दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रबोधन, गोरेगाव आणि साप्ताहिक मार्मिक यांच्यातर्फे साहित्य सेवक वसंत तावडे स्मृतीप्रित्यर्थ प्रबोधन-मार्मिक कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यावेळी या स्पर्धेचे स्वरूप अधिक व्यापक असणार आहे. गेली दोन वर्षे या स्पर्धेला उत्स्फूर्त महाराष्ट्रातूनच नव्हे, तर इतर राज्यांमधूनही जोरदार प्रतिसाद मिळाल्यामुळे यंदा ही स्पर्धा दोन विभागांत घेतली जाणार आहे. पहिला विभाग विनोदी कथांचा असून दुसरा विभाग लघुतम कथांचा असणार आहे. त्याला विषयाचे बंधन नसेल.
विनोदी कथांच्या विभागात प्रथम क्र. रु. १५,०००, द्वितीय क्र. रु. १०,००० आणि तृतीय क्र. रु. ७,५०० या रकमांची पारितोषिके देण्यात येणार असून लघुत्तम कथा विभागात प्रथम क्र. रु. ५,०००, द्वितीय क्र. रु. ३,५०० आणि तृतीय क्र. रु. २,००० अशी पारितोषिके देणार आहेत. विनोदी कथांच्या विभागात प्रत्येकी ५,००० रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. लघुतम कथा विभागात प्रत्येकी १,००० रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जातील.
स्पर्धेचे नियम
- विनोदी कथांच्या स्पर्धेसाठी लेखकांनी ३,५०० ते ४,००० या शब्दमर्यादेतील कथा पाठवायच्या आहेत. लघुतम कथा ६०० ते ७०० या शब्दमर्यादेत बसणारी असावी.
- दोन्ही स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुल्या असून कोणत्याही स्पर्धकाला एकाच विभागात कथा पाठवता येईल. दोन्ही विभागांत कथा पाठवल्यास दोन्ही बाद मानल्या जातील.
- स्पर्धकांनी स्वरचित आणि स्वलिखित कथा युनिकोड फाँटमध्ये टाइप केलेल्या वर्ड फाइलच्या स्वरूपातच पाठवायची असून हस्तलिखित स्वीकारले जाणार नाही.
- कथा मराठी भाषेत असावी, गरजेनुसार अन्य भाषांतील शब्दांचा तात्कालिक आणि उचित वापर चालेल.
- कथा सद्भिरुचीहीन नसावी. ती अनुवादित अथवा पूर्वप्रकाशितही नसावी.
- विभाग एकसाठी (विना परतावा) प्रवेश शुल्क २०० रुपये असून विभाग दोनसाठी ते १०० रुपये आहे.
- कथांचे अर्ज १ ते २६ जून २०२६ या काळात स्वीकारले जातील. कथा पाठवण्याची अंतिम तारीख ७ जुलै २०२६ ही आहे.
- पारितोषिकप्राप्त कथा मार्मिक दिवाळी अंकापासून त्यानंतरच्या अंकात क्रमश: प्रसिद्ध केल्या जातील. सर्व कथांच्या वापराचे आणि पुन:प्रकाशनाचे सर्व हक्क ‘प्रबोधन गोरेगाव’ यांच्याकडे असतील.
- कथा स्पीडपोस्टने किंवा [email protected] या ईमेलवर पाठवता येतील. प्रत्यक्ष कार्यालयात येऊन दिलेल्या कथा स्वीकारल्या जाणार नाहीत.
- पोस्टाने कथा पाठवण्याचा पत्ता- मा. प्रमुख कार्यवाह, प्रबोधन गोरेगाव, प्रबोधन क्रीडाभवन, प्रबोधन क्रीडाभवन मार्ग, सिद्धार्थ नगर, गोरेगाव पश्चिम मुंबई ४००१०४.
- स्पर्धेसाठीचे प्रवेश अर्ज स्वतःचे नाव सांगून ७५०६७६०६७६ या क्रमांकावरून मागवता येतील. यासाठी दुपारी तीन ते पाच यावेळेतच संपर्क साधावा.
साहित्यसेवक वसंत तावडे यांच्याविषयी…
स्व. वसंत तावडे हे प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक धडाडीचे शिवसैनिक. अखेरच्या श्वासापर्यंत शिवसेना व स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधन गोरेगाव या तीन नावांनी झपाटलेला कार्यकर्ता. या संस्थेचा ते एक प्रमुख आधारस्तंभ होते. शिवसेनेच्या संपूर्ण इतिहासाची व कार्याची विविध वृत्तपत्रांत तसेच मासिकांत छापून आलेली कात्रणे जमा करण्याचा त्यांना छंद होता. त्यांच्याकडे ‘उत्तम वाचक आणि चांगला लेखक’ हे गुण असल्यामुळे त्यांनी ‘आपले वसंतश्री’ हा दिवाळी अंक प्रकाशित करण्याचा उपक्रम अनेक वर्षे सातत्याने व यशस्वीपणे चालविला. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्याने व्याकरणशुद्ध मराठी लेखनासाठी त्यांचा प्रचंड आग्रह होता.
१९७७ साली मुंबई उपनगर मराठी साहित्य संमेलन गोरेगाव येथे भरवण्यामध्ये स्व. वसंत तावडे यांचा सिंहाचा वाटा होता. मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव या संस्थेच्या कार्यात त्यांचा जवळचा संबंध होता. तसेच ज्या ठिकाणी मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जात असे त्या ठिकाणी ते आपल्या मित्रपारिवाराला आग्रहाने सोबत घेऊन जात असत.
‘प्रबोधन गोरेगाव’विषयी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारणाच्या विचारांच्या प्रेरणेतून सन १९७२ साली ज्येष्ठ शिवसेना नेते, माजी मंत्री सुभाष देसाई यांनी ‘प्रबोधन गोरेगाव’ या संस्थेची स्थापना केली. ज्ञान, कला, सेवा या त्रिसूत्रीला न्याय देत आज या संस्थेने गोरेगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील जनतेसाठी ‘प्रबोधन क्रीडाभवन’ हे क्रीडा संकुल, प्रबोधन डायलेसिस सेंटर, मीनाताई ठाकरे रक्तपेढी, प्रबोधनकार ठाकरे वाचनालय यासह अभ्यासिका, जॉगर्स पार्क, ओझोन जलतरण तलाव असे विविध समाजोपयोगी उपक्रम कार्यान्वित केले आहेत.
संस्थेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संस्थेने, ग्रामीण भागातील अपूर्ण शिक्षण झालेल्या गरीब मुलामुलींना रोजगार मिळावा यासाठी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य लाभावे या उद्देशाने रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात ‘एमजीएल- प्रबोधन कौशल्य निकेतन’ ही संस्था सन २०२२पासून सुरू केली. या संस्थेमध्ये नर्सिंग,आयटी, इलेक्ट्रिशियन, ए.सी. दुरुस्ती, गॅस पाईपिंग, ब्युटीशियन, शिवणकाम, मोबाईल दुरुस्ती यासारखे अभ्यासक्रम सुरू केले असून दरवर्षी साधारण ३२० विद्यार्थी प्रशिक्षित होत आहेत.

