श्रा वण हा व्रतवैकल्यांचा महिना. ठिकठिकाणी धार्मिक सत्संगांचे, पूजापाठांचे, कथाश्रवणांचे कार्यक्रम होतात. पुराणिक मंडळी सप्ताहात रसाळ भाषेत भागवताचे विवेचन करतात, रोचक कथाकथन करतात आणि कळत नकळत धर्माची, आचारविचारांची शिकवण देऊन जातात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत असेच काहीतरी करायला सुदूर अमेरिकेला गेले होते बहुतेक! तिथे त्यांनी न्यू यॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअरमध्ये एक काल्पनिक, रोचक कथा खपवण्याचा प्रयत्न केला. पण, मुळात भागवत कथा सांगायला भाषेत, मांडणीत रसरशीतपणा असावा लागतो. संघाच्या आणि भाजपच्या बहुतेक मंडळींच्या तोंडात छापखान्यातले खिळे बसवले असावेत, अशी संस्कृतप्रचुर, कृत्रिम हिंदी भाषा असते. ती कोणाच्याही हृदयाला स्पर्श करू शकत नाही. त्यात आपण बोलत आहोत ते धादांत खोटं आहे, हे त्यांना माहिती असल्यामुळे चेहर्यावर शून्य भाव आणि आवाजात मात्र अनावश्यक आरोह अवरोह, असा रेटून बोलण्याचा रटाळ कार्यक्रम सहसा चालत असतो. तरीही सरसंघचालकांनी हा प्रयत्न करून पाहिला आणि तो अंगाशी आला.
भागवतांनी असे विधान केले की ज्या हिंदू माणसाला भारतात मुस्लिम असता कामा नये, असं वाटतं, तो माणूस हिंदू असूच शकत नाही! ते ऐकल्यानंतर नागपूरच्या रेशीमबागेपासून ते दिल्लीतल्या शाही सरकारी निवासस्थानांपर्यंत कितीजणांच्या नाकाला कांदे लावण्याची वेळ आली असेल, याची कल्पनाही करणे कठीण! या विधानाने संघविरोधकांपेक्षा संघ समर्थकांना अधिक धक्का बसला असेल. कारण भागवती न्यायाने त्यांचे स्वयंसेवक, समर्थक आणि संघविचारांचे अनुयायीच हिंदू म्हणवून घ्यायला अपात्र ठरतील; गंमत म्हणजे, जे खरे हिंदू ठरतात, ते संघाचे ठाम विरोधक आहेत. संघाला मुळात सगळ्या हिंदूंच्या वतीने बोलण्याचा ठेका दिलाय कुणी, हाच त्यांचा प्रश्न असतो!
भागवतांचा अमेरिका दौरा घोषणेपासूनच वादात सापडला होता. त्यांना अमेरिकेत येऊच देता कामा नये, ते महात्मा गांधींच्या मारेकर्यांच्या संघटनेचे प्रमुख आहेत, अशा शब्दांत त्यांना थेट विरोध झाला होता. खासगी संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमावर आपण बंदी आणू शकत नाही, पण आपण या कार्यक्रमाला विरोध दर्शवतो, असं न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. भागवतांची संघटना आणि तिच्या भारतातल्या शाखाप्रशाखा मिळून जी उघड विषपेरणी करतात, तसले काही त्यांना
अमेरिकेच्या भूमीवरून करता येणे अशक्यच होते. पण, म्हणून एवढी मोठी कोलांटउडी?
भागवतांच्या संघटनेच्या अस्तित्त्वाचा पायाच मुळी मुस्लिमद्वेषावर आधारलेला आहे. काँग्रेसमध्ये महात्मा गांधींचे प्राबल्य वाढले आणि हिंदू मुस्लिम एकतेची भाषा होऊ लागली, तेव्हा केशव बळिराम हेडगेवार यांनी काँग्रेस सोडून रा.स्व. संघाची स्थापना केली. संघाचे
आयडियॉलॉग गोळवलकर गुरुजी ‘बंच ऑफ थॉट्स’मध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन या धर्मांना ‘भारताला असलेला अंतर्गत धोका’ म्हणतात थेट. त्यांच्यापासून ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतचा संघाचा सगळा इतिहास हा मुस्लिमांविरोधात हिंदू संघटन करण्याच्या प्रयत्नांचाच आहे. मुस्लिम, ख्रिश्चन आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने बौद्ध धर्म स्वीकारलेले पूर्वाश्रमीचे दलित यांना संघाच्या जहाल संघटनांचे अनुयायी दुय्यम नागरिक मानतात. त्यांना वर्णाश्रम व्यवस्थेच्या नावाखाली जातव्यवस्था, त्यातली उच्चनीचता हे सगळं परत हवं आहे. मनुस्मृती हे त्यांच्यासाठी संविधान आहे आणि देशाचा तिरंगा त्यांना मान्य नाही. तो संघस्थानावर फडकवण्यासाठीही किती काळ जावा लागला, हे आता तिरंगा रॅलीची सोंगं करून दाखवणार्यांना ठाऊक नसेल का?
विखारी सामाजिक ध्रुवीकरण, मुस्लिमांचे मॉब लिंचिंग, गोरक्षेच्या नावाखाली खंडणीखोरी, धर्माच्या नावाने धुडगूसाला संरक्षण, सामाजिक सौहार्दाला काळिमा फासणार्यांचा उदोउदो, बलात्कार्यांना संरक्षण, त्यांचा सन्मान आणि दोन शेठजींच्या घशात सगळा देश घालत जाणे, हीच कामगिरी भागवतांच्या परिवारातल्या सरकारने गेल्या १२ वर्षांत प्रामुख्याने केली आहे. मुसलमान तुमची मंगळसूत्रं चोरून नेतील, गायी पळवून नेतील, अशा प्रकारचा प्रचार खुद्द पंतप्रधान करत असतील, तर मग आसामच्या मुख्यमंत्र्यासारख्या तोंडाळाला मियाँभाईंच्या नावाने खडे फोडण्याचा परवानाच मिळतो. उत्तर प्रदेशातलं बुलडोझर राज आणि महाराष्ट्रात छू म्हटल्यावर पिसाटासारखी गलिच्छ भाषेत भुंकत सुटणारी पिलावळ या सगळ्या या परिवाराच्या देणग्या आहेत. नवमतदार असलेल्या जेन झींवर सध्या तरी धर्मद्वेषाची मात्रा चालत नाही, म्हणून हे नवे सर्वसमावेशक, सेक्युलर भासणारे सोंग उभे केले जात असल्यास त्यात काही आश्चर्य नाही.
संघ परिवार हा शेकडो तोंडांनी बोलणारा आणि शेकडो हातांनी भलभलत्या उचापती करणारा ऑक्टोपस आहे, हे जग जाणून आहे. त्यांच्या गेल्या १२ वर्षांतल्या अधोगती-पुस्तकावर जगातल्या बहुतेक देशांनी लाल शेरा मारलेला आहे. त्यामुळेच जी संस्था पाकिस्तान या देशासाठी अमेरिकेत लॉबिइंग करते, तीच नेमून संघाच्या प्रतिमेची रंगसफेदी करण्याचं काम तिला सोपवण्याची वेळ आली आहे, हे पुरेसं बोलकं आहे. देशात एक करायचं, परदेशात दुसरंच काहीतरी बोलायच्ां, परत वर तिथल्या भारतीयांनी तिकडे समरस होऊन राहावे, असं सांगायचं, असा एक अघळपघळ कार्यक्रम भागवतांनी केला आहे. ते परत भारतात आले की हरदासाची कथा मूळपदावर येणार यात काही शंका नाही.
त्यांचे इथले अनुयायी त्यांना फार गंभीरपणे घेत असतील, अशी शक्यता नाही. जिथे जातील तिथे त्यांना तसं बोलावं लागतं, बाकी आपण जे आजवर करत आलो आहोत, तेच करत राहायचं, हा त्यांच्यासाठीचा अलिखित नियम आहे. निदान अमेरिकेतल्या भागवत संप्रदायींनी तरी त्यांचे बोलणे मनावर घ्यावे आणि आपण विश्वगुरू बनलो आहोत, अशा गैरसमजातून रोज तिथले कायदे कानून, सांस्कृतिक सामाजिक संकेत धाब्यावर बसवून भारताची लाज तिकडे न काढण्याचा निर्धार करावा. तेवढे झाले तरी हे मोहनी भागवत सार्थकी लागेल!

