
‘आयपीएल’चा १९वा हंगाम जसजसा विजेतेपदाच्या लढतीकडे वाटचाल करतो आहे, तसतशी ट्वेंटी-२० मधील या लीगच्या आणि भारतीय संघाच्या कर्णधारांवर कुर्हाड येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल, ऋतुराज गायकवाड यांना ‘आयपीएल’चे कर्णधारपद टिकवणे कठीण जाईल. तर सूर्यकुमार यादवचे भारतीय संघाचे नेतृत्वसुद्धा जाऊ शकते. कर्णधारांच्या कामगिरीचा हा आढावा.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)या ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेचे १९वे पर्व आता अस्ताकडे वाटचाल करू लागले आहे. एव्हाना काही बड्या संघांचे आव्हान संपुष्टात आले असून २४ मेपर्यंत बाद फेरीतले चार संघ निश्चित होतील. संघाच्या अपयशाला जबाबदार असलेली पहिली व्यक्ती म्हणजे कर्णधार आणि दुसरी व्यक्ती- मुख्य प्रशिक्षक. त्यामुळे पराभवाचे खापर संघनायकांवर फोडून त्यांच्या हकालपट्टीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबई इंडियन्सचा हार्दिक पंड्या, लखनऊ सुपर जायंट्सचा ऋषभ पंत, कोलकाता नाइट रायडर्सचा अजिंक्य रहाणे, दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल या चौघांचे कर्णधारपद जाण्याची दाट शक्यता आहे, तर चेन्नई सुपर किंग्जच्या ऋतुराज गायकवाडचे नेतृत्व डावावर आहे. याशिवाय ट्वेंटी-२० विश्वविजेता कप्तान सूर्यकुमार यादवचे भारतीय कर्णधारपद आणि पंतचे कसोटी उपकर्णधारपदही जाऊ शकते.
पाच वेळा आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सवर साखळीत गारद होण्याची नामुष्की ओढवली, हे तसे आश्चर्यकारक. रोहित शर्मा, सूर्यकुमार, जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंड्या असे भारतीय नेतृत्वाचा अनुभव असलेली चौकडी असतानाही नेमके काय चुकले? हार्दिकचे नेतृत्व हे अपयशाला कारणीभूत ठरते. त्याचे कर्णधारपद संघाची मोट बांधू शकले नाही. गुजरात टायटन्समध्ये त्याचे छान चालले होते. पण रोहित निवृत्तीकडे जात असल्याने भावी कर्णधाराला तोवर स्थिरावता येईल, या उद्देशाने मुंबई इंडियन्सने आखलेली रणनीती त्यांच्यावरच उलटली. त्यामुळे दुखापतीचे कारण दाखवत रोहित गेल्या काही सामन्यांत खेळला नाही किंवा त्याला खेळवले गेले नाही.

हार्दिकचे अष्टपैलूत्वही यंदाच्या हंगामात कुठेही दिसले नाही. तो जे आठ सामने खेळला, त्यात २०.८६च्या सरासरीने १४६ धावा काढल्या आणि जेमतेम ४ विकेट्स घेतल्या. यात एकही अर्धशतक त्याच्या खात्यावर नाही. हे त्याच्या दर्जाला साजेसे मुळीच नाही. मुंबई इंडियन्सने या वर्षी तब्बल २४ खेळाडूंना आजमावले, यावरही टीका होते आहे. त्यामुळे हार्दिकचे स्थान धोक्यात आहे आणि त्याने अन्य संघात जाणे, हेच त्याच्या आणि मुंबई इंडियन्सच्या भल्याचे आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार आणि बुमरा असे दोन कर्णधार आजमावले. याशिवाय सर्वोत्तम कामगिरी करणारा रियान रिकल्टन, क्विंटन डीकॉक, शार्दुल ठाकूर, तिलक वर्मा असेही काही पर्याय कर्णधारपदासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे आयपीएलच्या २०व्या हंगामापूर्वी, येत्या वर्षभरात मुंबई इंडियन्सला नवनेतृत्वाचा गांभीर्याने विचार करावा लागेल.

लखनऊच्या पंतने संघाची घोर निराशा केली. पंतला या संघाने २७ कोटी रुपयांची बोली लावत लिलावात खरेदी केले होते. ही महागडी बोली आयपीएलच्या इतिहासात विक्रमी ठरली. गतवर्षीचा हंगाम सुरू होण्याआधी पंतकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. पण गेल्या दोन्ही हंगामात संघाची कामगिरी अत्यंत वाईट ठरली. गेल्या हंगामात सातव्या क्रमांकावरील हा संघ यंदाच्या हंगामात तळाच्या क्रमांकावर गटांगळ्या खातो आहे. १२ सामन्यांत एक अर्धशतकासह १३८च्या स्ट्राइक रेटने २५१ धावा. त्याने खेचले एकंदर नऊ षटकार. जे आधुनिक क्रिकेटमध्ये फलंदाज एका सामन्यात मारतो. ही त्याची फलंदाजीतली कामगिरी त्याच्याकडून असलेल्या अपेक्षांना अजिबात न्याय देत नाही. त्याचे फलंदाजीतले मुक्तछंदातले सौंदर्य हरवले आहे. तसेच संघबांधणीचे काही निर्णयसुद्धा पूर्णपणे चुकल्याचे दिसून येते. मुश्ताक अली ट्वेंटी-२० स्पर्धेत १३४ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करणार्या अर्शिन कुलकर्णीला सलामीला पाठवण्याचा धाडसी निर्णय फसला. त्याने २४ चेंडूंत फक्त १७ धावा काढल्या. याचप्रमाणे हिंमत सिंगच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १३० चा स्ट्राइक रेट जेमतेम राखणार्या हिंमतला ६ सामन्यांत संधी मिळाली. यात त्याने केवळ ९२ धावा काढल्या. तसेच आयुष बडोनीला वरच्या क्रमांकांवर फलंदाजीसाठी पाठवण्याचा प्रयोग वारंवार का करण्यात आला? जो या अपेक्षांची पूर्ती करू शकला नाही. एडन मार्करम आणि निकोलस पूरन हे भरवशाचे तारे दर्जाला साजेशी कामगिरी दाखवू शकले नाहीत. पण पंतगिरी अपयशी हेच लखनऊच्या अपयशाचे प्रमुख कारण ठरते. परिणामी पंत भारतीय संघाचे उपकर्णधारपदही गमावण्याचीही चिन्हे आहेत.
दिल्ली कॅपिटल्सची यंदाच्या ‘आयपीएल’मधील कामगिरीसुद्धा फारशी समाधानकारक नव्हती. अक्षरला कर्णधार आणि खेळाडू या दोन्ही आघाड्यांवर अपयश आले. त्याने १३ सामन्यांत १२५.२३च्या स्ट्राइक रेटने फक्त १३४ धावा काढल्या. यात फक्त एक अर्धशतक. तर गोलंदाजीत ८.०५च्या इकॉनॉमीने १० विकेट्स. सहकारी फिरकीपटू कुलदीप यादवही महागडा ठरला असताना अक्षरचा इकॉनॉमी रेट समाधानकारक दिसतो. पण अनेकदा अक्षरने स्वतःकडून Dापेक्षेपेक्षा कमी गोलंदाजी करून घेतली. आक्रमक फलंदाज अभिषेक पोरेलला डावलण्याचा निर्णय, माधव तिवारीसारख्या अष्टपैलू खेळाडूचा सातत्याने वापर न करणे, आणि लयीत नसलेल्या युवा साहिल परखला वैभव सूर्यवंशीसारखी कामगिरी करण्याची अपेक्षा ठेवत थेट कठीण परिस्थितीत उतरवणे, हे निर्णय आश्चर्यकारक वाटतात. साहिलकडे गुणवत्ता आहे, पण त्याच्यावर आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. २०२७मध्ये महालिलाव होईल. त्यात कदाचित अक्षर संघातले स्थान टिकवेलही; पण त्याआधी कर्णधारपद गमावण्याची चिन्हे आहेत.
कोलकाता नाइट रायडर्सचे अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व सोपवले गेले; कारण कर्णधारपदासाठी अन्य पर्याय संघात उपलब्ध नव्हता. दुसरे कारण म्हणजे त्याचा मुंबईकर संघ सहकारी अभिषेक नायर मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. लीगच्या मध्यापर्यंत नित्याने हरणारा हा संघ नंतर अनपेक्षितपणे जिंकू लागला. कामगिरीचा हा चढ-उतार दोन टोकांचा. रहाणेच्या खात्यावर १२ सामन्यांत २२.८२च्या सरासरीने आणि १३०.७३च्या स्ट्राइक रेटने २५१ धावा आहेत. फिन अॅलन, कॅमेरून ग्रीनला उशिराने सूर गवसला. तिसर्या क्रमांकावर उतरणार्या अंगक्रिश रघुवंशीचा सुरुवातीच्या सामन्यांतला स्ट्राइक रेट झगडणारा होता. रहाणेने केलेली काही वक्तव्येसुद्धा वादग्रस्त ठरली. त्यामुळे ३७ वर्षीय रहाणेचे कर्णधारपद तर जाईलच. सुरुवातीला सातत्याने हरणारा संघ, नंतर अचानक जिंकू लागला हे जरी सत्य असले तरी अजिंक्यने संघातले स्थान टिकवले तरी उत्तम ठरेल.
महेंद्रसिंह धोनीच्या प्रतीक्षेत चेन्नई सुपर किंग्जचा हंगाम संपत आला. धोनीशिवाय संघबांधणी करण्याचे चेन्नईचे उद्दिष्ट प्रारंभीच्या टप्प्यात सपशेल अपयशी ठरले. पण नंतर संघ कमालीचा सावरला. लाडक्या ‘थाला’ची जागा ‘चेट्टा’ने म्हणजे संजू सॅमसनने घेतली. कर्णधार ऋतुराज गायकवाड लीगच्या अर्ध्यापर्यंत संघर्ष करीत होता. त्याचा स्ट्राइक रेटही निराशाजनक होता. पण उत्तरार्धातील सामन्यांत त्याने उत्तम धावा केल्या. पण ऋतुराजचे नेतृत्व चेन्नईच्या दर्जाला साजेसे झाले नाही. परिणामी पुढील वर्षी संजूकडे कर्णधारपद गेल्यास आश्चर्य वाटू नये.
दोन महिन्यांपूर्वी भारताचे ट्वेंटी-२० विश्वविजेतेपद टिकवणारा संघनायक सूर्यकुमार यादव याची मुंबई इंडियन्सचा प्रभारी कर्णधार म्हणून कामगिरी संमिश्र स्वरूपाची राहिली. त्याने ११ सामन्यांत १७.७३च्या सरासरीने १४४.४४च्या स्ट्राइक रेटने फक्त १९५ धावा काढल्या. यात एकमेव अर्धशतक आणि ५ षटकार हे सूर्याच्या ‘मिस्टर ३६०’ या बिरुदाला मुळीच साजेसे नाही. त्यामुळेच हार्दिकला मुंबईच्या कर्णधारपदावरून हटवल्यास सूर्या हा खंबीर पर्याय ठरू शकत नाही. त्याचप्रमाणे भारतीय ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद आणि स्थानही तो गमावण्याची दाट शक्यता आहे.
तूर्तास, १९वा हंगाम संपत आला आहे. २४ मेपर्यंत बाद फेरीचे ४ संघ ठरतील आणि ६ संघ घरचा रस्ता धरतील. मग संघांच्या कामगिरीचे शवविच्छेदन होईल आणि कर्णधार, खेळाडू यांच्या हकालपट्टीrला सुरुवात होईल. पंत, अक्षर, ऋतुराज, सूर्या किमान खेळाडू म्हणून लीगमध्ये टिकाव धरतील; पण रहाणेबाबत प्रश्न निर्माण होईल. पण शुभमन गिल, ईशान किशन (प्रभारी), रजत पाटीदार, रियान पराग यांनी कर्णधाराच्या भूमिकेतून छाप पाडल्याचे पाहायला मिळाले. श्रेयस अय्यरचा पंजाब संघ प्रारंभीच्या आठ सामन्यांत अपराजित राहून गुणतालिकेत अग्रस्थानी होता. पण नंतर सलग सहा सामन्यांत पराभवांमुळे त्यांना प्ले-ऑफ्स गाठणेही कठीण झाले आहे. पण तरीही श्रेयसचे गेल्या काही हंगामांत यशस्वी झालेले नेतृत्वगुण पाहता तो भारतीय क्रिकेटसाठी कर्णधारपदाचा उत्तम पर्याय ठरू शकतो. चला, आता उत्तरार्धातल्या रंगतदार सामन्यांचा आस्वाद घेऊया!

