी भावगीतांचा, कधी भारुडांचा तर कधी नकलाचा कार्यक्रम असायचा. हे सारे कार्यक्रम खोल्यांच्या मधल्या वर्‍हांड्यात सादर केले जायचे. आता ती मजा गेली. दुसरी आठवण येते ती आमच्या बजाबा मास्तरांची. हट्टेकट्टे, उंचेपुरे, डोक्यावरचे केस पूर्ण भादरलेला गोलमटोल रूंद चेहरा गुडघ्यांपर्यंत असलेल्या इस्त्रीच्या खाकी हात पँटीत खोचलेला इस्त्रीचा खाकी शर्ट, पायात मोज्याशिवाय असलेले चॉकलेटी बूट, चेहरा उग्र वाटेल असा चष्मा किंवा गॉगल, पानाने रंगलेले तोंड, जिन्यातून चाळीत एन्ट्री घेणार, मोठ्या आवाजात हिंदी अथवा मराठी गाण्याची लकेर घेत. बाजूच्याच गिरणीत जॉबर असले तरी कामगारांच्या ड्युट्या लावून हे गाव फिरुन झाल्यावर घरी हजर. शिक्षणाचा गंध नसला तरी गिरणीत त्यांना मास्तर म्हणत. बजाबा मास्तर तसे रसिक होते. अख्ख्या परिसरात त्यांच्याशिवाय कोणाकडेच ग्रामोफोन नव्हता. त्यावर कव्वाल्या, भक्तिगीतं यांच्या रेकॉर्ड्स लावून चाळीतल्या मुलांना गोळा करून गाणी ऐकत बसण्याचा त्यांचा छंद होता. गणपतीत तर ते चाळीतल्या मुलांसह गाणी म्हणायला जात. त्यांचे आवडते गाणे होते-

मनात येते खरोखरी गं बाई
नटून फिरावे घरोघरी
असेल त्याचे खरे म्हणावे
अनन्यभावे शरणही जावे
निश्चय माझा खरोखरी
गं बाई नटून फिरावे घरोघरी
मुलांच्या सगळ्या कार्यक्रमांना, विशेष म्हणजे होळीच्या सणाला प्रोत्साहनच नव्हे तर भरपूर वर्गणीही देत. त्यांची आणखी एक गवळण न विसरता येण्याजोगी.

आल्या आल्या पाच गवळणी
पाच रंगाचे हो शृंगार करुनी
पहिली गवळण रंग काळा
नेसून आली चंद्रकळा ।।
आल्या आल्या…

ही गवळण ते अशा काही ठसक्यात सादर करत की ज्याचे नाव ते. चाळीतल्या मुलांना त्यांनी गणपतीची महागडी फ्रेम आणून दिली होती. तिची गॅलरीत स्थापना करून तिच्यासमोर रोज संध्याकाळी चाळीतली मुलं, सामुदायिक प्रार्थना म्हणत पूजा करत. मुलं मोठी झाल्यावर चाळीच्या जागी नवी सोसायटी बांधली गेली. तिच्या गच्चीवर त्या फ्रेमच्या जागी संगमरवरी गणेशमूर्तीची कायमची स्थापना मुलांनी केली. तिचा उत्सवही दरवर्षी थाटात साजरा करण्यात्ा येतो. मुलांना सन्मार्गाला लावणारे बजाबा मास्तर काळाच्या पडद्याआड गेले. पण गणेशोत्सव आला की त्यांच्या स्मृती जाग्या होतात. आज झोपेतही ती जुनी चाळ, ती गणपतीची मजा दिसते आणि ते दिवस पुन्हा येणार नाहीत याची खंत वाटते.

Previous Post

नाय नो नेव्हर

Next Post

राशीभविष्य (१९ ते २५ सप्टेंबर २०२६)

Next Post
राशीभविष्य ( २१ ते २७ फेब्रुवारी २०२६)

राशीभविष्य (१९ ते २५ सप्टेंबर २०२६)

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.