• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

डुप्लिकेट की

इन्स्पेक्टर प्रधान पंचनामा (भाग १)

marmik by marmik
May 26, 2026
in पंचनामा
0
डुप्लिकेट की

साळवी यांनी मुंबईत गेल्या तीन महिन्यांत चोरीला गेलेल्या गाड्यांचे डिटेल्स मागविले. त्यांचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट लक्षात आली की ३५ चोर्‍यांपैकी १२ चोर्‍यांमध्ये गाडी चोरताना काच फुटली नाही, अलार्म वाजला नाही. चोरीची मोडस ऑपरंडी म्हणजे गुन्हेपद्धती एकच आहे.

त्यादिवशी सकाळी आठ वाजता अंधेरी पश्चिमेकडील ‘रॉयल हाईट्स’ या आलिशान इमारतीच्या खाली पार्किंगमध्ये जेव्हा राजेश मेहता ऑफिसला जाण्यासाठी खाली आले, तेव्हा त्यांना पांढर्‍या रंगाची टोयोटा फॉर्च्युनर ही त्यांची महागडी गाडी दिसेच ना! त्यांनी वॉचमनला विचारले. त्याने सांगितले की पहाटेच्या सुमारास तुमची गाडी वेगाने बाहेर पडली. मला वाटले की तुम्हीच कुठे तरी बाहेर चालले असाल, मी तर गाडीला जाताना सॅल्यूट केला. मला काय माहिती की गाडीत तुम्ही नाही, कोणी चोर बसला होता. मेहता यांनी जमतील तशा
वॉचमनला शिव्या घातल्या.

मग ते शांतपणे विचार करू लागले. त्यांच्या गाडीत अलार्म सिस्टिम होती. चोरट्याने काच फोडली असती तर अलार्म वाजला पाहिजे होता. गाडीच्या पार्किंगच्या जागेवर फुटलेल्या काचा दिसायला हव्या होत्या. पण तसे काही घडल्याचे दिसत नव्हते. मग त्यांनी सोसायटी
ऑफिसात जाऊन इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये दिसले की पहाटे ३:२०ला एका मास्क घातलेल्या व्यक्तीने डुप्लिकेट चावी लावून अगदी सहजपणे गाडी सुरू केली आणि तो आरामात निघून गेला.

मेहता यांना काहीच सुचत नव्हते. त्यांनी सर्व रेकॉर्डिंग आपल्या मोबाईलमध्ये घेतले आणि धावत पळत ते जोशी मार्ग पोलीस स्टेशनला पोहोचले. तिथे सकाळचा नुकताच चार्ज घेतलेला हवालदार बसलेले होते. मेहता यांनी त्यांना सांगितले की माझी कार बिल्डिंगच्या पार्किंगमधून चोरी झाली आहे. त्यावर हवालदार शिंदे त्यांना म्हणाला की, नीट आठवा. काल रात्री पिऊन तुम्ही कुठेतरी विसरून आला असाल. हे ऐकताच मेहता यांना राग आला. ते शिंदेंना म्हणाले, ’साहेब काय बोलता आहात? मी जैन माणूस आहे, दारूला हात लावत नाही.’ केबिनमध्ये बसलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळवी यांनी त्यांचा वाद ऐकला आणि काय गडबड आहे म्हणून शिंदे यांना आत बोलावले. त्यावेळी मेहता देखील त्यांच्यामागे आत गेले. मेहता यांनी साळवींना गाडीचोरीची तक्रार सांगितली आणि आपल्याकडील व्हिडिओ फुटेज देखील दाखवले.

साळवींनी तात्काळ गुन्हा नोंद करून तपास स्वतः कडे घेऊन डी.बी. पथकाला मदतीला घेतले आणि तपासाची चक्रे फिरवली. त्यांनी स्वतः पथकासोबत जाऊन इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. चोरट्याकडे डुप्लिकेट चावी असणे साळवींच्या अनुभवी नजरेला लगेच खटकले— गाडी चोरणार्‍याकडे एक तर गाडीची ओरिजनल चावी असायला पाहिजे किंवा त्याची कॉपी असायला पाहिजे. या दोन्ही गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला शक्य नाहीत. त्यांनी मेहतांना विचारले, ‘तुमची गाडी अलीकडे कोणाला दिली होती का?’ मेहता म्हणाले, नाही. आता साळवी यांचा संशय मेहता, त्यांचे कुटुंबीय आणि बिल्डिंगमधील वॉचमन, माळी यांच्यावर गेला. त्यांनी साखळीतली प्रत्येक कडी वेगवेगळी तपासायची ठरवली. दोन दोन कर्मचार्‍यांचे पथक तयार करून त्यांना या सगळ्यांकडे तपास करून रिपोर्ट करायला सांगितले. सर्व पथकांनी कसून माहिती घेतली पण काहीही क्ल्यू मिळाला नाही. या सगळ्यात एक महिना झाला तरी गाडी सापडत नव्हती आणि चोराची माहितीही मिळत नव्हती. डी. बी. पथकाने क्राईम ब्रँचच्या अभिलेखावरील सर्व गुन्हेगारांची माहिती घेतली, परंतु काहीही उपयुक्त माहिती मिळाली नाही.

साळवी यांच्या लक्षात आले की एकतर चोर तरी हुशार आहे, नाही तर आपला तपास चुकीच्या दिशेने चालला आहे हे नक्की. त्यांनी मुंबईत गेल्या तीन महिन्यांत चोरीला गेलेल्या गाड्यांचे डिटेल्स मागविले. त्यांचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट लक्षात आली की ३५ चोर्‍यांपैकी १२ चोर्‍यांमध्ये गाडी चोरताना काच फुटली नाही, अलार्म वाजला नाही. चोरीची मोडस ऑपरंडी म्हणजे गुन्हेपद्धती एकच आहे. त्यांनी लगेच त्या १२ केसेस वेगळ्या केल्या आणि त्यावरच लक्ष केंद्रित करायचे ठरविले. त्यांनी पूर्ण अभ्यास केल्यावर लक्षात आले की सर्व ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा चोर एकच आहे. मग त्यांच्या लक्षात आलं की चोरीची ठिकाणे वेगवेगळी आहेत, गाड्या वेगवेगळ्या मॉडेलच्या आहेत पण कंपनी एकच आहे… टोयोटा! हा निव्वळ योगायोग नसणार, काहीतरी लिंक असणार. याचा तपास करायचे त्यांनी ठरविले.

साळवींनी चोरीला गेलेल्या सर्व कारचे शोरूममधील रेकॉर्ड चेक केले तेव्हा कळलं की या सर्व गाड्या याच शोरूममध्ये सर्व्हिसिंगसाठी येत होत्या. सर्व्हिसिंग करणार्‍या प्रत्येक कामगाराला स्वतः समोर बसवून साळवींनी तपास केला. परंतु त्यातूनही काहीच उपयुक्त माहिती मिळाली नाही. सर्व कामगारांना १० मिनिटांचा ब्रेक देऊन पुन्हा बोलावले होते. साळवींनी राक्षे या कर्मचार्‍याला सांगितलं की या सर्व कामगारांना पोलीस स्टेशनसमोरच्या टपरीवर चहाला घेऊन जा. ते सर्व कामगार चहा पीत असताना चेंबरच्या खिडकीतून साळवी त्यांच्याकडे पाहत होते. त्यांची नजर एका कामगारावर खिळली होती. तो फोनवर बोलत होता. त्याच्या हातातला फोन महागड्या कंपनीचा दिसत होता. त्याच्या गळ्यात सोन्याची चेन होती. पेहरावावरून तो श्रीमंत वाटत होता. कदाचित शोरूम मालकाचा मुलगा किंवा मॅनेजर असावा असे वाटले.

काही वेळात राक्षे कामगारांना आत घेऊन आले. त्यावेळी साळवी यांनी राक्षे यांना विचारले, मॅनेजरही सोबत आले आहेत हे मला सांगितले नाही. मॅनेजर आलेले नाहीत, असं एक कामगार म्हणाला. साळवींनी विचारलं, ’मग तो निळा शर्ट घातलेला माणूस कोण आहे? कामगार म्हणाला, ‘तो तर आमच्या सर्व्हिसिंग सेन्टरमध्ये पिक अप अँड ड्राइव्हचे काम करणारा रफीक आहे.’ साळवी आश्चर्याने म्हणाले, ’त्याचा थाट बघून हा कामगार वाटत नाही.’ कामगार म्हणाला,’तो दिल्ली साइडचा आहे. गावी भरपूर शेती आणि श्रीमंती आहे, पण आईवडिलांशी पटत नाही म्हणून इथे येऊन नोकरी करतो आहे. त्याला दहा हजार रुपये पगार आहे. त्याला पगाराचे काही नाही.’
सर्व कामगार निघून गेल्यानंतरही साळवींच्या डोक्यातून रफीकचा विचार जात नव्हता. गावी इतकी श्रीमंती असलेला रफीक दहा हजाराची का नोकरी करत असेल? तो नक्की खरे बोलतो आहे का? तो दिल्ली सोडून इथे आलेला आहे. एखाद्या गुन्हा तर करून इथे आलेला नाही ना? काहीतरी चुकत आहे, असे त्यांच्यातला पोलीस अधिकारी त्यांना सांगत होता. साळवी यांनी त्याची चौकशी करण्याचे ठरविले. त्यांनी राक्षेंना रफीकवर २४ तास पाळत ठेऊन दोन दिवसांत रिपोर्ट करायला सांगितले.

दोन दिवसांनी सकाळी राक्षे इन्स्पेक्टर साळवींची वाट पाहत होते. साळवी पोलीस ठाण्यात येताच राक्षे त्यांच्या चेंबरमध्ये आले. त्यांनी रफीकची सगळी माहिती काढली होती. रफीक मूळचा एका गरीब कुटुंबातला. पण काही दिवसांपासून त्याच्या राहणीमानात मोठा बदल झाला होता. तो झोपडपट्टीत राहायचा, तिथून तो आता मुंबईत एका भाड्याच्या चांगल्या खोलीत राहायला गेला होता. १० हजार रुपये पगार असलेला रफीक रोज रात्री डान्स बारमध्ये हजारो रुपये उडवतो. बारमध्ये नाचणार्‍या एका मुलीशी त्याचं लफडे आहे. तिच्यावर तो खूप पैसे खर्च करत असतो. आपण मूळचे श्रीमंत आहोत आणि घरातून निघून आल्याचा बनाव त्याने रचला आहे, अशी माहिती राक्षेंनी साळवींना दिली.

साळवींची शंका खरी ठरताना दिसत होती. त्यांनी घाई न करता पूर्ण माहिती काढूनच पुढील कारवाई करायचे ठरविले. रफीकने शोरूममध्ये नोकरी मिळविण्यासाठी दिलेली गावाची माहिती खोटी होती. तो राहत असलेल्या भागात गोपनीयरित्या खबर्‍याकडून माहिती काढली, तेव्हा कळले की त्याला रोज रात्री काही गुन्हेगारांसारखे दिसणारे लोक भेटायला येतात. आताच जर रफीकला उचलले तर बाकीचे त्याचे साथीदार पळून जातील, म्हणून रफीकच्या ‘पाहुण्यां’ना रेड हँड पकडू या, असे साळवींनी ठरवले. त्यासाठी रफीक राहत असलेल्या भागात डीबीची टीम आणि खबरी यांचा विजिलन्स ठेवला.

तीन दिवसांनी रात्री साडेअकराच्या सुमारास अंधेरीच्या त्या अरुंद गल्लीमध्ये अंधार आणि शांतता पसरली होती. फक्त अधूनमधून एखादा कुत्रा भुंकत होता आणि दूरवरून लोकल ट्रेनचा आवाज येत होता. रफीकचं घर असलेल्या जुन्या चाळीच्या आसपास पोलिसांनी अदृश्य जाळं विणलं होतं. इन्स्पेक्टर साळवी यांच्याकडे संपूर्ण ऑपरेशनची सूत्रे होती. कोणी पानटपरीवाला बनून उभा होता, कोणी रिक्षा ड्रायव्हरच्या वेशात बसला होता, तर काहीजण अंधारात उभ्या असलेल्या बंद दुकानांच्या आडोशाला दबा धरून होते. राक्षे आणि त्यांच्याबरोबर आणखी दोघेजण समोरच्या इमारतीच्या टेरेसवरून दुर्बिणीतून लक्ष ठेवून होते.

काही वेळाने साळवी यांनी वायरलेसवर हळू आवाजात सांगितले—‘सगळे सावध राहा…’ रात्री बारा वाजले… एक वाजला… पण काहीच हालचाल नव्हती. अचानक राक्षेचा कुजबुजणारा आवाज वायरलेसवर आला— ‘सर…काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गल्लीत शिरली आहे.’ साळवी लगेच सावध झाले. स्कॉर्पिओ हळूहळू रफीकच्या चाळीजवळ येऊन थांबली. गाडीचे दिवे बंद झाले. आतून दोन माणसं उतरली. दोघांनीही कॅप आणि मास्क घातले होते. त्यातील एकाने सिगारेट पेटवली. क्षणभर लायटरच्या उजेडात त्याचा चेहरा दिसला…
राक्षे कुजबुजले— ‘सर… पकडायचं का?’

साळवींनी वेट अँड वॉच सांगितले. त्यामुळे राक्षेंनी काही हालचाल केली नाही. तेवढ्यात रफीक चाळीतून खाली उतरून आला. त्याच्या हातात एक छोटा काळा पाऊच होता. तो घाबरलेला दिसत होता. आजूबाजूला वारंवार नजर फिरवत होता. रफीकने पाऊच त्या माणसाच्या हातात दिला.

साळवींनी वायरलेसवर आदेश दिला, ‘सगळे तयार… कोणीही पळता कामा नये…गो!’ क्षणात अंधार फाडत पोलिसांची टीम चारही बाजूंनी धावत आली. ‘पोलीस! कुणी हलायचा प्रयत्न करू नका!’
एकदम गोंधळ उडाला. आलेले संशयित दचकले, पण पुढच्याच सेकंदाला विजेच्या वेगाने पळू लागले. रफीक जागेवरच थरथरत उभा राहिला.

‘पकडा साल्याला!’ राक्षे ओरडले.

संशयितांमधील म्होरक्या पळत पळत मुख्य रस्त्याकडे निघाला. त्याने धावताना कमरेतून पिस्तूल काढले आणि मागे वळून गोळी झाडली.

धाड!!!

गोळी एका भिंतीवर जाऊन आदळली. लोक घाबरून किंचाळले. गल्लीत गोंधळ उडाला. साळवी मात्र न घाबरता त्याच्या मागे धावत होते.

‘थांब! नाहीतर एन्काउंटर होईल!’ साळवी गर्जले.

पण तो थांबणार्‍यांपैकी नव्हता. तो मुख्य रस्त्यावर आला आणि एका बाईकवाल्याला ढकलून त्याची बाईक हिसकावण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात साळवींनी धावत जाऊन त्याच्यावर झडप घातली. दोघेही रस्त्यावर जोरात आपटले. त्याने पुन्हा पळण्याचा प्रयत्न केला.

पण राक्षे आणि इतर पोलिसांनी त्याला जमिनीवर दाबून बेड्या ठोकल्या.
दुसरीकडे, गल्लीमध्ये दुसर्‍या आरोपीलाही पोलिसांनी पकडले होते. रफीक मात्र भीतीने थरथरत भिंतीला टेकून बसला होता. त्याच्या डोळ्यांत पश्चात्ताप स्पष्ट दिसत होता.

रफीकला अटक केले तेव्हा पहाटेचे जवळपास चार वाजले होते. मुंबईच्या आकाशात फिकट उजेड पसरायला सुरुवात झाली होती. पण जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये मात्र अजूनही तपासाची धामधूम सुरू होती. इन्स्पेक्टर विजय साळवी यांनी टेबलवर हात आपटला. ‘राक्षे! वेळ घालवायची नाही. लगेच रफीकच्या खोलीची झडती घ्या. हा मुलगा वरून भोळा दिसतोय, पण खेळ मोठा आहे.’

दोन पंच, फॉरेन्सिक टीम आणि डीबी पथकासोबत पोलीस रफीक राहत असलेल्या भाड्याच्या खोलीवर पोहोचले. ती खोली बाहेरून साधी दिसत होती, पण आत मात्र वेगळीच दुनिया होती. महागडे कपडे, ब्रँडेड शूज, परफ्यूम, दारूच्या बाटल्या… दहा हजार रु. पगाराच्या मुलाच्या खोलीत हे सगळं! रफीकला खोलीत आणण्यात आलं. साळवी शांतपणे म्हणाले—‘चल… आता नीट सांग. नक्की काय प्रकार आहे?’ रफीक निर्विकार चेहर्‍याने म्हणाला— ‘साहेब, मी काहीच केलं नाही. मदन काय करतो मला माहित नाही.’ साळवी फक्त हसले. ‘ठीक आहे. आम्ही शोधतो.’

झडती सुरू झाली. कपाटं उघडली गेली. बेड फाडून पाहिला गेला. बॅगा तपासल्या गेल्या. पण काही मोठं सापडत नव्हतं. तेवढ्यात एका कॉन्स्टेबलने किचनमधल्या वरच्या कप्प्यातून एक प्लास्टिकची पिशवी खाली काढली. ‘सर, हे बघा.’ पिशवीत अनेक छोटे साबणाचे बॉक्स होते. राक्षेंनी एक बॉक्स उघडला आत अर्धवट वापरलेला साबण होता आणि त्यावर कुठल्यातरी चावीचा स्पष्ट ठसा उमटलेला होता. ‘ही काय भानगड आहे?’ ते चकित होऊन म्हणाला. दुसरा बॉक्स उघडला… त्यातही तसाच ठसा. तिसरा, चौथा, पाचवा सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या चाव्यांचे ठसे! एका दुसर्‍या पिशवीत तर विविध कंपन्यांच्या कारच्या चाव्यांचा गठ्ठाच सापडला. क्षणभर खोलीत शांतता पसरली. राक्षे गोंधळून म्हणाले, ‘सर… हा साबणात चाव्या का दाबून ठेवतोय?’
साळवींचे डोळे विस्फारले. त्यांच्या अनुभवी डोक्यात वीज चमकली.
ते हळू आवाजात म्हणाले, ‘डुप्लिकेट चावी बनवायला…’
सगळ्यांना पराकोटीचा आश्चर्याचा धक्का बसला.
साळवी पुढे म्हणाले, ‘ओरिजनल चावी साबणावर दाबायची… ठसा तयार होतो… आणि त्यावरून डुप्लिकेट की करायची… हरामखोर फार मोठा खेळ खेळत होता.’
रफीकचा चेहरा फट्टक पडला. पण तरीही तो तोंड उघडत नव्हता. त्याचं एकच रडगाणं चालू होतं, ‘साहेब… मला काही माहित नाही… हे सगळं मदनचं आहे…’
(हा मदन कोण होता आणि खरा गुन्हेगार तो होता की रफीक की आणखी वेगळंच कोणी?… हे पुढच्या भागात पाहू या.)

Previous Post

गंध कर्पुराचा, मोकळ्या श्वासाचा…

Next Post

अंबिका सँडविच

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.