• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

अस्वस्थ करणारा राजकीय पट

संजय डहाळे (तिसरी घंटा)

marmik by marmik
July 11, 2026
in तिसरी घंटा
0
अस्वस्थ करणारा राजकीय पट

एकेकाळची दादरची छबिलदास शाळा. प्रायोगिक रंगभूमीचे जसे हक्काचे माहेरघरच. पण काळाच्या ओघात या रंगघरकुलाची दारे बंद झाली. एका चळवळीचा अध्याय तिथे संपला आणि उपनगरात जिथे जागा मिळेल तिथे प्रायोगिक चळवळ जमेल तशी पसरू लागली. मागे वळून बघताना छबिलदासच वैभव आजही नजरेत भरतं. विचारांचे आदान-प्रदान करून रंगभूमीला आधार देण्यासाठी विलेपार्ले, माटुंगा, गोरेगाव, बोरिवली अशा ठिकाणी तरुण रंगकर्मी गोळा होऊ लागले खरे, पण आर्थिक गणितांमुळे चळवळ छबिलदासप्रमाणे एकखंबी टिकली नाही. असो…

प्रस्थापितांपेक्षा काही आगळं-वेगळं करण्याचा प्रत्येक पिढीचा संकल्प असतो. जो आशय-विषयांच्या मुळांना गच्च धरून बोलतो. या विखुरलेल्या चळवळीतले एक ज्येष्ठ नाट्यशिक्षक संभाजी सावंत. त्यांनी गेली तीसएक वर्षे नाट्यशिक्षणातून एक पिढी उपनगरात घडविली. त्यांच्यावर पद्धतशीर रंगसंस्कार केले आणि यंदाच्या वर्षात प्रायोगिक ते व्यावसायिक अशा प्रवासाला ‘फेक नॅरेटिव्हचा बळी’ या दीर्घांकासोबत निघाले! ‘अवतरण’ या प्रायोगिक नाट्यसंस्थेतर्फे  सादर होणारं अस्वस्थ राजकीय घडामोडींवरलं हे नाट्य, जे संहितेपासून ते सादरीकरणापर्यंत थरार उडविते…

‘फेक नॅरेटिव्हचा बळी’ या नाटकाचे कथानक राजकीय पार्श्वभूमीवरचे. बापूसाहेब हे बहुजनांचे नेते एकांतासाठी अधून मधून एका परिचिताच्या फार्महाऊसवर काही दिवस राहतात. एका रात्री त्याच फार्महाऊसवर त्यांचा मृत्यू होतो. बापूंचे मित्र आणि नातेवाईक असलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्याने म्हणजे काकाजींनी बापूसाहेबाना मृतावस्थेत प्रथम पाहिलेलं असतं. तातडीने डॉक्टरला बोलावलं जातं, पण बापूचा हार्टफेल झाल्याने मरण पावल्याचं डॉक्टर सांगतो. बापूसाहेबांची एकुलती भोळीभाबडी मुलगी ही काकाजींची सून. आपली राजकीय वारस म्हणून काकाजी तिच्याकडे पाहात असतात. बापूंच्या मृत्युनंतर त्यांनी सत्ताधार्‍यांकडून मोठी रक्कम घेऊन काही आमदारांसह पक्षांतर केल्याचं कळतं आणि चर्चांना उधाण येतं. बापूंचे पक्षप्रमुख कोर्टात जातात, प्रकरण अनिर्णित राहातं. काकाजींच्या पक्षाचं सरकार सत्तेत येण्याच्या हालचाली सुरू होतात. काही दिवसांनी काकाजींनी ते फार्महाऊससुद्धा विकत घेतलेलं. तेही आता अधूनमधून एकांतात चिंतनासाठी तिथे येऊन राहतात. तसेच एकदा ते तिथे असताना त्यांची सून -बापूसाहेबांची कन्या दुर्गा अनपेक्षितपणे तिथे पोहोचते आणि भाबडेपणाने काही प्रश्न उपस्थित करते. ‘बापूसाहेबांनी आपल्या काही आमदारांसह खरोखर पक्षांतर केलं होतं का? पैसे घेतले होते का? खरोखरच त्यांचा मृत्यू त्यांचा हार्टफेल होऊन झाला का?’, वगैरे प्रश्न ती कुतूहलापोटी विचारते. काकाजींना उत्तरं द्यावीच लागतात. त्यातून धक्कादायक अविश्वसनीय अशी कारणमीमांसा तिला कळते. काकाजींची ती उत्तरं ऐकून दुर्गा अस्वस्थ होते आणि आपल्या परीने सत्य उघड करण्याचा चंग बांधते. ते ती कसं घडवून आणते हे अनुभवण्यासाठी हे प्रायोगिक नाटक पाहायलाच हवं.
बचावासाठी कारस्थानी माणूस कोणा शक्तीची मदत घेत असेल, तर ती शक्ती निष्प्रभ करण्यासाठी स्वतःचं शील पणाला लावण्यासारखं टोकाचं धाडस करणारी व्यक्ती सुद्धा कारस्थानीच म्हणावी का? वडिलांच्या मृत्यूमागचं संशयास्पद कारस्थान उघड करण्यासाठी दुर्गा ज्या कारस्थानी खेळी खेळते आणि सत्य उघड करते, त्या धक्कादायक तर आहेतच, पण तिच्या दृष्टीने अपरिहार्यही आहेत. त्यानेच नाट्य अधिक उत्कंठा वाढविते. माणसाचा विश्वास हा बहुदा त्याच्यावरील संस्कारांनी त्याला दिलेल्या मनोबळावर पोसलेला असतो. तो विश्वासच आंधळा असल्याचं त्याला कळतं; तेव्हा ते मनोबळ क्षणात लुप्त होतं. त्यासाठी एखादं फेक नॅरेटिव्ह पुरेसं ठरतं. दुर्गा चतुराईने काकाजींना कसं हतबल करते, हा नाट्यातील उत्कर्षबिंदू आहे. काकाजी या एका व्यक्तिरेखेत राजकारणातील अनेक प्रवृत्तीच्या व्यक्ती दिसतात. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊन नैतिकतेला पायदळी तुडवणार्‍या अशा व्यक्तीला धाडसाने प्रश्न विचारायची गरज असते. ह्या नाटकात दुर्गा ते काम करते. दुसर्‍याला गाडण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात तो स्वतःही गाडला जाऊ शकतो, हे दाखवून देते.

मुंबई विद्यापीठात नाट्य विभाग अस्तित्वात नव्हता, त्यावेळी नाट्य तज्ञ डॉ. कृ. रा. सावंत यांनी कीर्ती महाविद्यालयात नाट्य शिक्षण केंद्रातून १९६५ शिस्तबद्ध आणि परिपूर्ण असे अभ्यासक्रम राबविले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देऊन नाट्यकलेची समज वाढविणे तसेच व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासावर भर देणे, या उद्दिष्टांवर त्यात भर होतो. याच केंद्रातून लेखक ,दिग्दर्शक संभाजी सावंत यांनी नाटकाचे धडे घेतले आहेत नंतर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून उमेदवारीही केली आहे. अनेक प्रायोगिक नाटकांचे लेखन, दिग्दर्शन आणि नाट्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी त्यांनी पार पाडलीय. या राजकीय प्लस कौटुंबिक कथानकात उत्कंठा वाढविणारे प्रसंग हे एकामागोमाग एक आकाराला येतात. संवाद खटकेबाज तसेच सादरीकरण हे वेगवान आहे. नाट्य कुठेही रेंगाळत नाही. लेखन-दिग्दर्शन एकहाती असल्याने नेमकेपणा नजरेत भरतो. नाट्याचा शेवट कमालीचा सूचक आणि विचार करायला लावणारा आहे.

नाटकात दोनच पात्रे. बापूसाहेब, काकाजींच्या भूमिकेत निलेश पवार याने संयमाने राजकीय नेता उभा केलाय. अभिनयाची जाण उत्तम. देहबोली शोभून दिसते. त्याला सोबत प्रगती नायक हिने चांगली केलीय. दुर्गेचा अवतार लक्षवेधी झालाय. दोघांचे संवाद विलक्षण बोलके आहेत. त्यामुळे शेवटच्या प्रसंगापर्यंत नाट्य पकडून ठेवते. दिग्दर्शकांनी तांत्रिक बाजूपेक्षा दोघा कलाकारांवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे जाणवते. महेश कांबळे याचे सूचक नेपथ्य, उन्मेष वीरकर यांची प्रकाशयोजना आणि अंकुर ढमाले व अजय अणसूरकर यांचे पार्श्वसंगीत नाट्याला अनुरूप आहे. कुठेही भडकपणा नाही. टीमवर्क उत्तम असून प्रत्येक विभागाने आपला सहभाग चोख बजावला आहे. अर्थात सारेजण नाट्य प्रशिक्षित असल्यामुळे स्वाभाविकच प्रयोग एका उंचीवर पोहोचतो. अशा नाट्यकृती या प्रायोगिक रंगभूमीवर दीर्घांकापुरत्या न राहता दोन अंकी स्वरूपात व्यावसायिक रंगभूमीवरही ताकदीने उभ्या राहू शकतात.

राजकारणातील काही प्रवृत्ती अन विकृती याचे दर्शन जे वारंवार होत आहे त्यातून आपला वर्तमानकाळ दिवसेंदिवस अधिकच विद्रूप होताना दिसतेय. अपघात, घातपात, खून, मारामार्‍या आरोप–प्रत्यारोप, डावपेच हे सारं काही जणू राजकारण्यांचा एक खेळच बनलाय. या नाटकातील वर्तमानाशी सांधा जोडलेला राजकीय पट एकीकडे सामाजिक भान जागं करतो आणि कमालीचं अस्वस्थही करून सोडतो. जो रसिकांनी अनुभवावा असाच आहे.

  • फेक नॅरेटिव्हचा बळी
  • लेखन /दिग्दर्शन – संभाजी सावंत
  • दिग्दर्शन सहाय्य- प्रज्योत जाधव
  • नेपथ्य- महेश कांबळे /अक्षय तायडे
  • प्रकाश – उन्मेष वीरकर
  • संगीत- अंकुर ढमाले/अजय अणसुरकर
  • वेशभूषा- शरयू कदम
  • रंगभूषा- शरद विचारे
  • निर्मिती- ‘ अवतरण’
Previous Post

‘राँग नंबर’चा फटका!

Next Post

अन्न हे पूर्ण भ्रम!

Next Post
अन्न हे पूर्ण भ्रम!

अन्न हे पूर्ण भ्रम!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.