एक ऑक्टोबर १९६१ रोजी मार्मिकच्या मुखपृष्ठावर झळकलेले हे व्यंगचित्र पाहिल्यानंतर लगेच त्याचा आजचा संदर्भ लक्षात येतो. बर्याच काळात मुंबई रिक्षा-टॅक्सीचा संप झालेला नाही. हे मुखपृष्ठ बाळासाहेबांच्या कुंचल्यातून साकारलं, त्या काळात मुंबईत संपसम्राट आणि बंदसम्राट सोकावून बसलेले होते. त्यांच्या मागण्या असायच्या सरकारकडे. पण, सरकार त्यांना हिंग लावून विचारत नाही, म्हटल्यावर या वाहनचालकांच्या संघटनांचे नेते संप पुकारून मोकळे व्हायचे. म्हणजे अडचण सामान्य माणसाची करायची. त्याचे हाल करायचे. यांचं नाक दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडणार नाही आणि त्यातून आपल्या मागण्या मंजूर केल्याची घोषणा होणार नाही, हे त्यांना माहिती असायचं. बहुतेक वेळा ही मागणी भाडेवाढीची असायची. बाळासाहेबांनी या अप्रतिम व्यंगचित्रात टॅक्सीचा वेग, वाहनचालकाचा उद्दामपणा आणि सर्वसामान्य मुंबईकरांची उडालेली त्रेधातिरपीट हे सगळं कसं जिवंत केलंय ते अभ्यासणं हा व्यंगचित्रकारांसाठी एक अभ्यासाचाच विषय ठरेल. टॅक्सीचा संप झाला की टॅक्सी एका जागी स्थिर होते. बाळासाहेबांनी संप हेच रॅश ड्रायव्हिंग अशी कल्पनाच उलटी फिरवण्याचा मास्टरस्ट्रोक मारलेला आहे… आजच्या काळात मात्र मराठी भाषा बोलणार नाही, हा उद्दामपणा महाराष्ट्राच्या राजधानीत करण्यासाठी योजलेला संप रॅश ड्रायव्हिंगने मराठी माणसाला नव्हे, तर महाराष्ट्राच्या भाषिक अस्मितेलाच उखडून टाकायला निघाला आहे. मराठी माणूस नेहमीसारखी फक्त त्रेधा तिरपीट करून घेणार का?
