ऑनलाईन व्यवहार आज आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झाले आहेत. मोबाईल हातात आला की, बँक, पैसे, खरेदी, सगळं काही एका क्लिकवर होतं. मात्र, आपण सावध नसू तर हीच सोय कधी कधी डोकेदुखी ठरू शकते. उदा. कोणत्याही कारणाने एखाद्या सेवेचं अधिकृत संकेतस्थळ शोधणं, अधिकृत ग्राहक सेवा क्रमांक शोधणं हे काम आपण गुगलवर करायला जातो. अनेकदा सायबर गुन्हेगार त्या कंपन्यांच्या, सेवांच्या खर्याखुर्या वेबसाइटसारख्याच दिसणार्या बनावट वेबसाइट तयार करून त्यात खोटे ग्राहक सेवा क्रमांक टाकतात. आपण तपासून न पाहता तेच नंबर खरे मानून त्यांच्यावर कॉल केला, की समोरून गोड बोलणारा किंवा गोड बोलणारी ‘एजंट’ आपल्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन देतात. प्रत्यक्षात त्यांची नजर असते आपल्या बँक तपशीलांवर. आपली एक चूक आपल्या खात्यातील सगळे पैसे गायब करू शकते.
अनंत विश्वास हा हिंगोलीमधील एका छोट्याशा गावातून, डोळ्यांत मोठं स्वप्न घेऊन पुण्यात करियर घडवण्यासाठी आलेला एक जिद्दी मुलगा. गावात असताना आसपास सगळीच त्याच्या ओळखीची माणसं आणि साधं आयुष्य होतं. पण पुण्यातलं वातावरण वेगळं- वेगवान जीवनशैली, स्पर्धेचं वातावरण आणि प्रत्येक पावलावर नवीन अनुभव. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजे यूपीएससीच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन मोठे यश मिळवण्याचे स्वप्न अनंतने ठेवलेले होते. पुण्यात आल्यावर कॉट बेसीसवर एका छोट्याशा खोलीत तो राहायला लागला. सकाळी क्लास, दिवसभर अभ्यास, रात्री नोट्स काढणे, असं त्याचं चक्र सुरू झाले होते. त्याचे वडील दर महिन्याला त्याच्या बँक खात्यात पैसे पाठवत असत. बाळा, पैशांची काळजी घे. नीट वापर, असा सल्ला त्याला आई कायम देत असे. अनंतने आधुनिक सोय म्हणून स्मार्टफोनवर पेटीएम सुरू केलं होतं. ‘किती सोपं आहे हे! बँकेत जाऊन पैसे काढायची गरजच नाही, त्याच्या आधारे तो रूमचं भाडं, खानावळीचे पैसे, चहा-नाश्ता यांचे पैसे देत असे. आयुष्य व्यवस्थित चाललं होतं. पण कधी कधी सगळं व्यवस्थित सुरू असतानाच संकट दार ठोठावतं.
एक दिवस अनंतने खानावळीत जेवण केलं आणि पेटीएमने पैसे देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ट्रान्झॅक्शन फेल्ड असा मेसेज त्याला आला. त्याने पुन्हा प्रयत्न केला, त्यानंतर पुन्हा तेच घडले. ‘अरे हे काय होतंय? असे म्हणत तो पूर्णपणे गोंधळून गेला होता. रूमवर परल्यावर त्याने पुन्हा अॅप उघडलं. पण त्यामधून पैसे जात नव्हते. ‘काहीतरी प्रॉब्लेम आहे. ग्राहक सेवा केंद्राशी बोलायला हवं,’ असे म्हणत त्याने पेटीएम कस्टमर केअरचा नंबर गुगलवर शोध घेण्यास सुरुवात केली. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक पॉपअप जाहिरात आली. तुमची पेटीएम संदर्भात तक्रार आहे का, लगेच या नंबरवर कॉल करा. अनंतने थोडाही विचार न करता लगेचच त्या नंबरवर फोन केला.
फोन लागला. ‘हॅलो, मी विवेक मिश्रा बोलतोय, पेटीएम एक्झिक्युटिव्ह. तुमची समस्या सांगा,’ समोरून आत्मविश्वासपूर्ण आवाज आला.
अनंत थोडा रिलॅक्स झाला. ‘सर, माझ्या खात्यातून पैसे जात नाहीयेत.’
‘ओह… एक मिनिट. मी तुमचं अकाउंट तपासतो,’ समोरची व्यक्ती म्हणाली. काही सेकंदांनी म्हणाला, ‘सर, तुमचं केवायसी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय.
‘असं का?’ अनंत घाबरला.
‘हो. पण काळजी करू नका. मी आहे ना इथे. तुम्ही फोनवरच केवायसी पूर्ण करू शकता. त्याच्या त्या बोलण्यामुळे अनंतला थोडा दिलासा मिळाला होता. त्यामुळे तुमची लिमिटही वाढेल. सध्या पाच हजार रुपये असणारी लिमिट थेट २५ हजार रुपयांपर्यंत जाईल, असे आमिष त्याने दाखवले. त्यावर ‘खरंच?’ असं म्हणत अनंत त्यासाठी उत्सुक झाला होता. सर, तुम्हाला त्यासाठी फक्त एक छोटं अॅप डाउनलोड करावे लागणार आहे, त्याची लिंक तुम्हाला पाठवतो. काही क्षणात अनंतच्या मोबाइलवर लिंक आली. अनंतने कोणतीही शंका न घेता ते अॅप डाउनलोड केलं. ‘आता त्यात तुमची माहिती भरा. तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक डिटेल्स, याचा तपशील टाकण्यास विवेकने त्यांना सांगितले.
अनंत एकेक माहिती भरत गेला. सगळे झाल्यावर विवेक म्हणाला, तुम्हाला ओटीपी आला का? हो आला.
तो टाका. सगळं झालं बरं. आता तुमचं केवायसी पूर्ण झालं. तुमचं अॅप आता व्यवस्थित चालेल,’ समोरून उत्तर आलं.
‘थँक यू सर, म्हणत अनंतने विवेकचे आभार मानले आणि तो फोन कट झाला.
काही वेळानंतर अनंतने पुन्हा पेटीएम उघडलं. तेव्हा त्याला बॅलन्स : ० रुपये असे दिसले. ते पाहून तो जोरात ओरडला. अरे हे काय झाले? हे कसं शक्य आहे? त्याच्या खात्यातले २०,००० रुपये गायब झाले होते. ‘मी तर पैसे वापरले नाहीत. मग ते गेले कुठे? ते पाहून त्याचे डोळे पाणावले.
तो लगेच बँकेत गेला. बँक अधिकार्यांनी तपास केला. तुमच्या खात्यातून दोन वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर झाले असून ती खाती दिल्लीतील असल्याचे बँक अधिकार्यांनी त्याला सांगितले. पण मी काहीच केलं नाही, अनंत गोंधळून म्हणाला. या प्रकाराची अनंतने पोलिसांकडे तक्रार केली. तपास करत असताना पोलिसांनी त्याला विचारले, तू कुठे कॉल केला होतास का? त्यानंतर त्याने घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तपास केला तेव्हा कळले की तो नंबर आणि अॅप या दोन्ही गोष्टी बनावट होत्या. विवेक मिश्रा नावाची ती व्यक्ती प्रत्यक्षात सायबर गुन्हेगार होती. त्याने अनंतचा विश्वास जिंकून त्याला एक चुकीचं अॅप डाउनलोड करायला लावलं होते. त्याच्याकडून सगळी संवेदनशील माहिती घेत त्याच्या पेटीएमवर पूर्ण ताबा मिळवला होता. त्याने सेटिंग्ज बदलून ते पैसे दिल्लीतील खात्यांमध्ये ट्रान्सफर केले होते.
अशी घ्या काळजी
- वेबसाइटवर ग्राहक सेवा केंद्राचे क्रमांक शोधताना सावध राहावे. पूर्ण खात्री केल्याशिवाय त्यांच्यावर कॉल करू नये.
- दुसर्या व्यक्तीच्या सांगण्यावरून रिमोट अॅक्सेस अॅप इन्स्टॉल करू नये.
- आपल्या पेटीएमचा अॅक्सेस दुसर्या कोणत्याही व्यक्तीला देऊ नये, त्यामधून देखील फसवणुकीचे प्रकार घडू शकतात.
- पेटीएम ज्या बँक खात्याला जोडण्यात आलेले आहे, त्यामध्ये कमी पैसे ठेवावेत.
- आपल्या बँक खात्यामधून पैसे ट्रान्सफर करण्याचे लिमिट नेहमी कमी ठेवावे.
- आपल्या मोबाइलवर असणारे.
- अॅप, मोबाइलचा स्क्रीन, आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरण्यात येणारे अॅप यांना पासवर्डची सुरक्षा असावी.
- बँकेतून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरण्यात येणारी माध्यमे ही वेगळी असतात त्याची माहिती असणे आवश्यक आहे.
- त्याचबरोबर वॉलेट आणि मोड ऑफ पेमेन्ट यांची नेमकी माहिती प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे.
- कधीही गुगलवरील पॉपअप नंबरवर विश्वास ठेवू नका.
- नेहमी अधिकृत अॅप किंवा वेबसाइट वापर करा.
- कोणालाही ओटीपी, पिन, केवायसीची माहिती देऊ नका.
- अनोळखी अॅप डाउनलोड करू नका.
- लिमिट वाढवतो, केवायसी करतो, अशा आमिषांना बळी पडू नका.
