
एके घाई खेळता न पडसी डाई।
दुचाळ्याने ठकसील भाई रे।
त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होसी ।
या चौघांची तरी धरी सोई रे।।१।।
खेळ खेळोनियां निराळाचि राही।
सांडी या विषयाची घाई रे।
तेणेचि खेळे बसवंत होसी।
ऐसे सत्य जाणे माझ्या भाई रे।।२।।
सिंपियाचा पोर एक खेळिया नामा।
तेणे विठ्ठल बसवंत केला रे।
आपुल्या सवंगडिया सिकवूनि घाई।
तेणे सतंतर फड जागविला रे।
एक घाई खेळता तो न चुके चि कोठे।
तया संत जन मानवले रे।।३।।
ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा।
सोपान आनंदे खेळती रे।
कान्हो गोवारी त्यांनी बसवंत केला।
आपण भोंवती नाचती रे।
सकळिका मिळोनि एकचि घाई।
त्याच्या ब्रम्हादिक लागती पायी रे।।४ ।।
रामा बसवंत कबिर खेळिया।
जोडा बरवा मिळाला रे।
पांचा सवंगडिया एकचि घाई।
तेथे नाद बरवा उमटला रे।
ब्रम्हादिक सुरवर मिळोनिया त्यांनी।
तो ही खेळ निवडिला रे।।५।।
ब्राम्हणाचा पोर खेळिया एका भला।
तेणे जन खेळकर केला रे।
जनार्दन बसवंत करूनिया।
तेणे वैष्णवांचा मेळ मेळविला रे।
एक चि घाई खेळता खेळतो।
आपणचि बसवंत जाला रे।।६।।
आणिक खेळिये होउनिया गेले।
वर्णावया वाचा मज नाही रे।
तुका म्हणे गडे हो हुशारूनि खेळा।
पुढिलांची धरूनियां सोई रे।
एकचि घाई खेळता जो चुकला।
तो पडेल संसारडाई रे ।।७ ।।
या अभंगात वारकरी संप्रदायातील संतांची परंपरा खेळाच्या रूपकातून सांगितलेली आहे. आपण त्या अभंगाचं निरुपण करताना मागच्या भागात ज्ञानोबाराय आणि नामदेवरायांविषयी तुकोबांनी केलेली मांडणी पाहिलेली आहे. त्यानंतर कबीरांची मांडणी पाहत होतो. वारकरी संप्रदायात जे कबीरपंथी महंत होऊन गेले त्याचा आढावा घेतला. वारकरी संप्रदायाशी संबंधित आणखी एक कबीरपंथी महंत म्हणजे ज्ञानगिरीबुवा. हे ज्ञानगिरीबुवा मूळचे आजच्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील नेऊरगावचे. त्यांची स्वतःच्या मालकीची १०० एकर जमीन होती. त्याच जमिनीत गोदावरी नदीकाठी त्यांचा एकरभर जागेत एक कबीरपंथी मठ होता.
ज्ञानगिरीबुवा अधून मधून पुण्याला जात असत. पुण्यातल्या कबीरपंथी मठात त्यांचं जाणं-येणं असायचं. याच काळात त्यांचा महात्मा फुल्यांशी संपर्क आला. ज्ञानगिरीबुवा महात्मा फुले आणि त्यांच्या सहकार्यांना कबीरांच्या बिजक या ग्रंथातील विप्रमतीसी हा भाग वाचून दाखवत. या भागात कबीरांनी ब्राह्मणांच्या आचार-विचारांची जोरदार आणि परखड चिकित्सा केलेली आहे. तो ग्रंथ मूळ ब्रज भाषेत असल्यानं ज्ञानगिरीबुवांनी त्याचा मराठीत अनुवाद केला. ज्ञानगिरीबुवांनी अभंगरचनाही केलेली आहे. त्यातील मोजकी अभंगरचना आज उपलब्ध आहे. ज्ञानगिरीबुवांच्या या अभंगांवर वारकरी संतांच्या विशेषतः तुकोबारायांच्या अभंगांची छाप आहे. ‘चित्तशुद्धीसाठी व्हावी हरिभक्ती। ऐशी आहे उक्ती तुकोबाची।।’ अशी एक ओळ त्यांच्या अभंगात आढळते. त्याचबरोबर त्यांच्या आणखी एका अभंगातही अनेक बहुजन जातीतल्या वारकरी संतांचे उल्लेख आलेले आहेत. खरा ब्राह्मण हा जन्मावर नव्हे तर कर्मावर ठरतो अशी एक भूमिका जातिविरोधी प्रवाहात सतत आढळते. त्यालाच अनुसरून वारकरी संप्रदायातील संतांनीही ‘ब्रह्म जाणतो तोच खरा ब्राह्मण’ अशी भूमिका काही ठिकाणी घेतलेली आहे. साहजिकच या भूमिकेचा परिणाम म्हणून बहुजन समाजातील संतच खरे ब्राह्मण होते, असा आशय असणारे संतांचे अभंग आहेत. तशाच आशयाचे ज्ञानगिरी बुवांचेही अभंग आहेत. आता याच आशयाचा तुकोबारायांचा एक अभंग आणि हा अभंग यातील आशय आणि रचना या दोन्ही बाबतीत किती एकरूपता आहे हे आपल्या लक्षात येईल.
ब्राह्मण तो एक नरहरी सोनार।
ज्यासाठी शंकर माथा वाहे।।१।।
ब्राह्मण तरी एक सजन कसाई।
चक्रधारी गृही मांस विकी।।२ ।।
तुका म्हणे ब्रह्म जाणे तो ब्राह्मण।
येरा ते नमन करा परते।।३।।
आता ज्ञानगिरीबुवांच्या अभंगातील काही चरण पहा…
ब्राह्मण म्हणावा महार तो चोखा।
ज्याचा निजसखा पांडुरंग।।
ब्राह्मण म्हणावा सजन कसाई।
साह्य शेषशाई असे ज्यासी।।
ब्राह्मण म्हणावा सोनार नरहरी।
घडीफुंकी हरी त्याच्या सवे।।
ब्राह्मण म्हणावा नामदेव शिंपी।
भक्तिरस शिंपी जनावरी।।
ज्ञानगिरी जे का ब्रह्म जाणणार।
तया नमस्कार येरा नाही।।
ज्ञानगिरी बुवांचा हा अभंग मोठा आहे. यातील संतांचे उल्लेख त्यांनी तुकोबारायांच्या अभंगावरूनच केलेले आहेत हे उघड आहे. ज्ञानगिरी बुवांचे इतर अभंग वाचताना अभंगाच्या अखेरची ओळ वाचल्यावरच तो अभंग ज्ञानगिरीबुवांचा आहे हे कळतं. एरवी ज्ञानगिरी बुवांचे अभंग वाचताना आपण तुकोबारायांचे अभंग वाचत आहोत असं वाटतं. कुंभमेळा, सोवळे-ओवळे, तीर्थयात्रा, उच्चनीचता, यज्ञयागादी कर्मकांड आणि इतरही अशा अनेक बाबींची चिकित्सा करणारे ज्ञानगिरी बुवांचे अभंग आहेत. ते कबीरपंथी मठाचे महंत होते आणि म्हणूनच त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. महाराष्ट्रातील बहुतेक कबीरपंथी महंत वारकरी सांप्रदायिकच असतात. संप्रदायातील कबीरांचा हा प्रभाव आपल्याला तुकोबारायांच्या प्रस्तुत अभंगामुळे समजतो.
तुकोबाराय या अभंगात कबीरांनी रामाला बसवंत केलं असं म्हणतात. इथे काहीजण रामा म्हणजे रामानंद असं समजतात. वास्तविक पाहता आधीच्या दोन चरणांचा संदर्भ पाहता रामा बसवंत केला म्हणजे कबीरांच्या निर्गुण आत्मारामाचा उल्लेख आहे. आधीच्या दोन चरणात तुकोबारायांनी नामदेव आणि ज्ञानदेवांच्या गुरूंचा नव्हे तर त्यांच्या उपास्य दैवतांचा उल्लेख केला आहे. यावरून कबीरांनी ‘रामा बसवंत केला’ यातील रामा म्हणजे रामानंदांचा नव्हे तर निर्गुण आत्मारामाचा उल्लेख केलेला आहे. कबीरांनी रामाला बसवंत केल्यामुळे त्यांची जोड चांगलीच जमली असं तुकोबाराय म्हणतात. कबीरांनी त्यांच्या भजनाच्या जोरावर सारा आसमंत घुमवून टाकला. इथे तुकोबारायांनी त्या काळात ऐकलेल्या कबीरपंथी भजनांचा संदर्भ असावा. कबीरपंथी भजनातील गोडी भल्याभल्यांना मोहून टाकणारी आहे. त्यामुळेच तुकोबारायांना त्या कबीरपंथी भजनावरून कबीरांच्या भजनाची कल्पना आली असणार. ब्रह्मादिकांनाही गोड लागेल असं भजन कबीरांनी केलं हे तुकोबाराय सुचवतात. तुकोबाराय म्हणतात की कबीरांनी ‘पाचा सवंगडीया एकची घाई’ भजन केलं. हे पाच सवंगड्याचे भजन म्हणजे त्यांचे चार सवंगडी आणि एक स्वतः कबीर असं म. वा. धोंड म्हणतात. त्यांनी त्या चार कबीरशिष्यांची नावं दिलेली आहेत. त्यात चत्रभुज, बंकेजी, सहेतजी आणि धर्मदास आहेत. म. वा. धोंड यांचं हे विवेचन योग्य वाटतं. फारतर धोंडांनी दिलेली नावं तुकोबारायांना अभिप्रेत असतील असं ठामपणे म्हणता येणार नाही. कदाचित चार नावांऐवजी पाच नावंही असू शकतील. धोंडांनी दिलेल्या कबीरांच्या प्रमुख चार शिष्यांखेरीज सुरतगोपाल हे नावंही कबीरपंथीय मंडळीत फार महत्त्वाचं आहे. त्यांनीच कबीरांनंतर काशीत कबीरपंथाची गादी चालवली आणि कबीरपंथ पुढे वाढवला. त्यामुळे पाच सवंगडी म्हणजे कबीरांचे सहकारी हे उघड आहे. पण या पाच सवंगड्याचा अर्थ लावताना वै. शंकर महाराज खंदारकर यांनी हे पाचजण म्हणजे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि सीता असावेत असं सांगितलं आहे. वास्तविक पाहता आधीच्या चरणात तुकोबारायांनी ज्ञानदेवांच्या सोबत्यांची नावं सांगितली आहेत. त्याचबरोबर पूर्ण अभंगात संतांच्या सोबत्यांवर भर दिला आहे. मुळात हा अभंग खेळियाचा असल्यानं यात सवंगड्याचा उल्लेख आहे. त्यावरून कबीरांचे ‘पाचा सवंगडीया’ म्हणजे कबीरांचे सोबती असा म. वा. धोंड यांनी लावलेला अर्थ बरोबर आहे.
तुकोबाराय या अभंगात एकनाथांच्या कार्याचीही विशेषता सांगतात. तुकाराम महाराजांचा काळ हा एकनाथरायांच्या लगतचा उत्तरकाळ आहे. एकनाथ महाराज १५९९ साली समाधिस्थ झाले. त्यानंतर ९ वर्षांनी म्हणजे १६०८ साली तुकोबारायांचा जन्म झाला. त्यामुळे एकनाथांच्या कार्याचा परिचय तुकोबारायांना जवळून झाला असणार. एकनाथरायांना पाहिलेले काही लोक तुकोबारायांच्या काळात हयात असणार. त्यामुळेच तुकोबारायांनी केलेलं एकनाथ महाराजांचं वर्णन महत्त्वाचं आहे. तुकोबाराय एकनाथांनी जन खेळकर बनवला असं ते म्हणतात. जन खेळकर बनवला असं म्हणण्याचं कारण म्हणजे एकनाथांनी रुजवलेला भारुड हा प्रकार. एकनाथांनी भजनी भारुडाचा प्रकार अधिक रुढ आणि लोकप्रिय केला. भारुडात नाट्य आणि कवित्वाचा अद्भुत संगम आहे. त्यामुळे एकनाथांनी मनोरंजनातून अध्यात्म आणि सामाजिक प्रबोधन केलं. ते विविध बहुजन जातीजमातीच्या लोकात मिसळले. त्यांच्या व्यथा-वेदना त्यांनी रूपकातून लोकांसमोर आणल्या. त्यामुळेच तुकोबाराय सांगतात की एकनाथांनी वैष्णवांचा मेळा मेळविला. एकनाथांच्या भारुड आणि कीर्तनासाठी भरपूर लोक जमत होते. या लोकांच्या मनात वारकरी संप्रदायाची आवड निर्माण करून त्यांनी वैष्णवांचं संघटन केलं.
तुकोबाराय म्हणतात की एकनाथांनी जनार्दनाला बसवंत केलं. इथे जनार्दन म्हणजे एकनाथांचे गुरू जनार्दन स्वामी आहेत की ईश्वराचे पर्यायी नाव जनार्दन आहे याचा उलगडा होत नाही. कारण या अभंगाच्या तिन्ही चरणात तुकोबारायांनी संतांसोबत बसवंत म्हणून त्यांच्या त्यांच्या आराध्य दैवतांचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे एकनाथ महाराजांसोबत बसवंत म्हणून त्यांनी जनार्दन असा केलेला उल्लेख नेमका कोणाचा हे समजत नाही. तरीही नाथांची गुरुभक्ती पाहता हा उल्लेख जनार्दन स्वामींचा असावा.
तुकोबाराय या अभंगातून चार प्रमुख खेळियांचा निर्देश करतात. त्याचबरोबर इतरही खेळिया असल्याचं सांगतात. हा खेळ हुशारीने खेळा असं सांगून लोकांना सावध करण्याचं काम तुकोबाराय करतात. या अभंगात तुकोबारायांनी खेळाचं रूपक वापरून वारकरी संप्रदायाचा इतिहास सांगितला आहे. तो फार मार्मिक आहे. आपण सहजपणे एखाद्या फालतू प्रकाराला पोरखेळ म्हणतो. पण खरं म्हणजे पोरखेळातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात. खेळ निखळ आनंदासाठी खेळला जातो. त्याचा कोणताही इतर हेतू नसतो. त्याप्रमाणे वारकरी संप्रदायाचा हेतूही आनंदी समाज बनवणं हाच आहे. तुकोबाराय सांगतात, त्याप्रमाणे वारकरी संप्रदाय हा एक अखंड खेळ आहे. खेळात जशी सांघिकता, एकता आणि समता असते तशीच वारकरी संप्रदायातही आहे. वारकरी संतांनी संस्थात्मक काम केलं नाही असा एक आक्षेप सतत घेतला जातो. पण त्यात तथ्य नाही.
वास्तविक पाहता वारकरी संप्रदाय हीच एक लोकसंस्था आहे. तुकोबारायांनी ही लोकसंस्था खेळाच्या रूपकातून सांगितली आहे. खेळात जसा एक कप्तान असतो आणि बाकी त्याचे शिष्य नव्हे तर सवंग्ाडी असतात, त्याप्रमाणे वारकरी संप्रदायातील तुकोबारायांनी सांगितलेले हे प्रमुख संत म्हणजे कप्तान आणि त्यांचे सोबती संत म्हणजे सवंगडी आहेत. वारकरी संप्रदाय ही लोकसंस्था असल्यानं इथे लोकसंग्रहाला महत्त्व आहे. इथे कोणताही पदानुक्रम नाही. सगळे समान आहेत. त्यामुळेच ही लोकसंस्था अजूनही टिकून आहे.
वारकरी संप्रदायाने लोकसंग्रहाचं तत्त्व स्वीकारलं आहे त्याचा प्रत्यय या अभंगातून येतो. वारकरी संप्रदायातील या प्रमुख संतांनी केलेलं संघटन तुकोबाराय इथे उलगडून दाखवतात. वास्तविक पाहता वारकर्यांची भक्ती ही सामूहिक भक्ती आहे. वारी, भजन आणि कीर्तन हे सगळं सामूहिक आहे. देव एकट्याला मिळेल पण त्यासाठी वेळ लागतो. याउलट सामूहिक भक्तीने देव हाकेसरशी येतो अशी तुकोबारायांची मांडणी आहे. तुकोबाराय म्हणतात
एकलीया भावबळे। सापडे तो कै काळे ।।
वैष्णवांच्या मेळे। उभा ठाके हाकेसी ।।
हा अभंग म्हणजे वारकरी संप्रदायाच्या लोकसंग्रहाच्या प्रेरणेचा भक्कम पुरावा आहे.

