आ पण पंतप्रधान निवडून दिले आहेत की भारतीय जनता पक्षाचे प्रमुख प्रचारक की विविध वस्त्रप्रावरणांचा प्रसार करणारे परिधान मंत्री की एका व्यापार्याचा व्यापार जागतिक पातळीवर सेट करणारे मध्यस्थ, हे आणि असे बरेच प्रश्न २०१४ सालापासून भारतीय जनतेला सतत पडत आले आहेत. भाजपच्या मंडळींमध्ये धनदांडग्यांशी, बलाढ्यांशी लढण्याचं धाडस कधीच नसतं, पण, आपला कधीही संबंध न आलेल्या गोष्टींवर बोलण्याचं आणि सल्ले देण्याचं धारिष्ट्य खूप असतं. स्वातंत्र्यलढ्यात शून्य सहभाग असलेली ही मंडळी आता इतरांना राष्ट्रप्रेमाचे धडे द्यायला जातात, ती त्याच अगोचर औद्धत्याच्या बळावर. कोणतीही परीक्षा असो- मोदी विद्यार्थ्यांना परीक्षा कशी द्यायची, याचं मार्गदर्शन करतात! मुळात मुलांनी परीक्षा देण्यासाठी तिचे पेपर फुटू द्यायचे नसतात, तसं काही घडलं तर त्याची जबाबदारी घ्यायची असते, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा असतो आणि ही सगळी आपल्या पदाची कामं आहेत, हे त्यांच्या गावीही नसतं. अर्थात, लोकांना काटकसरीचा, इंधन बचतीचा, सार्वजनिक वाहने वापरण्याचा सल्ला देऊन लगोलग जे व्यापारी मित्रांच्या अडचणी सोडवण्यासाठी सरकारी विमानाने कोट्यवधींच्या खर्चाच्या परदेश दौर्यावर निघतात, त्यांच्याकडून ही अपेक्षा व्यर्थच आहे म्हणा!
या वर्षात मोदींच्या उंटाची उंची आणखी वाढली आहे. दर बदलत्या ऋतूत वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांमध्ये ‘ताईचा सल्ला’, ‘वहिनीचा सल्ला’ या नावाखाली ‘आला उन्हाळा, तब्येत सांभाळा’ असे जे लेख पाडले जातात, त्या शेळ्या हाकण्याच्या क्षेत्रात आता त्यांनी पदार्पण केलं आहे. त्यांनी एका महत्त्वाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (अलीकडे निवडणुका नसल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळ नावाचंही काहीतरी असतं आणि तिथेही चार लोक बोलावून त्यांना प्रवचन देता येतं, हे आठवलं असणार) मंत्र्यांना सल्ला काय दिला? उन्हाळा वाढलेला आहे, भरपूर पाणी प्या. उन्हाळा नसतानाही पाणी पिण्याची वेळ कशी येते आणि पाणी किती महत्त्वाचं असतं, ते मोदींना करण थापरच्या मुलाखतीपासून नीट माहिती आहे. त्यामुळे त्यांचे हे अनुभवाचे बोल आहेत म्हणा!
विचार करा, देशातले सगळ्याच राज्यांमधले मंत्री, लोकप्रतिनिधी, सरकारी बाबू लोक आलिशान एसी वाहनांनी प्रवास करतात, एसी ऑफिसांमध्ये काम करतात. दौरा काढला तर वातानुकूलित विश्रामगृहांमध्ये राहतात. यांना उन्हाळ्याचा ताप त्यातल्या त्यात कधी कळत असेल, तर तो निवडणुकीच्या वेळी. पण, पुढच्या पाच वर्षांची बेगमी करण्यासाठी तेवढा घाम तर गाळावाच लागेल ना? एरवी यांना कसले चटके बसतात आणि कसला उन्हाचा तडाखा जाणवतो? पण त्यांच्या तब्येतीची केवढी ही काळजी मोदींना!
अलीकडेच जागृत झालेल्या मोदींच्या या मातृहृदयाला नंतर आठवलं की अरे, या सगळ्यांच्या पलीकडे जनताही आहे आणि अगदी इतक्यात निवडणूक नसली तरी आपण तिचीही आठवण ठेवली पाहिजे. मग त्यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात अगदी आईच्या मायेने जनतेला सांगितलं, वाढत्या उष्णतेच्या आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. भरपूर पाणी प्या. पारंपरिक पेयं प्या. तहानलेल्याला पाणी द्या. दाराबाहेर लोकांना पाणी देण्यासाठी माठ ठेवा, वगैरे वगैरे. पाण्यात वाळा घाला, ताकात सैंधव आणि पुदिन्याची चटणी घाला, एवढंच सांगायचं बाकी राहिलेलं आहे… पण ते काय नंतरही कधी ना कधी ते सांगतीलच. ‘आजीबाईचा बटवा’ असतोच की पेपरांमध्ये. तो सापडेलच त्यांना कधी ना कधी.
मुळात जे वर्तमानपत्राच्या पुरवणीत कुणी न लिहिताही दर सीझनला कॉमन सेन्सने सगळ्यांना समजतं, ते सांगायला पंतप्रधान कशाला हवेत? हे काम करायला पंतप्रधान निवडला जातो का? पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हे सल्ला देतायत, भरपूर पाणी प्या. आणायचं कुठून? तुमच्या १२ वर्षांच्या सत्ताकाळात कितीजणांपर्यंत पिण्याच्या लायकीचं पाणी पोहोचलेलं आहे. ते पोहोचवण्याची जबाबदारी कोणाची आहे? त्याबद्दल प्रश्न कुणाला विचारायचा? उत्तर कोण देणार? जनतेला पाणी कोण पुरवणार? फुकटच्या तोंडाने सल्ले द्यायला काय लागतंय!
पारंपरिक पेयं प्यायला काहीएक सामुग्री लागते. ती आणायला पैसे लागतात. योग्य दराने माल उपलब्ध असावा लागतो. तो खरेदी करण्याची ऐपत असावी लागते. यातलं सर्वसामान्यांपाशी काय शिल्लक ठेवलेलं आहे तुम्ही? आता इराण युद्धावर सगळं खापर फोडण्याची ट्रिक वापरून उपयोग नाही. अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजायला फार पूर्वीच सुरुवात झाली होती आणि ती तुमच्या धोरणांमुळेच झाली होती, त्याचं काय? त्याबाबतीत जे करायला हवं ते न करता, आपल्या घोडचुकांची जबाबदारी न स्वीकारता, वर सर्वसामान्यांच्या जखमांवर हे मीठ किंवा सैंधव चोळायचं कशाला?

तहानलेल्याला पाणी द्या, हा माणुसकीचा धर्म भारतात फार पूर्वीपासून पाळला जातो. संकटसमयी कोणतेही सत्ताधीश आपल्या मदतीला येत नाहीत, हे सर्वसामान्यांना माहिती आहे, त्यामुळे लोकच एकमेकांना मदत करतात. उन्हाळ्यात जागोजागी प्याऊ उभारणारे दानशूर सामान्य लोकच असतात. पण, आज एकाने दुसर्याकडे पाणी प्यावं, दुसर्याने पहिल्याला आत्मीय भावाने पाणी द्यावं, असा भाईचारा राहिला आहे का तुमच्या विखारी राजवटीत? सगळे एकमेकांना ‘पाणी पाजायला‘ टपलेले. जे लोक इतरांना त्यांचा सण्ा साजरा करण्यासाठी सार्वजनिक जागी एकत्र येण्याचा अधिकारही नाकारतात, ते तहानलेल्याला पाणी पाजतानाही जात-धर्म पाहतील आणि त्यानुसार भेदभाव करतील, ही तुमच्या राजवटीची खास कमाई आहे.
प्रत्येक गावात पारावर एखादा रिकामटेकडा ज्येष्ठ नागरिक बसलेला असतो. तो लोकांना बळे बळे गोळा करून आपल्या बालपणीच्या खोट्या कहाण्या आणि तारुण्यातल्या पराक्रमाच्या थापा रंगवून रंगवून सांगत असतो. कोणीही न मागता असले बिनकामाचे फुटकळ सल्ले, फार मोठं ब्रह्मज्ञान सांगितल्याच्या आविर्भावात देत असतो. त्याच्या कचाट्यात सापडलेले लोक बिचारे नाईलाजाने माना हलवत असतात. अलीकडे असे अनेक रिकामटेकडे काका सोशल मीडियाच्या चावडीवर पोहोचले आहेत. तिथे बसून ते व्हॉट्सअॅपवरच्या ़फेकाफेकीच्या फॉरवर्ड संदेशांना माहिती आणि ज्ञान मानून उठता बसता इतरांना उपदेशाचे डोस पाजत असतात. देशाने तसेच एक काका दिल्लीच्या चावडीवर बसण्यासाठी निवडून दिले असतील, तर प्रश्नच मिटला… मग भरपूर पाणी प्या, हायड्रेटेड राहा… पण, ते अकलेच्या दुष्काळावर कितपत उपयोगी पडेल, देव जाणे!

