
अलेक्झांडर पुश्किन हा रशियन साहित्यिक. हा रशियन साहित्यिक. त्याच्या कविता, नाटके, कादंबर्या आणि कथा प्रसिद्ध आहेत. त्याच्या एका विख्यात कथेचे हे सार. काळीज हलवून टाकेल अशी गोष्ट. पुश्किनचा काळ आजपासून दोनशे वर्षांपूर्वीचा आहे त्या अनुषंगाने या कथेतील बारकावे समजून घेतले तर कथा अधिक उठावदार वाटते. कित्येक दशकांपूर्वी पत्रव्यवहाराला अतिशय महत्त्व होतं. जिथे वैराण वस्त्या असायच्या तिथेही पत्रं पोहोच व्हायची, साहजिकच या खात्याशी सर्वांचा स्नेह असे. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासमार्गांवर इथे वाटसरूला थांबण्याची, आराम करण्याची, अल्पोपहाराची सोयही असे. खेरीज आर्थिक व्यवहार देखील डाकमाध्यमातून होत असल्याने पहारेकर्याची नेमणूक असे. तिथे येणार्या संशयास्पद व्यक्तींना जेव्हा तो दाद देत नसे, तेव्हा त्याला दमदाटी व्हायची वा त्याच्याशी वाद व्हायचे. दिवस असो की रात्र त्याला शांतता नसे. पुश्किन यांनी संपूर्ण रशियामध्ये प्रवास केल्याने सर्व महामार्ग त्यांच्या परिचयाचे! पुश्किनना ओळखत नाही, असा पोस्टऑफिसचा एखादाच पहारेकरी असावा. जनतेत यांची प्रतिमा चुकीची होती. वास्तवात ते शांतताप्रिय, सेवाभावी, मनमिळाऊ, नम्र आणि पैशाचा लोभ नसणारे असत. अशाच एका पहारेकर्याची ही गोष्ट. सॅमसन वॉरेन त्याचं नाव.
१८१६ च्या मे महिन्यात पुश्किनला राज्यातील एका मार्गाला भेट देण्याची संधी मिळाली. एक सामान्य अधिकारी असल्याने भाडोत्री गाडीने त्याचा प्रवास व्हायचा. ते दिवस उष्ण, दमट होते. त्या दिवशी स्टेशनच्या सुमारे तीन मैल आधी पाऊस सुरू झाला, एका मिनिटात धुँवाधार पावसाने त्याला पूर्णपणे भिजवले. पोस्टऑफिसमध्ये पोहोचताच कपडे बदलणं आणि चहा मागवणं हे प्राधान्यानं आलंच.त्याला भिजलेलं पाहून सॅमसन ओरडला, ‘ऐ डॉनिया, सामोवर ठेव आणि क्रीम आण.’
त्याच्या हाकेसरशी चौदा वर्षांची कोवळी युवती भिंतीमागून समोर अंगणात आली. तिचे सौंदर्य पाहून पुश्किन थक्क झाला.
‘ही तुमची मुलगी आहे का?’ त्याने चौकीदाराला विचारले.
तो अभिमानाने उत्तरला, ‘होय! ती फार हुशार आणि चंचल आहे. तिच्या दिवंगत आईवर गेलीय!’
संवाद वाढवत तो पुश्किनच्या प्रवासाचा इतिहास टुरिस्ट रजिस्टरमध्ये लिहू लागला. पुश्किन त्याच्या छोट्याशा पण स्वच्छ झोपडीच्या भिंतींवर लटकलेली त्याची चित्रं पाहू लागला. ती चित्रे एका भरकटलेल्या मुलाबद्दल होती. पुश्किन त्याच्या सारथ्याच्या रोजंदारीचा हिशोब करत असताना तिथे डॉनिया आली. तिने एका नजरेत त्याच्यावर पडलेला आपला प्रभाव ताडला. त्याच्या प्रश्नांना ती न डगमगता उत्तरे देत होती. त्याने तिच्या वडिलांना वाईन दिली आणि तिला चहा दिला, त्यानंतर त्यांचे गप्पाष्टक सुरू झाले. बराच वेळ तिथे थांबल्यानंतर इच्छा नसूनही त्याला तिथून निघावे लागले. निघताना त्याने तिचे दीर्घ चुंबन घेतले, जे पुढे जाऊन दीर्घकाळ त्याच्या स्मरणात राहिले.
पाचेक वर्षांनी तो त्याच रस्त्यावरून जाताना त्याला तो वृद्ध पहारेकरी आणि त्याची तरुण मुलगी आठवली. तो आता हयात असेल का नाही या विचाराने त्याच्या मनात काहूर केले. त्याची घोडागाडी बरोबर त्या डाकचौकीसमोर थांबली. त्याने खोलीत प्रवेश करताच आतील भिंतींवरची, भरकटलेल्या मुलाची कहाणी सांगणारी ती चित्रे ओळखली. टेबल आणि बेड देखील आधीच्याच ठिकाणी ठेवले होते, परंतु खिडक्यांमध्ये आता फुले नव्हती आणि सर्व काही निर्जीव, विस्कळीत दिसत होते. पहारेकरी जाड कोट घालून झोपला होता. पुश्किनच्या येण्याने त्याला जाग आली. तो उठून उभा राहिला. तो सॅमसन वॉरेनच होता. मात्र तो अगदी म्हातारा दिसत होता. तो रजिस्टरमध्ये नावनोंदणी करत असताना पुश्किनने त्याला निरखून पाहिले, तो अगदी जख्ख जरठ दिसत होता. अवघ्या पाचेक वर्षात एखादा माणूस इतका कसा काय वठलेला वृद्ध दिसू शकतो या प्रश्नाने त्याला हैराण केले. अखेर न राहवून पुश्किनने त्याला सवाल केलाच,‘आपण एकमेकांना ओळखतो! तुमच्या लक्षात आहे का?’
सॅमसन काहीशा थंडपणे उत्तरला, ‘हा रस्ता लांब पल्ल्याचा आहे. इथे खूप लोक माझ्या घरी येतात जातात, त्यामुळे अनेकजण मला ओळखतात.’
सॅमसनने निर्विकारपणे केलेल्या खुलाशाकडे दुर्लक्ष करत त्याने विचारले, ‘तुमची मुलगी आता कशी आहे? त्यावर सॅमसनने त्रोटक उत्तर दिलं, ‘देव जाणो !’
‘बहुधा तिचे लग्न झाले असेल ना?’ पुश्किन न राहवून बोलला. म्लान सॅमसनने त्याच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले. जणू काही ऐकलेच नाही असा अविर्भाव होता त्याचा. कुजबुजत पुश्किनचे जर्नी डिटेल्स वाचत राहिला. पुश्किनने प्रश्नांची सरबत्ती थांबवली आणि चहा आणायला सांगितला. पुश्किनला सॅमसनच्या तुटकपणाचे कुतूहल सतावू लागले. याला मद्य दिले तर हा बोलू तरी लागेल असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. त्याने वाईन काढली आणि ग्लास भरले.
सॅमसनने पुश्किनने देऊ केलेला ग्लास नाकारला नाही. पुश्किनने दिलेल्या ‘रम’ने त्याचा हळूहळू ताबा घेतला. दुसरा ग्लास पिऊ लागताच तो खुलेपणाने बोलू लागला. त्याने एकतर आता एकतर पुश्किनला ओळखले तरी होते वा तो तसे नाटक तरी करत होता. मात्र त्याने जे सांगितले ते ऐकून पुश्किन अंतरबाह्य हादरला.
‘मग, तुला माझी डॉनिया माहीत आहे तर?’ त्याने संभाषण सुरू केलं. ‘तिला कोण ओळखत नाही बरं? अहो, नुसतं डॉनिया
डॉनिया हाच नाद ऐकतोय मी! काय पोर होती ती! जो कुणी येतो, तिची स्तुती करतो, तिला कुणी दोष देत नाही. शाळेत असतानादेखील तिच्यावर खुश होऊन शिक्षिका कधी तिला रुमाल द्यायची, तर कधी कानातल्या रिंग्ज द्यायच्या! दुपारचे किंवा रात्रीचे जेवण घ्यायचे असल्यासारखे वाटसरू मुद्दाम थांबायचे. प्रवासी अधिकारी कितीही रागावले असले तरी तिला पाहून शांत व्हायचे आणि माझ्याशी प्रेमाने बोलायचे. इतकेच नव्हे, तर इथे आलेले सैन्याचे दूत अर्धा तासभर तरी तिच्याशी बोलत असत… घर तिच्या भरवशावर होतं. काय आणायचे, काय बनवायचे, सगळे करायचे सर्व तीच ठरवे.’ सॅमसन आपल्या मुलीबद्दल प्रेमाने सांगत होता.
काही वेळापूर्वी याच सॅमसनची धास्ती आपण घेतली होती हे पुश्किनला आता खरे वाटत नव्हते. सॅमसन सांगू लागला, ‘मुलीने आनंदी राहावे असे मला वाटत नव्हते का? माझे माझ्या मुलीवर प्रेम नव्हते का? मी तिची काळजी घेतली नाही का? तिचे जगणे इथे अवघड झाले होते का? नाही. काही संकटांपासून कोणीही सुटू शकत नाही. ललाटीचे भाष्य पुसता येत नाही हेच खरे…’
प्रदीर्घ सुस्कारा टाकत त्याने आपले दुःख मोकळे केले : तीन वर्षांपूर्वी एका हिवाळ्याच्या संध्याकाळी, जेव्हा सॅमसन नव्या रजिस्टरची आखणी करत होता आणि डॉनिया भिंतीच्या मागे बसून शिवणकाम करत होती, तेव्हा एक ट्रोइका त्यांच्या डाकचौकीपाशी थांबला. केसाळ टोपी, लष्करी कोट आणि शाल घातलेला एक प्रवासी त्यातून उतरला. त्याचे नाव मिन्स्की होते. त्याने सॅमसनकडे शिलकीतले घोडे मागितले. मात्र घोडे शिल्लक नव्हते. नकार ऐकण्याची सवय नसलेल्या मिन्स्कीने आवाज वाढवला आणि चाबूक बाहेर काढला. अशा दृश्यांची सवय असलेली डॉनिया लगेच भिंतीआडून धावत आली आणि प्रेमळ आवाजात तिने त्याला विचारणा केली की त्याला काही खायचे आहे का?
डॉनियाच्या आगमनाचा अपेक्षित परिणाम झाला. मिन्स्कीचा राग निवळताना स्पष्ट दिसत होता. त्याने घोड्यांसाठी वाट पाहण्याचे मान्य केले आणि खाण्याचे जिन्नस मागवले. बारीक मिशांचा तो कणखर तरुण काळ्या घोडदळाचा अधिकारी होता. नंतर सॅमसनजवळ बसून तो त्याच्याशी नि डॉनियाशीही अदबीने बोलू लागला. त्याचे जेवण होईपावेतो घोडेही माघारी आले. सॅमसनने दाणापाणी न देताच त्यांना मिन्स्कीच्या घोडागाडीला त्वरित जुंपण्याचा आदेश दिला. त्याने आत येऊन पाहिलं तर मिन्स्की बेंचवर जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत लोळताना दिसला. त्याची प्रकृती खालावली होती. डोकं दुखत होतं. तशा अवस्थेत पुढे जाणे शक्यच नव्हते. सॅमसनने त्याला त्याची खाट दिली नि त्याची सुश्रुषा सुरू केली. त्याची प्रकृती सुधारली नाही तर दुसर्या दिवशी सकाळी शहरातून डॉक्टरांना बोलावावे असे ठरले. दुसर्या दिवशी मिन्स्कीची प्रकृती अजूनच खालावली. त्याचा सारथी घोड्यावर स्वार होऊन डॉक्टरांना बोलावण्यासाठी शहराकडे निघून गेला. तोवर व्हिनेगरमध्ये भिजवलेल्या रुमालाने त्याचे डोके बांधून डॉनिया कॉटजवळ त्याच्यापाशी बसली. सॅमसनसमोर एकही शब्द न उच्चारता तो नुसता रडतच होता. दोन कप कॉफी त्याने ढोसली आणि आक्रोश करतच दुपारच्या जेवणाची ऑर्डर दिली.
डॉनियाला त्याच्यापासून अंतर ठेवता येऊ नये असं तो वागायचा. प्रत्येक क्षणी तो काहीतरी प्यायला मागायचा आणि ती आपल्या हाताने बनवलेलं सरबत, कॉफी किंवा तत्सम पेय त्याला द्यायची. तो आपले ओठ ओले करायचा आणि दर खेपेस ग्लास परत करताना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉनियाचा हात आपल्या घ्यायचा.
डॉक्टरांनी त्याची नाडी तपासली. त्याच्याशी ते जर्मनमध्ये बोलले. सॅमसनला मात्र त्यांनी रशियनमध्ये सांगितले की मिन्स्कीला विश्रांतीची सक्त गरज आहे, दोन दिवसांनी तो जाऊ शकतो. मिन्स्कीने डॉक्टरांना पंचवीस रूबल्सची फी दिली, त्यांना लंचचे आमंत्रणही दिले. दोघे भरपेट जेवले. ‘वाईन’ची अख्खी बाटली रिचवली नि अगदी आनंदाने त्यांनी निरोप घेतला.
दुसर्या दिवसानंतर मिन्स्की पूर्णपणे बरा झाला. त्याला खूप आनंद झाला. सतत डॉनियाशी वा सॅमसनशी मस्करी करणे, शिट्ट्या वाजवणे, प्रवाशांशी बोलणे, त्यांचा प्रवास नोंदवहीत लिहिणे अशी त्याची वागणूक होती. तिसर्या दिवशी सकाळी त्याने निघण्याची तयारी केली तेव्हा सॅमसनचे मन भरून आले. तो रविवार होता, डॉनिया चर्चला जायची तयारी करत होती. मिन्स्कीला त्याची गाडी देण्यात आली. त्याने सॅमसनचा निरोप घेतला. सेवा बडदास्तीबद्दल त्याला बक्षीस दिले. डॉनियाचा निरोप घेताना त्याने गावाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या चर्चपर्यंत तिला लिफ्ट देण्याची ऑफर दिली. डॉनिया आधी विचारात पडली, नंतर तिने होकार दिला. त्याच्या शेजारी बसली. सारथ्याने इशारा करताच घोडे धावू लागले.
डॉनियाला आपण त्याच्यासोबत कसे जाऊ दिले याचा उलगडा बिचार्या सॅमसनला कधीच झाला नाही. मुलीच्या विरहवेदनांनी जेमतेम अर्ध्या तासानंतर त्याच्या छातीत कळा येऊ लागल्या. अस्वस्थतेतून तो स्वतःवरचा ताबा हरवून चर्चच्या दिशेने निघाला. तिथे त्याने पाहिले की सर्व लोक आपापल्या घरी गेले आहेत. डॉनिया कुठेच दिसली नाही. प्रीस्ट बाहेर पडत होता, सेवक मेणबत्त्या विझवत होता. कोपर्यात बसलेल्या दोन वृद्ध स्त्रिया अजूनही प्रार्थना करत होत्या. पण डॉनियाचा मागमूसही नव्हता. मोठ्या कष्टाने त्याने सेवकाला डॉनियाबद्दल विचारले, पण तिथेही निराशाच पदरी पडली. सॅमसन उदास मनाने घरी परतला.
आता एकच आशा उरली होती. तारुण्यातील चंचलतेपोटी डॉनियाने पुढच्या डाकचौकीत जाण्याचा निर्णय घेतला असावा, जिथे तिची गॉडमदर राहत होती. सॅमसनने डॉनियाची प्रतीक्षा केली. शेवटी एकाकी नि अस्वस्थ अवस्थेत तो संध्याकाळी परतला, तेव्हा डॉनिया पुढच्या डाकचौकीतूनही मिन्स्कीसोबत पुढे निघून गेल्याचा दुःखद निरोप त्याला मिळाला. हा आघात सॅमसनला सहन झाला नाही. आदल्या रात्री ज्या कॉटवर मिन्स्की झोपला होता त्या कॉटवरच तो नकळत पडला. सॅमसनच्या लक्षात आले की मिन्स्कीचा आजार खोटा होता, तो सगळा एक बहाणा होता!
पश्चात्तापाच्या आगीत होरपळणार्या सॅमसनची तब्येत ढासळली, त्याला शहरात नेण्यात आले. त्याच्या जागी काही काळासाठी दुसरा पहारेकरी नेमण्यात आला. मिन्स्कीवर उपचार करणार्या डॉक्टरांनीच वृद्ध सॅमसनवरही उपचार केले. त्यांनीच त्याला सांगितले की मिन्स्की पूर्णपणे निरोगीच होता. त्यांना त्याचे दुष्ट हेतू कळले होते, मात्र चाबकाच्या फटक्यांच्या भीतीने ते गप्प राहिलेले! एक तर ते सत्य बोलत होते वा बढाई मारत होते. त्यांच्या वक्तव्याने सॅमसनला अजिबात दिलासा मिळाला नाही.
आजारातून बरे झाल्यानंतर सॅमसनने डाक ऑफिसच्या वरिष्ठ अधिकार्याकडे दोन महिन्यांची रजा मागितली आणि कोणालाही एक शब्दही न सांगता तो पायीच मुलीच्या शोधात निघाला. प्रवासी नोंदवहीचे रजिस्टर पाहून त्याला कळले की मिन्स्की स्मोलेन्स्कहून पीटरबर्गला रवाना झाला होता. तिला घेऊन जाणार्या सारथ्याने कथन केलं की वाटेत डॉनिया सतत रडत असली तरी ती स्वतःच्या मर्जीने जात आहे असेच वाटत होते!

सॅमसनने पीटर्सबर्ग गाठले. जुन्या परिचयाच्या सैन्यातील निवृत्त अधिकार्यांच्या हॉस्टेलवर तो राहिला आणि डॉनियाचा शोध त्याने चालू ठेवला. अल्पावधीतच त्याला समजले की मिन्स्की अजूनही पीटर्सबर्गमध्येच आहे. सॅमसनने त्याच्या घरी जायचे ठरवले. पहाट होताच तो त्या गेस्टहाऊसमध्ये गेला आणि हुजूरांच्या भेटीसाठी विनंती केली की एका वृद्ध सैनिकाला हुजूरांना भेटायचे आहे. विहिरीजवळ चपला साफ करत असलेल्या ऑर्डर्लीने सांगितले की साहेब झोपले आहेत आणि ते अकरा वाजण्यापूर्वी कोणालाही भेटत नाहीत. सॅमसन नाईलाजाने माघारी फिरणार होता, तोच मिन्स्की स्वतः लाल टोपी घालून बाहेर आला.
‘काय भाऊ, काय हवंय तुला?’ त्याने विचारले.
सॅमसनचे मन भरून आले. त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले आणि थरथरत्या आवाजात तो फक्त म्हणाला, ‘हुजूर कृपया…!’ मिन्स्कीने आवाज ओळखीचा वाटल्याने झर्रकन त्याच्याकडे पाहिले आणि तो जवळपास किंचाळलाच! सॅमसनचा हात धरून त्याने त्याला अभ्यासाच्या खोलीत नेत दरवाजा बंद केला. वृद्ध सॅमसन म्हणाला, ‘गाडीतून पडलेले धान्य देखील धुळीत मिसळते, निदान मला माझी डॉनिया द्या! तुमच्या हृदयात ती सामावली असली तरी परत द्या हो! तिला मारू नका हो!’
‘जे झाले ते झाले. आता तो काळ पुन्हा येणार नाही,’ मिन्स्की जरबयुक्त स्वरात म्हणाला,‘मी तुमचा अपराधी आहे, तुमची मी क्षमा मागतो, पण मी डॉनियाला सोडेन असे समजू नका. ती आनंदात राहील याचे वचन देतो. तुम्हाला तिची काय गरज आहे? ती माझ्यावर प्रेम करते, ती तिचे जुने आयुष्य विसरली आहे.’
एवढं बोलून एक लिफाफा त्याने सॅमसनच्या सदर्याच्या बाहीत सरकावला आणि चटकन दार लोटून निघून गेला. विमनस्क अवस्थेत सॅमसन बराच वेळ तसाच उभा राहिला. शेवटी त्याने यंत्रवत लिफाफा उघडला आणि त्यातल्या पाच-पाच, दहा-दहा रुबलच्या काही चुरगळलेल्या नोटा त्याला दिसल्या. त्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. अपमानाचे अश्रू! त्याने त्या नोटा चुरगाळल्या नि जमिनीवर फेकल्या. त्याने आपल्या डाकचौकीत परतण्याचा निर्णय घेतला. निघण्याआधी एकदा तरी आपल्या मुलीला पाहण्याची त्याची इच्छा होती.
याच हेतूने दोन दिवसांनंतर तो पुन्हा मिन्स्कीच्या घरी आला, परंतु ऑर्डर्लीने मोठ्या गांभीर्याने उत्तर दिले की हुजूर कुणालाही भेटणार नाहीत. त्याने वृद्ध सॅमसनची मान पकडून त्याने त्याला गेस्टहाऊसच्या बाहेर ढकलले, घाईघाईने दरवाजा बंद केला. दमलेला सॅमसन बराच वेळ नि:शब्द उभा राहिला आणि काही वेळाने निघून गेला.
त्याच दिवशी संध्याकाळी तो चर्चला प्रार्थना करून लिटेयानाच्या रस्त्याने जात होता. अचानक एक भव्य वॅगन त्याच्या समोरून गेली आणि सॅमसनने त्यात बसलेल्या मिन्स्कीला ओळखले. तीन मजली इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर वॅगन थांबली आणि मिन्स्की आत शिरला. सॅमसनच्या अधीर मनात एक आनंदी विचार तरळला. मागे वळून तो सारथ्यापाशी गेला आणि त्याला विचारले, ‘भाऊ कुणाचा घोडा आहे? मिन्स्की आता इथेच कुठेतरी आहेत ना?’
‘बरोबर आहे,’ सारथ्याने उत्तर दिले, ‘पण तुला का चौकश्या?’
‘तुझे मालक मिन्स्की यांनीच मला हे पत्र डॉनियाला देण्यास सांगितले, पण मी विसरलो होतो की डॉनिया कुठे राहते?’
‘डॉनिया येथेच राहतात, दुसर्या मजल्यावर. मात्र हे पत्र खूप उशिरा आणलेस भाऊ, कारण आता मिन्स्की स्वत:च येथे आले आहेत.’
‘काही हरकत नाही,’सॅमसन धडधडत्या हृदयाने म्हणाला, ‘माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तरीही माझे काम मला पुरे करावेच लागेल.’ असे म्हणत तो पायर्या चढू लागला.
दरवाजा बंद होता. त्याने बेल वाजवली. काही क्षण तणावाने भारलेल्या प्रतिक्षेत गेले. आतून चावी फिरवण्याचा आवाज आला. मग दार उघडले गेले.
‘एव्हडोत्या सॅमसानोव्हना इथे राहतात?’ त्याने डॉनियाचे पूर्ण नाव घेत विचारले.
‘हो, इथेच,’ तरुण दासीने उत्तर दिले. ‘तुमचे त्यांच्याकडे काय काम आहे?’
सॅमसन उत्तर न देता दिवाणखान्यात शिरला.
‘नाही नाही, तुम्हाला आत जाता येणार नाही,’ मोलकरीण मागे धावत येत ओरडली. पण सॅमसन काहीएक न ऐकता पुढे निघून गेला. पहिल्या दोन खोल्यांमध्ये अंधार होता, तिसर्या खोलीत मंद प्रकाश होता. तो उघड्या दरवाजाजवळ थांबला. मिन्स्की एका सुशोभित खोलीत विचारमग्न होऊन बसला होता. अत्याधुनिक देखणा पोशाख घातलेली डॉनिया त्याच्या खुर्चीच्या हातावर बसलेली, जणू तिच्या इंग्रजी घोड्यावर स्वार झाल्यागत तिची बैठक होती! तिने मिन्स्कीकडे प्रेमाने पाहिले, चमचमत्या बोटांनी तो तिच्या केसांशी खेळत होता. बिचारा सॅमसन वॉरेन! त्याची मुलगी त्याला कधीच इतकी सुंदर वाटली नव्हती. तो फसगत झाल्यागत तिच्याकडे बघत राहिला. त्याच्या हालचालींची चाहूल मिन्स्कीला लागली असावी.
‘कोण आहे तिकडे?’ मिन्स्कीने डोके वर न करता विचारले. सॅमसन गप्प राहिला. काहीच उत्तर न मिळाल्याने डॉनियाने मस्तक उंचावून वर पाहिलं आणि किंचाळत ती कार्पेटवर पडली. घाबरलेला मिन्स्की तिला उचलण्यासाठी पुढे गेला आणि अचानक दारात उभ्या असलेल्या वृद्ध सॅमसनला पाहताच डॉनियाला तसेच सोडून रागाने थरथरत तो त्याच्या दिशेने झेपावला.
‘तुम्हाला काय पाहिजे?’ दातओठ खात तो म्हणाला, ‘दरोडेखोरासारखे माझ्या मागे का फिरत आहात? मला मारायचेय का? चालते व्हा!’ आणि म्हातार्या सॅमसनच्या कंबरेचा पट्टा धरून त्याने त्याला पायर्यांवरून खाली ढकलले.
अत्यंत खजील मनाने सॅमसन त्याच्या खोलीवर परतला. मित्राने त्याला न्यायालयात तक्रार करण्याचा सल्ला दिला, मात्र विचाराअंती त्याने हात झटकले आणि मागे हटण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांनी तो पीटर्सबर्गहून त्याच्या डाकचौकीत परतला नि स्वतःला कामात गुंतवलं…
आपली दास्तान सुनावून झाल्यावर
सॅमसन म्हणाला, ‘दोन वर्षे झालीत… मी डॉनियाशिवाय जगत आहे. अलीकडे तिची कोणतीही खबर नाही. जिवंत की मृत… काहीच ठाऊक नाही… ती पहिली किंवा शेवटची नाही जिला एखाद्याने आमिष दाखवून काही दिवस सोबत ठेवले आणि नंतर सोडून दिले. पीटर्सबर्गमध्ये अशा अनेक मूर्ख तरुणी आहेत, ज्या आज मखमली वस्त्रे परिधान करताहेत आणि कदाचित उद्या त्या कपड्यांच्या लक्तरांमध्ये रस्त्यावर झाडू मारताना दिसतील. कदाचित डॉनियाचेही असेच नशीब असेल, असे वाटते तेव्हा मी नकळत तिच्या मृत्यूची इच्छा करतो…’
त्या वृद्ध पहारेकर्याने आपली कैफियत सांगताना कैकदा शर्टच्या बाह्यांनी अश्रू पुसले. आपली व्यथा सांगताना त्याने वाईनचे पाचेक ग्लास रिचवले होते. त्याच्या कथेचा पुश्किनच्या हृदयावर खोलवर परिणाम झाला. अलविदा करूनही तो त्याला कधीच विसरू शकला नाही. डॉनियाचा विचार करत राहिला.
या घटनेनंतर काही काळाने एका मित्राच्या भेटीत त्याला कळले की सॅमसन जिथे काम करत असे ती डाकचौकीच आता अस्तित्वात नाही.
‘वृद्ध पहारेकरी निदान जिवंत आहे का?’ पुश्किनच्या या प्रश्नावर मित्राकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. न राहवून पुश्किनने तिकडे जायचे ठरवले आणि घोडा घेऊन त्या गावाकडे निघाला.
हिवाळ्याचे दिवस होते. आकाश ढगाळ ढगांनी व्यापले होते. शेतांमधून वाहणार्या थंड वार्याच्या झोतासोबत लाल पिवळी पानं उडत होती. पुश्किन सूर्यास्ताच्या वेळी गावात पोहोचला आणि तडक डाकचौकीपाशी जाऊन थांबला. पोर्चमध्ये जिथे कधी काळी गरीब
डॉनियाने त्याचे चुंबन घेतले होते, तिथे एक लठ्ठ स्त्री आली. तिने त्याच्या प्रश्नांचे उत्तर दिले.
वृद्ध सॅमसन वॉरेन जवळजवळ एक वर्षापूर्वी मरण पावला होता. आता त्याच्या घरात एक दारूवाला राहत होता आणि ती स्त्री त्या दारू बनवणार्याची पत्नी होती. इथेपर्यंत येण्यासाठीचा आपला प्रवास व्यर्थ गेल्याबद्दल आणि त्यापायी खर्ची पडलेल्या सात रूबलबद्दल पुश्किनला वाईट वाटले. पण, तिथून निघण्याआधी काही शंकांचे निरसन करणे जरुरीचे होते.
‘तो कसा मेला?’ पुश्किनने दारूभट्टीवाल्याच्या बायकोला विचारलं.
‘पिऊन…’ ती म्हणाली.
‘त्याला कुठे दफन केलेय?’
‘वस्तीच्या बाहेर, त्याच्या कालकथित पत्नीच्या शेजारी.’
‘तुम्ही मला त्याच्या कबरीपर्यंत नेऊ शकता का?’
‘का नाही. अरे वांका बेटा! मांजरासोबतचा तुझा खेळ पुरे झाला आता… ह्या यजमानांना कब्रस्तानापाशी घेऊन जा आणि त्या पहारेकर्याची कबर दाखव.’
तिची हाक ऐकून लाल केस असलेला, कंबरेत किंचित बाक आलेला, फाटके कपडे घातलेला एक तरुण धावत पुश्किनकडे आला आणि त्याला ताबडतोब वस्तीबाहेर घेऊन गेला.’तू मृताला ओळखतो का?’ जाताना पुश्किनने त्याला विचारले.
‘का बरं ओळखणार नाही? त्यांनीच तर मला गोफ कसा बनवायचा ते शिकवलं. मधुशालेतून निसटलो की आम्ही त्यांच्या मागे जायचो. आजोबा, अक्रोड, म्हणून ओरडायचो, मग ते आम्हाला अक्रोड द्यायचे. अधूनमध्ाून ते आमच्यासोबत वेळ व्यतीत करत.’
‘तुला त्यांची आठवण येते का?’
‘आता प्रवासी क्वचितच येतात. नाही म्हणायला मागच्या उन्हाळ्यात एक मेमसाब आली होती. तिने याच वृद्ध पहारेकर्याबद्दल विचारले आणि त्याच्या कबरीपाशी गेली होती.
‘कोणती मेमसाब?’ पुश्किनने कुतूहलाने विचारले.’खूप सुंदर ! कर्ती स्त्री असावी ती,’ मुलगा म्हणाला.
‘सहा घोड्यांची गाडी घेऊन ती आली होती. तीन लहान मुले आणि आयादेखील सोबत होती. मेमसाबच्या चेहर्यावर काळा मुखवटा घातला होता. वृद्ध पहारेकरी निवर्तल्याचे सांगताच तिने हंबरडा फोडला आणि मुलांना म्हणाली, शांत बसा, मी कब्रस्तानात जाऊन येते. मी तिला घेऊन इकडे येणार होतो, पण ती म्हणाली की ‘मला रस्ता माहीत आहे.’ आणि तिने नंतर मला चांदीचे पाच कोपेक दिले.’
बोलत बोलत पुश्किन आणि तो तरुण कब्रस्तानात पोहोचले. ती अगदी निर्जन जागा होती. कुंपणही नव्हते. बर्यापैकी लाकडी क्रुसांनी भरलेला परिसर होता तो. तिथे एखाद्या झाडाची सावली देखील नव्हती. इतकी दयनीय स्मशानभूमी पुश्किनने आयुष्यात कधीच पाहिली नव्हती.
‘ही त्या वृद्ध पहारेकर्याची कबर आहे,’ एका वाळूच्या ढिगार्यावर चढत तरुणाने सांगितले, ज्यावर तांब्याचा पुतळा जडलेला काळा क्रॉस उभा होता.
‘मेमसाब इथे आली होती?’ पुश्किनने विचारले.
‘होय’, वांकाने उत्तर दिले. ‘मी तिला दुरून पाहत होतो. बराच वेळ ती इथे उभी होती. मग गावात जाऊन पाद्री बोलावून आणला. तिने त्याला पैसे दिले आणि निघून गेली. ती ज्या वेगाने निघून गेली ते पाहू जाता ती एक चांगली सारथी असावी.’
आणि मग पुश्किनने देखील वांकाला पाच कोपेक्सचे नाणे दिले.
आता त्या प्रवासाबद्दल आणि त्याकामी खर्च केलेल्या सात रूबलबद्दलही पुश्किनला खेद वाटत नव्हता…

