काँग्रेसच्या काळात व्यक्तिस्तोम फार माजले होते, अशी एक ओरड नेहमीच केली जायची. मुळात हा राजेशाही, सांस्थानिकशाही आणि सरंजामशाही रक्तात भिनलेला समाज. इथे ब्रिटिशांची राजवट उलटून लोकशाही प्रस्थापित होत असताना पंतप्रधानपदावर विराजमान झालेले कमालीचे लोकप्रिय नेते पं. जवाहरलाल नेहरू यांच्याकडे आणि त्यांच्या घराण्याकडे ‘शाही घराणे’ म्हणूनच पाहिले जात होते. नेहरूंनी आपले स्तोम माजू नये याची काळजी घेतली, पण इंदिरा गांधींच्या काळात इंदिरा इज इंडिया अशी घोषणा देण्यापर्यंत त्यांच्या खुशमस्कर्यांची मजल गेली होती. त्यातून इंदिरा गांधींना आणीबाणीनंतरच्या पराभवाला सामोरं जावं लागलं. पण त्यातून झेप घेऊन त्या उभ्या राहिल्या. त्यांच्या हत्येनंतर अननुभवी राजीव गांधी हे ‘राजपुत्र’ म्हणूनच गादी चालवायला पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले. मग परंपरेप्रमाणे इंदिराजींच्या चेहर्याच्या जागी राजीव यांच्या चेहर्याची प्रस्थापना झाली. आपल्याला मते आपल्या नव्हे तर राजीव यांच्या चेहर्यामुळे मिळत आहेत, हे कळत असल्याने प्रचाराच्या फलकांवर राजीव गांधी यांचाच चेहरा ठसठशीत असायचा, त्यावर बाळासाहेबांनी मार्मिकच्या तत्कालीन अंकात घेतलेला हा मार्मिक चिमटा… मात्र, घराणेशाही आणि व्यक्तिस्तोम यांच्या नावाने ठणाणा करत सत्तेवर आलेला भारतीय जनता पक्ष नंतर त्याच मार्गावर आणखी पुढे जाईल; महात्मा गांधींच्या संदर्भात प्रदर्शन मांडताना त्याच्या फलकांवरून गांधींनाच गायब करून तिथेही हे लोक नरेंद्र मोदींना विराजमान करतील आणि कोविड लसीच्या प्रमाणपत्रावरही मोदी आपला फोटो छापून आणतील, याची कल्पना बाळासाहेबांना आली नसणार!
