महाराष्ट्राच्या विधिमंडळात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्रातल्याच त्यांच्या विरोधकांना उद्देशून अचानक हिंदी भाषेत का बोलले असतील हो संतोषराव? एनी आयडिया? – सुरेश खोपकर, पनवेल
तुम्ही ज्याची नोकरी करता, त्याला तुमचं बोलणं कळावं म्हणून (त्याची भाषा येत नसेल तर) त्याला कळेल अशाच भाषेत बोलता ना? मग… स्वतःचं बघा ना… आणि महाराष्ट्रात इतके मुद्दे झाले, त्यावर हिंदी सोडा, मराठीत तरी मुख्यमंत्री कधी काय बोललेत का? ते आठवा ना… तेव्हा मुख्यमंत्री बोलत नाहीत म्हणून बोलता… त्याने चिडचिड होऊन ते चिडून काही बोलले तर हिंदीत बोलले म्हणून बोलता… ते ज्यांना बोलले ते आणि ते बघून घेतील… तुम्ही का मुख्यमंत्री असल्यासारखे ते अंगावर ओढून घेताय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी एकही पत्रकार परिषद घेत नाहीत, कारण बहुतांश भारतीय जनता ग्रामीण भागातली आहे, तिला थेट तिच्याशी गप्पा मारलेल्या आवडतात, असं उत्तर आपल्या अधिकार्यांनी परदेशात दिलं आहे. यामुळे आपल्या देशाचा अपमान होत नाही का? – वनिता पाटील, भाईंदर
मान असतो त्याचाच अपमान होतो… असं म्हणतात… मग अपमान करायला, ते कधी आपल्या देशाचा मान वाढवतात? (तुम्हाला वाटलं त्यांच्याबद्दल नाही बोलत आहोत, त्या परदेशी पत्रकारांबद्दल बोलतोय आम्ही…) त्यांना म्हणावं, तुमच्याशी जर पीएम बोलत नाहीत, तर तुम्ही पण नका ना बोलू त्यांच्याशी… त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी आम्ही आमची माणसं, आमच्या खर्चाने आणून त्यांच्यासमोर बसवतो ना… मग या परदेशी पत्रकारांची का जळजळ होते? हा असा उलटा विचार करायला शिका, म्हणजे तुमचीही जळजळ होणार नाही!
मुलाला कमी मार्क मिळाले म्हणून मी त्याच्यावर ओरडलो, तर तो म्हणतो, मला काहीही बोला दिनकरराव, पण माझ्या शाळेचा अपमान मी सहन करणार नाही? अभ्यास हा करणार नाही आणि याला बोललं तर शाळेचा अपमान होतो? – दिनकर कामेरकर, चिंचवड
जो विद्यार्थी, ‘मी अभ्यास करतो’ असं जगाला सांगतो, पण प्रत्यक्षात अभ्यास करतच नाही, तो मुलगा नापास झाल्यावर त्याला ओरडणार्यांचीच चूक आहे. मुलाची काय चूक आहे? त्याला बोलण्यापेक्षा’ तो अभ्यास का करत नाही? त्याला कोणी अभ्यास करू देत नाही का? तो असं का बोलला? त्याला कोणी असं बोलायला सांगितलंय का? याचा शोध घ्या, मग तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर सापडेल.
फुटबॉलचा खेळ जगातला एक नंबर खेळ आहे. त्यात काही लाखांची लोकसंख्या असलेले देशही वर्ल्ड कप खेळतायत, पण लोकसंख्येत विश्वगुरू असलेल्या भारताचा संघही नाही आणि एकही भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये नाव कमावलेला नाही. किती लाजिरवाणं आहे ना हे? – सार्थक शेलार, धाराशिव
जे देश वर्ल्डकप खेळत आहेत त्यांच्या पैकी कुठला देश विश्वगुरू झालाय? इतर देश फक्त एका कपसाठी खेळतायेत, त्यांच्या देशात जाऊन, त्यांची मेडल्स कोण मिळवतंय? याचा माज बाळगा आणि तरीही लाज वाटत असेल, तर लाज सोडा… म्हणजे लाजिरवाणं वाटणार नाही… हे तर खूप सोपं आणि ट्रेंडिंग आहे…
आज तारीख १८ आहे, म्हणजे बेरीज झाली नऊ. दोनाच्या पाढ्यात एक येत नाही, पण आठ येतो, म्हणजे बेरीज झाली नऊ. साहित्य आणि कलांमध्ये रस आहेत नऊ. कसं वाटलं माझं गणित? मीही भविष्यात देशाचा पंतप्रधान बनू शकतो ना? – मोहन गावकर, पुसद
आणि जे आधीचे आहेत त्यांचं काय करायचं? तेच भल्याभल्यांना कळत नाहीये… त्यात तुमची उदबत्ती कुठे लावताय? कसंय.. चहा कोणीही बनवू शकतो, तो विकता सगळ्यांनाच येत नाही… नाही नाही… चहा नाही… चहा सोडून सगळं विकता यायला हवं… ही अशी टीका आणि रोज शंभर शंभर किलो शिव्या खायची तयारी आहे का? आणि म्हणे मी पंतप्रधान होऊ शकतो का?
एखादा लोकप्रतिनिधी आपल्या मुलीच्या वयाच्या डॉक्टरवर अश्लील भाषेत ओरडत गलिच्छ शेरेबाजी करतोय आणि काही बायका त्याला प्रोत्साहन देतायत, असं दृश्य आपल्या राज्यात पाहायला मिळतं? त्याच्या त्या भाषेचंही काही लोक समर्थन करतात. हाच का तो सुसंस्कृत महाराष्ट्र? – माया पेठकर, वर्धा
मारणार्यांनी चार मारून सुद्धा मार खाणार्यांनी एकदाही हात उचलला नाही… इतक्या शिव्या ऐकून सुद्धा एकही अपशब्द उच्चारला नाही… हा आहे सुसंस्कृत महाराष्ट्र… उडदामाजी काळे गोरे असतातच… काही नाही हो… सुसंस्कृत भाषेतल्या प्रश्नाला सुसंस्कृत उत्तर दिले… कोणी कसं घ्यावं… आणि कोणी कसं वागावं हे त्याच्या संस्कृतीवर अवलंबून असतं.
विचारून टाका प्रश्न
तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या [email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील…

