लैंगिक छळ झालेल्या पीडितेने टिकटॉकवर व्हिडिओ अपलोड करणे तसेच आधुनिक आणि उंची राहणीमानासाठी तिला दोष देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. टिकटॉकवर व्हिडीओ अपलोड करणे आणि आपली आपली जीवनशैली जोपासणे हा गुन्हा ठरत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केलेल्या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
एका विशेष फॅशन डिझायनर कर्मचार्याने आपल्या 17 वर्षांच्या अल्पवयीन सहकारी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. पीडिता आधुनिक आणि उंची राहणीमानात जगत असून तिने टिकटॉकवर अनेक व्हिडीओ अपलोड केले आहे. त्यावरून यासाठी तीदेखील दोषी आहे, असा दावा करत 37 वर्षांच्या आरोपीने जामीनासाठी अर्ज केला होता. तसेच पीडितेचे व्हिडीयोही न्यायालयात सादर केले होते.
आधुनिक आणि उंची राहणीमान जपणे आणि टिकटॉकवर व्हिडीओ अपलोड करणे हा गुन्हा नाही. तिने टिकटॉकवर व्हिडीओ अपलोड केले म्हणून तिला दोष देता येणार नाही, असे न्यायलयाने स्पष्ट केले. तसेच आरोपीवर गंभीर आरोप आहेत. याआधीही आरोपीने तिचा लैंगिक छळ केला होता. कामाच्या ठिकाणी अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचे हे गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपीला जामिनावर सोडल्यास समाजात अयोग्य संकेत जातील, असे मत नोंदवत विशेष न्यायाधीश एम. ए बरलिया यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.
विशेष सरकारी वकील गीता शर्मा यांनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार आरोपी आणि अल्पवयीन मुलगी मुंबई उपनगरातील फॅशन डिझायनरकडे सहाय्यक टेलर म्हणून काम करत होते. आरोपी मुलीकडे अश्लील हातवारे करुन तिचा लैंगिक छळ करीत होता. 5 ऑक्टोबरला त्याने तिला पकडून सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला आहे. याबाबत मुलीने कंपनीच्या मालकांना सांगितले होते. मात्र, कारवाई झाली नाही, असा आरोपही मुलीने केला आहे.
कंपनीकडून आरोपीवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. हे समजल्यावर तिने पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. त्यानुसार 5 नोव्हेंबर रोजी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि दुसर्याच दिवशी आरोपीला अटक करण्यात आली. एफआयआर दाखल करण्यास उशीर झाल्याचा आरोप करत आरोपीने निर्दोष असल्याचा दावा केला आहे. कंपनीच्या मालकांनी आरोपीवर कारवाई करावी, अशी अपेक्षा होती. मात्र, कंपनीने कारवाई केली नसल्याने तक्रार दाखल केल्याचे मुलीने न्यायालयात सांगितले. या प्रकरणातील आरोपीला जामीन दिल्यास खटल्यातील साक्षीदारांना धमकावण्याची शक्यता आहे. तसेच प्रकरणाच्या तपासावरही परिणाम होऊ शकतो, असे न्यायालयाने सांगत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
सौजन्य- सामना