भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला दिवसेंदिवस लागणारं चित्रविचित्र वळण पाहून माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या हल्ली खूप विचारात पडलेला दिसतो. महाराष्ट्राची इतकी नाचक्की करणारा कामपिसाट भोंदूबाबा महाराष्ट्रात अजूनपर्यंत निर्माण झाला नव्हता, ती उणीव या खरातने भरून काढली, असं पोक्याचं मत आहे. त्याने जमवलेली अब्जावधीची माया आणि महिलांसोबत केलेली गैरकृत्ये दडपून टाकण्याचा प्रयत्न कोणी कसा केला याचा भांडाफोड होईलच आणि संबंधित गोत्यात येतील, त्याआधीच खरातला संपवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा पोक्याचा कयास आहे. तरी महाराष्ट्राच्या बुवाबाजीच्या इतिहासातील एक काळेकुट्ट पान म्हणून खरात फायलीचा उल्लेख होईल आणि आयएएससारख्या परीक्षेतही एक खास पेपर खरात फायलीवर असेलच असा पोक्याचा ठाम विश्वास आहे. योगायोगाने आठ दिवसांत या प्रकरणाचा अभ्यास करून लातूरच्या एका तज्ज्ञ परीक्षकाने तयार केलेली प्रश्नपत्रिका पोक्याच्या हाती लागली. ती वाचून मीही चक्रावलो. तीच ही प्रश्नपत्रिका-
१) खालील कोणत्याही विषयावर निबंध लिहा.
अ) दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये.
ब) खरातबुवाचे अंकशास्त्र.
क) बुवा तिथे बाया.
ड) खरातबाबाचे हिप्नॉटिझम व वशीकरण शास्त्र.
इ) खरातबुवाचे लकी टेबल.
२) खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
अ) खरात प्रकरणाला वाचा कशी फुटली?
ब) खरात प्रकरण दाबण्यात कुठल्या नेत्यांनी पूर्वीपासून मदत केली?
क) कोणकोणत्या राजकीय नेत्यांनी खराबुवाच्या तीर्थप्रसादाचे भक्षण केले?
ड) महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षांनी खरातला वाचवण्यासाठी किती अपार मेहनत का व कशी घेतली?
इ) खरातबुवा प्रकरणात कोणत्या राजकीय पक्षाचे नेते सर्वात जास्त गुंतलेले होते?
फ) खरातबुवा प्रकरणापासून आजच्या तरुण पिढीला, विशेषत: तरुण-तरुणींना कोणता धडा घेता येईल?
भ) पुढच्या शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सावध करण्यासाठी अभ्यासक्रमात कोणत्या ढोंगी बाबांच्या चरित्रांचा त्यात समावेश करावा?
म) खरातवर येणार्या आगामी मराठी चित्रपटाचे नाव व त्यातील सौंदर्यवती हिरॉईन कोण असेल?
३)सविस्तर टीपा द्या
१) खरात बुवाची देश-परदेशातील संपत्ती.
२) खरात बुवाच्या कारस्थानांना बळी पडलेल्या पीडित महिलांची संख्या.
३) रत्न म्हणून लाखो रुपयांना चिंचोके विकण्याचा खरात बुवाचा धंदा.
४) पॉवर वाढवणार्या मधाची लाखो रुपयांना विक्री करण्याची किमया.
५) खरातचा कर्दनकाळ नीरज जाधव.
६) खरातने पुढार्यांना दिलेले सल्ले.
७) खरातचा ऑस्ट्रेलियात पळून जाण्याचा फसलेला डाव.
८) स्त्रियांना वश करून त्या धनिकांना पुरवण्याचा खरातचा व्यवसाय.
९) मी नाही त्यातली, कडी लावा आतली.
१०) थर्ड डिग्री.
११) खरातच्या शक्तिवर्धक औषधांची नावे.
४)पुढील गाणे कोणत्या नाटकात आहे?
गळ्यात माळा, टिळा कपाळा
भजन सांगतो गोड गळा
दिसतो साधू, असतो भोंदू
अंगात त्याच्या नाना काळा
५)कल्पनाविस्तार करा
१) अनामिकेचे रहस्य २) गोहातीतील भगतगिरी ३) या छत्रीखाली दडलय काय? ४) ज्योतिष-एक शास्त्र-एक कला.
५) इराण-अमेरिका युद्ध आणि खरात बाबा. ६) मंतरलेल्या वस्तू पुरण्याच्या जागा.
७) सौंदर्याचे कुरूप रूप. ८) सरपंच देशमुख हत्या प्रकरण आणि खरात प्रकरण तुलना.
९) खरात बाबाने घेतलेले कथित नरबळी १०) आज अजितदादा असते तर!
६)एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात आलेले एका वाचकाचे मोबाईलधारकांबद्दल संताप व्यक्त करणारे हे पत्र वाचून हा पत्रलेखक खरोखरच संस्कृतीरक्षक आहे की केवळ प्रसिद्धीसाठी पत्र लिहीत आहे हे त्या पत्राला योग्य उत्तर देऊन स्पष्ट करा.
सध्या भोंदूबुवा खरात प्रकरण वृत्तपत्रे, टीव्ही चॅनल्स, इतर प्रसारमाध्यमे आणि मोबाईलवरूनही गाजत आहे. अनेक मोबाईलधारकांवर त्याचा अनिष्ट, वाईट परिणाम होत आहे हे मी अनुभवाने सांगतो. दोन-तीन तास मोबाईलला हातही न लावणारे मोबाईलधारकही आता खरातच्या विविध कारनाम्यांच्या क्लिप्स चवीने बघत असतात. त्यावर कॉमेंटही केल्या जातात. माझ्या मते हा सारा किळसवाणा प्रकार ताबडतोब थांबवण्याची गरज आहे. एकदा का अशा विकृत गोष्टी पाहण्याची चटक लागली की तिचे रूपांतर सवयीत होते. म्हणून खरातच्या क्लिप्स दाखवण्यावर बंदी घाला, अशी विनंती नव्हे तर आग्रह मी सरकारला करीत आहे. मोबाईल एकीकडे चांगल्या उपयुक्त माहितीचा खजिना आहे. पण या खरातबुवाचा प्रसारमाध्यमात प्रवेश झाल्यापासून त्याच्या काळ्या कृत्यांची आणि अश्लील वर्तनाची माहिती अश्लील दृश्यांसह देऊन कोणते जनहित साधले जाते, हे कळत नाही. उत्सुकतेपोटी सर्व वयोगटातील बहुसंख्या मोबाईलधारक ही दृश्ये पाहतात तेव्हा त्यांच्याविषयी चिंता वाटते म्हणून हा पत्रप्रपंच.
– बाबू खैरमोडे, वणी
७)सेक्सॉलॉजिस्टची प्रतिक्रिया
खजुराहो येथील प्रसिद्ध मराठी सेक्सॉलॉजिस्ट डॉ. मदन घायकुते यांची खरातच्या एकंदर दिव्य पराक्रमाबाबतची मते वाचून त्यावर आपली थोडक्यात प्रतिक्रिया द्या.
डॉ. मदन घायकुते : हे प्रकरण माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडले आहे. त्या अमेरिकेच्या एपस्टीननेही इतके गैरप्रकार महिलांसोबत केले नसतील. बायांना नादी लावणारा बुवा एवढ्यापुरताच खरात मर्यादित नव्हता तर भारतीय पुराणांपासून आजपर्यंत कोणत्याही ढोंगीबुवाने केले नसतील इतके स्त्रियांचे शोषण या खरात बुवाने केलेले आढळते. आज वात्सायन असता तर त्यानेही कपाळावर हात मारून घेतला असता.

