
‘बी प्रोफेशनल’ हा सई परांजपे यांच्याकडून मी घेतलेला `कानमंत्र.’ कानमंत्र म्हणजे अक्षरश: शाब्दिक रीतीने कान पिळून (शाब्दिक कानफटावून) घेतलेला कलाजीवनातला मंत्र! हा मंत्रधारण विधी कसा झाला हे ओघाओघाने मी लिहीनच. तूर्त मंत्राची प्रेरणा जरा बाजूला ठेवतो.
१९ मार्च हा सई परांजपे यांचा जन्मदिवस! स्त्रियांचे वय विचारू नये असे म्हणतात. सई परांजपे यांचे तर मुळीच नको कारण त्या आजही अजाण बालकापासून ते परिपक्व प्रौढांपर्यंत पोहोचणार्या त्यांच्या अत्यंत आवडीच्या आणि जिव्हाळ्याच्या सर्व क्षेत्रात सहज संचार करतात, त्यांचा आणि वयाचा का…ही…ही संबंध नाही.
इतका वेळ मी सई परांजपे असा उल्लेख करीत होतो, आता पुढील लेखनात मात्र मी सई असा एकेरी उल्लेख करणार आहे, कारण सई या शब्दानेच आणि तिच्याविषयी आदर जिव्हाळ्यानेच मी जोडला गेलो आहे.
आकाशवाणी पुणे केंद्राच्या बालोद्यान कार्यक्रमात सई परांजपे हे नाव प्रथम कानी पडले. शकुंतला परांजपे यांची कन्या आणि रँग्लर परांजपे यांची नात. यामुळे सईबद्दलचे कुतूहल वाढले. भेटीची आणि ओळखीची ओढ निर्माण झाली. तो योग जुळून आला १९५९ साली. विलिंग्डन कॉलेजमधून मी `इंटर सायन्स’ परीक्षेत नापास झालो. नापास विद्यार्थ्यांना एक अखेरची संधी म्हणून
ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेतली गेली. मला काहीही करून मिरज-सांगली सोडून पुण्याला यायचेच होते. मी पुण्याला आलो आणि पुण्यातील आपटे रोडवरील `इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या गणित, विज्ञान, रसायनशास्त्र शिकवणार्या शरद जोशी आणि पु.ग. उर्फ भैय्या वैद्य यांचा क्लासचा विद्यार्थी झालो. या कॉलेजच्या क्लासप्रमाणे त्या ठिकाणी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ’गणित’ विषयाचे वर्ग सुरू होते. त्यांचे शिक्षक होते पद्माकर मारुती ठोंबरे-त्यामुळे त्यांना पीएमटी या नावाने संबोधले जाई. त्यावेळी ते जंगली महाराज रस्त्यावरील मॉडर्न हायस्कूलमध्ये शिक्षक होते. ते माझे मामा श्री. भा. महाबळ यांचे मित्र. महाबळांमुळे माझी आणि ठोंबरे यांची ओळख झाली.
ठोंबरे हे आपल्या क्लासेसचे दरवर्षी गॅदरिंग करीत आणि एखादे बालनाट्य सादर करीत. सर्व भूमिका क्लासचे विद्यार्थीच करीत. यावर्षी त्यांनी सई परांजपे लिखित `शेपटीचा शाप’ ही नाटिका बसविण्याचे ठरविले. सई परांजपे देखील याच आपटे रोडवरच रहात असल्यामुळे तालीम बघायला या, अशी विनंती त्यांनी केली. सई परांजपे आल्या त्यांनी तालीम बघितली. मुलांना काही सूचना केल्या. माझे नाटक, सिनेमाचे वेड ठोंबरे यांच्या चांगलेच ध्यानात आले होते. त्यांनी त्या दिवशी मलाही बोलावले. सई परांजपे यांचे प्रत्यक्ष दर्शन त्यावेळी प्रथम घडले. गोरीपान, फार उंच नाही, फार बुटकी नाही, स्थूलपणाकडे झुकणारे शरीर, बोलण्यात स्पष्टपणा, धाकधारी तसंच बुद्धीची चमक दिसणारे डोळे आणि प्रसन्न हास्य या सार्याच गोष्टी प्रथमदर्शनीच मला जाणवल्या. संवाद मात्र काहीही झाला नाही.

पण काही योग, मग ते दुःखद असो किंवा सुखद, आपोआपच जुळून येतात. ज्या `इंटर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मध्ये मी इंटर सायन्सच्या क्लासला जात होतो, त्याच्या संचालकांनी विद्या महामंडळ, पुणे ही शिक्षण संस्था १९६१मध्ये उभारली आणि मी अपघाताने त्याच शिक्षणसंस्थेत माध्यमिक शिक्षक म्हणून रुजू झालो. माझी कलेविषयीची आवड लक्षात घेऊन वैद्यांनी माझी सांस्कृतिक खात्यात प्रमुखपदी नेमणूक केली. वक्तृत्त्व, नाट्य, कथा-कथन, निबंध अशा विविध स्पर्धेसाठी मी विद्यार्थी-विद्यार्थिनींची तयारी करून घेऊ लागलो. आंतरशालेय नाट्य स्पर्धेसाठी आमच्या शाळेतील विद्यार्थी समाजाच्या कोणत्या स्तरातून येतात, त्यांचे घरचे वातावरण, त्याची भाषा, त्यांचा अनुभव, त्यांची बौद्धिक आणि शारीरिक आर्थिक व या सार्या गोष्टी विचारात घेऊन मी सुरुवातीच्या काळात प्रचंड अपयश सहन करून त्यातून तालवून सुलाखून निघून नाटिका निवडू लागलो. लिहू लागलो आणि काही काळाने काही वर्षे अशी उगवली की विद्या महामंडळाचे नाटक म्हणजे सर्व बाबतीत प्रथम क्रमांक हे समीकरणच बनवून गेले.
एके वर्षी मी `कहाणी एका नगरा’ची हे लोककथेवर आणि पाण्याचा प्रश्न, अंधश्रद्धा हे विषय निवडून नाटिका लिहिली. स्पर्धेत त्याला एकूण ११ बक्षीस मिळाली. एका तालमीसाठी आमचे मुख्याध्यापक पु.ग. ऊर्फ भैय्या वैद्य यांनी सई परांजपे यांना तालीम बघण्यासाठी बोलावले. वैद्य सर आपटे रोडवरच राहायचे. त्यामुळे त्यांची आणि सई परांजपे यांची चांगलीच ओळख. सई परांजपे आणि अरुण जोगळेकर अगदी ठरलेल्या वेळी हजर! तालीम बघितली आणि काही सूचना देऊन गेले. फारसे काही बोलणे झाले नाही.
त्या काळात ’घाशीराम कोतवाल’ हे नाटक अगदी धुमधडाक्यात सुरू होते. सईची जीवश्चकंठश्च मैत्रिण मीरा रानडे, त्यांचा मुलगा राहुल रानडे, घाशीरामच्या संचात नव्याने सामील झालेला तो एके दिवशी निरोप घेऊन शाळेत आला. सई मावशीने आज शाळा सुटल्यावर तुम्हाला भेटायला घरी बोलावले आहे. मी संध्याकाळी सई परांजपे यांना भेटलो आणि सुखद वार्ता समजली. शं. गो. साठे यांच्या `ससा आणि कासव’ या नाटकावरून कथा नावाची हिंदी चित्रपट सई करते आहे आणि त्यातील एका चांगल्या भूमिकेसाठी माझी निवड झाली आहे. आमचे चित्रिकरण पुण्यातच होणार आहे. त्यामुळे शाळेतून पगारी, बिनपगारी रजा याचा काही प्रश्न येणार नव्हता. मी अत्यंत खुश झालो. सईच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी मिळते आहे, उद्या सकाळी दहा वाजता केसरी वाड्यासमोरील साळुंखे वाड्यात ये. तुमचा शॉट उद्या आहे. मी तरंगतच घरी आलो.

त्याआधी मी काही चित्रपटांमधून बारीकशा भूमिका केल्या होत्या. त्या ठिकाणी वेळेसंबंधी अनुभव काही फारसा चांगला नव्हता. सकाळी आठला हजर व्हा असं सांगायचे आणि रात्री आठला पॅकअप झाल्यावर उद्या सकाळी तुझा पहिला शॉट घेऊन टाकू असं बोलावून बोळवण करायचे. हा अनुभव गाठीशी बांधून मी निवांतपणे साडेदहा अकराच्या सुमारास साळुंखे वाड्यापर्यंत गेलो. माझ्या आधीच चाळकरी मंडळी त्या ठिकाणी हजर होती. साळुंखे वाड्यात दोन जिने आहेत, दारातून आत गेल्यावर समोरच पहिल्या मजल्याचा जिना. आपण आलो आहोत हे सईला कळावे म्हणून मी दबकत दबकत मांजराच्या पावलांनी जिना चढून पहिल्या मजल्यावर गेलो, आणि लगेचच दुसर्या जिन्याने खाली उतरू लागलो आणि दचकलोच- बापरे! सई अंगणात खुर्चीवर बसून केसावरून कंगवा फिरवीत हातातील स्क्रिप्टवर रंगीत पेनाने खुणा करीत होती. तिला भेटण्याचे काही धाडस मला झाले नाही. मी तसाच एकेक पाय मागे टाकीत अत्यंत दबक्या चालीने जिना उतरलो आणि बाहेर येऊन सहकलाकरांच्या समूहात सामील झालो. आमच्या शॉटसाठी आम्हाला जेव्हा बोलवले त्यावेळी मी असा काही मूक अभिनय केला की मी वेळेआधीच हजर आहे, पण कानाला खडा लावला, उशिरा शूटिंगला जाणे सईच्या बाबतीत नाही म्हणजेच नाहीच.
’कथा’ चित्रपट हिंदी होता. साळुंखे वाड्यातील शूटिंग हा एक अपूर्व अनुभव होता. योजकतेची कमाल होती. त्या चाळीत बांबूचे पहाड बांधले होते, त्यावर फळ्या टाकून शूटिंग चालायचे. सईने सर्व चाळीलाच कलाकार बनविले होते आणि समूहदृश्यात समाविष्ट केले होते, त्यावर एक वेगळेच प्रकरण होईल. ’कथे’मध्ये माझा एक वेगळ्या प्रकारे सहभाग होता. सईला जास्वंदी फुलाचे प्रचंड आकर्षण. ’कथा’मधील नायिकेच्या (दीप्ती नवल) केसात माळलेलं जास्वंदीचे फूल हे आमच्या ’उमेश’ बंगल्यातील बागेत फुललेलं आहे. माळी मी आणि केसात फूल माळणारा हिरो वेगळाच! फारुक शेख. असते एकेकाच्या नशिबात. कपडेपटातही मी अल्पसा सहभागी आहे. त्यावेळी मी बहुतेक खादीचे कपडे वापरायचो. शाळेत खादीची शर्ट-पॅन्ट आणि इतर वेळेला खादीचा लेंगा-झब्बा. नायक नसरुद्दीन शहा यानं वापरलेला लेंगा-झब्बा माझा आहे. कपडेपटाची प्रमुख राणी सबनीस (लेखक वसंत सबनीस यांची कन्या) हिने तो माझ्याकडून मागून घेतला होता. ’कथा’त मी छोटसेच काम केले, पण अभिनयापेक्षा शिस्त म्हणजे काय, याचीच अधिक चव घेतली.
शूटिंगच्या पॅकअपच्या दिवशी प्रत्येक कलाकाराच्या हाती उद्याच्या कार्यक्रमाची पत्रिका पडायची. त्यात प्रत्येक विभागाची शॉट क्रमांक, कलाकार, वेळ याची माहिती आणि ब्रेकफास्टला काय, जेवणात काय आहे, संध्याकाळी नाश्त्याला काय, रात्रीचे किती लोक जेवणासाठी आहेत याची सविस्तर माहिती असायची. एखादी गोष्ट समूहाने साकारताना शिस्तबद्ध नियोजन किती नितांत गरजेचे असते याचा वस्तुपाठच यातून मिळायचा. तो मला ’कथा’रूपाने सईच्या दिग्दर्शनामुळे मिळाला.

`अंगुठा छाप’ हा साक्षर व्हा असा संदेश देणारा सईचा अनुबोधपट. त्यातही मला काम करण्याची संधी मिळाली. यासंबंधी सईने नुकतेच राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ’साथसंगत’ पुस्तकात काय लिहिले आहे ते वाचा…
`पुण्याचे श्रीराम रानडे, हे पीएसपीडीएच्या जमान्यापासून माझे स्नेही होते. ते आता पुण्याला एक उत्तम शिक्षक म्हणून गणले जात होते. याखेरीज नाटक, चित्रपट आणि समाजसेवेच्या कार्यातही ते व्यग्र असतात. श्रीराममुळे आम्हाला खूप छान बालकलाकार मिळाले. पराग देशमुख या आपटे प्रशालेच्या विद्यार्थ्याला आम्ही चिखलूसाठी निवडले. शिवाय या शाळेतील शंतनू पांडे, गणेश पोकळे आणि इतर दोघं तिघं महत्त्वाच्या भूमिकांमधून चमकले. गुरुजींची भूमिका श्रीराम रानडेनी निभावली.’ (सयसंगत राजहंस प्रकाशन पृष्ठ क्रमांक १२२.)
यातील आजोबांची भूमिका भोलाराम आठवले या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकाराने अतिशय अप्रतिमपणे साकारली आहे. माझ्यासारख्या कलावेड्या माणसाला `अंगुठा छाप’च्या निमित्ताने रानडे परिवाराच्या किवळे गावातील वाड्यात सहभाग लाभला, ही खरोखरच माझ्या भाळी लिहिलेली भाग्यरेषाच. किती आठवणी, किती अनुभव, केवढा दीर्घ कलाप्रवास. अंगुठा छापमधील कलाकारांची जुळवाजुळव सुरू होती. त्याच काळात सई मला आणखीन, एका ’आठवले’ यांच्याकडे घेऊन गेली होती. ते आठवले कोण? तर पुण्याच्या आपटे पथावरील वेदिका आश्रमात राहणारे डॉक्टर. आप्पा आठवले (एम.ए.एम.एस.सी.एच.डी). हे माझ्या मामी उषाताई वसंत महाबळ यांचे बंधू. मूळ सांगलीचे. `अंगुठा छाप’मध्ये भूमिका कराल का? अशी विचारणा करण्यासाठी आम्ही त्यांच्या ब्रह्मचार्याच्या मठीत (ते अविवाहित होते) गेलो होतो. एकेकाळी ’किचका’ची भूमिका करणारे अप्पा दम्याचा विकाराने हैराण झाले होते. त्यांना सईने विनंती केली. दगदग होणार नाही, सर्व सीन्स बसूनच आहेत असे सांगितले. पण त्यांनी ठाम नकार दिला. माझा दमा उफाळून केव्हा धापा टाकायला लागेल हे सांगता येत नाही. तुमची फार पंचाईत होईल. सईला कदाचित हे आठवले आज आठवत नसतील, पण या प्रसंगाचा मी साक्षीदार आहे. मला चांगलेच आठवते आहे.
अंगुठा छाप’च्या शूटिंगच्यावेळी ’बी प्रोफेशनल’ हा कडक शब्दांत सईने दिलेला कानमंत्र आजही मला लख्ख आठवतो. मी शाळेत वर्गावर शिकवत असतो आणि एक खेडूत पालक आपल्या बागेत पिकलेला भला मोठा भोपळा घेऊन शाळेत येतो आणि मला वर्गाबाहेर बोलावून हा भोपळा तुम्ही घ्या, अशी विनंती करतो. शाळेच्या पटांगणात हा प्रसंग चित्रित होणार होता. शूटिंगची वेळ सकाळची होती मी शरद विंझे (हे सईचे/ शकुंतलाबाईंचे उत्तम मित्र, माझ्या नात्यातील) काही विद्यार्थी असा तो सीन होता. सई आम्हाला सीन समजावून सांगत होती. बाकीच्या तंत्रज्ञान मंडळीचे कॅमेरे, लाईट्स, साऊंड यांची तयारी सुरू होती. अचानक माझं लक्ष दुसरीकडेच गेलं. आणि कानावर कडक शब्द आदळले, “श्रीराम, बी प्रोफेशनल’ सईने मला सगळ्यांसमोर झापलं होतं. मांजरीनं नाकावर पंजा मारावा तसे ते शब्द मला रक्तबंबाळ करून गेले. काही क्षणातच तितक्यात समजावणीच्या स्वरात कानी पडले, `श्रीराम लक्षात ठेव, आपल्याकडे वेळ कमी असतो अनेकांना बरोबर घेऊन काम पूर्ण करायचे असते.’ मी माझी समजूत घातली. आपले सर्व लक्ष त्या गोष्टींकडे केंद्रित केले पाहिजे. बी प्रोफेशनल याचा आणि तुम्ही व्यावसायिक की हौशी, किती पैसे घेता की मुळीच घेत नाही याचा काहीही संबंध नाही. ज्या क्षणी जे काम हाती घ्याल. त्या क्षणी दुसरा कोणताही व्यवहार बाजूला ठेवून फक्त त्या आणि त्या गोष्टीवरच लक्ष केंद्रित करायचं. मी `बारा पिंपळावरील मुंजा’, `रमलो मी’ वृत्तीचा… अजून तरी सईचा ‘बी प्रोफेशनल’ हा कानमंत्र माझ्या आचरणात आलेला नाही.

एके दिवशी सकाळी सईचा मोबाईल आला. ‘मी सई बोलतेय! अरे, विनीला (तिच्या मुलीला) माझ्याकडून काही माहिती हवी होती, तिच्याशीच बोल.’ विनी म्हणाली, ‘रामकाका, मी शाळेत असताना वर्गातल्या एका मैत्रिणीने ग.दि. माडगूळकरांचं गाणं गायले होते.
`उठ पंढरीचा राजा, वाढ वेळ झाला’
`थवा वैष्णवांच्या दारी, दर्शनासी आला’
त्या गीताचे सर्व शब्द हवे आहेत. तुझ्याकडे आहेत का?’ मी क्षणात हो असे सांगितले. ‘ते पूर्ण गीत मला तोंडपाठ आहे. संपूर्ण गीत लिहून मी तुला काही वेळातच पाठवतो…’ मागोमाग सईचे शब्द कानीही पडले. ‘बघ विने, माझी निवड चुकली नाही, श्रीरामला नक्की माहित असणार. माझी निवड चुकली नाही…’ ही पाठीवर पडलेली कौतुकाची थाप माझी छाती फुगवून गेली.
सईचे मराठी भाषा प्रेम वाखणण्यासारखं आहे. वास्तविक तिला अनेक भाषा अवगत आहेत. भारतातील आणि जगातील अनेक प्रांतात तिची भ्रमंती झालेली आहे. त्या त्या प्रदेशातील भाषा ती बोलू शकते, लिहू शकते, वाचू शकते. पण तितकीच तिची मराठीवरील पकड मजबूत आहे. आणि मराठी वापरण्याविषयी ती आग्रही आहे. ती अभिमानाने सांगते, मराठीमध्ये मी जी जी बालनाट्यं लिहिली, त्यापैकी एकाही नाटकाचे शीर्षक इंग्रजी नाही. सई अशी भाग्यवान आहे की, तिचे पहिले पुस्तक ती आठ वर्षाची असताना प्रकाशित झालं. पुस्तकाचं नाव `मुलांचा मेवा.’ तेव्हापासून सई अनेक वाङ्मयप्रकारांतून, माध्यमांतून प्रकट होतेच आहे. ‘सय’ या राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या मलपृष्ठावरील मजकूर जसाच्या तसा उद्धृत करण्याचा मोह मला आवरत नाही.
’हे आत्मकथन आहे. जगातल्या अनेक गोष्टींना एखाद्या उत्साही मुलीच्या अवखळ कुतूहलाने सामोरे जाणार्या एका प्रतिभावंत मनस्विनीचे.
आकाशवाणीपासून दूरचित्रवाणीपर्यंत बालनाट्य आणि प्रायोगिक रंगभूमीपासून ’जास्वंदी’, ’सख्खे शेजारी’ अशा गाजलेल्या नाटकांपर्यंत, अनोख्या डॉक्युमेंटरीपासून ’चष्मेबद्दूर’, ’कथा’, ’दिशा’, ’स्पर्श’, ’साज’ अशा अनवट चित्रपटांपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये स्वतःची अमीट छाप उमटवणारी ही बहुआयामी प्रतिभावान कलाकार… सई परांजपे! मिष्कील आणि,मनस्वी प्रेमळ आणि फटकळ, नर्मविनोदी आणि स्पष्ट व्यक्ती आग्रही आणि पारदर्शी सईच्या व्यक्तिमत्त्वाचे असे विविध पैलू ओळखणारे आत्मकथन!
`सध्या मांजरं’ घरात राहतात आणि रानडे जिन्याखाली, या माझ्या धाकट्या कन्येने डॉक्टर आरती रानडे हिनं लिहिलेल्या `सफर प्रयोगशाळेतल्या प्राण्याच्या विश्वाची’ या लेखातील पहिलेच वाक्य वाचून सई बेहद्द खुष! परांजपे आणि मांजरीवर प्रेम हे अद्वैत आहे. आणि माझ्या परिवारातील मी अपवाद सोडून सर्वांची ’मांजरमाया’ ही अफाट आहे. सईच्या प्रत्येक चित्रपटात मांजर असणारच आणि माझ्या घरातही तोच प्रकार. मला मात्र मांजर, कुत्रे फारसे आवडत नाहीत. त्याबाबतीत सई परांजपे आणि ’उमेश’ या बंगल्यातील इतर विरुद्ध मी असा उघड उघड सामना आहे. परदेशातील मुली, जावई,नात-नातू यांचा मांजराबद्दलचा जिव्हाळा आणि उमाळा काही आगळाच. माझी ’उमेश’ ही वास्तू म्हणजे मांजरासाठी प्रसूतिगृह आणि ’उमेश’ची मागील भागातील जागा म्हणजे मांजराची दफनभूमी. प्रसूतिगृहात मला काहीच करायचं नसते. पण डोळे उघडल्यानंतर कापसाच्या गोळ्यासारखी दिसणारी मांजरीची पिल्लं जेव्हा पायात घोटाळायला लागतात, तेव्हा त्यांना चुकवता चुकवता आपणच धडपडून पडू अशी साधार भीती वाटते. आणि रस्त्यावर भटकणार्या कुत्र्यांकडून एखाद्या मांजराचा फडशा पडतो, तेव्हा त्यांचा दफनविधी उरकताना जीव मेटाकुटीला येतो. पण ’नाईलाज पर क्या इलाज’ आहे? मांजरावर माझं प्रेम नसलं तरी मांजरांवर जिवापाड प्रेम करणार्या सई परांजपे आणि माझ्या सर्व परिवारावर माझं अतूट प्रेम आहे. त्या प्रेमाबद्दल मला मांजरांबद्दलची नावड बाजूला ठेवावी लागते आणि त्यातच मला समाधान आहे.
