(पूर्वसूत्र : राजेश मेहता यांच्या टोयोटा फॉर्च्युनर गाडीच्या चोरीनंतर तपास १० हजाराची नोकरी करून शाही आयुष्य जगणार्या रफीकपर्यंत जाऊन पोहोचला. पोलिसांनी त्याच्या चाळीतल्या घरी भेटायला येणार्या संशयितांची धरपकड केली. रफीकच्या खोलीतल्या महागड्या वस्तू आणि त्याच्याकडच्या असंख्य साबणाच्या खोक्यांमधल्या साबणांवरचे गाड्यांच्या चाव्यांचे ठसे त्याचं गुपित उघड करून गेले. मात्र, त्याचा दावा होता की हे सगळं मदनचं होतं… हा मदन कोण होता आणि त्याची या सगळ्या प्रकरणात भूमिका काय होती?… वाचा… पहिला भाग वाचण्यासाठी इथं क्लिक करा )
******************
साळवींनी त्याच्याकडे थंड नजरेने पाहिले. ‘बरं…’ असं म्हणत ते खुर्चीवर बसले. दोन मिनिटं पूर्ण शांतता मग अचानक साळवींचा आवाज बदलला. ‘राक्षे…याला पोलिसी भाषा समजत नाही.’ राक्षेने लगेच रफीकची कॉलर पकडली आणि त्याला पोलिसी खाक्या दाखवला. धाड!
‘सरळ सांग! काय आहे हे?’
‘नाही साहेब! मी नाही—’
एक जोरदार थप्पड बसली. रफीक डगमगला.
‘आम्हाला फिरवतोस? महिनाभर पोलीस वेडे आहेत का?’
रफीक थरथरत म्हणाला— ‘मी फक्त माहिती द्यायचो…’
साळवी लगेच गुरगुरले— ‘कसली माहिती आणि कोणाला द्यायचा?‘
‘नाही… म्हणजे…’ राक्षेने टेबलावरचा साबणाचा बॉक्स त्याच्या समोर फेकला.
‘मग हे काय आहे? पूजा करतोस का याची?’
खोलीतील वातावरण तंग झालं होतं. रफीकच्या कपाळावर घाम फुटला होता. पण तरीही तो स्पष्ट सांगत नव्हता. साळवींनी शांतपणे मोबाईल काढला आणि एका लेडी कॉन्स्टेबलला फोन लावला.
‘त्या बारवाल्या मुलीला घेऊन या.’
हे ऐकताच रफीक दचकला. ‘साहेब… तिला यात ओढू नका…’
साळवी थंडपणे म्हणाले— ‘का? तिच्यावर लाखो रुपये उडवलेस ना? पैसे कुठून आले ते तिलाही माहिती असेल. आरोपी म्हणून टाकू मग. चोरीच्या पैशांवर ऐश केली म्हणजे ती पण सहभागी.’
‘नाही साहेब!’ रफीक जवळपास ओरडलाच.
‘ती काहीच करत नाही… तिचा काही संबंध नाही…’
साळवी खुर्चीत मागे रेलले.
‘मग सांग सगळं. नाहीतर उद्या पेपरमध्ये फोटो येईल— चोर टोळीच्या बारबाला मैत्रिणीला अटक.’
रफीक पूर्णपणे हादरला. त्याच्या डोळ्यासमोर त्या मुलीचा चेहरा आला. तिला पोलीस पकडून नेत आहेत… लोक बघतायत… हे चित्र त्याला सहन झालं नाही. तो अचानक खाली बसला. ‘साहेब…सांगतो… सगळं सांगतो…’
साळवी शांत झाले. ‘बोल. सुरुवातीपासून सांग… मदन कसा भेटला?’
रफीकने थरथरत्या हाताने पाणी प्यायलं. काही क्षण तो खाली मान घालून बसला… आणि मग हळूहळू रडत रडत बोलू लागला— ‘साहेब… दिल्ली जेलमध्ये भेटला तो…’
खोलीत पूर्ण शांतता पसरली.
‘मी तेव्हा एका मारामारीच्या केसमध्ये आत होतो. मी कार सर्विस सेंटरमध्ये काम करायचो. एकदा एका गाडीचं काम उशिरा झालं… सुपरवायजरने सगळ्यांसमोर शिवी दिली. मला राग आला… बाजूलाच पडलेला पाना मी त्याच्या डोक्यात मारला… त्याचं डोकं फुटलं… मालकाने माझं काही ऐकलंच नाही… सरळ पोलीस बोलावले…’ रफीकचा आवाज हळूहळू भरून येत होता. ‘माझ्यावर केस झाली… आणि मी जेलमध्ये गेलो… तिथे मदन भेटला. सुरुवातीला तो खूप चांगला वागत होता. जेलमध्ये मला मदत करायचा. कॅन्टीनमधून खायला आणायचा. बाकी वैâद्यांपासून वाचवायचा…’
राक्षे मध्येच म्हणाले— ‘म्हणजे शिकार तयार करत होता.’ रफीकने मान खाली घातली.
‘एक दिवस त्याने विचारलं — ‘किती पगार होता तुझा? मी सांगितलं — दहा हजार… मदन त्या वेळी हसला होता. महिनाभर कुत्र्यासारखं काम करून दहा हजार? आमच्या एका कामाचे पंधरा हजार मिळतात. मी घाबरलो. विचारलं काय काम? तो म्हणाला— तुला काही करायचं नाही. फक्त मदत करायची.’
साळवी खुर्चीत पुढे झुकले. ‘मग?’
‘मी आधी नाही म्हटलं होतं साहेब. पण जेलमध्ये माणूस कमजोर होतो. मदन माझ्या डोक्यात सतत एकच गोष्ट भरवत होता— तुझ्यावर अन्याय झाला. गरीब असल्यामुळे तुला आत टाकलं… आता जगायचं असेल तर पैसे कमावावे लागतील… मग एक दिवस त्याने माझा जामीन करून घेतला.’
हे ऐकताच राक्षे चकित झाले. ‘काय? स्वतःच्या पैशाने?’
‘हो साहेब. तेव्हाच मला समजायला पाहिजे होतं…’ रफीकच्या आवाजात पश्चात्ताप होता. ‘मला मुंबईला पाठवलं. त्याच्या मित्राच्या रूमवर ठेवला. सुरुवातीला मी खूप घाबरलो होतो… पण तिथे वेगळीच दुनिया होती…’
त्याच्या डोळ्यांसमोर ते दिवस उभे राहिले.
‘रोज बिर्याणी, चायनीज, दारू, सिगारेट, रात्री डान्स बार… माझ्यासारख्या गरीब मुलाने ते आयुष्य कधी पाहिलंच नव्हतं साहेब…’ तो थोडा थांबला. ‘सुरुवातीला वाईट वाटायचं…पण हळूहळू सवय लागली…’
साळवी गंभीरपणे म्हणाले— ‘आणि तीच त्यांची चाल होती.’ रफीकने मान डोलावली. ‘हो साहेब… मदन खूप शातीर होता. त्याने आधी मला त्या चैनीची सवय लावली. मग एक दिवस अचानक म्हणाला— उद्यापासून स्वतः कमावून हे सगळं करायचं असेल तर आमचं काम कर. ‘मी घाबरलो होतो. पण त्याने मला अडकवलं होतं…’
‘कसं?’ साळवींनी विचारलं.‘ ‘तो म्हणाला— या खोलीचं पाच हजार भाडं आहे…उद्यापासून स्वतः भर… आम्ही काही जबरदस्ती करत नाही…’ रफीक कटू हसला. ‘साहेब, त्या वेळेला मला परत जुनं गरीब आयुष्य नको वाटत होतं. ‘मग मदनने प्लॅन सांगितला… तो म्हणाला—‘तू फक्त शोरूममध्ये नोकरी कर. टेक्निशियन नाही… पिकअप अँड ड्रॉप. मी विचारलं कमी पगाराची नोकरी कशाला? तो हसला… ‘पगारासाठी नाही… माहितीसाठी काम करायचं.’ त्यांनी सगळं प्लॅनिंग करून ठेवलं होतं साहेब… ज्या गाड्या पिकअपसाठी यायच्या, त्यातल्या महागड्या गाड्या निवडायच्या. मग ग्राहकाचं लक्ष नसताना चावी साबणावर दाबून तिचा ठसा घ्यायचा.’ तो ठसा मी मदनच्या माणसाला द्यायचो. त्यावरून डुप्लिकेट चावी बनायची.’
साळवींच्या डोळ्यांत तीक्ष्ण चमक आली. ‘आणि मग गाडीवर पाळत ठेवायची…’
‘हो साहेब… मदन स्वतः कधीच समोर यायचा नाही. तो खूप काळजी घ्यायचा. आम्ही कधीही उघडपणे भेटत नव्हतो. कधी पानटपरीवर एखादा माणूस यायचा… कधी फोनवर कोडवर्डमध्ये बोलायचे… त्यामुळे आमचे संबंध कोणालाच कळत नव्हते.’
राक्षे म्हणाले—‘म्हणजे पोलिसांनाही संशय येऊ नये.’
‘हो…’ रफीक पुढे म्हणाला—‘आणखी एक महत्वाची गोष्ट होती साहेब…’
‘कोणती?’
‘ज्या गाडीची चावी बनवायचो… ती गाडी परत सर्व्हिसिंगला आली तर मी मुद्दाम तिचं पिकअप घ्यायचो नाही.’
साळवी लगेच समजून म्हणाले—‘कारण उद्या चोरी झाली तर तुझ्यावर संशय येऊ नये.’
‘हो साहेब…’ ‘मदन म्हणायचा— ‘एकाच गाडीभोवती जास्त फिरू नकोस. पोलीस सर्वात आधी पिकअपवाल्याला पकडतात.’
राक्षेंनी दात ओठ खात म्हटलं— ‘म्हणजे सुरुवातीपासून पूर्ण तयारी…’
रफीक पुढे बोलत राहिला— ‘मदनने मला अजून एक गोष्ट शिकवली… गरीब दिसायचं नाही.’ सगळे त्याच्याकडे पाहू लागले. ‘मदन म्हणायचा—‘जर लोकांना तू गरीब वाटलास तर ते तुझी ऐश पाहून तुला विचारतील, एवढा पैसा कुठून आला. पण तू स्वतःला श्रीमंत घरचा दाखव… लोक प्रश्न विचारणं बंद करतात. मग मी सगळ्यांना सांगायला लागलो की माझ्या गावी शेती आहे, घर श्रीमंत आहे, आईवडिलांशी पटत नाही म्हणून मुंबईला आलो…’ महागडे कपडे, सोन्याची चेन,महागडा फोन… हे सगळं मुद्दाम ठेवायला सांगितलं होतं त्याने…’
साळवी हळू आवाजात म्हणाले— ‘म्हणजे तू खोटी ओळख जगत होतास…’
रफीकच्या डोळ्यातून अश्रू आले. ‘हो साहेब. सुरुवातीला फक्त नाटक होतं. पण नंतर मी स्वतःलाच विसरलो…’
क्षणभर चौकशी खोलीत शांतता पसरली. साळवी उठले… टेबलावरचे साबणाचे बॉक्स पाहिले… आणि मग रफीककडे पाहत म्हणाले— ‘गुन्हेगाराचा सर्वात मोठा शस्त्र चाकू किंवा बंदूक नसते… तर दुसर्याच्या कमकुवतपणाचा केलेला वापर असतो.’
रफीक खाली मान घालून रडत बसला होता. त्याच्या कबुलीजबाबानंतर संपूर्ण टोळीचं जाळं पोलिसांसमोर स्पष्ट झालं होतं. आता फक्त एकच माणूस बाकी होता तो मदन. जोशीमार्ग पोलीस स्टेशनच्या चौकशी खोलीत मदन समोर बसला होता. हातात बेड्या होत्या… पण चेहर्यावर अजूनही तोच माज होता. तो खुर्चीत रेलून बसला होता, जणू काही तो आरोपी नसून पाहुणाच होता. इन्स्पेक्टर विजय साळवी समोर शांत बसले होते. टेबलावर साबणाचे बॉक्स, डुप्लिकेट चाव्या, कारचे फोटो आणि रफीकचा कबुलीजबाब पडला होता. साळवी शांतपणे म्हणाले— ‘मदन…तुझा गेम संपलाय.’ मदन हलकंसं हसला. ‘साहेब… कोणता गेम? मी तर काहीच केलं नाही.’
राक्षे संतापले. ‘हरामखोर! रफीकने सगळं सांगितलंय.’
मदन निर्विकारपणे म्हणाला—‘तो काय बोलतो त्याच्याशी माझा संबंध नाही.’
साळवी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. त्यांना माहित होतं— हा साधा चोर नाही. हा मेंदूने खेळणारा गुन्हेगार आहे.अशा लोकांना मार देण्यापेक्षा त्यांचा अहंकार तोडावा लागतो. साळवींनी टेबलावरून एक फोटो उचलला. तो फोटो दिल्ली जेलचा होता.
‘हे ओळखतोस?’
क्षणभर मदनच्या चेहर्यावर हलकासा बदल झाला. पण तो लगेच सावरला. ‘नाही.’ साळवींनी दुसरा फोटो टाकला. त्यात रफीक आणि मदन जेलच्या आवारात एकत्र दिसत होते. मदन काही बोलला नाही. साळवी पुढे म्हणाले—‘तुझी चूक माहित आहे काय झाली?’ मदन शांत. ‘तू स्वतःला खूप हुशार समजलास.’
‘सरळ बोलायला सुरुवात कर!’ राक्षे गुरगुरले.
मदन पुन्हा खुर्चीत बसला. ‘मारून काही होणार नाही साहेब.’
साळवी अचानक उठले. ते त्याच्या अगदी जवळ गेले.
‘मार तर अजून सुरूही झालेला नाही…’ त्यांचा आवाज थंड होता… पण अंगावर काटा आणणारा. ‘तुला वाटलं तू पोलिसांपेक्षा हुशार आहेस? पण गुन्हेगार कितीही डोकं लावो… एक ना एक धागा मागे राहतोच.’
मदन पहिल्यांदा थोडा अस्वस्थ दिसू लागला.
साळवी पुढे बोलू लागले— ‘तू थेट चोरी करायचास… पण स्वतःचं नाव कुठेच येऊ दिलं नाहीस. दिल्लीतून माणूस शोधलास…त्याची मजबुरी ओळखलीस… त्याला आधी उपकार करून जाळ्यात ओढलंस…’
मदनच्या डोळ्यात हलकी चमक आली. त्याला जाणवत होतं— पोलीस त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचले आहेत.
साळवी म्हणाले—‘तू आधी त्याला चैनीची सवय लावलीस… कारण तुला माहित होतं — गरीब माणूस भुकेला राहू शकतो, पण चैनीची सवय लागली की मागे फिरत नाही.’
मदन नकळत हसू लागला.
राक्षे ओरडले—‘हसतो काय?’
पण साळवींनी हाताने त्याला थांबवलं. त्यांनी मुद्दाम मदनच्या अहंकाराला हात घातला होता. ‘तुझा प्लॅन जबरदस्त होता, हे मान्य करावंच लागेल. तू स्वतः कधीच समोर यायचा नाहीस… रफीकला मुद्दाम पिकअप अँड ड्रॉपमध्ये टाकलंस. साबणावर चावीचे ठसे… डुप्िलकेट की… गाडी चोरीनंतर दुसर्या राज्यात विक्री…’ साळवी टेबलावर बोटं आपटत म्हणाले ‘आणि सर्वात भारी खेळ— ज्या गाडीची चावी घेतली तिच्यापासून रफीकला दूर ठेवायचास.’
मदनच्या चेहर्यावर आता अभिमान स्पष्ट दिसत होता. तो नकळत बोलून गेला— ‘कारण पोलीस पहिल्यांदा त्याच्यावरच जातात…’
क्षणभर खोलीत शांतता पसरली.
राक्षे लगेच हसले. ‘झालं! तोंड उघडलं शेवटी.’
मदनला स्वतःची चूक लक्षात आली. पण उशीर झाला होता.
साळवी शांतपणे खुर्चीत बसले. ‘पुढे सांग.’
मदन काही क्षण गप्प बसला. मग अचानक तो हसू लागला. ‘साहेब… खरं सांगू?’
‘बोल.’
‘तुमच्यासारखा अधिकारी पहिल्यांदाच पाहिला. बाकीचे पोलीस फक्त चोर शोधतात… तुम्ही चोराचा विचार शोधलात.’
साळवी निर्विकार होते.
मदन पुढे बोलू लागला— ‘हो… मीच सगळं प्लॅन केलं. जेलमध्ये रफीकला पाहिल्यावर मला समजलं हा उपयोगी पडेल. गरीब होता… रागात होता… आणि आयुष्यावर नाराज होता. असे लोक पटकन तुटतात. मी आधी त्याचा विश्वास जिंकला. मग त्याला बाहेर काढलं. त्याला पैसे, दारू, बार… सगळं दिलं.’ तो हसत म्हणाला—‘माणूस एकदा चैनीला सरावला की मग तो स्वतःहून गुन्ह्यात उतरतो.’
राक्षे चिडून म्हणाले— ‘आणि तू स्वतः मागे राहून त्याला पुढे केलंस.’
‘कारण मी मूर्ख नाही,’ मदन थंडपणे म्हणाला. ‘मी कधीच उघड भेटत नव्हतो. वेगवेगळे फोन… वेगवेगळे माणसं… रफीकला पण सांगितलं होतं — गरीब राहू नकोस.’
साळवी म्हणाले—‘म्हणून खोटी श्रीमंती दाखवायला शिकवलंस.’
‘हो,’मदन अभिमानाने म्हणाला— ‘गरीब माणूस अचानक पैसे खर्च करू लागला तर लोक विचारतात. पण ‘घरची श्रीमंती आहे’ म्हटलं की लोक गप्प बसतात. साहेब… आम्ही गाडी चोरी करण्यापूर्वी महिनाभर तिच्यावर लक्ष ठेवायचो. मालक कोण, कधी येतो, सिक्युरिटी कशी आहे… सगळं. आणि गाडी घेतल्यानंतर चार तासात मुंबईबाहेर. नंबर प्लेट बदलायचो… कागदपत्रं बनवायचो… मग गाडी राजस्थान, बिहार किंवा नेपाळ बॉर्डर साईडला विकली जायची.’
साळवी शांतपणे ऐकत होते.
कबुलीजबाब संपल्यावर त्यांनी एकच वाक्य म्हटलं—‘डोकं वाईट नव्हतं तुझं…पण हुशारी गुन्ह्यात वापरलीस…म्हणून शेवट इथे झाला.’
मदन पहिल्यांदाच शांत झाला.
त्या रात्री पोलिसांनी मदनच्या टोळीतील आणखी दोन साथीदारांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून डुप्लिकेट चाव्या बनवण्याचे साहित्य, बनावट नंबर प्लेट्स आणि चोरीच्या पाच महागड्या गाड्या जप्त केल्या.
दुसर्या दिवशी सकाळी जोशी मार्ग पोलीस स्टेशनच्या आवारात राजेश मेहतांची पांढरी फॉर्च्युनर उभी होती. मेहता गाडी पाहताच भावुक झाले. ‘साहेब…तुम्ही तर अशक्य शक्य केलं…’ तपासात कारचोरीच्या तब्बल १२ केसेस उघडकीस आल्या. मेहतांची टोयोटा फॉर्च्युनर राजस्थानमधील एका फार्महाऊसमधून जप्त करण्यात आली. कोर्टाने मदन आणि त्याच्या साथीदारांची रवानगी जेलला केली. रफीकला सरकारी साक्षीदार बनवण्यात आले.
एका रात्री साळवी पोलीस स्टेशनच्या गच्चीवर उभे होते. शिंदे हवालदार म्हणाला— ‘साहेब, एवढा हुशार चोर शेवटी पकडला गेला…’ साळवी हलकंसं हसले. ‘गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एखादी चूक नक्की करतोच… फक्त पोलीसांची नजर ती चूक शोधणारी असावी लागते.’

