• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

खणखणीत बंदा रुपया!

श्रीराम रानडे (यांचा मी सांगाती)

marmik by marmik
April 18, 2026
in मनोरंजन, यांचा मी सांगती
0
खणखणीत बंदा रुपया!

सुप्रसिद्ध लेखक, कथा, कादंबरी, व्यक्तीचित्रे, पटकथा-संवाद लेखक, आकाशवाणीवरील अधिकारी आणि शालेय वयातच स्वातंत्र्य चळवळीशी जोडले गेलेल व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांचा ५ एप्रिल १९२७ हा जन्मदिवस! त्यांचे हे जन्मशताब्दीचे वर्ष सुरू होत आहे. त्यांच्याविषयी आलेला हा प्रत्यक्ष अनुभव!

व्यंकटेश माडगूळकर यांची आणि माझी ओळख झाली ती ‘मौज’मध्ये त्यांची ‘माणदेशी माणसं’ प्रसिद्ध होऊ लागली तेव्हापासून. मी त्यावेळी शाळकरी वयाचा होतो. वाचनाचे जबरदस्त वेड आम्हा सर्वच रानडे परिवाराला. ‘झेल्या’, ‘धर्मा रामोशी’, ‘रघू कारकून’, ‘खाला तांबोळीण’, ‘बन्याबापू’, ‘माळी’, ‘कोंडिबा गायकवाड’ आणि इतर सर्व मंडळी जी एकदा बालवयात मानगुटीवर बसली ती अजूनही खाली उतरायला तयारच नाहीत. ‘माणदेशी माणसं’ पुस्तकरूपाने त्यानंतर प्रकाशित झालं. गोडसे, दलालांची त्यात चित्रे आहेत. त्यामुळे ही सर्व मंडळी अधिकच जवळची वाटतात. ही माणसे तुम्ही कशी लिहिलीत, कुठं भेटली ही तुम्हाला, असा सवाल जेव्हा लेखक माडगूळकरांना विचारला गेला होता, त्यावेळी त्यांनी असं काहीसं लिहिलं आहे, ही माणसं जशीच्या तशी मला भेटली नाहीत. माझ्या बालपणी अवतीभवती होती. मी एकाचं मुंडक दुसर्‍याला, दुसर्‍याचा हात तिसर्‍याला अशी मोडतोड करून ही चित्रं उभी केली. या ‘माणदेशी माणसां’मुळे माझ्या वाचनाला एक वेगळीच नजर मिळाली, हे मात्र शंभर टक्के खरी गोष्ट. दिवाळी अंक, विविध मासिके, वृत्तपत्रे, साप्ताहिके यामधून प्रसिद्ध होणार्‍या व्यंकटेश माडगूळकरांच्या कथा, कादंबर्‍या, मी अधिकाधिक आवडीने आणि बारकाईने वाचू लागलो आणि या लेखकाचं लिहणे काही न्यारेच आहे, याची प्रचिती मला जाणवू लागली. ‘काळ्या तोंडाची’ ही कथा वाचून तर वेडावूनच गेलो.

व्यंकटेश माडगळूकर हे उत्तम कथा-पटकथा-संवाद लेखक. ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘सांगत्ये ऐका’, ‘जशास तसे’, ‘संत नामदेव’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचे लेखनकार्य त्यांच्या सर्जनशील लेखणीमधून उतरले आहे. शिवाय सती, तू वेडा कुंभार (पहिले नाव- जाणार कुठं?), पती गेले गं काठेवाडी, बिकट वाट वहिवाट, कुणाचा कुणाला मेळ नाही, बिनबियांचं झाड अशी नाटके-वगनाट्ये त्यांच्या नावावर आहेत.

ग. दि. माडगूळकर आणि व्यंकटेश माडगूळकर या ‘अण्णा’ आणि ‘तात्या’ या दोन अस्सल माणदेशी माणसांनी कथा-कविता, कादंबरी, गीतलेखन, नभोनाट्य अशा अनेक प्रचार आणि प्रसार माध्यमांतून आपली स्वतंत्र ‘नाममुद्रा’ उमटवली आहे. माडगूळसारख्या खेड्यातून बालपणीचे संस्कार घेऊन लेखनात रमलेले हे दोघे सख्खे भाऊ. सरस्वती देवीच्या कंठीचे मौतिक हार म्हणून आजही तळपताहेत. मराठी रसिक वाचकांनी त्यांना भरभरून दाद दिलीच. दोन्ही बंधूंना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान करून त्यांच्या वाङ्मयसेवेला मानाचा मुजरा केलेला आहे.

या दोघा बंधूंची प्रत्यक्ष भेट व्हावी, त्यांच्याकडून चार अक्षरं शिकावित अशी आशा धरून मी पुण्यात आलो. पण नियतीची काय करणी बघा… मी गदिमा अर्थात अण्णांपर्यंत पोहचूच शकलो नाही, त्यांची माझी ना कधी ओळख झाली. वास्तविक मी त्यांना गुरुस्थानी लहानपणीच विराजमान केले. पण प्रत्यक्ष सहवास शून्य! त्यांचा एकलव्य शिष्य म्हणूनच मी वावरतो आहे. व्यकंटेश माडगूळकरांची आणि माझी मात्र बर्‍यापैकी ओळख झाली. इतकेच नव्हे तर त्यांचे समवयस्क लेखक द. मा. मिरासदार, शंकर पाटील यांच्याबरोबरही संवाद घडू लागले. या त्रयींचे ‘कथाकथन’ ही मी कितीवेळा ऐकले त्याची गणतीच नाही. ‘शाळा तपासणी’,’ व्यंकूची शिकवणी’, ‘धिंड’ या कथा मला आजही तोंडपाठ आहेत. त्याचप्रमाणे विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगांवकर यांचं काव्यवाचन! पु.ल. म्हणायचे, ‘हे ‘ट्रिपल इंजेक्शन’ एकदम घ्यावे लागते. मी ते अनेकवेळा घेतले आहे.’

पुण्यात राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकात मी निळूभाऊंच्या (निळू फुले) संगतीनं काम करायला लागलो आणि व्यंकटेश माडगूळकरांचा परिचय हळूहळू होऊ लागला. माडगूळकर आकाशवाणी, पुणे केंद्रावर ग्रामीण विभाग प्रमुख होते. ते दरवर्षी होळीच्या निमित्ताने ‘होळीची पोळी’ हा कार्यक्रम आकाशवाणीवरून सादर करायचे. एका वर्षी कार्यक्रमात त्यांनी निळूभाऊला सहभागी करून घेतले. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा या उक्तीप्रमाणे मीही गेलो निळूभाऊबरोबर रेकॉर्डिंगला. प्रत्यक्ष भाग नाही घेता आला, पण आकाशवाणीचा स्टुडिओ, रेकॉर्डिंग रूम, तो उघडझाप होणारा स्टुडिओतला लाल दिवा, प्रत्यक्ष ध्वनिमुद्रण याचे जवळून दर्शन घडले आणि पुढे मी जेव्हा स्वतःच आकाशवाणीचा ‘नभोनाट्य कलाकार,’ शालेय कार्यक्रमाचा लेखक आणि कलाकार सादरकर्ता झालो, तेव्हा या उमेदवारीचा मला फायदा झाला. या होळीच्या पोळीचे मानधन १५ रुपये निळूभाऊंना चेक स्वरूपात मिळाले. हा चेक कलेक्टर कचेरीच्या आवारत असलेल्या ट्रेझरीमधून वटवला जायचा. निळूभाऊ आणि त्यांच्या संगतीनं मी सायकल हाणत ट्रेझरीमध्ये गेलो. निळूभाऊला तेव्हा कोणी-म्हणजे कोणीही ओळखत नव्हते. चार काऊंटरवरच्या भाऊसाहेबांना विनवणी केली. पण कुणाची तरी ओळख आणा, त्याशिवाय रक्कम मिळणार नाही, असं उर्मट उत्तरं मिळाली. शेवटच्या खिडकीवर हेच उत्तर मिळताच एरवी कमालीचा शांत असलेला ाfनळूभाऊ ऊग्ररूपी नीलकंठाच्या रूपात प्रगटला आणि त्यानं गर्जना केली, ‘आता मला या चेकचे पैसे द्या, नाहीतर मी हा चेक तुमच्यासमोर फाडेन…’ काय झाले कुणास ठावुक. एक घार्‍या डोळ्यांचा, थोडासा बुटका, काळा कोट घातलेला, थोडेसे हात आखुड असलेला वकील, पुढे आला आणि भाऊसाहेबांना म्हणाला,’ यांना मी ओळखतो. द्या त्यांना पैसे!’ रोख पंधरा रुपये मिळाले. ते वकील म्हणाले, ‘मी पटवर्धन. मी देखील सेवादलात आहे. मी कलापथकातून निळूभाऊ तुमची कामे बघितली आहेत…’

निळूभाऊ आणि मी बाहेर पडलो. निळूभाऊ मला बळेबळे कलेक्टर कचेरीसमोरील हॉटेलात घेऊन गेला. मिसळ-पाव संपवलं. चहावर आम्ही ताव मारला आणि मगच शांतपणे सायकली दामटत घरी परतलो. ‘राष्ट्रसेवा दल कला पथकाने’ व्यंकटेश माडगूळकर लिखीत ‘बिनबियांचे झाड’ आणि ‘कुणाचा कुणाला मेळ नाही’ ही दोन वगनाट्ये रंगमंचावर सादर केली. या दोन्ही वगनाट्यांनी धमाल केली. तमाशा या कलाप्रकाराकडे आधी नाके मुरडणारा मध्यमवर्गीय उच्चवर्गीय, सुशिक्षित रसिक प्रेक्षकवर्ग, स्त्री-पुरुष आकर्षित झाले आणि नवनाट्याला एक नवा आयाम मिळाला. निळू फुले यांच्या हाताखाली मी राष्ट्रसेवा दलाच्या पुणे शहर कलापथकात काम करू लागलो. ‘बिनबियांचं झाड’, ‘कुणाचा कुणाला मेळ नाही’, ‘येरा गबाळ्याचे काम नोहे’, ‘पुढारी पाहिजे’, ‘चिनी आक्रमणाचा फार्स’ अशी लोकनाट्ये आम्ही सादर करायचो. पडेल ती आणि ऐनवेळी मिळेल त्या साकाराव्या लागणार्‍या भूमिकांमुळे अंगात लोकनाट्याचा बाज चांगलाच मुरला आणि त्याचा उपयोग मला ‘घाशीराम कोतवाल’मधील प्रमुख सूत्रधाराची भूमिका साकारताना पुरेपुर झाला.

त्यावर्षी गणपती उत्सवात आम्ही राहुरी,श्रीरामपूर भागातील साखर कारखान्यात किशोर पवार आणि सेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मामा गणारे यांच्या पुढाकारामुळे ‘कुणाचा कुणाला मेळ नाही’ हे तात्यांच्या लोकनाट्याचे पाच-सहा कार्यक्रम केले. दौरा संपवून आम्ही परत आलो. आपापल्या पोटाच्या चाकरीला लागलो. महिना उलटला आणि सेवादलाच्या पत्त्यावर निळू भाऊंच्या नावाने एक पत्र आले. ‘आपण ‘कुणाचा कुणाला मेळ नाही’ या मी लिहिलेल्या वगनाट्याचे प्रयोग गणेशोत्सवात केल्याची वार्ता समजली. पण लेखकाचे मानधन अद्यापी मिळालेलं नाही. माझ्या ‘अक्षर’ बंगल्यावर अमूक दिवशी, अमूक वेळी, मानधनासह येऊन भेटावे.’ पत्राखाली लपेटदार सही-व्यंकटेश माडगूळकर!

पत्र वाचून निळूभाऊ हादरलाच! खरंच की! लेखकाला आपण विसरूनच गेलो. आता काय करायचे? पण त्याक्षणी आमच्या मदतीला धावून आले सेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शामराव पटवर्धन! त्यावेळी त्यांचा मुक्काम काही दिवसांसाठी पुण्यातच होता. शामराव पटवर्धन हे जेजुरी दरोड्यातील प्रमुख आरोपी. शाळकरी वयातले व्यंकटेश माडगूळकर हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी मोहिमेत सहभागी झाले होते. इतर सर्व आरोपींवर गुन्हा सिद्ध झाला आणि त्यांना वेगवेगळ्या वर्षांच्या सक्तमजुरीच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. अल्पवयीन विद्यार्थी म्हणून व्यंकटेश माडगूळकर यांना शिक्षा न करता समज देऊन सोडून देण्यात आले. त्यामुळे शामराव आणि व्यंकटेश यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध. ते म्हणाले, ‘मी येतो तुमच्याबरोबर व्यंकटेशकडे!’

ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी शामराव, निळूभाऊ आणि त्यांच्या सदर्‍याचे टोक धरून मी सायकली दामटवत ‘अक्षर’ बंगल्याशी गेलो. बंगल्याचा कंपाऊंडला सायकली लावून फाटक उघडून आत गेलो. तात्या बाहेरील व्हरांड्यात फेर्‍या मारत होते. आम्हाला पाहून, या ‘निळोबाराया’ असं म्हणून त्यांनी स्वागत केलं. आपल्या अभ्यासिकेत ते आम्हाला घेऊन गेले. लेखकाची खोली. पुस्तकांनी कपाटांनी भरलेली. लेखनाचे टेबल, खुर्ची, पॅड, पेन व्यवस्थित. आपल्या एका आवडत्या लेखकाची अभ्यासिका आणि लेखकाची खोली बघून मी अत्यंत प्रसन्न झालो.

शामराव आणि तात्यांच्या विविध विषयांवर गप्पा सुरू झाल्या. जुन्या धाडसी योजनांवर दोघे भरभरून बोलले. मी श्रोता या भूमिकेतून श्रवणभक्ती करत होतो. तो चळवळीचा काळ, तो उभा राहिलेला खटला, साक्षी-पुरावे, शिक्षा, सुटका हा सारा इतिहास प्रत्यक्ष सहभागी असलेले ते दोघे. स्वातंत्र्यसैनिकांकडून त्यांच्याच वाणीमधून आमच्यापुढे साक्षात प्रकट होत होता. चहापाणी झाले आणि निळूभाऊने दहा-दहाच्या सहा नोटा काढून तात्यांच्या हातात ठेवल्या आणि म्हणाला, ‘माफ करा तात्या! रॉयल्टीचे पैसे द्यायला उशीर झाला…’ निळूभाऊचे हे वाक्य ऐकले मात्र आणि तात्यांचा सगळा नूरच बदलला. शब्दांना धार आली आणि त्यांनी अक्षरश: आम्हाला धारेवर धरले. ‘लेखकाला तुम्ही इतके ‘दुय्यम’ समजता? लेखक लिहितो म्हणूनच तुम्ही स्टेजवर काम करू शकता ना?- लक्षात ठेवा, प्रथम लेखक आणि नंतर इतर गोष्टी….’ अखंडपणे पाच मिनिटे तात्या पोटतिडकीने बोलत होते. आणि शामरावांसकट आम्ही दोघेही कान पाडून ऐकत होतो. पुन्हा वातावरण निवळले. निरोप घेऊन आम्ही बाहेर पडलो. ‘हुश्श’ केले. तात्यांचे-व्यकंटेश माडगूळकरांचे एक वेगळेच दर्शन मला प्रत्यक्ष घडले. लेखणीचा-लेखनाचा-ज्वलंत आणि जिवंत क्रांतिकारक लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्या रूपात मला भेटला होता.
‘वेस्टर्न रिजनल लँग्वेज सेंटर’ ही पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या परिसरात भाषाविषयक शिक्षण देणारी संस्था भारत सरकारच्या योजनेप्रमाणे श्िाक्षकांनी आपल्या मातृभाषेव्यतिरिक्त आणखी एखादी भारतीय भाषा शिकावी हा आणि आपल्या विद्यार्थ्यांना शिकवावी, इतर प्रांतातील संस्कृतीशी ओळख व्हावी हा त्याचा उद्देश! गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची, ‘विश्वभारती’ किंवा सानेगुरुजींची आंतरभारतीची कल्पना त्यात समाविष्ट आहे. या पश्चिम विभागीय भाषा केंद्रात ‘गुजराती’,’सिंधी’ आणि ‘मराठी’ या भाषा शिकवल्या जातात. मी सिंधी भाषा निवडली. केंद्राच्या प्रमुख होत्या डॉ. विजया चिटणीस. त्या व्यंकटेश माडगूळकर यांच्या पत्नी! या केंद्रात अनेक सांस्कृतिक उपक्रम त्या साजरे करीत. ‘घाशीराम कोतवाल’, ‘महानिर्वाण’, ‘सामना’, ‘जैत रे जैत’ या नाटक-चित्रपटांमुळे त्या माझ्या चांगल्याच परिचयाच्या झाल्या होत्या. वेगवेगळ्या उपक्रमांसाठी त्या अनेक मान्यवर लेखकांना आमंत्रित करीत. ज्ञानेश्वर नाडकर्णी, व्यंकटेश माडगूळकर अशा लेखकांचा मला या केंद्राच्या कार्यक्रमातूनच अधिक परिचय घडला. विजया चिटणीस आणि माडगूळकर यांचा मुलगा मोहन माडगूळकर हा डेक्कन जिमखान्यावरील गरवारे प्रशालेचा विद्यार्थी. माझ्या दोन्ही मुली रुपाली आणि आरती याच शाळेच्या विद्यार्थिनी. हे तिघेही शाळेच्या नाट्य, कथाकथन, वत्कृत्त्व स्पर्धेत भाग घेत असत आणि आंतरशालेय स्पर्धेत हमखास बक्षीसे मिळवित. त्यांची शाळा सकाळी असे, कधीकधी त्यांना शाळेत पोहचविण्यासाठी मी जात असे. माडगूळकरही मोहनला शाळेत सोडण्यासाठी येत असत. तिथे आमची छान गट्टी जमली. शाळा सुरू झाली की आम्हाला मोकळा वेळ असे. ‘काय रानडे, तोंड पोळून घ्यायचे का?’ असे म्हणत तात्या (आता मी त्यांना तात्या या घरगुती नावाने संबोधू लागलो होतो) मला शेजारच्या हॉटेलात घेऊन जात आणि मस्तपैकी मिसळ खिलवित. इंग्रजी विषयावरील, संस्कृत साहित्यातील अनेक नवीन नवीन विषयांवर ते माहिती देत. त्यामुळे माझ्या ज्ञानात आपसूकच भर पडत असे.
तात्यांच्या लिखाणात विलक्षण ताकद होती. ते स्वतः उत्तम चित्रकार आणि लेखक. दोन्ही कलांचा बेमालूम संगम त्यांच्या लिखाणात-चित्रांत जाणतो. कमीत कमी रेषा आणि कमीत कमी शब्द ही त्यांची खासियत. एका दिवाळी अंकात ओळीने तीन वर्षे त्यांच्या कादंबर्‍या प्रकाशित झाल्या. ‘कोवळे दिवस’, ‘चित्रकथी’ आणि ‘चित्रकवी’. ‘करुणाष्टक’मधील हा भाग मला इथं दाखला म्हणून द्यावा वाटतो…

”भराभरा दादा विहिरीपाशी आले तर रहाट सुटलेला. सगळा दोर उलगडून आत लोंबतो आहे. त्यांना धसका बसला आणि मोठमोठ्यांदा माझ्या नावानं हाका मारलेल्या ऐकू आल्या.

मी विहिरीच्या आतूनच ओरडलो, ‘ओ दादा… मी आत आहे… विहिरीत…’ मग आभाळातून देवदर्शन व्हावे, तसे विहिरीच्या काठावरून आत डोकावणारे दादा मला विहिरीच्या तळातून दिसले…
‘घाबरू नकोस…’
‘नाही’
‘लागलं का तुला कुठं? पडलास कसा?’
‘पडलो नाही… उतरलो… चड्डी पडली.’
‘बरं बरं’
‘दादा, मला वर काढा…’
‘हो. हो.’
त्यांनाही विचार करावाला लागला असणार. म्हणाले, ‘दोराला गच्च धर. दोन्ही हातांनी आणि घागरीवर बैस. मी तुला शेंदून घेतो.’ मी बसलो, दोर तुटणार नाही ना, या भितीनं वरचेवर थांबून आत डोकावत दादांनी रहाट जिवाच्या बळानं हळूहळू ओढला आणि मला वर घेतलं.
पुढे असे गर्तेत पडण्याचा उद्योग मी आयुष्यात आणखी काही वेळा केला. पण दादा मरून गेले होते. आई सतत दूर होती. मला कोणीही शेंदून वर घेतले नाही.” (करुणाष्टके, चौथी आवृत्ती, ऑगस्ट २००२, मॅजेस्टिक प्रकाशन पृष्ठ क्रमांक ७३, ७४)

माडगूळकरांच्या याच लेखनाचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करण्याचं माझं एक भावनिक नातं आहे. याचं कारण म्हणजे तात्यांची मुलगी ज्ञानदा नाईक हिनं ‘करुणाष्टके’ हे पुस्तक मला भेट दिलेले आहे. त्यांनी लिहिले आहे… ‘श्रीराम रानडे यांना… ती. तात्यांची शब्दकळा, तुमच्या संग्रहासाठी प्रेमपूर्वक, ज्ञानदा ८/१०/२००४’

‘बनगरवाडी’ मी कोळून प्यायलो आहे. माझ्या मनोमनी, रोमारोमात ती भिनली आहे. अनेक वर्षे माझ्या ती नित्यचिंतनात आहे. मी जर दिग्दर्शन क्षेत्रात उतरलो असतो तर जिवाचं रान करून हा चित्रपट तयार केला असता. अनेक नामवंत निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी हा चित्रपट करायचा प्रयत्न केला. माझे मित्र आणि प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांनीही ‘बनगरवाडी’ चित्रपट केला. मी तो बघितला नाही. याचं कारण मी अनेक वर्षे माझ्या मनाशी जी बनगरवाडीची चित्रमूर्ती उराशी जपली आहे, त्याला तडा गेला असता. अमोल पालेकरांचा चित्रपट नक्कीच चांगला असणार. पण व्यंकटेश माडगूळकरांनी केवळ १३१ पानांत जे काही शब्द चित्रित केले आहेत, त्याला तोड नाही.

असे हे माझे अत्यंत आवडते लेखक व्यंकटेश दिगंबर उर्फ तात्या माडगूळकर. ५ एप्रिल १९२७ हा त्यांचा जन्मदिवस. हे संपूर्ण वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष! हेअगदी दणक्यात साजरे झाले पाहिजे. सर्व साहित्यप्रेमी संस्थांनी, रसिक वाचकांनी, चित्रपट, नाटक, दूरदर्शन,वृत्तपत्रे आणि सर्व माध्यमांनी याला उत्तम प्रतिसाद देऊन आपली सांस्कृतिक परंपरेची गुढी उंचच उंच उभारली पाहिजे, हीच व्यंकटेश माडगूळकरांना आदरांजली ठरेल!

Previous Post

खाण्यासाठी जन्म आपुला

Next Post

खासगी नोकरी

Next Post
खासगी नोकरी

खासगी नोकरी

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.