१ मे हा महाराष्ट्र दिन. केंद्र सरकारशी मोठा संघर्ष करून, शंभराहून अधिक हुतात्म्यांचे बलिदान देऊन मराठीजनांनी महाराष्ट्र मिळवला, तो हा दिवस. या वर्षी, या दिवशी सगळीकडे महाराष्ट्राच्या परंपरेचं, इतिहासाचं दर्शन घडवणारे अनेक कार्यक्रम होतील, महाराष्ट्र गीते वाजतील…मात्र याच दिवशी महाराष्ट्र दिनाला बट्टा लावणारी एक घटना महाराष्ट्राच्या राजधानीत घडेल… (कामगार नेते शशांक राव यांचा मनसुबा काही कारणाने बदलला नाही तर) महाराष्ट्रात राहू, महाराष्ट्राचे खाऊ, पण मराठी बोलणार नाही, त्यासाठी संपावर जाऊ, असा मुंबईतील रिक्षा-टॅक्सीचालकांचा निर्धार त्या दिवशी व्यक्त होईल आणि ४ मे या तारखेपासून मराठी सक्तीविरोधी संप सुरू होईल.
हे शशांक राव मुंबईत, राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाचे आहेत, हा काही योगायोग नाही. अलीकडे महाराष्ट्राच्या अस्मिताबिंदूंच्या मानहननाची जी काही गलिच्छ गटारे इथे वाहतात, त्यांच्या उगमस्थानी कमळाखालचा चिखलच असतो. हे शशांक राव म्हणजे कामगार युनियन क्षेत्रातल्या घराणेशाहीतले एक उत्तराधिकारी. यांचे वडील शरद राव हे जॉर्ज फर्नांडिस यांचे पट्टशिष्य. ते मुंबईत आले कर्नाटकातल्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातून. त्यांच्या मूळ राज्यात कुणी कन्नड ही राज्यभाषा बोलणार नाही, असा बाणा दाखवायला गेलं, तर त्याची खेटराने पूजा होईल. आणि हे इथे मात्र मराठी न बोलण्याचा उद्दामपणा करणार्यांना फूस देणार! शरद राव हे ज्या समाजवादी चळवळीतून आले, त्या चळवळीच्या काही धुरीणांचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोठा सहभाग होता. त्या चळवळीच्या पोटी ही असली महाराष्ट्रद्रोही फळे यावीत?
अर्थात, सत्तेत भागीदार असलेल्या शहासेनेला अचानक मराठीचा पुळका यावा आणि कमळाबाईने लगेच त्याविरोधात पदर खोचावा, या रोमहर्षक वगनाट्याची संहिता कोणी आणि का लिहिली असेल, ते ओळखणं कठीण नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राज आणि उद्धव ठाकरे हे बंधू मनभेद विसरून एकत्र आले, एकत्र लढले आणि त्यांना मराठी माणसांची भक्कम साथ लाभली, हे पाहिल्यावर ज्यांचे धाबे दणाणले, त्यांनी आता ठाकरे बंधूंचा मुद्दाच आपण पळवू, असा बालिश आणि पोरकट विचार करून ही नूरा कुस्ती लावलेली दिसते. नाही तर महाराष्ट्रातल्या मंचावरून ‘जय गुजरात’चा नारा देणारे मिंधे आणि मिरा-भाईंदरमध्ये आलो की मला हिंदीतच बोलावं लागतं हो, अशी लाचार पोपटपंची करणारे त्यांचे शिलेदार अचानक मराठी सक्तीच्या मुद्द्यावर आक्रमक झाले नसते.
महाराष्ट्रात मराठी बोललीच पाहिजे, हा मुद्दा चर्चेत आला की शिवसेना, तो कोणी, कोणत्या राजकारणासाठी चर्चेत आणला आहे, हे पाहात नाही- ती आपली भूमिका आहे, असं मानून त्याला पाठिंबा देते. तेच यावेळीही शिवसेनेने केलेलं आहे. पण, सत्तेत बसलेली ही नाटक मंडळी खरोखरच मराठी भाषेच्या किंवा महाराष्ट्राच्या भल्याच्या पोटतिडकीने हे करत असतील का आणि हा विषय हे धसास नेतील का, या बाबतीत मात्र कोणाही सुज्ञ मराठी माणसाच्या मनात कायम शंकाच राहील. ज्यांनी मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी उभा राहिलेला मातृपक्ष तुरुंगात जाण्याच्या भीतीने फोडला आणि चिन्ह, नाव यांच्याबरोबरच बापही पळवण्याचा प्रयत्न केला, त्या, गद्दारांच्या टोळीने मायमराठीच्या आणाभाका घ्याव्यात, यावर कोण विश्वास ठेवणार?
मराठी माणसाची, मराठी भाषेची आता अचानक झालेली आठवण खरी असती तर यांना सत्तेतला मोठा भाऊ रोज कशी महाराष्ट्राची मानखंडना करतो, तेही दिसलं असतंच. कोणी सोम्या गोम्या फटिचर बुवा इथे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचं विद्रूपीकरण करतो आणि तुमच्या सरकारचे प्रमुख त्याच्या भाकडकथांना लोककथा म्हणून खपवतात. आपण फार स्पष्टवक्ते आहोत, अशी स्वत:च स्वत:ची प्रसिद्धी करणारे केंद्रीय मंत्री चूप बसतात, त्या बुवाचा जागेवरच हिशोब करत नाहीत. हे सगळं पाहिल्यावर उद्विग्न होऊन सत्तेतून बाहेर पडण्याचा बाणेदारपणा यांनी दाखवला असता, तर यांना शिवरायांचे मावळे म्हणता आलं असतं हो!
महाराष्ट्राची अस्मिता जिवंत आहे की मेली आहे की अर्धमेली आहे, यासाठी सतत खडे मारत राहण्याचं हे नीच राजकारण आहे. पण, राजकारणासाठी का होईना, रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलता यायला हवं, असा आदेश निघाल्यावर नेहमीप्रमाणे काही मराठी धेंडं हाय तौबा करून छाती पिटत कष्टकर्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी आडवी झाली आहेत, याला काय म्हणायचं! गोरगरीबांवर सक्ती कसली करता, हिंमत असेल तर श्रीमंत धेंडांवर करा, हे यांचं तर्कशास्त्र. गोरगरीब असोत की श्रीमंत असोत- या राज्यात पिढ्यानपिढ्या राहून मराठी बोलणार नाही, हा उद्दामपणा संपवायलाच हवा. महाराष्ट्रात कामधंदा करायचा असेल तर मराठी बोलावंच लागेल, इतकं सांगितलं की ही मंडळी विषारी सापासारखे फणा काढून अंगावर येतात. हे लाड इतर कुठल्या राज्यात चालतील का? हे लाड फक्त महाराष्ट्रातच चालतात. कारण इथे महाराष्ट्रद्रोही मराठी भय्ये बोकाळलेले आहेत आणि त्यांचेच प्रतिनिधी सत्तेत आहेत.
आपल्याला रिक्षा टॅक्सीत बसल्यावर कुठे फार काही बोलावं लागतं, नुसतं ठिकाण तर सांगायचं असतं, त्याला कशाला भाषा लागते, हे यांचं तर्कट! रिक्षा-टॅक्सी चालक दिवसा इथे गाडी चालवून रात्री उत्तर भारतात जातात का? ते इथेच्ा राहतात ना? त्यांची मुलंबाळं इथेच शिकतात ना? तेही बाजारात ग्राहक असतातच ना? इथेच राहू, पण, मराठी बोलणार नाही, हिंदीच दामटू, ही मस्ती येते कुठून? काही मराठी विचारवंतांना, कुणालाही सक्तीने नाही, प्रेमाने मराठी बोलायला सांगा, अशी गोड कल्पना सुचते आहे. यांनी एक दिवस रस्त्यावर उतरून रिक्षा टॅक्सीचालकांना प्रेमाने मराठी बोलायला लावण्याचा प्रयत्न करून पाहायला हरकत नाही. सगळा गोडवा अर्ध्या दिवसात संपून जाईल कायमचा.
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपल्या घरात हाल सोसते मराठी, असं कवी सुरेश भट यांनी फार पूर्वीच लिहून ठेवलेलं आहे. आपल्याच घरात हाल सोसण्याची आणि पाहुण्यांना उरावर घेण्याची घाणेरडी सवय मराठी माणसांनी सोडली नाही, तर आपण आपल्याच घरात पाहुणे बनून राहू!
तसे होईल तेव्हा आपण १ मे रोजी एकमेकांना ‘महाराष्ट्र दिन की ढेर सारी शुभकामनाएँ’ देण्याची तयारी ठेवू या!
