‘मन हे वेडे’ या आपल्या व्हिडीओ अल्बमनंतर अभिनेत्री स्मिता शेवाळे सध्या काय करतेय हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाच होता. आता त्याचा उलगडा झाला आहे. लवकरच ती ‘चाबुक’ या आपल्या आगामी नव्या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. सृष्टी मोशन पिक्चर कंपनी या बॅनरखाली निर्माते, दिग्दर्शक कल्पेश भंडारकर यांच्या या सिनेमाचे ट्रेलर स्मिताने इन्स्टाग्रामवरील आपल्या पेजवर शेयर केले आहे. यात समीर धर्माधिकारी तिचा नायक म्हणून चमकणार आहे.
लोकांनीही स्मिता शेवाळेच्या या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद देत तिला नव्या प्रोजेक्टबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. हा सिनेमा म्हणजे एक कौटुंबीक ड्रामा असल्याचं ट्रेलरवरूनच स्पष्ट होतंय. समीर धर्माधिकारी याने यात अनंत यज्ञोपवीत नावाच्या एका महत्त्वाकांक्षी आर्किटेक्टची भूमिका करतोय. आपल्या कामात आणि जीवनातही कुणी इंटरफेयर केलेलं त्याला आवडत नाही. अनंतची पत्नी एक साधी सरळ स्त्री आहे. स्मिताचा कॉलेज मित्र त्यांच्या घरी येतो तेव्हा कथानक वळण घेतं. त्यातच अनंतला घरात एक छुपा कॅमेरा आढळतो असं ट्रेलरवरून स्पष्ट होतं. स्मिता शेवाळेने या सिनेमातील कलाकारांची नावे आणि हा सिनेमा कधी रिलीज होणार याची काहीच माहिती दिलेली नाही.