कोरोनाकाळात मुंबईची जीवनवाहिनी लोकल बंद असल्यापासून स्वतःचा जीव धोक्यात घालून मुंबईकरांना परिवहन, विद्युत सेवा देताना ‘बेस्ट’ उपक्रमातील लागण झालेल्या तब्बल 95 टक्के कर्मचाऱयांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. गेल्या 9 महिन्यांपासून बेस्टमधील हजारो कर्मचारी खबरदारी, काळजी घेऊन मुंबईकरांना सेवा देत आहे.
कोरोनामुळे 23 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठी ‘बेस्ट’ची सेवा पहिल्या दिवसापासून सुरू होती. यामध्ये सुरुवातीच्या काळात कोरोनाचा कहर असतानाही आवश्यक खबरदारी, नियम पाळून मुंबईकरांसाठी बेस्ट धावत होती. मात्र ही सेवा देताना ‘बेस्ट’च्या शेकडो कर्मचाऱयांनाही कोरानाची लागण झाली. मात्र बेस्ट प्रशासनाने परिवहन आणि विद्युत अशा दोन्ही सेवा अविरतपणे सुरू ठेवल्या. सद्यस्थितीत ‘बेस्ट’मधील 50 पैकी 40 कर्मचाऱयांना सौम्य व अतिसौम्य लक्षणे आहेत. तर यातील दहा जणांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत आहे. तर 48 कर्मचारी संशयित असल्याने त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
आतापर्यंत 2835 जणांना लागण
परिवहन आणि विद्युत सेवा पुरविणाऱया ‘बेस्ट’ कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली. आतापर्यंत बेस्टमधील कोरोराची लागण झालेल्या 2 हजार 835 कर्मचाऱयांपैकी 2 हजार 690 जणांची कोरोनावर मात केली आहे. 95 टक्के कर्मचाऱयांनी कोरोनावर मात केली आहे, तर 52 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सौजन्य- सामना