
अर्थेविण पाठांतर कासया करावे।
व्यर्थचि मरावे घोकूनिया।।१।।
घोकूनिया काय वेगी अर्थ पाहे।
अर्थरूप राहे होऊनिया।।२।।
तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी।
नाही तरी गोष्टी बोलू नका।।३।।
धर्माच्या क्षेत्रात पाठांतराला खूप महत्त्व आहे. वैदिक परंपरा तर पाठांतरावरच उभी आहे. त्यामुळेच तिथे वेदपाठकांना प्रतिष्ठा आहे. वारकरी संप्रदायात मात्र पाठांतराबरोबरच त्याचा अर्थ जाणून घेणं महत्त्वाचं आहे. केवळ अक्षरांची घोक्कंपट्टी करणं वारकरी संतांना नामंजूर आहे. प्रस्तुत अभंगात तुकोबाराय तेच सांगतात. प्रस्तुत अभंग लिहिताना तुकोबारायांचा नेमका कोणत्या पाठकांवर होता याचा उलगडा होत नाही. तरीही हा रोख वेदपाठकांवरच असण्याचा संभव जास्त आहे. त्या काळातील बहुतांश वेदपाठक वेदाचा शब्दार्थही समजून घेत नव्हते. त्यामुळेच तुकोबारायांनी ‘वेदांचे गव्हार न कळे पाठका।’ अशा स्पष्ट शब्दात त्यांचा समाचार घेतलेला दिसतो. तुकोबारायांच्या त्याच न्यायाने आपण वारकरी संतांच्याही अभंगांचा अर्थ समजून पाठांतर करणं अपेक्षित आहे हे उघड आहे.
वारकरी संप्रदायातील संतांनी हजारो अभंग लिहिले आहेत. वारकरी संप्रदायिक ते पाठ करत असत. त्याचा अर्थ समजून घेत असत. पुढच्या काळात मात्र काही प्रमाणात अर्थाचा विसर पडत जाऊन पाठांतर आणि गायनावरच भर दिला जाऊ लागला. ‘राग आळवितो नाना। काय गातो हे कळेना।’ असा काही लोकांचा व्यवहार झाला. त्या काळात अभंगातील शब्दांचा अर्थ आणि चरणांची आंतरसंगती लक्षात घेऊन अभंगांचा अर्थ लावणारेही काही कीर्तनकार वारकरी संप्रदायात झाले. त्यात दादासाहेब आजरेकर, विष्णुबुवा जोग महाराज, दादा महाराज सातारकर आणि धोंडोपंत दादा अत्रे यांचा उल्लेख करावा लागेल. दादासाहेब आजरेकर यांनी अभंगांच्या चरणांचा विचार करत काही अभंगांचे पाठ निश्चित केले. अनेकदा तुकोबारायांच्या अभंगात वरकरणी विसंगती दिसते. तिचं स्पष्टीकरण देऊन अभंगांच्या अर्थाची संगती लावण्याचं काम मोठ्या प्रमाणात धोंडोपंत दादा अत्रे करत असत असं डॉ. भा. पं. बहिरट यांनी नोंदवलं आहे. विष्णुबुवा जोग महाराजांनी तर तुकोबारायांच्या अभंगांचं विषयवार वर्गीकरण करून सार्थ गाथाच प्रकाशित केला. दादा महाराज सातारकरही तुकोबारायांच्या अभंगांवर निरुपण करत असत. त्यावर आधारित जवळपास ७५० अभंगांचा सार्थ गाथा ‘भिजल्या वहीचे अभंग’ या नावाने बाबाजी परांजपे यांनी संपादित केला. पुढच्या काळात प्र. न. जोशी आणि शंकर महाराज खंदारकर यांनीही गाथाभाष्य प्रसिद्ध केले.
अभंगांचं पाठांतर आणि शब्दार्थ समजून घेणं महत्त्वाचं आहेच, पण त्यापुढे जाऊन त्या संपूर्ण अभंगगाथेचं वर्म समजून घेणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळेच तुकोबारायांनी ‘बहुत केले पाठांतर। वर्म राहिलेसे दूर।’ असं म्हटलं आहे. शब्दार्थाबरोबरच अभंगांचा भावार्थ समजून घेण्याचीही गरज आहे. जो फक्त शब्दार्थ जाणतो त्याला संतविचारांचा मूळ गाभा समजेलच असं नाही. त्यामुळेच एकीकडे संतांच्या अभंगांवर कीर्तन करणार्या कीर्तनकार- कथेकर्यांकडूनही संतविचारांशी विसंगत आचरण घडत असायचं. संतांच्या अभंगातून समतेचा आणि मानवतेचा विचार मांडला गेलेला होता, पण त्यावर कीर्तन करणारे लोक मात्र अनेकदा वर्णविषमतेचा पुरस्कार करत असत.
यासंदर्भातला एक किस्सा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ‘लढत’ या आत्मचरित्रात आला आहे. विखे पाटील हे सहकार आणि राजकारण क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व. विठ्ठलरावांचे वडील म्हणजे एकनाथराव पाटील हे वारकरी होते. ते आषाढी आणि कार्तिकीची पंढरपूरची वारी कधीही चुकवत नसत. विठ्ठलराव त्यांना आबा म्हणत. त्यांनी घरात पोथीवाचन करण्यासाठी एक खणखणीत आवाजाचा ब्राह्मण पुराणिक नेमला होता. त्यासाठी त्याला दरवर्षी चार मण ज्वारी दिली जात होती. या पोथीवाचनाचा एक प्रसंग सांगताना विठ्ठलराव लिहितात, ‘अशीच एकदा पोथी ऐन रंगात आली होती. गुरुजी समरस होऊन सांगत होते.
‘बडवे मज मारिताती – काय केला अपराध?
विठोबा, काय केला अपराध?
म्हणती महारा देव बाटविला -।
खरोखर देव बाटविला
ती चोखोबारायाची कैफियत मी मन लावून ऐकत होतो. बाहेर अंगणातून ‘छळ्ळख्खन’ असा आवाज झाला. तसं गुरुजींचं तालासुरात चाललेलं पोथी वाचन एकाएकी गपकन बंद झालं. कानांवर पडणारा ‘छळ्ळख्खन’ आवाज दूरवर जात ऐकेन येईनासा झाला, तसं गुरुजी पुन्हा कथेचा सूर धरत म्हणाले, ‘तर चोखोबा म्हणतो, असा मी काय अपराध केला, म्हणून मला सर्व बडवे लोकांनी पंढरीरायांच्या देवळातून हुसकावून लावावं?’
मी त्यांना मध्येच विचारलं, ‘तुम्ही आता पोथी वाचायचं थांबवलं, ते काय म्हणून?’
अंगणाच्या रोखानं बघत ते म्हणाले, ‘बाहेर अंगणातून महार साबळ्याचा म्हातरबा गेला. त्याच्या हातच्या घुंगूर काठीचा नाद नाही का आला? म्हणून.’
त्या दिवशी मला पहिल्यांदा समजलं, की गावगाड्याच्या रोजच्या जीवनात ‘शिवताशिवत’ किती तळवटापर्यंत मुरलेली आहे. पोथीच्या पठनाचे बोलही घर-महार म्हणून गाव सेवा करणार्या म्हातारबा महाराच्या कानावरही पडू नयेत, अशी प्रथा लोणी बुद्रुकातही चालत आलेली होती तर! केव्हापासून? मी विचारच करित राहिलो. काही माग लागला नाही त्याचा.’
हा किस्सा आपल्याला बरंच काही सांगून जातो. एका बाजूला जातीच्या आधारावर चोखोबांच्या छळाची कहाणी सांगणारा पुराणिक दुसर्या बाजूला स्वत: मात्र कसोशीने अस्पृश्यता पाळत होता. चोखोबांच्याच जातीच्या व्यक्तीच्या कानावर चोखोबांच्याच कथेचा एक शब्दही जाऊ नये असा त्याचा कटाक्ष होता. एका बाजूला संतांचे अभंग आळवून म्हणणारे, त्यांच्या कथा सांगणारे, त्यांच्या पालख्या काढणारे लोकच दुसरीकडे त्यांच्या अभंगातला अर्थ मात्र समजून घेत नव्हते. अभंगांचा अर्थ न समजल्यामुळे तो कृतीत येण्याची काही शक्यताच नसते.
तुकोबाराय प्रस्तुत अभंगात सांगतात की अर्थाशिवाय पाठांतर ही केवळ घोक्कंपट्टी आहे. त्यापेक्षा आधी त्याचा अर्थ पहा. काही लोकांना अर्थ कळतो पण त्यानुसार वागण्याची त्याची तयारी नसते. त्यामुळे तुकोबाराय म्हणतात की पाठांतर आणि अर्थ कळण्यापेक्षाही अर्थ जाणून त्यानुसार कृती करणं महत्त्वाचं आहे. ‘अर्थरूप राहे होऊनिया।’ अभंगाच्या अर्थाला अनुरूप राहा असं अभंगाच्या तिसर्या चरणात तुकोबा सांगतात.
अर्थ कळूनही अर्थरूप न झालेले लोक कसे असतात हे समजावून देणारा एक किस्सा गाडगेबाबांच्या प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या चरित्रात आला आहे. हा प्रसंग गाडगेबाबांनीच प्रबोधनकारांना सांगितला होता तो त्यांच्याच शब्दात असा आहे-
माझ्या भटकंतीत मला एक परीटबुवा भेटला. नावगाव आता आठवत नाही. तो चांगला शिकला सवरलेला होता. मोठा कर्मकांडी. स्नान, जप-तप, पोथीपुराण वाचणे यांचे मोठे बंड. सारखा तो त्यातच गुरफटलेला असायचा. टिळे, माळा, भस्म, रुद्राक्ष अंगावर भरपूर. तुकोबारायांचे अभंग रोज तो मला वाचून समजावून सांगायचा. ‘समजले नाही’ अशा मुद्रेने मी मुकाट बसलो, का तो अभंग पुन्हापुन्हा जोरजोराने सुरावर वाचायचा. मला तो पाठ व्हायचा. लगेच त्या रात्रीच्या कीर्तनात मी तो सांगायचा. तसे म्हटले तर अभंग दोहरे मला फार थोडेच यायचे. पण कोण जाणे कसे व्हायचे ते. हव्या त्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर बोलणे भरपूर करता यायचे. लोकांना तेच फार आवडायचे आणि मग ते ओरडायचे, ‘बुवाजी, अभंग दोहरे नको. काहीतरी सांगा.’ याच परीटबुवांविषयी बाबा आणखी सांगतात, ‘पण या परिटबुवाला एक मोठी वाईट खोड होती. उठल्यासुटल्या तो पंचांग पहायचा. कुठे जायचे, काही करायचे, कुणाला भेटायचे का काढलेच याने आपले पंचांग बाहेर नि बसला ग्रहमानावर बोटे चाळवीत. ग्रहमान अनुकूल नाही, असे पंचांगात दिसले का हा जागचा उठायचा नाही.’ मी म्हणायचा,’ अहो बाप्पा, तुकोबारायांनी या पंचांगाची नि मुहूर्ताची टर उडवल्याचे अभंग तुम्ही मला तोंडपाठ म्हणून दाखवता, घोळून घोळून अर्थ सांगता, मग तुम्हीच कसे या वेडगळ फंदात पडता?’ पटायचे नाही ते त्याला. काळीज खुंटीवर अडकवून फक्त डोक्यांनी कामे करणारी पंडित मंडळी असतात ना, त्यातलाच तो एक होता. खूप खूप वाचले पण काळजात त्याचा अणुरेणू गवसायचा नाही. सारे वरच्या वर.’
वारकरी संतांचा आचार-विचार हा व्यापक, उदार आणि सर्वसमावेशक आहे. त्या संतांचे अभंग म्हणणारे लोक प्रत्यक्षात मात्र संतांप्रमाणे आचरण करत नाहीत असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत- ‘एकनाथ-तुकाराम यांच्यासारख्या साधूंची नावे हे लोक मोठ्या प्रेमाने घेतील आणि त्यांच्या कविता आळवून आळवून म्हणतील; परंतु त्या साधूंनी प्रतिपादिलेल्या न्यायबुद्धीची, भूतदयेची, समतावादाची व उदार विचारांची हटकून पायमल्ली करतील.’ कोणत्याही सिद्धांताला अपवाद असतात तसे या सिद्धांतालाही काही अपवाद आहेत. त्यातील ठळक अपवाद म्हणजे गाडगेबाबा. ते निरक्षर असल्यामुळे त्यांना स्वतःला अभंग वाचता येत नव्हते. त्यांनी परीटबुवांकडून ते ऐकून घेतले आणि पाठ केले. त्यांच्याकडूनच शब्दार्थही समजून घेतला. मग त्यांना सर्वच अभंगांचा गाभा म्हणजे वर्म समजलं. त्यानंतर तुकोबारायांचे ते अभंग बाबा अर्थशः जगले. शब्दशः जगण्यात आणि अर्थशः जगण्यात फरक असतो. अर्थशः जगणं म्हणजे वर्म समजून त्यानुसार आचरण करणं. त्यामुळेच गाडगेबाबा म्हणजे ‘आधुनिक तुकाराम’ आहेत, असं कर्मवीर भाऊराव पाटील यांनी म्हटलं आहे. त्यालाच तुकोबाराय अर्थरूप होऊन राहणं असं म्हणतात. संतांच्या काळात शब्दार्थही न जाणणारे वेदपाठक आणि शब्दार्थ जाणणारे पंडित होते. त्याचप्रमाणे पुढच्या काळात वारकरी संप्रदायातही दोन प्रवाह निर्माण झाले. संतांच्या अभंगांचं पाठांतर करून शब्दार्थ न जाणता त्यावर भजन करणारे भजनी कीर्तनकार आणि शब्दार्थ जाणणारे पण आचरण न करणारे वेदांती कीर्तनकार. हे शब्दांची जोडाजोड करून अभंगाचा वेदांती शब्दार्थ सांगायचे. ते शब्दांचा कीस पाडून पांडित्य दाखवायचे. गाडगेबाबांचं अभंगांचं पाठांतरही बर्यापैकी उत्तम होतंच पण त्याचबरोबर त्यांच्या जगण्यात संतत्व उतरलं होतं. त्यामुळे अभंगांशी अर्थरूप होऊन जगण्याचा आदर्श त्यांच्या जीवनात दिसतो. त्या काळात वारकरी संप्रदायात संतविचारांशी विसंगत अस्पृश्यता, भेदाभेद, कर्मकांड, गुरुबाजी, सोवळं-ओवळं, पुरुषी मानसिकता, परधर्मद्वेष, व्रतवैकल्ये, बहुदेवतोपासना याचं स्तोम वाढलं होतं, त्याला गाडगेबाबांनी ठाम विरोध केला. त्यांनी मूळ संतविचार नेमकेपणाने सांगितला आणि आचरणातही आणून दाखवला.
उदा. अस्पृश्यता, भेदाभेद आणि वर्णाभिमान नाकारणारे संतांचे अभंग आहेत. (उदा. वर्णाभिमाने कोण जाले पावन। वगैरे) ते अभंग अर्थ न जाणता पाठ करणारे आणि काही जण अर्थ जाणून पाठ करणारे होते, पण ते बहुतेकजण अस्पृश्यता पाळणारे होते. गाडगेबाबांनी मात्र अस्पृश्यतेच्या विरोधातील अभंग केवळ पाठ करून शब्दार्थ सांगितला नाही तर त्यांनी आचरणातून अस्पृश्यता नाकारली. त्यांनी वारकरी संप्रदायाच्या इतिहासात पहिल्यांदाच दलित वारकर्यांसाठी पंढरपूर आणि आळंदीला धर्मशाळा उभारल्या. दलितांच्या घरी जेवण केलं. दलित कीर्तनकार घडवले. कृतीतून अभंग जगणारा हा माणूस होता. संपूर्ण तुकोबारायांचा गाथाच गाडगेबाबांच्या जगण्यात उतरला होता. त्यामुळे गाथ्याशी अर्थरूप होऊन जगणार्या या महात्म्याचा आदर्श घेण्याची आज गरज आहे.
