१९७७ सालातली ही रविवारची जत्रा आहे. १९७५ साली इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीनंतर काँग्रेसमधले असंतुष्ट, समाजवादी साथी आणि संधीसाधू जनसंघी यांनी एकत्र येत इंदिरा गांधींविरोधात आघाडी उघडली. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्त्वाखाली आपण जणू दुसरा स्वातंत्र्यलढाच लढतो आहोत, असा या मंडळींचा आव होता. त्यांनी केलेल्या वातावरणनिर्मितीमुळे १९७७च्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव झाला आणि जनता पक्षाचे कडबोळे सरकार सत्तेवर आले. आणीबाणीच्या काळात जे फार शुचिताबहाद्दर आणि प्रामाणिक वगैरे वाटणारे नेते होते, त्यांचे खरे रंग जनता पक्षाची सत्ता येताच दिसू लागले. ही बुभुक्षित मंडळी सत्तेवर येताच या ना त्या नावाखाली परदेश दौर्यांची हौस भागवू लागली. त्यावर कोरडे ओढणारी ही जत्रा. कोण कुठे जातो आहे, कोण कुठून येतो आहे, याचं दर्शन घडवणारी. या मंडळींची ही सरकारी खर्चाने केली जाणारी चैनबाजी पाहून सर्वसामान्य माणसांचा प्रतिनिधी असलेले बाळासाहेबांचे काकाजी चकित झालेले आहेत. आज सगळ्या मंत्रिमंडळाची हौस एकटे पंतप्रधानच भागवत आहेत. गेली १२ वर्षे त्यांनी जगभ्रमंतीपलीकडे नेमकं काय केलं, हे सांगणं कठीण आहे. कुठेही जायचं, तिथले किरकोळ पुरस्कार स्वीकारायचे, तिथलं नृत्य पाहायचं, तिथली वाद्यं वाजवायची, इकडूनच भाड्याने नेलेल्या भारतीयांनी मग ‘मोदी साक्षात देव आहेत’ म्हणून रडून दाखवायचं, हा कंटाळवाणा कार्यक्रम अनेक वर्षे सुरू आहे… युद्धपरिस्थितीमुळे कसे बसे काही दिवस भारतात काढल्यावर भारतीयांना परदेश प्रवास टाळण्याचं आवाहन करून मोदी पुन्हा अनेक देशांच्या दौर्यावर रवाना झाले… बाळासाहेबांनी आज हे चित्र वेगळ्या प्रकारे काढलं असतं आणि काकाजी बेशुद्ध पडलेलेच दाखवावे लागले असते त्यांना.

