ट्रेकिंसाठी खडतर समजल्या जाणाऱ्या किल्ल्यांपैकी एक म्हणजे हरिश्चंद्र गड. नगर जिल्ह्यातील या गडावर साखरप्यात राहणाऱ्या ऋतुजा शिंदे या कोकणकन्येने यशस्वी चढाई करून हम भी किसी से कम नहीचा नारा दिला आहे. या धाडसी ट्रेकिंगमुळे संपूर्ण जिल्ह्यात ऋतुजा हिला नावाजले जात आहे. या आधी तिने वानरलींगी सुळका हा अतिशय धोकादायक असणारा ट्रेक पार पाडला होता. रत्नागिरीच्या सह्याद्री ट्रेकिंग संघटनेची ती सदस्य आहे.
गिर्यारोहणासाठी अत्यंत खडतर समजला जाणारा हरिश्चंद्रगड सर केल्यामुळे तिच्या साहसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सह्याद्री गिर्यारोहकांच्या समुहात साखरप्यातील महिला ट्रेकर्स ऋतुजाचा सहभाग विशेष लक्षवेधी होता. लॉकडाऊननंतर गिर्यारोहकांनी गिर्यारोहणाचे नियोजित उपक्रम पुन्हा सुरू केले आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगावर गिर्यारोहणासाठी अत्यंत खडतर समजला जाणारा हरिश्चंद्रगड सर केल्यामुळे ऋतुजा वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ऋतुजाचा हा ट्रेकचा दुसरा चित्तथरारक अनुभव होता.
गिर्यारोहणाचा कोणताही अनुभव नसताना प्रचंड जिद्दीच्या व साहसाच्या जोरावर हा ट्रेक पूर्ण केल्याचे तिने सांगितले. सकाळी 10 वाजता गडावर चढाई करण्यास सुरुवात झाली. हा गड सर करण्याकरिता संध्याकाळचे 7 वाजले व रात्री तेथेच मुक्काम केल्याचे तिने सांगितले. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 5 वाजता चालण्यास सुरवात केली व सुमारे दोन तासांनी तारामती शिखरावर पोहचण्यात यश आले. अशाप्रकारे तब्बल 20 तासांची खडतर पायपीट पूर्ण होऊन यशस्वीरित्या ट्रेक झाला.
नवख्या गिर्यारोहकांनी ट्रेकिंगच्या उपकरणांचा आधार घेणे गरजेचे आहे, असे ती म्हणाली. परंतु आमच्या समुहातील सर्व सदस्य उत्तम जाणकार असल्याने कोणतीही भीती वाटली नाही. ऋतुजा ही सध्या उच्च महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिला ट्रेकिंगची आवड असल्याचे तिने सांगितले. भविष्यात अशाच प्रकारे अनेक साहसी ट्रेकमध्ये सहभागी होणार असल्याची ती म्हणाली. या मध्ये तिच्या आई वडिलांचा सुद्धा पाठिंबाअसल्याची ती म्हणाली. तसेच प्रचंड इच्छा शक्ती व मेहनत असेल तर आपण कोणताही ट्रेक पूर्ण करू शकतो, असे ती नवीन इच्छुक असणाऱ्या ट्रेकर्स ना सांगायला विसरली नाही.
सौजन्य- सामना