झु रळ हा किळसवाणा कीटक. तो दिसताक्षणीच माणसं न राहवून किंचाळतात. अगदी छप्पन्न इंची छाती असल्याचा दावा करणारी माणसंही झुरळाला घाबरतात. झुरळापेक्षा किळसवाणी असलेल्या माणसांनाही झुरळांची शिसारी येते हे आक्रीतच.
असं हे झुरळ एखाद्याच्या चड्डीत शिरलं तर त्याची काय भयंकर अवस्था होते, ते देश गेले काही दिवस पाहतो आहे आणि खदा खदा हसतो आहे. चड्डीची फुल पँट झाली तरी बुद्धीच तोकडी आणि वृत्ती वाकडी असल्यावर तिला पँट कसं म्हणायचं, थोडी लांबट, पण चड्डीच ती! तिच्यात सीजेपी अर्थात कॉक्रोच जनता पार्टी नावाचं झुरळ शिरलं आणि चड्डीधारींनी रोंबा सोंबापासून भरतनाट्यमपर्यंत सगळ्या मुद्रांचं मिश्रण असलेला एक भयभीत फ्यूजन नाच केला, तो मनोरंजक होता.
देशाच्या सरन्यायाधीशांनी बेरोजगार युवकांना झुरळ म्हणून हिणवलं, त्याचं विडंबन करण्यासाठी अमेरिकेत बोस्टनमध्ये शिकणार्या अभिजीत दिपके या युवकानं कॉक्रोच जनता पार्टी नावाचं एक पेज सोशल मीडियावर तयार केलं. एकेकाळी जसपाल भट्टी हे विनोदवीर तत्कालीन सरकारची खिल्ली उडवण्यासाठी एखादा पक्ष स्थापन करून त्याचा जाहीरनामा जाहीर करायचे, तो अर्थातच उपहासपूर्ण आणि विनोदी असायचा, त्यातलाच हा प्रकार. तो व्हायरल झाला नसता, तर कधीच विरून गेला असता, त्याच्याकडे कुणी लक्षही दिलं नसतं. पण या पॅरडी पेजला तरुणांनी इतक्या वेगाने सबस्क्राइब करायला सुरुवात केली की त्याने ‘जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष’ म्हणवणार्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया फॉलोअर्सचा आकडा पार केला. बरं हे खरोखरचे फॉलोअर, बनावट बॉट वगैरे नाहीत. सोशल मीडियावर हे बनावट सदस्य वजा केले आणि देशाच्या राजकारणात यांनी इकडून तिकडून केलेली खोगीरभरती काढून टाकली तर या पक्षाचा आकार झुरळापेक्षाही कमी भरेल! त्यामुळेच की काय, यांना या किरकोळ झुरळांचीही भीती वाटली.
विचार करा, अनेक वर्षांची परंपरा असलेली ही विचारधारा- अनेकजण तिला अविचारधाराही म्हणतात, ते सोडा- वर्षानुवर्षे कुजबुज आघाडी चालवून आणि मुळात नोंदणीकृतही नसलेल्या मातृसंघटनेने कुत्र्याच्या छत्र्यासारख्या ठिकठिकाणी उगवलेल्या संघटनांचं देशभरातलं जाळं, यांच्या चरणी मेंदू गहाण ठेवलेल्या भक्तांचा सुकाळ, सामदामदंडभेदाने बळकावलेली निरंकुश सत्ता आणि अपरिमित पैसा असलेल्या या पक्षाचं धाबं एका पॅरडी पेजने दणाणवून सोडावं! अखंड हिंदुस्तान बनवू, अमुकमुक्त देश बनवू, वगैरे मोठमोठ्या वल्गना करणार्या या परिवाराने ‘विचारशक्तीमुक्त भक्त’ घडवण्यापलीकडे काही वेगळं साधलेलं नसावं, हे फारच करुण आहे.
यांना अमेरिका आपल्या तालावर नाचवतो, हे लाजिरवाणं आहे, पण समजण्यासारखं आहे. कारण यांच्या ‘मालकां’चे हात दगडाखाली अडकलेले आहेत आणि एपस्टीन फाइल्समध्ये आणखी कुणाचं तरी वेगळं काहीतरी अडकलेलं असावं! त्यामुळेच भारताला नरकाचं द्वार म्हणणारे अमेरिकेचे अध्यक्ष आपलं युद्ध थांबवल्याचं परस्पर जाहीर करतातच; पण आता आपला आर्थिक करार होण्याआधीच आपण अमेरिकेकडून काय काय आयात करणार आहोत, हे अमेरिकेचा गृहमंत्री सांगतो. व्हेनेझुएला या अमेरिकेने बळकावलेल्या देशाचा अध्यक्ष भारताला भेट देणार आहे, हेही तोच सांगतो. जिथे शेजारी देशांच्या चलनापेक्षा आपलं चलन अधिक कोसळलेलं आहे, तिथे आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय राजकारणात किंमत ती काय उरली असणार? आता कॅडबरी नव्हे, मेलडीच परवडणार आपल्याला! तीही काही भाग्यवंतांना!

पण, म्हणून झुरळांचीही इतकी धास्ती… ती ही आभासी झुरळांची?
लगेच त्या अभिजीत दिपकेला जिवे मारण्याच्या धमक्या, त्याच्या सगळ्या सोशल अकाऊंट्सना टाळे, हॅकिंग हे सगळे थिल्लर चाळे महासत्ता बनण्याची स्वप्नं पाहणार्या देशाच्या सत्ताधार्यांनी करावेत? झुरळ पार्टीने यांचं नेमकं काय उघडं पाडलं आहे, त्याचा विचार केला, तर यांची ही पळापळ समजू शकते. १२ वर्षांपूर्वी देशाला खर्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं आणि आज देशात जे काही सुरू आहे, तो अमृतकाळ आहे, असा भ्रम सत्ताधार्यांनी पसरवला आहे. या देशातला प्रत्येक जण एका नॉन बायॉलॉजिकल अवताराचा भक्तच आहे आणि जो भक्त नाही तो पाकिस्तानी-बांगलादेशी आणि हिंदूद्रोही आहे म्हणजेच देशद्रोही आहे, असं एक तर्कट आपण संपूर्ण देशाच्या गळ्यात मारण्यात यशस्वी झालो आहोत, अशी या व्होटचोर सरकारची आणि त्याच्या समर्थकांची समजूत आहे.
झुरळ पार्टीने हा सगळा डोलाराच कोसळवून टाकला आहे. देशात सगळं आलबेल नाही आणि तसं ते नाही हे कळण्याची अक्कल असलेला तरुणवर्ग अजूनही शिल्लक आहे, हे त्यांनी दाखवून दिलं.
आज देशातले विरोधी पक्ष स्तंभित अवस्थेत आहेत. त्यांचे हातपाय बांधून, त्यांचे नेते, कार्यकर्ते पळवून, मतचोरी करून, सरकार चोरी करून त्यांना सत्ताधार्यांनी विकल करून टाकलं आहे. सत्ताधार्यांच्या लालसेचा बुलडोझर कसा थांबवावा, याचा काही अंदाजच त्यांना येत नाही. शिवाय, विरोधकांच्या आंदोलनांना गोदी मीडियाकडून कसलंही महत्त्व दिलं जात नाही. जिथे १००हून अधिक जणांचा बळी घेणार्या उत्तर प्रदेशातल्या वादळाची, वीजप्रपाताची बातमी आपल्या देशाला रशियाच्या अध्यक्षाकडून मिळते, तिथे या बातम्या कुठून मिळणार? साहजिकच आता राजकीय आसमंतात ‘मैं ही मैं हूँ, दूसरा कोई नहीं’ अशा भ्रामक आत्मविश्वासाचा फुगा सत्ताधार्यांनी फुगवला होता. त्याला झुरळांनी टाचणी लावून दाखवली.
या देशातल्या युवकांकडे रोजगार नाही. त्यांच्यासाठी कसलंही उज्वल भवितव्य उरलेलं नाही. महागाईचा आगडोंब उसळत चाललाय. शिक्षणाचा बट्ट्याबोळ होतोय. सतत हिंदू-मुस्लिम आणि जातीजातींमध्ये तेढ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, याने हा जेन झी युवकवर्ग कंटाळला आहे, वैतागला आहे, संतापला आहे. त्याच्यासाठी काही करणं दूर राहिलं, वर त्याची झुरळं म्हणून थट्टा उडवता? या वर्गाला आता बदल हवा आहे. हा युवकवर्ग त्यांना हवा तो बदल किती शांततेत घडवून आणतात, ते तामिळनाडूमध्ये थलपती विजय याच्या अनपेक्षित विजयाने दाखवून दिलं आहे.
त्यामुळेच, सत्तेच्या चड्डीत झुरळ शिरल्यावर पळापळ झाली तो अपघात नव्हे. हे आभासी झुरळ चिरडून टाकणं सहज शक्य आहे. पण, त्या पळापळीत राजा किती भोंगळा आहे, हेही सर्वसामान्यांना दिसून गेलेलं आहे, हे विसरता कामा नये.
झुरळांचं यापुढचं बंड आभासी असणार नाही!
