
व्हॉट्सअप वापरत नाही, असा माणूस शोधणं कठीण आहे. ज्याच्याकडे मोबाइल आहे त्याच्याकडे बाकीचा सोशल मीडिया असेल नसेल, व्हॉट्सअप नाही असं होत नाही. नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याशी जोडलेलं राहण्यासाठी व्हॉट्सअपचा फार उपयोग होतो. जिथे फोनवर बोलण्याची गरज नसते, इच्छा नसते, तिथे व्हॉट्सअपवर मेसेज पाठवणं उपयोगी पडतं. फोटोंची देवाणघेवाणही याच माध्यमातून होते. तेही हॅक होऊ शकतं, ही माहिती अनेकांसाठी नवी असेल. मात्र, तसं होत असेल तर ते किती घातक ठरू शकतं, याची कल्पनाही करता येणार नाही.
केतकीच्या बाबतीत हेच झालं. केतकी कॉलेजात समाजशास्त्राच्या प्राध्यापक म्हणून काम करत होत्या. विद्यार्थी वर्गात लोकप्रिय, फावल्या वेळात त्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजकार्यही करत असत. एका सोमवारी कॉलेजातल्या मुलांना घेऊन प्रा. केतकी सातार्याला एका संस्थेला भेट देण्यासाठी गेल्या होत्या. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही मंडळी त्या संस्थेमध्ये पोहचली. ओळख, चहा, नाष्टा आटपल्यावर पहिल्या सत्राला सुरुवात झाली. समाजशास्त्रामध्ये मोठे काम असणारे बेंगळुरूचे प्रा. रमण मुलांशी संवाद साधत होते. प्रा. केतकी देखील व्यासपीठावर होत्या. कार्यक्रमात असल्याने त्यांनी मोबाईल सायलेंटवर ठेवलेला होता.
दुपारी बाराच्या सुमारास पहिले सत्र संपले. दुसरे सत्र एक वाजता सुरू होणार होते. मध्ये एक तासाचा वेळ होता. केतकी यांनी मोबाईल तपासाला तेव्हा त्यावर एका अनोळखी नंबरवरून दोन मिस्ड कॉल आले होते. फोन नंबर अनोळखी असल्यामुळे त्यांनी उलटा फोन केला नाही. हातातला फोन बॅगेत ठेवणार इतक्यात तो वाजला. त्याच नंबरवरून पुन्हा फोन आला होता. केतकी यांनी तो उचलला, समोरची व्यक्ती म्हणाली, हॅलो, केतकी मॅडम बोल रही है, क्या? हां, आप कौन? मॅडमजी, हम कुरियर कंपनी से बोल रहे है. आपके नाम से एक कुरियर आया है, लेकिन हमको आपका पता नही मिल रहा हैं, हम आपको एक नंबर भेजते है, उसके उपर आपका पता हमे भेज दो. हम दस दिन से आपको कॉल कर रहे है, आप हमारा फोन उठा नही रहे…
केतकी यांचे एक कुरियर खरोखरच येणार होते. त्यामुळे त्या व्यक्तीने पाठवलेल्या मोबाईल नंबरवर त्यांनी आपला पत्ता पाठवून दिला. त्यानंतर अर्ध्या तासाने त्यांना पुन्हा एक फोन आला. त्यावर बोलणारी व्यक्ती केतकी यांना म्हणाली, मॅडम, आम्हाला तुमच्या कुरिअरची डिलिव्हरी द्यायची आहे, तुमचा पत्ता सापडत नाही आहे. तुम्हाला एक नंबर पाठवतो, तो तुम्ही डायल करा, म्हणजे आमचे काम सोपे होईल, असे म्हणून त्या व्यक्तीने फोन ठेवला. दरम्यान, केतकी यांच्या मोबाईलवर एक नंबर आला होता. त्याच्यामागे स्टार… हॅश आणि त्याच्यापुढे आकडे असा काहीसा तो विचित्र नंबर होता. हा नंबर डायल केल्यावर त्यांना कुरियर पोहोचवण्यासाठी आपला पत्ता कसा मिळेल, हा प्रश्नही केतकी यांना पडला नाही. त्यांनी ते कुरिअर मिळवण्यासाठी तो नंबर फिरवला आणि तिथेच सारा खेळ झाला. नंबर फिरवताच केतकी यांचा मोबाईल बंद झाला.
त्यानंतर जे घडले ते अविश्वनीय होते. केतकी यांचे व्हॉट्सअप हॅक झाले. त्यांना येणारे फोन दुसर्या ठिकाणी वळवले गेले. त्यांच्या व्हॉट्सअपवरून त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असणार्या मंडळींना ‘आपण खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडलो असून आपल्याला तात्काळ पाच लाख रुपयांची आवश्यकता आहे’, असे मेसेज गेले. केतकी अडचणीत आहेत, म्हणून काही जणांनी दिलेल्या खात्यामध्ये पैसे टाकले होते. केतकी यांची एक मैत्रीण मुंबईमध्ये होती. तिने केतकीच्या मुलाला फोन केला आणि त्याच्याकडे विचारणा केली, काय झाले घरी? आईला काही मेडिकल इमर्जन्सी आली आहे का? त्यावर कबीर म्हणाला, नाही मावशी, तुम्ही असे का विचारत आहात? त्यावर त्यांनी केतकीच्या व्हॉट्सअपवरून पाठवल्या गेलेल्या मेसेजची माहिती दिली. कबीरने आपले
व्हॉट्सअप तपासले तेव्हा त्यावर देखील हा मेसेज त्याला पाहायला मिळाला. त्याने आईच्या मोबाइलवर फोन केला तेव्हा तो दुसरीकडे वळवला होता. दरम्यान, आपला फोन बंद पडला आहे, त्यावर येणारे कॉल दुसर्या नंबरवर वळवले गेले आहेत, हे केतकी यांच्या लक्षात आले होते. केतकी यांच्यासोबत असणार्या प्रा. प्राची यांच्या मोबाईलवर फोन करून कबीरने आईचे व्हॉट्सअप हॅक झाल्याची माहिती तिला दिली. केतकी अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरून गेल्या होत्या. त्यांना रडू कोसळले होते. हा प्रकार पाहून त्यांच्या वर्गात शिकणार्या विशाल नावाच्या तरुणाने त्यांचे व्हॉट्सअप अनइन्स्टॉल केले. सायबर सुरक्षेमध्ये काम करणार्या मित्राच्या मदतीने
हॅक झालेला फोन मोकळा केला. या प्रकाराची त्यांनी पोलिसात तक्रार केली.
- अशी घ्या काळजी-
फोन किंवा व्हॉट्सअप हॅक झाल्याची शंका आल्यास व्हॉट्सअपच्या सेटिंगमध्ये जाऊन त्याच्याशी लिंक असणार्या डिव्हाइसेसमध्ये जाऊन अनोळखी सर्व डिव्हाइसेस लॉगआउट करा. - व्हॉट्सअप अनइन्स्टॉल करा.
- मोबाइलवर टू स्टेप व्हेरिफिकेशन सुरू करा.
- कुणी स्टार, हॅश दाबून नंबर डायल करण्यास सांगितले तर तसे अजिबात करू नका, त्यामुळे तुमच्या मोबाइलचा ताबा दुसर्या व्यक्तीकडे जाऊ शकतो.
- आपल्या व्हॉट्सअपचा ओटीपी, पिन कोणालाही देऊ नका.
- फोनमध्ये अनोळखी अॅप दिसत असतील तर ती तातडीने अनइन्स्टॉल करा.
- ओटीपी, यूपीआय पिन, एटीएम पिन कोणालाही सांगू नका.
- फोनवर सतत पॉपअप, अनोळखी नंबरवरून फोन येणे, एसएमएस येणे, डेटा अचानक वाढणे, स्वतःहून अप उघडणे दिसत असल्यास महत्त्वाचा डेटा बॅकअप करून घ्या.
- आपल्या फोनची सर्व्हिस सेंटर किंवा सायबर सुरक्षा तज्ज्ञाकडून तात्काळ तपासणी करून घ्या.
- आपली आर्थिक फसवणूक झाली असल्यास फोन रिसेट करण्यापूर्वी त्यामधील पुरावे मेसेज, स्क्रीन शॉट सुरक्षित ठेवा.

