• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

खासगी नोकरी

ऋषिराज शेलार (अर्ध्या मुर्ध्या गोष्टी)

marmik by marmik
April 18, 2026
in भाष्य, वात्रटायन, विनोदी लेख, व्यंगावर बोट
0
खासगी नोकरी

हे ऑफिस ऐन चौकातील एक. ह्या कॉम्लेक्सच्या तीन गाळ्यात बांधलेलं. अर्ध्यानं आज यायचं कारण अर्थात नोकरी संशोधन. शुभंकर येथे एकटा काम करतो. वन मॅन आर्मी. सकाळपासून लोकांना तोंड देता देता त्याच्या तोंडाची मुलूखमैदानी तोफ झालीय.
‘मग अर्ध्या? काय काम काढलं?’ शुभंकरनं नेहमीच्या शैलीत हसून विचारलं.

‘हे… ते नाही का?’ काहीसा गोंधळलेला अर्ध्या काही खुणवत हातवारे करत बोलला.

‘मला वाटलं, ह्या गिर्‍हाईकांसारखं तूही दरडावून विचारतो की काय? मग आमचा लंबर कधी लागंल?’ शुभंकरनं हसत हसत विचारलं.
‘तू असल्यावं त्याचा नंबर कायम लागलेलाच राहील. आवर. माझं घे!’ एक गिर्‍हाईकानं त्याला टोमणा मारला.

‘तुम्हाला पहिल्याच झटक्यात घेतलं हो मी! फक्त कम्प्युटरनं हो म्हणू द्या! मग बघाच… मिनिटात काम!’ शुभ्यानं गिर्‍हाईक वताडलं. ‘बस ना तू! ऐवढे कस्टमर आटपले का मग बोलू.’ अर्ध्याला शुभंकरनं सांगितलं. तसं अर्ध्या पुढल्या बाकड्यावर अंगाचं मुटकुळं करून बसला.
हा शुभंकर ह्या खासगी कार्यालयात काम करतो. इथे आजवर डझनभर माणसं दर वर्षाला येऊन गेलीत. पण हा मागील साडेचार वर्षांपासून गोचीडसारखा चिटकून आहे. इथं त्याला काय सापडलंय त्यालाच ठाऊक! शुभंकर आणि अर्ध्या तसे सोबत शाळेत होते. इयत्ता एक पण शाळा वेगळी! ट्युशनमध्ये दोघांची ओळख झालेली. त्यात शुभंकरचा स्वभाव, त्याची शैली जरा आगळी. त्याच्या बोलण्यावर भले भले फिदा. थेट तरीही न बोचनारं बोलणं त्यालाच जमो जाणं.

आज त्याच्याकडं येण्याचं कारण म्हणजे त्याचं काही मोठ्या लोकांत असलेलं बसणं-उठणं! त्याच्या बर्‍याच शेठ लोकांशी चांगल्या ओळखी, त्यामुळं त्यातून एखाद्याकडं काम मिळालं तर मिळालं. हाच अर्ध्याचा हेतू!

‘काका तुम्हाला सांगितलं ना? आरामशीर घरात बसा, फॅन लावून! टेन्शन घ्यायचं नाही! येणार तर… दिल्लीवाले नाही, आम्हीच!’ गंभीर चेहर्‍यावर एकदम खुदकन हसत शुभ्याचं बोलणं ऐकून तो म्हातारा शांत निघून गेला.

तितक्यात संयतशेठ आले. हळू, थंडपणे. त्यांनी दारातून मध्ये आल्यावर थांबून चौफेर नजर फिरवली नि मग शांतपणे शुभ्याच्या शेजारील

खुर्चीवर जाऊन बसले. शुभ्यानं लागलीच उठून मालकाला मान दिला. ते बसल्यावर आपणही बसला.

‘अरे शुभंकर, मग काय पोझिशन आहे?’ संयतशेठनं तितक्याच थंडपणे प्रश्न केला.

‘शेठ म्हणजे बघा, मागणी तेव्हढीच आहे. पुरवठा तेव्हढाच आहे. पोझिशन म्हणाल तर रोजच्यासारखीच आहे.’ शुभ्यानं त्यांच्याच थाटात हसत उत्तर दिलं.

‘बरं, पण ते लाफेकर आले होते का इथं?’ संयतशेठ अतिशय शांतपणे विचारू लागले.

‘हो, आले होते ना! ते इथंच पडीक असतात. बाजूच्या दुकानात. त्यांना काय्ये..?’ शुभ्याचं बोलणं फुदकन हसत राहतं. तसंच तो आताही बोलला.

‘अरे, ते म्हणत होते. तू काही बोलला त्यांना? तरी मी बोललो त्यांना तो असं बोलणार नाही म्हणून…’ संयतशेठ!

‘बोलणार काय नाही? मी बोललोच थेट! ते म्हणाले लवकर द्या! मी म्हटलं मित्राचं ऑफिस आहे तुमच्या! मिळणारच तुम्हाला मित्राकडून पटकन… डिलिव्हरी! पण जरा कळ सोसा! असं उतावीळ होऊन ‘आधी मला द्या! मला द्या!’ म्हणणं तुम्हाला शोभत नाही. मित्राचा पूर्णवेळ तुम्हाला देण्यात गेला तर… बाकीच्या कस्टंबरना कधी देणार शेठ? डिलिव्हरी? आं?’ शुभ्या हसत हसतच उत्तरला!

‘हे बघ! तुला पटतं का हे उत्तर..?’ संयतशेठ नाराज होऊन जाब विचारायला लागले.

‘मी पटतं म्हणून काही देत नाही! बहुतेकदा तर न पटणारं प्रॉडक्टच गळ्यात मारतो. लोकं घरच्यांना पटते म्हणून बायको नांदवतात, तिथं आपलं प्रोडक्ट का नाही ज्यादा खपणार?’ हसत हसत शुभ्यानं संयतशेठला कोडं घातलं.

‘अरे, कसं बोलतो तू? आता रिजनल हेडचा साहेब मला म्हणाला. इथं कुणी लँडलाईन उचलत नाही! जरा लक्ष द्या!’ संयत शेठनं हळुवारपणे पुढली समस्या ऐकवली.

‘मी तर म्हणतो शेठ! अजून चारदोन लँडलाईन विकत घेऊ आणि महादेवाच्या गळ्यात कसे सर्प लोंबत राहतात, तशे माझ्या गळ्यात अडकवून फिरतो…’ शुभ्या हसूनच बोलला.

‘बघ, बघ! असं बोलायचं असतं का? ते आपले वरचे साहेब त्यांच्याशी….’ संयतशेठ नाराजीने बोलू लागले.

‘ते हुद्द्यानं मोठे! वरले काय वरले? आपण खालचे वरले असा भेदच मानत नाही.’ शुभ्या पुन्हा खुदकन हसत बोलला.

‘अहो शेठ, तो कामासाठी मुलं बघा म्हणून सुचवतोय.’ एक कस्टंबर मध्येच बोलला.

‘अरे मग एखादी मुलगी बघायची!’ संयतशेठ तरीही शुभंकरलाच सल्ला देऊ लागले.

‘बघितली की! दोन वर्षे झाली!’ शुभ्या तयार उत्तर घेऊनच बसलेला.

‘मग बोलावून घ्यायचं ना?’ संयतशेठ अधीरतेने बोलले.

‘हा लोकांच्या लेकीबाळीला असं बोलावणं बरं नाही शेठ!’ शुभ्या उंटासारखा तिरकी चाल जाऊ लागला.

‘अरे कामासाठी बोलवायचं आहे आपल्याला!’ संयतशेठ अजूनही संयतपणेच समजावू लागले.

‘ते होय! मला वाटलं…’ चाभरेपणा तसाही शुभ्याच्या अंगात जास्त!

‘कामासाठी म्हणतोय अरे शुभंकर!’ संयतशेठ बोलण्याचा विपर्यास होऊ नये म्हणून घाईनं स्पष्टीकरण देऊ लागले.

‘मला वाटलं स्थळ म्हणून बघायच्या. लगेच घे अडकित्ता न् फोड सुपारी!’ शुभ्या पुन्हा दात काढतो.

‘शुभंकर, कधी तरी गंभीरपणे बोलत जा!’ संयतशेठ अजूनही समाजवणीच्या सुरात!

‘तुम्हाला काय वाटतं? मी गंभीर नाही? मग टिकलो असतो होय?’ शुभ्यानं प्रतिप्रश्न केला.

‘हे बघ शुभंकर! तुझी मतं माझ्याबद्दल काय आहेत, मला माहित नाहीत. पण मी मात्र तुझ्याबद्दल कायम पॉझिटिव्ह विचार ठेवणार. तू

उद्या जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी तुला उद्या इथे जे काही शिकायला मिळेल ते कुठेही कामं येईल. हे ध्यानी ठेव. मार्क माय वर्ड्स!’ संयतशेठनं पठडीतली वाक्यं ऐकवली.

‘तरी पण मला ग्रेस मार्कांची गरज पडेल नाहीतर कॉपीची!’ शुभंकरनं हसत टोमणा मारला.

 

‘बघ, मी जास्त काही बोलत नाही! पण मी तुला चार कामं सांगितली, त्यातली झाली किती?’ संयतशेठ पुन्हा मूळ पदावर आले.

‘आज रात्री प्लँचेट करून उरलेली करून टाकतो चला!’ शुभ्या टवाळी करण्याच्या मूडमध्ये!

‘अरे मी बोलतो काय? तू बोलतो काय?’ प्रथमच चिडक्या स्वरात संयतशेठ बोलले.

‘माणसं कमी आहेत, त्यांची आवश्यकता आहे, हे सोडून सगळं बोलता आहात शेठ तुम्ही!’ न राहवून अर्ध्या मध्येच बोलला.

‘हे बघ अध्वर्यू! शुभंकरला बोलू देत की! मी त्याला माणसं शोध म्हणालो! शोधलेत का त्याने? नाही! मी त्याला अगदी सूट दिली, बाबा तुझ्या हिशेबाने कुणाला बघून शे-पाचशे घ्यायला सांग! मग महिन्यानं काम चांगलं असलं, वाटलं तर थोडे आणखी वाढवून देऊ काय?’ संयतशेठनं कॅसेटची बी बाजू वाजवून दाखवली.

‘काय सांगता? काम चांगलं वाटल्यावर पगार वाढवून मिळणार? आयला मी चान्स मिस केला…! मी कधीतरी चांगलं काम करायला पाहिजे होतं बघा! नेक्स्ट टाइम नक्की!’ शुभंकर बोलता बोलता खुर्चीतून ताडकन उठून उभा राहिला अन् अर्ध्याला खुणावून कार्यालयातून बाहेर पडला. संयतशेठ केवळ विस्फारल्या डोळ्यांनी बघत राहिले.

अर्ध्या शुभ्याच्या मागून ऑफिसमधून बाहेर पडला. थोडं बाजूला आल्यावर अर्ध्यानं शुभंकरला हटकलं.

‘का रे शेठ बसलेला असताना तू बाहेर आलास. कश्याला?’ अर्ध्यानं त्याचा हात धरून थांबवत विचारलं.

‘मी काम सोडतोय!’ शुभंकरनं थोडक्यात सांगितलं.

‘का पण?’ अर्ध्यानं खोदून विचारलं.

‘अरे खाजगी ते खाजगी रे! इथं हा शेठ वर्षांपासून माझ्याकडून सारं कामं करून घ्यायचा. आणखी माणसं भरा म्हंटलं की हा आता बघितलेत, येतील उद्या-परवा. तोवर कर काम. दे कस्टंबरला तोंड म्हणून मलाच तोफेच्या तोंडी द्यायचा. आता त्याला म्हणा बस खुर्च्या उबवत. मी उद्यापासून जातोय विनाअनुदानित शाळेत शिपाई म्हणून. संस्था ती संस्था रे शेवटी!’ शुभ्या भडभडला.
‘मग माझं?’ अर्ध्याचा महत्त्वाचा सवाल.

‘तुला खाजगीच पाहिजे ना? मग तू जा की आत! तुला लगेच काम मिळेल.’ शुभ्यानं बोटानं रस्ता दाखवला. अर्ध्यानं पाल झटकल्यागत तिथून काढता पाय घेतला!

Previous Post

खणखणीत बंदा रुपया!

Next Post

फटकारे बाळासाहेबांचे

Next Post
फटकारे बाळासाहेबांचे

फटकारे बाळासाहेबांचे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.