संतोषराव, गणपती बाप्पाकडे महाराष्ट्राच्या वतीने काही मागणं मागायची जबाबदारी तुमच्यावर सोपवली तर काय मागाल तुम्ही?
– विनायक पंडित, बदलापूर
अशी जबाबदारी आमच्यावर सोपवणार्यांनाच मुळात महाराष्ट्राचं भलं करण्याची बुद्धी दे अशी मुख्य मागणी आम्ही करू… आणि आमच्या या मागणीचा नको तो अर्थ काढून, आमच्यावर जबाबदारी सोपावणार्यांना आमचा विरोध आहे, असे वाटून घेण्याची दुर्बद्धी कोणालाही ना होवो, अशीही उप-मागणी आम्ही गणपती बाप्पाकडे करू; नव्हे ती करावीच लागेल… नाहीतर आम्हाला आमचा मुद्दा पटवून देण्यासाठी तोंडासमोर येईल त्या प्रत्येक माईकवर आम्हाला सारखं सारखं बोलावं लागेल, ‘घटम भिंद्या पटम चिंध्या.. मिंध्या.. निंद्या…’
ज्याला पप्पू म्हणून हिणवलं, त्याचीच नक्कल आज विश्वगुरू करतायत. त्याने टी शर्ट घातलं, हे (शोभत नसताना, बेंगरूळ दिसत असताना) टी शर्ट घालतात; त्याने तरुणाईमध्ये जाऊन संवाद साधला, हे तशीच कॉन्सर्ट करण्याचा प्रयत्न करतात… आखिर ये क्या मजबुरी है?- माहिका पाटील, अलिबाग
मजबुरी का नाम (महात्मा हो) गांधी… असं तुम्हाला म्हणायचंय का? किंवा तो पप्पू असेल तर आपण महापप्पू आहोत हे त्यांना दाखवून द्यायचंय असं तुम्हाला म्हणायचंय का? तर ते तसं नाहीये… पण ते नेमकं कसं आहे तेही कळत नाहीये… आम्हाला कळलं की लगेच तुम्हाला कळवतो.. तोवर अपनी मैत्री बनी रहे…फ्रेंड्स!
संतोषराव, तुम्हाला कोणता गणेशोत्सव साजरा करायला आवडतो? कोकणातला, गावचा, घरगुती की शहरातला सार्वजनिक गणेशोत्सव?- विद्याधर घोरपडे, फलटण
चिठ्ठ्या टाकून ठरवावं लागेल… जरा आमची मजबुरी समजून घ्या साहेब… आम्ही घरगुती गणपती आवडतो म्हटलं तर सार्वजनिकवाले खवळतील… सार्वजनिक गणेशोत्सव आवडतो म्हटलं तर गावकी आणि भावकीवाले भडकतील… हल्ली कोण आपल्या बाजूने बोलला, यापेक्षा कोण आपल्या विरोधात बोलला हे ठरवणं सोप्प झालंय… त्यामुळे ‘आम्हाला हा संपूर्ण उत्सवच आवडतो…’ हे गुळगुळीत उत्तर गोड मानून घ्या…
मुंबई-गोवा महामार्गाचं काम रखडल्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना लाज वाटते, असं ते सांगतात. यावेळी सर्वाधिक कंत्राटदारांना आपण काळ्या यादीत टाकू असंही ते सांगतात. पण, या सगळ्याची जबाबदारी स्वीकारून ते स्वत: राजीनामा का देत नाहीत? – संदेश म्हात्रे, माणगाव
त्यांच्या पक्षात राजीनामा दिला जात नाही… त्यामुळे ते स्वतः राजीनामा देणार नाहीत.. आणि कोणी मागितल्यावर राजीनामा देण्यासाठी अजून तरी जंतर मंतरवर कोणी जमलेलं नाही… तरीही या विषयावरून राजीनामा द्यायला साहेबांचं डोकं आणि दिवस फिरलेले नाहीत… आणि तरीही तुम्ही त्यांचा राजीनामा मागताय? तुमच डोकं फिरल नसेल… पण दिवस फिरू शकतात… त्यासाठी आडनावं पंडितच असायला पाहिजे असं काही नसतं. आमच्या बोलण्यातला संदेश लक्षात घ्या संदेशजी…
पुण्यासारख्या, तथाकथित शुद्ध मराठी भाषेचा ठेका घेतलेल्या शहराला विद्यानंद बापट यांच्या अस्खलित मराठी बोलण्याचं कौतुक वाटावं, यात बापटांचं कौतुक करायचं की पुण्याची, भाषेच्याही बाबतीत, केवढी घसरण झाली आहे याबद्दल शोक करायचा? काही कळेना झालंय… – अभय वर्तक, वसई
बापटांच्या भाषेबद्दल बोलताय? बापटांना चापट मारणार्याच्या भाषेचं काय करावं ते आमच्यासारख्यांना कळेना झालंय. त्यांच्याही भाषेचं कौतुक व्हायला हवं ना. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असतानाही त्यांनी त्यांच्या भाषेचा दर्जा टिकवून ठेवलाय ना… आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारे बापटांच्या भाषेच कौतुक करतात. पण सपोर्ट मात्र बापटांना चापट मारणार्यांना करतात. यावरून काय कळायचं ते कळून घ्या…
एआयमुळे लवकरच मानवजात संपुष्टात येण्याची शक्यता आहे, ही बातमी वाचून पृथ्वीने आणि इतर सजीवसृष्टीने सुटकेचा नि:श्वास सोडला असेल, नाही का? – श्रीकांत पोळ, बोरिवली
मानवाचं सोडा… एआयबद्दल आपल्या लाडक्या महामानवाने काय म्हटलंय त्याची माहिती घ्या… माननीय महामानवाने एआयची तुलना घरातल्या ‘आय’बरोबर केली, तेव्हाच खुद्द एआयनेच शेवटचा निःश्वास घेतला असेल… आता मानवजात जे वापरतेय ते एआयचे उरले सुरले शेवटचे श्वास असतील…

