• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मिसिंग लिंक-कनेक्टिंग लिंक!

marmik by marmik
July 11, 2026
in मर्मभेद
0

१ मे २०२६.

काहीही गरज नसताना महाराष्ट्राचे तिन्ही सत्ताधारी एकत्र मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर पोहोचले होते, वाहतुकीचा पुरता बोर्‍या वाजवून त्यांनी मिसिंग लिंक नावाच्या सुमारे १३ किलोमीटरच्या, प्रामुख्याने भुयारी असलेल्या पर्यायी मार्गाचं उद्घाटन केलं. ही मिसिंग नव्हे, कनेक्टिंग लिंक आहे, असं छातीठोकपणे सांगितलं गेलं तेव्हा. या मार्गामुळे संपूर्ण घाटरस्ता टाळून प्रवासात थेट ३०-४० मिनिटांची बचत होते, असा दावा त्यावेळी केला गेला होता. १३ किलोमीटरसाठी तब्बल ७००० कोटी रुपये खर्च करून रस्ते अभियांत्रिकीतला एक चमत्कारच आपण घडवला आहे, अशीही पाठ थोपटून घेतली गेली होती…

…त्यानंतर दोनच महिन्यांत, ६ जुलै रोजी रस्ते अभियांत्रिकीतला हा स्वघोषित चमत्कार सदोष बांधकामातली स्लॅब पडून आणि दरडी कोसळून बंद पडला आणि या दोन शहरांमधला संपर्क तुटला, वाहतुकीचा बोर्‍या वाजला. हे सगळे होत असताना मुंबईमध्ये अटल सेतूवर मात्र पुण्याच्या दिशेने निघालेल्यांना वाहतूक बंद पडल्याचे सांगून परत फिरवले जात होते, पण दोन्ही बाजूंचा टोल घेतल्यानंतर. टोल नाक्यापर्यंतचा रस्ता वापरलात ना, त्याचा टोल द्यावाच लागेल, असे सांगून.

महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात ज्या ज्या गोष्टींचे ढोल वाजवले गेले होते, त्या सगळ्यांचा आज बोर्‍या वाजताना दिसतो आहे… त्या सगळ्यांची मिसिंग-कनेक्टिंग लिंक एकाच ठिकाणी जाऊन भिडते… भारतीय जनता पक्ष! जिथे जिथे भाजपची सत्ता आहे तिथे तिथे घोटाळा आहे आणि त्या घोटाळ्याच्या बाबतीत टर्रेबाज असंवेदनशीलता आणि धादांत थापेबाजी यांचीही लिंक याच पक्षाच्या, परिवाराच्या धुरीणांपर्यंत जाऊन पोहोचते. मिसिंग लिंकच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत, अशी माहिती समाजमाध्यमांमध्ये प्रसृत होताच खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पहिल्या पावसात असं होतंच, नंतर त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते, मग रस्ते वाहतूक योग्य होतात, अशी, रस्ते अभियांत्रिकीतल्या तज्ज्ञांनाही तोंडात बोटं घालायला लावणारी मखलाशी केली होती.

मुंबईत पावसाने जवळपास आठवडाभर धुमाकूळ घातला. त्याच्या सुरुवातीलाच एका स्कूलबसवर झाड कोसळून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. दुसर्‍या दिवशी एका माणसाचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. त्यावर फिदीफिदी दात काढून हसत भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम म्हणतात, साहेब, काल झाडावर होतं, आज मॅनहोल! आपण ज्या शहराच्या सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष आहोत, त्या पक्षाच्या ढिसाळ कारभारामुळे दोन माणसांचा जीव जातो आणि यांना लाज वाटण्याच्या ऐवजी हसू येतं? आपल्या राजवटीत मरण स्वस्त झालेलं असलं तरी त्याची कोणतीही झळ आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, याची खात्री असल्याशिवाय इतका निगरगट्टपणा येत नाही. कधी झाडावर आणि कधी मॅनहोलमध्ये असणारं मुंबईकरांचं मरण नंतरच्या दिवसांमध्ये ढासळणार्‍या भिंतींवर, उघड्या पडलेल्या विजेच्या वायरींमध्ये असं कुठे कुठे दडून मुंबईकरांचा घास घेत राहिलं… आकडा वाढत राहिला… मुंबईकर हळहळत राहिले… दर वर्षी पाऊस येतो, दर वर्षी नालेसफाईचे दावे होतात, दर वर्षी वृक्षांची छाटणी होते, तरीही काही अनमोल जीव का जातात, हे यांना विचारणारे कोणी नाही आणि मनाची लाज तर यांना कधी नव्हतीच!

देशात आज राम मंदिराच्या लुटीची चर्चा आहे. शेकडो कोटींच्या या लुटींची मिसिंग-कनेक्टिंग लिंकही भाजप आणि संघ परिवारापाशीच जाऊन भिडते. अपूर्ण स्थितीत असतानाही निव्वळ निवडणुकीसाठी इव्हेंटबाजी करून ज्याचं उद्घाटन केलं, त्या राम मंदिरावर लुटारूंच्या नेमणुका खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केलेल्या आहेत आणि हे त्यांच्याच मातृसंस्थेच्या परिवारातले नामचीन लोक आहेत. देशातला सलोखा उद्ध्वस्त करणार्‍या या आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर देशातल्या बहुसंख्यांची प्रभू श्रीरामांवर असलेली श्रद्धा वापरून त्यांना लुटण्याचा कार्यक्रम केला गेला, तो याच मंडळींकडून. ‘मंदिर वही बनायेंगे’च्या नार्‍याला भुलून दागदागिने, पैसे, सोनंअडकं, सोन्याचांदीच्या शिला वगैरे देणार्‍यांना कधीच त्या दानाचा हिशोब मिळाला नव्हता. राम मंदिराच्या उभारणीच्या वेळी जमीन घोटाळे झाले, अयोध्येचा सगळा व्यापारी कारभार गुजरात्यांच्या हाती सोपवला गेला, मंदिराच्या उद्घाटनानंतर संगनमताने देशभरातून आलेल्या दानावर मनसोक्त डल्ला मारला गेला. त्यावर प्रश्न विचारल्यावर सरसंघचालक ‘राम राम’ म्हणून काढता पाय घेतात आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे हे या लुटीच्या विषयावरून हिंदूंची आपल्या धर्माची बदनामी होऊ देऊ नका, असं आवाहन करतात! सगळ्या देशाच्या आस्थेचा विषय असलेल्या पवित्रतम मंदिरात तुमचे लोक घोटाळे करतात, त्याने धर्माची आणि हिंदूंची बदनामी होत नाही? घोटाळ्याबद्दल प्रश्न विचारल्यावर, गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हटल्यावर हिंदूंची बदनामी होते?

या परिवारातले आणखी काही नमुने ‘ज्यांनी राम मंदिर आंदोलनात भाग घेतला नाही, त्यांना दानचोरीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही’ असा युक्तिवाद करत आहेत. या न्यायाने ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नाही, त्यांना तर निवडणूक लढवायचा अधिकार असता कामा नये या देशात? आणि ज्यांनी स्वत:ची सुंता केलेली नाही ते तुमचे टिल्लू टॉम नेते गावभर मुसलमानांच्या धर्माच्य्ाा उठाठेवी फिरतात, त्यांनाही साखळीने बांधून घरातच ठेवा! हिंदूंचे पैसे हिंदूंनी चोरले, तर इतरांनी कशाला बोलावं, हा युक्तिवाद असेल तर मग आसाराम, राम रहीम वगैरेंना तुरुंगात डांबून ठेवायची गरज काय? त्यांनीही स्वधर्माच्याच महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप आहेत ना? न्यायालयाने कशाला उगाच मध्ये यावं त्यात? तिकडे उज्जैनमध्येही अयोध्येसारखाच मोठा जमीन घोटाळा मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याच नातलगांनी केल्याची चर्चा आहे. तिथेही हेच तर्कशास्त्र चालवायला हरकत काय?

राम मंदिर आंदोलन ऐन भरात होतं, तेव्हाही अयोध्येत कधी भाजपचा उमेदवार निवडून येत नव्हता आणि राम मंदिराचा इव्हेंट करून देशात ‘४०० पार’चे ढोल पिटले गेले, तेव्हाही अयोध्येत पराभवच पदरी आला… आपलं नाव वापरून ही लुटारूंची टोळी देश लुटते आहे, हे कळण्याची बुद्धी प्रभू रामचंद्राने अयोध्येतल्या जागृत जनतेला कायमच दिली आहे… आता तीच बुद्धी सगळ्या देशाला लाभो! नाहीतर शहाणपणाची मिसिंग लिंक कायम मिसिंगच राहील, कनेक्टिंग लिंक बनणार नाही.

Previous Post

अर्थ आणि पाठांतर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.